श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट झाल्यावर घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की, "त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून क्षणाचे महत्त्व समजून घे ."
रामाच्या त्या बोलण्याने लक्ष्मण संभ्रमित झाला.ज्याचा आपण शत्रू म्हणून नाव केला.त्याच्याकडून कांहीं समजून घ्यायचं? शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, त्वरा कर अन्यथा रावणाच्या अंताबरोबरच हे 'क्षणाचं महत्व' सुध्दा कायमचे अंत पावेल. भावाची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मण अखेर मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाकडे गेला.रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली. त्याने लक्ष्मणाला सांगितले की, त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्श करून गेले ते सोन्याचे झाले, मधले रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले.
रावण म्हणाला, हे आहे क्षणाचे महत्त्व. "क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर . प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे.तो क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे.
मित्रहो, नुकताच रामायणातील हा लहानसा प्रसंग वाचण्यात आला अन् 'क्षण' या एकाच शब्दावर लक्ष केंद्रीत होऊन मनांत विचारांचं अक्षरशः काहुर माजलं . विविध भाषांमध्ये हा शब्द पल, निमीष, a moment, आदि विविध प्रकारे वापरला जातो. परंतु सर्व भाषांमध्येच नाही तर समस्त मानवी जीवनात या शब्दाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका इंग्रजी लेखकाने म्हंटलंय की, " Life is not measured by time. It is measured by moments." किती गहन अर्थ भरलाय या एका लहानशा वाक्यात.आयुष्याचं मूल्यमापन या अर्थाने करायचं असेल तर आपण किती वर्ष जगलो यापेक्षाही आलेल्या प्रत्येक क्षणाचा कसा उपयोग करून जगलो याला आपोआपच महत्त्व प्राप्त होते.म्हणूनच " वाया जावू नेदी क्षण ऐसे संतांचे वचन" असे तुकोबाराय म्हणतात. कविवर्य केशवसुत यांच्या "आला क्षण गेला क्षण" या कवितेतील काही पंक्ती येथे उद्धृत करण्याचा मोह होतो.........
" कर्तव्य जे तत्पर त्यांचे ,दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे ,आला क्षण गेला क्षण" किंवा
"वार्धक्य जर सौख्यात जावया व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते, ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण "
पहिल्या काव्यपंक्तीत आपलं निहीत कर्तव्य आपल्याला तत्परतेनं पार पाडायचं असेल तर तसा मनाचा दृढ निश्चय करायला एक क्षण देखील पुरेसा असतो अशी शिकवण आपल्या मुखातून घड्याळ आपल्याला देत असतं.म्हणून आयुष्यातला एक योग्य क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे.हे समजून घेण्यासाठी काही प्रसंग आपण समजून घेतले पाहिजेत,
आपल्याला कुठेतरी प्रवासाला जायचं म्हणून आपण जय्यत तयारी करतो.सर्व सामान, कपडे,पाणी, खाद्य पदार्थ सर्व काही घेवून आपण स्टेशनवर पोहचतो.वेळ ७.३० मिनीटाची असते आपण घड्याळातील वेळेनुसार योग्य वेळेत पोहोचलेलो असतो पण केवळ काही क्षणांचा विलंब झाल्याने गाडी धाड धाड करत आपल्या समोरून निघून जाते.केवळ काही क्षणांचा विलंब झाल्याने आपल्याला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो.कारण घड्याळाचा प्रत्येक शब्द आपण ऎकत नाही.आयुष्याच्या प्रवासात हा क्षण आपण पकडला तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.
छत्रपती शिवरायांच्या पदरी असलेले कविराज भूषण यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे, एकदा भूषण ऐन तारुण्यात असतांना आपल्या घरी भावासोबत जेवायला बसला असताना जेवणात भाजीत मीठ नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.त्याने तसं वहिनीला तत्काळ सांगितलं,स्वाभाविकपणे वहिनीला राग आला.वहिनीने रागातच उत्तर दिलं ' आधी मीठासाठी पैसे कमवायला शिका मग नांव ठेवा' त्याक्षणी भूषणला ते वाक्य जिव्हारी लागलं अन् तो पानावरून तडक उठून बाहेर पडला ते पैसे कमवण्याचा निर्धार करूनच.आपल्यातल्या काव्य प्रतिभेची जाणीव त्याला झाली अन् छत्रपतींच्या दरबारात कविराज होण्याची संधी त्याला मिळाली.एक क्षण आयुष्याचं सोनं करून गेला.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे,अण्णा ऐन तारुण्यात असतांना देशभक्तीने प्रेरीत होवून सैन्यात भरती झाले होते.एका युध्दाच्या प्रसंगी ते चालवत असलेल्या जीपवर शत्रूचा हल्ला झाला.जीपमधील सर्व सैनिक मारले गेले.मनाला प्रचंड यातना झाल्या पण त्याक्षणी मनात विचार आला की,मी एकटाच जिवंत राहिलो त्याअर्थी माझ्याकडून आणखी काही विशेष कार्य घडायचंय.युध्द संपल्यावर स्टेशनवर गावाकडे येण्यासाठी आले असतानाच आपले सहकारी गेल्याचं दुःख होतं , विमनस्क मनस्थितीत फिरत असताना भूक लागली म्हणून भेळ खायला घेतली त्यावर स्वामी विवेकानंदांचा " नरसेवा ही ईश्र्वरसेवा है " हा संदेश वाचण्यात आला आणि आपल्या गांवाचा विकास करण्याचा निर्धार करून ते गांवात परतले.पुढे तब्बल वीस वर्ष त्यांनीं स्वत:ला गाडून घेऊन ग्रामविकासाचा आदर्श उभा केला.
मित्रहो, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.याचा पुरेसा बोध घेवून आपण केशवसुतांच्या ह्याच कवितेतील आणखी एका पंक्तीकडे वळू या,
"वार्धक्य जर सौख्यात जावया, व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते, ध्यानी सतत अपुल्या आण,
घडय़ाळ जे हे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण "
आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करताना बालपणीचा अज्ञातपणे गेलेला सुखाचा काळ आपण सोडला तर जगण्याची उमेद जेव्हा येते त्यावेळी येणारं आयुष्य सुखात जावं असं आवर्जून वाटायला लागतं.त्यासाठी आपली धडपड सुरू होते,धावपळ सुरू होते.या धकाधकीत अगणित क्षण आपली इच्छा नसतानाही निसटून जातात. पण याचा पश्चाताप आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी होतो.म्हणुनच केशवसुत आपल्याला घड्याळ आपल्याला अविरतपणे जे सांगतंय ते ऐकण्याची गळ घालतात.
एका ब्रिटीश विचारवंताने क्षणाचं मूल्य सांगताना असं म्हंटलंय,
If you don't give me a penny no problem .but .but if you give me a moment l will be more happy"
संतश्रेष्ठ माधवनाथ महाराज आपल्या शिष्यगणांसमवेत वार्तालाप करत असताना अचानकपणे ' मला हिशेब द्या, हिशेब द्या ' असं मोठमोठ्या आवाजात ओरडायला लागले.सर्वजण घाबरले.शिष्यांना वाटलं महाराज आश्रमातील खर्चाचा तपशील मागत असतील एका ज्येष्ठ शिष्याने धाडस करून नम्रपणे सांगितले महाराज आश्रमातील खर्चाचा हिशेब पूर्ण करून उद्या पर्यंत देतो महाराज म्हणाले मूर्खांनो तो हिशेब मी मागणी नाहीये मला हिशेब हवाय तुमच्या गेलेल्या प्रत्येक क्षणाचा.तो प्रत्येकाला मांडता येईल? शिष्य नि:शब्द झाले.
कविवर्य बा.भ.बोरकर संधीप्रकाशात कवितेत म्हणतात
" आयुष्याची आता झाली उजवण , येतो तो तो क्षण अमृताचा "
ही जाणीव माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होत राहिली तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.!!!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार,
9527153925
No comments:
Post a Comment