नमस्कार मित्रांनो,
गेले १०/१२ दिवस आपण घरात बसून आहोत.खूप कंटाळा येतोय नाही?पण काय करणार सगळं जगच थांबलंय.आपण जगापेेक्षा वेगळे कसे असणार नाही कां? पण मनांत अनेक प्रश्न तुम्हांला,मला सर्वांनाच भेडसावताहेत की हे सर्व अचानक झालंच कसं ? कधीपर्यंत हे सर्व चालणार ? जग नेमकं कोणत्या अवस्थेला पोहचणार ? या सर्व प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा व्हायची वेळ आलीय. एक ५०० मायक्रो मीटर आकारमान असलेला विषाणू समपूर्ण जग वेठीला धरू शकतो नव्हे ठप्प करून टाकतो.जग तिसरं महायुध्द होणार म्हणून विज्ञान,तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या देशाची संरक्षण सिध्दता करत ़असतांना कुठलाही गाजावाजा न होता जग विनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं जातंय अन् भौतिक विकासाच्या गमज्या मारणारे देश ,त्यांचे प्रमुख हताश होऊन त्याकडे पहात बसले आहेत .केवढी ही दुर्दशा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलीय.हे सत्य नाकारता येणार नाही.फक्त आणि फक्त एका विषाणुमुळे हे घडलंय.मला जाता जाता 'विश्वनाथ' चित्रपटातील नाना पाटेकरचा एक संवाद आठवला."एक मच्छर आदमी को रातभर सोने नही देता,हिजडा बना देता है "......वगैरे वगैरे. आज एक विषाणु कोरोना का रूप लेकर आया और पूरे विश्व को निकम्मा बना दिया. मित्रहो हे सर्व वाटतंय तितकं सोपं नाहीये हे मात्र निश्चीत .कधी संपेल माहीत नाही.पण आपण याकडे एक स्वल्पविराम म्हणूनच पाहू या. होय ' स्वल्पविराम ' हा शब्द नव्हे तर संकल्पना मी जाणीवपूर्वक वापरतोय.
' स्वल्पविराम ' या संकल्पनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे याची आज नव्याने जाणीव व्हायला लागलीय. हा स्वल्पविराम नसता तर जगात अवघा कल्लोळ निर्माण झाला असता.पाॅज,टेकऑफ,मध्यंतर,शाॅर्ट रेसेस या अनेक शब्दातून हा व्यक्त होतो.एकूण काय तर क्षणभर विश्रांती.सहजपणे विचार केला अन् समाज जीवनातली विविध क्षेत्रं समोर येवू लागली.सर्वप्रथम आपण वाचायला ,लिहायला शिकलो ते विरामचिन्हांचा वापर करून .त्यात स्वल्पविराम आपल्यासमोर कित्येकदा नाचत नाचत येतो.आपण गाणं म्हणायला शिकलो तेंव्हासुध्दा दोन ओळींमध्ये पाॅज घ्यायला शिकलो.ते जर केलं नसतं तर शब्दांचे ,वाक्यांचे अर्थ उमगले नसते.गाण्याचे स्वरताल ह्रदयापर्यंत भिडले नसते.विमान जमिनीवरून आकाशात उंच भरारी घेते तेव्हा टेकऑफ घेतेच की. कोणतंही वाहन बनवतांना त्याच्या वेगाला मर्यादा असावी म्हणून ब्रेक,गियर या व्यवस्था निर्माण केल्याच की.खेळ मैदानावरचा असो की बैठा त्यात पाॅज,टेकऑफ महत्वाचा असतोच ना.? एवढंच कशाला आपण मनोरंजनासाठी एखादा चित्रपट ,नाटक पाहतो तेंव्हादेखील मध्यंतराची आतुरतेने वाट बघत असतो. यालाच ' स्वल्पविराम ' म्हणता येईल. सद्यःस्थितीत संपूर्ण जगाला मिळालेला हा स्वल्पविरामच आहे .हा पूर्णविराम नक्कीच नाही.
मित्रहो,आज या स्वल्पविरामाची गरज कां निर्माण झाली असावी ? याचाही थोडा विचार करण्याची गरज आहे. भौतिक विकासाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपण सर्वच इतके रममाण झालो आहोत की कुठेतरी पाॅज,स्वल्पविराम ,टेकऑफ घ्यायला हवा हेच आपण विसरलो. जगातल्या दोन देशांमध्ये आम्हीच कसे महासत्ता आहोत हे दाखविण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली अन् त्याचा निकष समोरील शत्रूचा विनाश करण्यासाठी लागणारी संरक्षणसिध्दता हा मानला गेला.दोन व्यक्तीमध्ये होणारी भौतिक विकासाची स्पर्धादेखील याच वळणावर येवून ठेपली.आम्ही भौतिक विकास साधला म्हणजे सारं कांही मिळालं अशीच आमची धारणा बनत चालली त्यामुळे कुठेही स्वल्पविराम न घेता गतिमान अधिक गतिमान होण्याच्या मागे आम्ही लागलो.त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास हेच अंतिम सत्य आपण मानू लागलो. परिणामस्वरूप यातला 'माणूस' हा घटक आम्ही हरवून बसलो आहोत किंबहुना माणसाला सुध्दा यंत्रवत बनविण्याची , वापरण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली.विश्वाचं अंतिम सत्य भौतिक विकास नव्हे तर अधिभौतिक विकासालाही महत्व दिले पाहिजे हेच आम्हाला कळेनासे झालंय. कविवर्य केशवसूतांची एक काव्यपंक्ती येथे उधृत कराविशी वाटतेय.ते म्हणतात,"देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या" नेमकं हेच तत्व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीलाही लागू पडते . विज्ञानाने बनवलेला यंत्रमानव व यंत्रवत् झालेला माणूसदेखील माणसानेच घडवला ना ?मग या माणसाच्या मन या संकल्पनेच्या विकासाचं काय? त्यालाच अधिभौतिक विकास म्हणतात.तो झाला नाही तर या प्रगतीला कधीतरी विनाश आहेच याची अनुभूती यावी म्हणून हा स्वल्पविराम आहे.थोर विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांनी एक सुंदर वचन एका ठिकाणी लिहून ठेवले आहे .ते म्हणतात,"शत्रुवर विजय मिळवायचा असेल तर शस्त्रांची नितांत गरज असते पण ते शस्त्र चालविणारे हात मजबूत नसतील तर ते शस्त्र कुचकामी ठरते .त्याच्याही पुढे जावून ते म्हणतात की प्रशिक्षणातून हे हात मजबूत होतीलही पण,त्या हातांना ते शस्त्र चालविण्यासाठी प्रवृत्त करणारं मन दुर्बल असेल तर ते शस्त्र व ते हातही निरूपयोगी ठरतील."नेमका हाच बोध या स्वल्प विरामातून आपल्या घ्यायला हवा.भारतीय संस्कृतीत या सर्व प्रकारच्या म्हणजेच सर्वांगीण विकासाच्या विचाराची दिशा आहेच.स्वल्पविरामाच्या निमीत्ताने ती दिशा शोधण्याच प्रयत्न आपण करू या.सद्यःस्थितीत शासन व प्रशासनाने जो कृती कार्यक्रम दिलाय त्याचे पालन करू या.जगाला पूर्णविराम नको असेल तर स्वल्पविराम घेवू या.
कवी गुलजा़र यांनी एका कवितेत दिलेला संदेश आपण विचारात घ्यायला हवा ते म्हणतात,
बे वजह घर से निकलने की ज़रूरत क्या है?
मौत से आँखे मिलाने की ज़रूरत क्या है?
"सब को मालूम है बाहर की हवा है क़ातिल,
"यूँही क़ातिल से उलझने की ज़रूरत क्या है?
ज़िन्दगी एक नेमत है उसे सम्भाल के रखो,
क़ब्रगाहों को सजाने की ज़रूरत क्या है?
दिल बहलाने के लिये घर में वजह हैं काफ़ी,
यूँही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है ?
गुलज़ारसाहेब व पंतप्रधान यांचा हाच संदेश आहे की
आपण स्वल्पविराम घेवू या! आपण स्वल्पविराम घेवू या!
कवी गुलजा़र यांनी एका कवितेत दिलेला संदेश आपण विचारात घ्यायला हवा ते म्हणतात,
बे वजह घर से निकलने की ज़रूरत क्या है?
मौत से आँखे मिलाने की ज़रूरत क्या है?
"सब को मालूम है बाहर की हवा है क़ातिल,
"यूँही क़ातिल से उलझने की ज़रूरत क्या है?
ज़िन्दगी एक नेमत है उसे सम्भाल के रखो,
क़ब्रगाहों को सजाने की ज़रूरत क्या है?
दिल बहलाने के लिये घर में वजह हैं काफ़ी,
यूँही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है ?
गुलज़ारसाहेब व पंतप्रधान यांचा हाच संदेश आहे की
आपण स्वल्पविराम घेवू या! आपण स्वल्पविराम घेवू या!