Thursday, July 13, 2023

प्रतिभासंपन्न कवयित्री

 

प्रतिभा संपन्न निसर्ग व प्रेम कवयित्री
इंदिरा संत

२० व्या शतकातील शेवटच्या सहा दशकांमध्ये सातत्याने काव्यलेखन करणार्‍या मराठी कवितेच्या परंपरेमध्ये स्वतःचे एक वैशिष्ट्यपूर्ण  स्थान निर्माण करणार्‍या प्रतिभासंपन्न कवी इंदिरा संत.एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे इंदिरा संत यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.    साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादाची लय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत .रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवयित्रीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते.  साठ, सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कविता आजही वाचताना ताज्या टवटवीत फुलासारखा सुगंध  वाटत जातात.
थंड गुलाबी कार्तिकातली, धूसर धूसर धुके तरंगणारी सकाळ, अशा निर्मल निर्भर वातावरणावर झगमगणारी सोनेरी किरणांची सुंदर नक्षी, त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूचफुलांचा सुगंध!
चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलुन तो हृदयाशी धरला!
इतका सुंदर सौंदर्यानुभव देणारी शेला ही आपली आवडती कला. अशाच अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे’ असं म्हणणार्‍या इंदिराबाईंच्या कवितेचं नातं शिल्पकलेबरोबर अभिजात रसिकतेशी कायमचं जुळलं आहे.
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या आजच्या तरुणाईने एकदा इंदिराबाईंची ही कविता आवर्जून वाचावी.प्रेमात इतका हळुवारपणा असावा याचा वस्तुपाठच इंदिरा संतांनी दिला आहे.
नको पाठवू.........
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !
पाठवीशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते ||
कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेचे वर्णन एका वाक्यात करावयाचे असेल तर ' स्वत्वाने सुंदर ठरलेली विशुध्द भावकविता’ असे  करता. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातल्या कविता रविकिरण मंडळाचे संस्कार घेऊन आलेल्या आहेत.
   केवळ कविता हा त्यांच्या लेखनाचा प्रांत कधी राहिला नाही.जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्या कविता करत होत्या आणि त्या ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा वगैरे मासिकातून प्रसिध्द होऊ लागल्या होत्या. १९४१ मध्ये ‘सहवास’ हा उभय पतीपत्नींचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर शेला (१९५१) मेंदी(१९५५) मृगजळ (१९५७) रंगबावरी (१९६४) बाहुल्या (१९७२) गर्भरेशीम (१९८२) चित्कळा (१९८९) वंश कुसुम (१९९४) व निराकार (२०००) असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले. शामली (१९५२) कदली (१९५५) चैतू (१९५७) हे तीन कथासंग्रह, मृद्गंध (१९८६) मालनगाथा (१९९६) फुलवेश (१९९७) हे तीन ललितलेख संग्रह, गवतफुला, अंगतपंगत, मामाचा बंगला हे बालसाहित्य- असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांच्या गद्यलेखनाचे स्वरूपही कवितेसारखे नितळ, सहजसुंदर व काव्यात्मक आहे, त्यामुळे साहजिकच कवी म्हणून इंदिराबाईंचा ठसा साहित्यक्षेत्रावर अधिक उमटला.
‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.
प्रियकराचा चिरविरह हाच त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू बनला. निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या चार अनुभवसूत्रांना या विशिष्ट प्रकारच्या दुःखाने व्यापून टाकल्याने त्यांची कविता विरहाच्या अधिकच गडद छटा घेऊन व्यक्त झाली. दुःखाच्या ताजेपणातील प्रतिक्रियात्मक उत्कटता सर्वाधिक जाणवते ती ‘शेला’ मधल्या कवितांवर
अजूनही जागा आहे
स्पर्श तुझा कायेवरी
आणि अंगाचा सुगंध
खेळतसे श्‍वासावरी (अजूनही)
मनावरची चांदण्यांची झिरझिरी धुंदी अजून ओसरली नाही तोच चंदेरी वर्तमानाचे रूपांतर एकाएकी भीषण भूतकाळाच्या जळत्या आठवणीत व्हावे हे एक संवेदनाशील कवीमन मानूच शकत नाही. शेलानंतर चारच वर्षांनी प्रसिध्द झालेल्या मेंदीतील कविता अधिक तरल, अर्थघन आणि सुजाण वाटतात.
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला घ्यावे तुजला घ्यावेे (मृण्मयी - मेंदी)
' नाहीस तू ने भरले अंबर’ अशा जाणीवेने व्यापलेले दुःख ‘मृगजळ’मध्ये अधिक गडद झाल्याचे, एकवटत चालल्याचे जाणवते. थोड्या अलिप्तपणे दुःखाच्या नजरेला नजर देण्याचे सामर्थ्य त्या गोळा करताना इथे दिसतात. ‘उभे दुःख हे उभेे पुढ्यातच ..... स्तब्ध स्वयंभू पहाडापरी’ - दुःखाचं असं पुढे ठाकणं जणू सवयीचं झाल्यासारखं स्वीकारार्ह आहे. त्या दुःखाला स्त्रीच्या म्हणून असलेल्या अनुभवाचा हळुवार जीवनस्पर्शी वास आहे.
कारण येतो वास तयाला
तान्ह्या ओठावरूनी
ओघळणार्‍या गोड दुधाचा
जुन्या अनुभवांना सामोरे जाणारे कवीमन आता अधिक चिंतनशील, तटस्थ आणि प्रतिमांच्या भाषेत बोलू लागलेले दिसते. या पार्श्‍वभूमीवर आठ वर्षांनी प्रसिध्द झालेल्या रंगबावरीत दुःखाचा कढ निमाला आहे, दुःखाच्या दाहकतेतून पोळून निघाल्यावर कवीमन शांत झाले आहे, बाहेरच्या जगाची सोनेरी चाहूल होऊन बघते आहे.
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळाळेल मन
केंव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात (किती उबावे उबावे)असा प्रश्‍न त्या स्वतःला विचारू लागल्या आहेत. जागं होण्याचं नाकारणार्‍या स्वतःच्या मनाला त्या प्रतिप्रश्‍न विचारू लागल्या आहेत.
निसर्गाच्या संवेद्य वर्णनाबरोबर शिणलेल्या देहाला आलेेले विश्रब्धपण, ‘कोमल काळोखात’ संथ निवांत झुलणारे मन, मनात उगवणारी सतेज पहाट, समर्पण वृत्तीने स्वत्वाचे दान करून ‘शून्या’ झालेली भरतीची लाट, या प्रतिमा दुःखाशी संघर्ष संपल्याची साक्ष देतात. निर्गुण, निराकार जगाला व्यापणार्‍या प्रेमाची, विशुध्द निसर्गसौंदर्याची, जगण्यातल्या एका अबोध आनंदाची जाणीव कवीमनाला झालेली दिसते. तटस्थपणे प्रेमानुभवाचे विश्‍लेषण करण्याची प्रक्रिया जीवनातील ताणांसकट व्यक्त होते. दुःखाचा सातत्याने शोध घेताना भोवतालच्या विश्‍वातील दुःखाचे आतले हुंकार त्यांना जाणवू लागतात.
इंदिराबाईंच्या सुरवातीच्या कवितांमधली स्त्री असंयमी, समर्पिता, जीवनाचा धूप करून प्रियकराभोवती घमघमणारी रातराणी, धूळफुलांचा वास लेवून होणारी पाऊलवाट आहे. परिपूर्णता म्हणजे पुरूष आणि अपूर्णता, चंचलता म्हणजे स्त्री. ही स्त्री पन्नास, साठच्या दशकातील स्त्री-प्रतिमेला साजेशीच होती. पण काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते. गेल्या तीस, चाळीस वर्षात बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न त्या ‘बाहुल्या’ मध्ये करतात, ही त्यांच्या जाणिवांच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या त्याचीच खूण आहे. ‘ही अशी ती तशी’ मध्ये विविध परिस्थितीतून आलेल्या व शिक्षकीपेशा पत्करलेल्या स्त्रियांची रेखाटने येतात. ‘कुटुंबातील नीटस पोर’ मध्ये पैशासाठी नोकरी करणार्‍या स्त्रीचे वर्णन येते. आखीव रेखीव आयुष्यात कसरत करून (कसातरी) तोल सांभाळताना अचानक तोल जातो (बंदिस्त) स्त्रीचं घरातलं दुय्यम, दुर्लक्षित स्थान, आयुष्यातला कंटाळवाणेपणा आणि घरकामाचं तेच तेचपण ‘फॉसिल’ कवितेत व्यक्त होतं.
मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी
मी म्हणजे आवकजावक बिलेपावत्या
मी म्हणजेे बौद्धिकाची रतीब-गाळणी
मी म्हणजे हेच काही
चैतन्याची चमक नाही
चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही, दुःख नाही. स्त्रीला दिलेली चालत्या बोलत्या पाषाणाची उपमा संसारातलं तिचं गोठलेलं स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते. घरासाठी कष्ट करणारी, नोकरी करणारी, घर सांभाळणारी ‘गृहलक्ष्मी’ ही घरासाठी आयुष्य वेचताना स्वतःच सारं काही गमावून बसते याचं उपरोधिक चित्र ‘मध्यमवर्गीय गार्गी’ या कवितेतील ‘शिजवणारी तीच - शिजणारी तीच’ या प्रतिमेतून घरादारासाठी भरडून निघालेल्या स्त्रीमध्ये प्रभावीपणे व्यक्त होते.
या सर्वच कवितांमधून एक शांत संयत, प्रौढ अलिप्तता जाणवते. समर्पिता प्रेयसी ते एकाकी व्यक्ती हा स्त्रीच्या व्यक्तिजीवनाचा त्यांचा प्रवास पुढील काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी कविता प्रवाहाला दिशादर्शक आहे.
त्यांची कविता दुःखाच्या आत्म्याचा शोध घेताना वैयक्तिक दुःखाकडून विश्‍वात्मक दुःखाकडे विस्तारत जाते. या संपूर्ण प्रवासात त्यांचा सच्चा साथी प्रियकर आहे तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाला स्वतःचा रंग, रूप, स्वभाव, स्पर्श, रस सगळं माणसांसारखं आहे. कार्तिकाचा थंड गुलाबी स्पर्श आणि उमलत्या बूच फुलांचा मादक सुगंध असणारं धुकं म्हणजे वसंतसेना वसुंधरेला चारुदत्ताकडून मिळालेला शेला आहे (शेला) धूळभरू रुक्ष विरागी सडक, लाल कोवळ्या पानांचा पिसारा फुलवून उभ्या असणार्‍या पिंपळाच्या दर्शनानं त्याच्यावर लोभावून जाते.
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन (मृण्मयी)
आपल्या रक्ताला मातीची ओढ आहे, मनाला मातीचे ताजेपण आहे असे सांगताना
दंवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावे.असेही त्या म्हणतात.
हेमंताच्या शेल्याने अंग टिपावे, वसंतातील फुलांचे वस्त्र ल्यावे, ग्रीष्माने कचभार उदवावा आणि जर्द विजेचा मत्त केवडा वेणीवर तिरकस माळावा अशी सुंदर रोमँटिक कल्पनाचित्रे उभी करताना त्या निसर्गकन्या होतात. निसर्गरूपातून फिरणार्‍या कालचक्राच्या गतीचा क्षण पकडताना निसर्ग प्रतिमारूपाने येतो, आणि त्याचे त्यांच्या भाववृत्तीशी नाते जुळते. निसर्गातील रंगांची मुक्त उधळणही त्यांच्या कवितेत वेधक रूप घेऊन येते गाण्यामधला पोपटी भाव, मनातील हिरवा गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके अशा रंगप्रतिमा निसर्ग आणि माणसाची एकरूपता दर्शवतात.
ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)
शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात.
संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ज्या ठिणग्या उडतात, त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजे माझी कविता आहे.’ असे त्या म्हणत.
धगधगते जीवन हे
धरून असे ओंजळीत
आले मी कुठून कशी
आले मी हेच फक्त (आले मी)
अनेक वर्षे सातत्याने लेखन करणार्‍या इंदिराबाईंची कविता त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच प्रगल्भ होत गेली. आयुष्यातील स्वतः पलिकडची अनुभूती उत्कटपणे कवेत घेत गेली. भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे.
                                                 शशिकांत घासकडबी , नंदुरबार
                                                  ९५२७१५३९२५

अविस्मरणीय स्मरणगाथा

 

गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनिदां 

   आजच्या तरुणाईला तूला गोनिदां माहिती आहेत का? असं कोणी विचारलं तर कदाचित त्यातला एखादाच त्याचं उत्तर देवू शकेल कारण ६०,७०,८० घ्या दशकात साहित्य जगतात वाचन करणाऱ्या तरूणांच्या मनावर ज्यांनी राज्य केलं त्यातील एक मोठं नांव म्हणजे गोनिदां उर्फ आप्पा दांडेकर.गोनिदां नांव उच्चारताच आपल्या समोर दोन पुस्तकांची नांव आवर्जून येतात ती म्हणजे‌   'कुणा एकाची भ्रमणगाथा 'आणि '        ' स्मरणगाथा '.ही दोन्ही पुस्तकं ज्यांनी वाचली आहेत त्यांच्यासाठी तर गोनिदां हे ' अविस्मरणीय स्मरणगाथा ' आहेत आणि त्यांचा क्षणभराचा सहवास ज्यांना मिळाला ती त्यांच्यासाठी एक अमृतगाथाच म्हणावी लागेल.

  ८ जुलै १९१६ ला विदर्भात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे अप्पांचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी घराबाहेर पडून सलग पन्नास वर्ष पूर्णेपासून नर्मदेपर्यंत जास्तीत जास्त पदभ्रमंती करणाऱ्या या कलंदर फकीराची अवघी जीवनगाथा म्हणजेच स्मरणगाथा आणि भ्रमणगाथा आहे.

सहयाद्रीच्या कडेकपाऱ्या, गड-किल्ले यांच्या कुशीत रमलेले,शिवबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेक गडावरची धूळ मस्तकी धारण करणारे व्यक्तिमत्त्व. शिवरायांचे पदचिन्ह, हाताचा ठसा व अस्थिशेष आपल्यापाशी आहे, याची श्रीमंती बाळगणारा हा अस्सल मराठी मातीतला हा माणूस किती अनुभव संपन्न आणि समृद्ध असेल याची अनुभूती त्यांच्या सहवासात किंवा त्यांची साहित्य संपदा वाचणाऱ्यालाच येवू शकेल.. या अनुभवांतूनच त्यांचे साहित्य प्रसवले. त्यातून मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या, छत्रपतींच्या काळात नेणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अखंड भ्रमंतीतून आलेले आगळेवेगळे अनुभवच शब्दरूप घेऊन आले.  तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;’ असे गोनीदां म्हणत असत.

नर्मदची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले.  या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.

'आमचे राष्ट्रगुरू’ ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. ‘साभार परत’ हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. ‘बिंदूची कथा’ ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी ‘माचीवरला बुधा’, ‘पूर्णामायेची लेकरं’ (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),’आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘मृण्मयी’ अशा अनेक  दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या.

  'मृण्मयी’ अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. ‘पवनाकाठचा धोंडी’ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘शितू’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’ या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.

  ‘मोगरा फुलला’ कादंबरीची हकीकत थोडी वेगळी. ज्ञानदेवांचे वडील विट्ठलपंत यांच्या संन्यासी वृत्तीचे गोनीदांना खूप आकर्षण होते. ज्या माणसाचा पुत्र साक्षात ज्ञानेश्वर आहे, त्यात तेज:पुंज असे काही असणारच, या विचाराने त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यातील निम्मा भाग त्यांनी विट्ठलपंतांच्या जीवनातील संघर्षाचे, ताणतणावांचे चित्रण करण्यात खर्च केला आहे. या कादंबरीचे १९७७ मध्ये प्रथम गोनीदांनीच जाहीर वाचन केले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला; पण तेंव्हा हा प्रकार रूजला नाही. आता गोनीदांची कन्या प्रा. वीणा देव, व जामात डॉ विजय देव आपल्या मुलींसह गोनीदांच्या सहा कादंबऱ्यांचे अभिवाचन करीत आहेत.गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला.

गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी’, तसेच ‘श्री रामायण’, ‘भक्तिमार्गदीप’, ‘कर्णायन’, ‘कृष्णायन’, ‘दास डोंगरी राहतो’, ‘तुका आकाशाएवढा’ ही पुस्तके लिहिली. साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘काका माणसात येतो’, ‘वनराज सावध होतात’, ‘कुऱ्हाडीचा दांडा’, ‘संगीत राधामाई’, ही नाटके त्यांनी लिहिली. ‘छंद माझा वेगळा’ हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, ‘पाच संगीतिका’ हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.

 त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘स्मरणगाथा’ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने’नगरभूषण’, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्य वाचस्पती’ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ‘नानासाहेब नारळकर’ पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ‘दुर्गप्रेमी’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. 

१९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान. मालतीबाई बेडेकर यांना दहा मतांनी हरवून गोनीदा अध्यक्ष झाले. आपल्या वऱ्हाड प्रांतात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला; पण नंतर ‘आदरणीय मालती बेडेकरांविरूध्द मित्रमंडळींच्या आग्रहास्तव उभा राहिलो. ते सर्व वर्ष कटू गेले. साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो हे विसरून जायचे आहे.’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. ‘जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.’, अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी ‘सकाळ’ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.

गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे’ अशी त्यांची मराठी आहे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा ‘मृण्मयी पुरस्कार’ सुरू केला. १९९८ सालात, स. प. महाविद्यालयाच्या ‘प्राचार्य सोनोपंत दांडेकर’ अध्यासनाला हा पुरस्कार लाभला. त्याआधी मारूती चित्तमपल्ली, विलास मनोहर, शुभदा गोगटे, तळेगावचे साहित्य संस्कृती मंडळ, आळंदीचे वारकरी शिक्षण मंडळ, यांना हा पुरस्कार मिळाला आहे.मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ”माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.’ या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा? गोनीदांचे मायमराठीवर असेच प्रेम होते. ‘मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,’ अशी खंत ते व्यक्त करीत.‘सर्वथा अनलंकृत लिहिता यावे, हीच आता तीव्र इच्छा आहे,’ असे त्यांनी सोळा वर्षांपूर्वी म्हटले होते. एवढे लिखाण केल्यावरही त्यांना साधेसोपे लिहीणे हे अवघड आहे याची जाणीव होती. या दांडेकराला लालित्यासाठी तडजोड करावी लागत नाही, लालित्य हा त्याच्या लिखाणाचा अंगभूत गुण आहे, असे ते आत्मविश्वासाने म्हणू शकत असत.अतिशय सूक्ष्म अवलोकन, गड-किल्ल्यांचा मुखोद्गत इतिहास, तेथील रेतीरेतीविषयी मनात दाटलेला अभिमान, मुलखाचे फकिरी व्यक्तिमत्त्व, प्रचंड अनुभवातून उतरलेले ताकदवान साहित्य, मायबोलीविषयी वाटणारी उत्कट तळमळ, हे गोनीदांच्या अवघ्या जीवनाचे सार आहे.

महाविद्यालयात शिकत असताना दोन वेळा गोनिदांचा सहवास लाभला एकदा अमळनेरला ते विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी ते आलेले होते.त्यावेळी आमच्या काॅलेजचे प्राचार्य असलेले प्रा.मुंजे यांची कन्या कौमुदी ही त्यांची मानसकन्या.भटकंतीत वेगवेगळ्या प्रकारचे दगड,खडे संकलित करणं हा त्यांचा छंद होता.त्याचे संकलनही त्यांनी त्यावेळी आम्हाला दाखवले होते.एकदा पुण्यात असताना पेरूगेटजवळच्या एका दवाखान्यात ते दाखल होते आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हादेखील आपले आजारपण विसरून त्यांच्या भ्रमंतीविषयीच ते बोलत होते.विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनात त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आवर्जून एक आवाहन केले होते की, 'आयुष्यात खूप मोठे व्हा तुम्हाला जे करावसं वाटेल ते करा पण राजकारण्यांच्या आसपासही फिरकू नका '. 

पुण्याला तळजाई येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या

 शिबीरानिमीत्त पुणे शहरातून झालेल्या विशाल पथसंचलनाचे चित्रीकरण करताना पाहिले आणि आम्ही थक्क झालो.त्यावेळी ६०/६५ वर्षाचे अप्पा पंचविशीत असलेल्या तरूणाप्रमाणे संचलनाच्या पुढे उत्साहाने धावत होते. साहित्य पंढरीतील या अनोख्या वारकऱ्याला विनम्र अभिवादन 🙏🌹🙏

                        शशिकांत घासकडबी, नंदुरबार -९५२७१५३९२५

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...