Showing posts with label संगीतप्रेमी लोकमान्य टिळक. Show all posts
Showing posts with label संगीतप्रेमी लोकमान्य टिळक. Show all posts

Thursday, July 30, 2020

संगीतप्रेमी लोकमान्य टिळक


राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, न्यायालयीन खटले या सर्व धावपळीच्या दिनक्रमात लोकमान्य टिळक आपला वाचन व लिखाणाचा व्यासंग जोपासत असतांना त्यांना असलेली शास्त्रीय गायन व नाट्यगीताची आवडदेखील जोपासत होते.गणेशोत्सवाच्या निमीत्ताने त्यांच्या वाड्यात अधूनमधून गाण्याच्या मैफिली रंगत असत. एकदा नारायण राजहंस हा बालक आपल्या माणसांसोबत टिळकांच्या घरी गेले असता तो एक बंदीश गात असतांनाच टिळकांनी ते ऐकले व त्यांच्या तोंडून ' अरे हा तर बालगंधर्व ' हे सहजोद्गार निघाले.तोच नारायण पुढे बालगंधर्व म्हणूनच प्रसिध्द झाला.
एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने टिळक रहात असलेल्या गायकवाडवाड्यात रात्री बरीच गर्दी जमली होती.संगीत नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, यांच्याशी टिळकांचे स्नेहाचे संबंध होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन होणार होतं. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले त्याला एक वर्ष झालं होतं म्हणून त्यावर्षीच्या उत्सवात बखलेबुवांचं गाणं व्हावं, असं कृष्णाजी खाडिलकरांनी लोकमान्यांना सुचवलं होतं. लोकमान्यांना बखलेबुवांबद्दल प्रचंड आदर होता, त्यामुळे त्यांनी खाडीलकरांची ही सूचना मान्य केली. खुद्द लोकमान्यांनी दिलेलं आमंत्रण बखलेबुवांनीही लगेच स्वीकारलं. कार्यक्रम रात्री ठीक दहा वाजता सुरू झाला. सुरुवातीला मा. कृष्णरावांचं गायन झालं. नंतर बालगंधर्व गायला बसले. काही नाट्यगीतांनंतर लोकमान्यांच्या गुणवर्णनपर ’जो लोककल्याण साधावया’ हे मालकंसातलं पद ते गायले. या दोन्ही तरुण गायकांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. दोन्ही गायक श्रोत्यांचे लाडके, आणि त्यांच्या नाट्यगीतांनी तमाम गानरसिकांना वेड लावलं होतं. मध्यरात्री एक वाजता भास्करबुवा बैठकीवर आले. त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. बुवांना हा अनुभव नवीन नव्हता. बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि बुवा या तिघांचे जलसे भारतभर सतत होत असत. या जलशांना तोबा गर्दी उसळत असे. पण प्रत्येक ठिकाणी बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांच्या पदांना भरपूर दाद मिळे. बुवांचं शास्त्रीय गायन सुरू झालं, की श्रोत्यांचा बैठकीतला रस ओसरे. बुवांच्या नाटकातल्या पदांना मात्र जोरदार दाद मिळे, त्यांनी नाट्यगीतं गावीत, असा आग्रह होई. नाट्यगीतांनी श्रोत्यांना वेड लावलं, तरी शास्त्रीय गायनात आता त्यांना रुची राहिली नव्हती, याचं बुवांना फार वाईट वाटे.
गायकवाडवाड्यात त्या रात्री भास्करबुवांचं गाणं सुरू होताच श्रोत्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अनेकजण बुवा गात असतानाच उठून जाऊ लागले. बैठकीला लोकमान्य उपस्थित होते. भास्करबुवांसारख्या थोर गायनाचार्यांचा असा अपमान त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. ते उभे राहिले, आणि श्रोत्यांना म्हणाले, "आजचा कार्यक्रम गणपतीउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा यांच्या गायनाला सुरुवात झालेली आहे, आणि ते तुम्ही शांतपणानं ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कोणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं, पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं, ते वाटतं म्हणजे असं की, त्यांची कला फार मोठी आहे, आणि त्याबद्दल विचार करण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून भास्करबुवांना मी मुद्दाम तसदी दिली. ते इथे आले, आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. त्यांनी उत्तमप्रकारे काम केलं आहे, याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं, प्रत्यक्ष गजाननस्वरूप  भास्करबुवा बखले यांच्या घातल्याचे कार्यक्रम ऐकण्याचा प्रसंग वारंवार येऊ द्यावा, अशी प्रार्थना मी करतो."
टिळकांच्या आवाहनानंतर श्रोते अर्थातच शांत झाले, आणि पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला. बुवा अडीच तास गायले. गाणं संपल्यानंतर लोकमान्यांनी सर्वांना घरात नेलं, आणि बुवांच्या गाण्याची मनापासून प्रशंसा केली. मोठ्या प्रेमानं जरीचं उपरणं लोकमान्यांनी बुवांच्या अंगावर घातलं. नंतर लोकमान्य कंदील घेऊन उंबर्‍या गणपती चौकापर्यंत बुवांना सोडायला आले होते.या एकाच प्रसंगांतून लोकमान्य टिळकांचं संगीत प्रेम किती होतं हे लक्षात येतं. संगीत कलेची आवड जोपासत कलाकारांना प्रोत्साहन देणारे लोकमान्य आपणांस नक्कीच वंदनीय आहेत!!!!!!!!
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...