Showing posts with label मैत्री आणि गप्पा. Show all posts
Showing posts with label मैत्री आणि गप्पा. Show all posts

Friday, July 24, 2020

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ लोकमान्य टिळक


स्वातंत्र्यचळवळीतील अग्रणी म्हणून राष्ट्रीय राजकारणात लोकमान्य टिळक आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होतेच पण सामाजिक कार्यकर्ते म्हणुनही त्यांची एक वेगळी छाप होती . असं असूनही  लोकमान्य टिळकांनी आपला व्यासंग कधीच सोडला नाही. खरंतर टिळकांचा मूळ पिंड हा एका अभ्यासकाचा, संशोधकाचा होता.गणित व खगोलशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते.त्याकाळात कामाचा प्रचंड व्याप असतांनाही वेळात वेळ काढून त्यांनी ‘द ओरायन’ तसंच ‘द आक्र्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचं संशोधन सुरूच होते.

      लोकमान्य टिळकांनीही प्राचीन वैदिक साहित्यांतील खगोलीय उल्लेखांच्या आधारे वेदांचा काल व आर्याचे मूळ वर्षांस्थान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी आपल्या The Orien आणि The Arctic Home In the Vedas या दोन अद्वितीय ग्रंथांद्वारे आपले संशोधन, आपले विचार जगाच्या समोर मांडले व सर्वत्र त्याचे जोरदार स्वागत झाले. १८९३ साली Orien प्रसिद्ध झाल्यानंतर, जॉन हॉपकिन्स युनिव्‍‌र्हसिटी, बाल्टीमोर येथील प्राच्य विद्येचे प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी फेब्रु. १८९४ मध्ये दिलेल्या व्याख्यानात म्हटले की, 'A literary event of even greater importance has happened within the last two or three months- an event which is certain to stir the world of science and culture' हे पुस्तक म्हणजे 'unquestinably the literary sensation of the year' आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या ग्रंथांमुळे जहाल राजकारणाच्या पलीकडील प्रज्ञावंत टिळकांचे स्तिमित करणारे दर्शन जगाला झाले. या संशोधनामुळेच मॅक्समुल्लरसारख्या ऋषितुल्य विद्वानाची व टिळकांची जवळीक निर्माण झाली.वेदवाङ्मय हे मानवाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे आणि मानवाचा विशेषत: आर्यवंशाचा अभ्यास करण्यास वेदांइतके दुसरे महत्त्वाचे असे काहीच नाही. १८८२ साली केंब्रिज विद्यापीठात ‘भारतापासून इंग्लंडने काय शिकावे?’ या विषयावरती प्रा. मॅक्समुल्लर यांनी व्याख्यानमाला गुंफली. आपल्या भाषणात संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात, ‘प्राचीन आर्यवंशाचा विस्तार आज ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव्ह अशा नानारूप रंगात झाला आहे. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून या आर्यवंशाचा व त्यांच्या चालीरीतींचा व संस्कृतीचा परिचय आपल्याला होणार आहे. ऋग्वेदातील काही सूक्तात आजही आपल्याला आर्यजनांच्या पूर्वीच्या अवस्थेचे दर्शन होते.मानवाच्या उत्क्रांतीचा विचार करताना आर्यसंस्कृतीचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. परंतु वेदांसारखे अतिशय अभिजात वाङ्मय निर्माण करणाऱ्या आर्याबद्दलचा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय झालेला नाही. त्यापैकी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे १) आर्याचे मूळ वसतिस्थान कुठले? २) वेदांचा निश्चित काळ कोणता? ३) आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून इतरत्र गेले? या सर्व प्रश्नांचा विचार खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र वगैरे शास्त्रांच्या आधारे करणे आवश्यक आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना अनेक स्थित्यंतरे झाली. हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता, इतर नैसर्गिक आपत्ती व मानवी टोळ्यांतील आपापसातील आक्रमणे यातून मानवाचे निरनिराळे गट सतत स्थलांतर करत होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कृतीचे आदानप्रदान होत होते. शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे भाषांमुळे वैविध्य येत होते. काही नवीन भाषा उदयाला येत होत्या, तर काही भाषा मृत होत होत्या. या सर्वाचा विचार करता आर्यासंबंधीच्या समस्येची उकल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे, काटेकोरपणे उपलब्ध पुराव्यांची छाननी करून, विविध शास्त्रांच्या साहाय्याने तर्कशुद्ध निष्कर्ष मांडणे आवश्यक आहे.टिळकांचेही लक्ष या गहन प्रश्नांकडे गेले आणि त्यांनी चिकित्सकपणे वैदिक साहित्याचे संशोधन केले. त्या संशोधनाची फलश्रुती म्हणजेच टिळकांचे हे दोन अपूर्व ग्रंथ! भगवद्गीतेचे परिशीलन करत असताना विभूती योगांतील ‘मासाना मार्गशीर्षोऽहं, ऋतुना कुसुमाकर:’ या श्लोकाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या वचनामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे असे त्यांना वाटले अन् त्या अनुरोधाने त्यांनी वेदकाळाचा निर्णय करण्याचे ठरवले. इजिप्तची संस्कृती सर्वात प्राचीन आहे, असे पाश्चात्त्य विद्वान मानत होते. परंतु आर्य संस्कृती मात्र इ.स. पूर्व २४०० पेक्षा जास्त जुनी नाही असे त्यांचे मत होते. टिळकांनी आपल्या संशोधनाद्वारे नेमके हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, आर्यसंस्कृती अतिप्राचीन आहे व वेदातील विशेषत: ऋग्वेदातील आर्याच्या धार्मिक चालीरीती ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावेळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. या संबंधात टिळकांनी वैदिक वाङ्मयातील सूक्ते व पुराणकथा यांचा पुरावा म्हणून वापर करून त्यांचा अर्थ नव्याने लावला. त्याचप्रमाणे वैदिक आर्याच्या या चालीरीती व पुराणकथा यांचा इराण व ग्रीसच्या चालीरीती आणि पुराणकथा यामध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आपले मत सिद्ध करण्यासाठी लोकमान्यांनी वैदिक साहित्यातील अत्यंत विश्वसनीय पुरावेच वापरले व पुराणकथांचा उपयोग केवळ मतपुष्टीसाठी केला.प्रो. मॅक्समुल्लर यांनी वेदांचा काल ठरवण्यासाठी वेद वाङ्मयाची छंद, पंत, ब्राह्मण आणि सूत्र अशी विभागणी त्यातील भाषेच्या फरकाप्रमाणे केली. परंतु भाषाशास्त्रीय किंवा वाङ्यमयीन पद्धतीने वेदांचा काल ठरवण्याची पद्धत सदोष आहे. प्रो. मॅक्समुल्लर यांनी प्रत्येक कालखंड ५०० वर्षांचा धरला. अशा तऱ्हेने भाषाशास्त्रीय पद्धतीने वेदांचा काल ठरवू पाहणाऱ्या विद्वानातच एकवाक्यता नव्हती. म्हणूनच भाषाशास्त्रीय पद्धतीशिवाय दुसरी कुठली तरी पद्धत वापरणे आवश्यक आहे, असे टिळकांना वाटले. या दृष्टीनेच त्यांनी खगोलशास्त्राच्या साहाय्याने वेदांचा काल ठरवण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीवरही अर्थातच टीका झाली. परंतु या पद्धतीने अनुमान काढू पाहणारे विद्वान वैदिक वाङ्मयातील खगोलीय उल्लेख शोधून त्याचा योग्य तो अर्थ लावण्याऐवजी, नक्षत्रांची संकल्पना चीनकडून हिंदूंनी घेतली की हिंदूंकडून चीनने घेतली, वेदकालीन कालचक्र हे पाच की सहा वर्षांचे होते, चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी Intercalary दिवस किंवा महिने कधीपासून सुरू झाले, अशा प्रश्नांच्या चर्चेतच घुटमळत राहिले. त्यामुळेच त्यांना योग्य तो कालनिर्णय करता आला नाही, असे टिळकांचे मत होते.खगोलीय पद्धतीने कालनिर्णय करण्यासाठी उत्तरायण, दक्षिणायन आदी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे सूक्ष्म ज्ञान आवश्यक आहे. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे संपात बिंदूंचे चलन होते व ते क्रमाचे एकेका नक्षत्रांतून फिरत असतात. या संपात चलनामुळे वैदिक काळी मृगशीर्ष नक्षत्रांत असलेला वसंत संपात बिंदू रोहिणी, कृतिका, भरणी, अश्विनी, रेवती अशा क्रमाने उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सरकला आहे. याचाच अर्थ असा की मृगशीर्ष नक्षत्रापूर्वी आद्र्रा, पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये वसंत संपात होत असावा. टिळकांच्या मते वेदवाङ्मयात याचे अस्पष्ट उल्लेख आहेत. पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती होती व आर्याचे नववर्ष व पंचांग पुनर्वसू नक्षत्रातून सुरू होत असल्याचे उल्लेख ऐतरीय व तैतरीय ब्राह्मण तसेच वाजसेनीय संहितेत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. वेदवाङ्मय निर्मितीपूर्वीचा हा काळ असून लोकमान्यांनी त्याला ‘अदिती काल’ असे नाव दिले. लोकमान्य टिळकांनी आपल्या अद्वितीय ज्योतिज्र्ञानाने आणि गणिती प्रतिभेने वैदिक साहित्यात अयनचलनांचे उल्लेख आहेत हे सिद्ध केले. मृगशीर्ष (आग्रहायण किंवा ग्रीक ओरायन) नक्षत्र वसंत ऋतूच्या प्रारंभी उगवत असताना आर्यलोक यज्ञप्रारंभ करीत असल्याचे उल्लेख वेदांत आहेत हे त्यांनी निदर्शित केले. वेदवाङ्मयनिर्मितीच्या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असल्याचे नि:संदिग्धपणे सिद्ध करणाऱ्या वेदातील आख्यायिका म्हणजे १) प्रजापती दुहितृगमन, २) श्वानकथा, ३) वृषाकपी सूक्त इ. लोकमान्यांच्या मते प्रजापती हा आर्याचा मूळपुरुष असावा. त्याचेच प्रतीक म्हणून आजही उपनयनसंस्कार केला जातो व बटूचा वेश प्रजापतीप्रमाणे (दंड, मेखला इ.) असा असतो. हाच संस्कार पारशी लोकांमध्ये ‘नवज्योत’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुरावे व अयनचलनांच्या सूक्ष्म गणिताद्वारे लोकमान्यांनी ऋग्वेदाचा काल इ.स.पू. ४००० वर्षे असावा, असा सिद्धांत मांडला.सर्वसामान्य भारतीयांची व दुरभिमानी पोथीपंडितांची अशी समजूत होती की, संस्कृत या गीर्वाणभाषेतूनच जगातील सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत. परंतु, टिळकांनी हे सिद्ध केले की वेदकाली संस्कृतसारख्याच काही प्रगत भाषा अस्तित्वात होत्या व अथर्ववेदांत अन्य भाषेतील विशेषत: खाल्डियन भाषेतील शब्द आहेत. तसेच तुलनात्मक भाषाभ्यासानेही लक्षात आलेले आहे की संस्कृत, ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे. परंतु, संस्कृत ही इंडोयुरोपियन भाषासमूहाची जननी नसून ती ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांची सहभगिनी आहे. यावरून आपणास असे ढोबळ अनुमान काढता येते की, या सर्व भाषा अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात व ही प्राचीन भाषा बोलणारे आर्य लोक कुठे तरी केव्हा तरी एकत्र राहत असावेत.वेदकाळाचा वेध घेत असतानाच टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत. अवेस्तांमध्ये आर्याच्या आनंदी निवासस्थानाचे ‘अैर्यानाम वेजो’ असे वर्णन आहे. येथे अनेक महिने कडक थंडी व काही महिनेच उन्हाळा असे. या बाबतीत वैदिक व इराणी परंपरांचे मत जवळजवळ सारखेच आहे. वेदातही दीर्घकालीन दिवस व रात्री यांचा उल्लेख आहे. लो. टिळकांनी ऋग्वेदांतील,तानीदहानि बहुलान्यासन या प्राचीनमुदिता सूर्यस्य।यत: परिजार इवाचरन्त्युषो ददृक्षे न पुनर्यतीव।।या ऋचेकडे लक्ष वेधले. सूर्योदयापूर्वी बराच काळ लोटला आहे असा उल्लेख येथे आहे. टिळकांनी अशा तऱ्हेचे कालमान फक्त उत्तर ध्रुव प्रदेशातच असू शकते असे प्रतिपादन केले. टिळकांच्या मते वेदातील व अवेस्तांतील परंपरांचा विचार करता आर्याच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील मूळ वसतिस्थानाचे अक्षांश साधारणत: बरोबर ठरवता येतात. परंतु रेखांश किंवा ही आर्यभूमी उत्तर ध्रुव प्रदेशात कुठपर्यंत पसरलेली होती हे ठरवणे मात्र कठीण आहे. आर्याचे हे वसतिस्थान युरोप की आशियाच्या उत्तरेला होते हे ठरवणे शक्य नाही, ते सायबेरियाच्या उत्तरेला असणेही अशक्य नाही. परंतु, याबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे, हे त्यांना मान्य होते.वैदिक वाङ्मयात पूर्व युगातील (पूर्वयुगम) म्हणून अनेक स्फुट, अनाकलनीय आख्यायिका आहेत. त्या दुबरेध असून, त्यांचा योग्य अर्थ लावणे सहज शक्य नव्हते. परंतु लोकमान्यांनी संशोधन करून असे मत मांडले की या सकृद्दर्शनी, दुबरेध आख्यायिकांचा अर्थ आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले तर सहज लावता येतो. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडल्यानंतर वेदांची रचना झालेली असली तरी वैदिक देवतांना उत्तर ध्रुव प्रदेशाचा स्पष्ट संदर्भ आहे. महाभारतीय युद्धापर्यंत वेदांत नवनवीन सूक्तांची भर पडत होती, त्यामुळेच यातील अनेक आख्यायिका पुरातन काळातील असून, पूर्वीच्या ऋषीची (पूर्वेऋषय:) दैवी वाणीच पुनरुक्त करत असल्याचे उल्लेख या ग्रंथांत आढळतात. या पुरातन आख्यायिकांपैकी ऋग्वेदातील इंद्रवृत्रयुद्ध, दीर्घरात्रीभय, दीर्घतमस कथा, अष्टपुत्रा अदिती आख्यायिका आदींच्या साहाय्याने टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाविषयीची आपली उपपत्ती मांडली. यासाठी त्यांनी तत्कालीन भूगर्भशास्त्रीय व पुरातनशास्त्रीय संशोधनाचाही विचार केला. ‘आक्र्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथाद्वारे त्यांनी आपले हे संशोधन सादर केले. १८९९ साली टिळक डोंगरीच्या तुरुंगात असतानाच या ग्रंथाची सिद्धता झाली, .पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग इ.स.पू. दहा हजार वर्षे इतके आधी झाले असावे. लोकमान्यांनी हिमयुगोत्तर कालाच्या सुरुवातीपासून ते बुद्धपूर्वकालातील आर्याच्या स्थित्यंतराची पाच कालखंडांत विभागणी केली, तो येणेप्रमाणे-इ.स.पू. दहा हजार ते आठ हजार - या कालखंडात आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असावेत. दीर्घकालीन हिमप्रलयामुळे आर्याना मूळ वसतिस्थान सोडावे लागले. हिमयुगोत्तर काळाची सुरुवात.इ.स.पू. आठ हजार ते पाच हजार - नवीन वसतिस्थानाच्या शोधात आर्याचे स्थलांतर, युरोप व आशियाच्या उत्तरेला आर्याची भटकंती. या कालखंडात वसंत संपात पुनर्वसू नक्षत्रात होत असावा व पुनर्वसू नक्षत्रांची देवता अदिती असल्यामुळे या कालखंडाला ‘अदिती काल’ असे नाव.इ.स.पू. पाच हजार ते तीन हजार - ‘ओरायन कालखंड’ आर्याच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा कालखंड. या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. वेदांतील बहुतांश सूक्ते/ ऋचा याच कालखंडात वैदिक ऋषींना स्फुरल्या. परंतु, उत्तर ध्रुव प्रदेशातील आपल्या मूळ वसतिस्थानाच्या आठवणी त्यांच्या स्मृतिकोशात साठवलेल्या असल्यामुळे वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख याच कालखंडात आपले पंचांग व धार्मिक चालीरीती रिफॉर्म करण्याचा प्रयत्न आर्यानी केला.इ.स.पू. तीन हजार ते चौदाशे - ‘कृतिका काळ’ वसंत संपात कृतिका नक्षत्रात होत असे. तैतरीय संहिता, ब्राह्मणे वगैरेंची रचना याच कालखंडातील आहे.
         १९१८ साली टिळक इंग्लंडला गेले होते, त्या वेळी विशेष खटला व इतर राजकीय कामकाजात व्यग्र असतानाही टिळक ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’त जाऊन खाल्डियन व असीरियन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे इष्टिका लेख लिहून घेत. तसेच असीरियन संस्कृतीचे थोर अभ्यासक डॉ. थॉमस यांच्याबरोबर लोकमान्यांची चर्चा होत असे. तेव्हा दादासाहेब खापर्डे लोकमान्यांना म्हणाले, ‘इतक्या कामानंतर आपल्याला शीण न येता आपण अशा गहन विषयाकडे कसे वळता?’ यावर टिळकांचे उत्तर होते, ‘राजकीय कामाचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा करायला जातो. टिळकांचा गौरव करताना डॉ. राधाकृष्णन म्हणालेच होते, की ही वॉज बाय नेचर अ स्कॉलर अ‍ॅण्ड ओन्ली बाय नेसेसिटी अ पोलिटिशन’ (He was by nature a scholar and only by necessity a politician.)वैदिक साहित्यातील अनाकलनीय सूक्तांचा ऋचांचा अर्थ लावून टिळकांनी वेदकाल इ.स.पू. चार हजार ते साडेचार हजार वर्षे इतका मागे गेला आणि पृथ्वीवरील शेवटच्या दोन हिमयुगामधील (Interglacier) काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते हे सिद्ध केले. ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने टिळकांनी हे संशोधन केले असले तरी वैदिक वाङ्मयातील सूक्तांचा अर्थ लावण्याचे काम हे मूलत: संस्कृत भाषातज्ज्ञांचे आहे आणि एकदा का आपण लावलेला अर्थ बरोबर आहे हे मान्य झाले तर खगोलशास्त्राच्या आधारे वेदवाङ्मयाचा काल व आर्याच्या मूळ वसतिस्थानाचे गूढ उकलणे सहज शक्य आहे, अशी टिळकांची धारणा होती. टिळकांनी आपले दोन्ही ग्रंथ इंग्रजीत लिहिले. जेणेकरून वेदांची व आर्यसंस्कृतीची प्राचीनता व महानता पाश्चात्त्य विद्वानांना समजेल. तसेच इंग्रजी भाषेत हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याने जगातील विद्वानांमध्ये, आर्यसंस्कृतीच्या अभ्यासकांमध्ये या ग्रंथासंबंधी चर्चा होऊन जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाची दखल घेतली जाईल याची टिळकांना खात्री होती. तसेच आपल्या संशोधनावर काही आक्षेप घेतले जातील, आपल्या काही मतांचे खंडनही होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती. परंतु, ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धताही अग्निसान्निध पारखली जाते, तद्वत आपले संशोधन टीकाकारांच्या परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडून आर्याच्या प्रश्नावरती नवीन प्रकाश पडेल किंवा यामुळे आर्यसंस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयीच्या संशोधनास चालना मिळून पूर्वग्रहविरहित चर्चेस प्रोत्साहन मिळेल, अशी टिळकांची भावना होती. अशा तऱ्हेने कुठलाही दुराग्रह न बाळगता, निखळ संशोधकाच्या भूमिकेतून टिळकांनी आपले संशोधन अत्यंत विनम्रतेने जगापुढे सादर केले . लोकमान्य टिळकांच्या या अद्वितीय कार्याला हा मानाचा मुजरा!!!!
                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


Friday, July 10, 2020

मैत्री आणि गप्पा


किती छान आहेत हे दोन शब्द.मनाला विरंगुळा देणारे,मनाचा थकवा दूर करणारे,मनाची प्रसन्नता वाढविणारे,आपलं एक वेगळं भावविश्व निर्माण करणारे.खरेपणाची चाड शिकवणारे,पारदर्शकतेची जाणीव निर्माण करणारे,' प्रेम' या शब्दाचा गहन व योग्य अर्थ सांगणारे,' विश्वास' या शब्दाची अनुभूती देणारे . किती तरी प्रकाराने या शब्दाचं विश्लेषण            करता येईल. . . . . . . . . . . . आयुष्यात ज्याने या दोन शब्दांची अनुभूती घेतली नसेल असा माणूस विरळाच म्हणावा लागेल. विलक्षण परस्परपूरकता या दोन शब्दांमध्ये गुंफलेली आहे.मैत्री आहे पण गप्पा झाल्या नाहीत असे कोणीही म्हणणार नाही.
सर्वप्रथम ऋग्वेदात 'मित्र ' या शब्दाचा उल्लेख आढळतो त्यालाच जोडून वरूण असा शब्द येतो.या दोन देवता ऋग्वेदात मानल्या गेल्या आहेत.' मित्रावरूण ' असा एकत्रित उल्लेख देखील या शब्दांचा केला जातो. या दोन्ही देवता जलावर अधिराज्य करतात. हे दोघेही कश्यप ऋषी व त्यांची पत्नी आदितीचे पुत्र आहेत. मित्र म्हणजे अथांग सागराची गहन सखोलता तर वरूण म्हणजे या विस्तीर्ण सागराचा पृष्ठभाग किंवा किनारा असे वर्णन केलेलं आहे.मित्र हा सूर्योदय असेल तर वरूण हा सूर्यास्त आहे.खूप विस्तृत वर्णन या दोन देवतांचं केलेलं असून या दोघांमध्ये द्वंद्व वाटत असलं तरी एक गहन मैत्रीचं अंतरंग त्यात आढळून येतं.व्यावहारिक जगात मैत्री आणि गप्पा यांच्यातलं नातं अशाच स्वरूपाचं आहे असं म्हणता येईल.
' अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करूण एव च ' श्रीमद् भगवद्गीतेत आपल्या प्रिय भक्तांचं विवेचन करताना भगवान श्रीकृष्णांनी कथन केलेला हा श्लोकार्ध आहे. या मध्ये
 भगवान श्रीकृष्ण सर्व प्राणीमात्रांशी द्वेषरहित व करूणायुक्त मैत्रीची अपेक्षा करतात.अशी मैत्री ही संवादातून होत असते. अशा सुसंगत मैत्रीचा आयुष्यात उपयोग काय ? यासाठी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे त्याचा अर्थ पाहू या.
"जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं !
मानोन्नतिं दिशति पापमपा करोति !!
चांगली मैत्री ही आपल्या बुध्दीतला गोंधळ किंवा द्वंद्व संपवणे.मन पारदर्शक होवून आपल्याला खरं बोलायला शिकवते.त्यामुळे आपल्यातले दोष दूर होवून आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेते.या संदर्भात आणखी एक सुभाषित आहे ज्यांत मित्र या संकल्पनेचं चांगलं वर्णन केलंय.
चन्दनं शीतलं लोके,चन्दनादपि चन्द्रमाः !
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः !!"
 म्हणजे सर्वात थंड म्हणजेच शीतलता चंदनात असते.त्यापेक्षाही शीतलता चंद्रात असते.पण, एका चांगल्या मित्रात चंदन आणि चंद्रापेक्षाही जास्त शीतलता असते.त्यामुळेच ' मैत्री आणि गप्पा ' या दोन शब्दांमध्ये एक अनोखं नातं असतं.
प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नाड शॉ मित्राविषयी म्हणतात
" The only service a friend can really render is to keep up your courage by holding up to you a mirror in which you can see a noble image of yourself. "
एखादी सेवा खरोखर देवू शकणारी सेवा म्हणजे मित्र. ज्यात आरशाप्रमाणे आपले प्रतिबिंब आपण धैर्याने पाहिले तरी आपली प्रतिमा आपल्यालाच उदात्त दिसेल.मैत्री किती निखळ असते याची ग्वाहीच जणू बर्नाड शॉ आपल्याला देतात.त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र आणि मैत्री यांचं स्थान महत्त्वाचं आहे याबाबत कोणतीही शंका नाही.मैत्रीची महती पटल्यानंतर त्याचा दुसरा अभेद्य भाग म्हणजे संवाद त्यासाठी वापरला जाणारा सोपा शब्द म्हणजे गप्पा.घनिष्ठ मैत्री आहे पण गप्पा होत नाही असं कधी होत नाही.सर्व प्रकारच्या वयोगटात आपल्याला मित्र असतात.बालवयात झालेले मित्र ज्यांना आपण लंगोटी यार म्हणतो.ही मैत्री खूप निरागस असते.या काळात आपल्या गप्पा पण निरागस असतात.समरस होवून खेळणे हा एकच भाव यामध्ये असतो.पण आयुष्यभर एखादा तरी लंगोटी यार आपल्याला लक्षात राहतो.शालेय जीवनात आपलं मैत्रीचं वर्तुळ वाढतं पण त्यातही आपली अभ्यासाची आवड,एखादा छंद यानुसार आपली मित्रांची चौकट ठरते.या वयात होणा-या गप्पा किंवा संवाद प्रामुख्याने अभ्यासाविषयी, शिक्षकांच्या शिकवण्याविषयी , एखाद्या आवडत्या खेळाविषयी असतात.मात्र हे स्वरूप आता विकसित तंत्रज्ञानामुळे बदलतंय हे निश्चित.मला आठवतंय आम्ही किशोरावस्थेत असतांना कधी मैदानी खेळ तर कधी बैठे खेळ खेळत असू पण संध्याकाळी कुठेतरी पायी फिरायला जाणे नियमित व्हायचे. त्यावेळी आपण वाचलेली एखादी गोष्ट किंवा सिनेमाची स्टोरी. हा गप्पांचा विषय असे.पण खरा मैत्री आणि गप्पांचा आनंद मिळतो तो महाविद्यालयीन जीवनात.या वयात प्रत्येकाची निरीक्षण शक्ती, सौंदर्यदृष्टी, एखाद्या विषयाचा आस्वाद घेण्याची क्षमता विलक्षण विकसित झालेली असते.जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देखील विकसित होत जातो.मन संवेदनशील बनत जाते.त्यावर सभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव देखील पडत असतो.पण वेव्हलेंथ जुळणारे मित्र मिळाले तर अशा सुसंगत मैत्रीमधील गप्पा आपलं आयुष्य घडवतात.अशा मैत्रीला काळ,वेळ,वय असे कोणतेही निकष लावता येत नाही.अशी मैत्री दीर्घकाळ टिकून राहते.मला आठवतंय की महाविद्यालयात शिकत असताना अ.भा.विद्यार्थी परिषदेशी संबंध आला तोपर्यंत कांहीं सहपाठी मित्र होते.पण पदवीपरीक्षा होईपर्यंत अनेक नवनवीन मित्र संपर्कात येत होते.सर्वांशीच संबंध सलोख्याचे राहिले.पण, आयुष्यभर टिकणारी घनिष्ठ मैत्री काही मोजक्या मित्रांशीच निर्माण झाली ती केवळ मैत्रीत होणा-या गप्पांमुळेच.मला आठवतोय तो पदवीधर झाल्यानंतरचा सुवर्णकाळ.कदाचित १/२ वर्षानंतरचा काळ असेल पदव्यूत्तर शिक्षण बहिस्थ विद्यार्थी म्हणून सुरू होते.विद्यार्थी परिषदेच्या कामात पूर्णत: सक्रीय होतो.नवनविन कार्यकर्ते परिषदेच्या कामात जोडण्याचा प्रयत्न सुरूच होता.अधूनमधून काॅलेजातही जाणे होत असे.त्यावेळी काॅलेजात अत्यंत उत्साही गृप परिषदेच्या कामात सक्रिय झाला.परिषदेच्या कामासाठी हा संपूर्ण गृप अधिक सक्रिय करायचा असेल तर मैत्री वाढवली पाहिजे म्हणून त्यातील तिघांकडे माझे वरचेवर जाणं होवू लागलं. त्यात विकास हा संघ   कामात असल्याने पूर्वपरिचीत होता पण प्रदीप आणि राजेश,संजय ,शेखरची नव्यानं मैत्री झालेली.ती अधिक घनिष्ठ होत गेली ती आमच्यात होत असलेल्या बहुआयामी गप्पांमुळे.सलग ४/५ वर्ष आम्ही सोबतच असायचो म्हणजे इतके की २४ तासांपैकी २० तास असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.एवढे तास आम्ही गप्पा मारतच असायचो.परिषदेचं काम, कार्यक्रम,योजना , संघटनात्मक बांधणी हे विषय तर होतेच पण अन्य वेळात राजकारण, समाजकारण, साहित्यिक विषय,एखाद्या सिनेमा किंवा नाटकाचे कथानक, वृत्तपत्रातील लेख, अग्रलेख,पुस्तक वाचन, एखाद्या कवितेची चर्चा असे कितीतरी विषय गप्पांमध्ये असायचे.त्यामुळे वेळ कसा निघून जायचा ते समजायचंच नाही.कित्येकदा पूर्ण रात्रसुध्दा सरून जायची.अभ्यास,घरातली कामही एकमेकांच्या सोबतीने व्हायची.जेवण सुध्दा कित्येकदा आमच्यापैकी एखाद्याच्या घरीच उरकायचे.आमच्यापैकी सगळ्यांच्याच घरी तुम्ही एवढ्या काय गप्पा करतात ? हा यक्षप्रश्न कायमच पडलेला असायचा.कुणाच्याही घरी त्यांचे आई-बाबा घरी नसणं ही आमच्यासाठी पर्वणीच असायची मनसोक्तपणे खाणं अन् मनसोक्त गप्पा.त्यानंतर आई किंवा बाबांचा ओरडा पण खावा लागत असे.आमच्यासोबत काही नविन मित्रही कधीतरी असायचे.एकदा एका नवीन मित्राने निरागसपणे असं म्हटलं की 'तुम्ही काय बोलतात ते मला फारसं कळत नाही पण जे काही बोलता ते ऐकायला खूप छान वाटतं'.एकाने हा अग्रलेख पेपरात कुठं असतो? असंही प्रांजळपणे विचारलं.आमच्यापैकी कुणालाही वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत किंवा अगदी परिषदेच्या कार्यक्रमात बोलायचं असेल तर त्याची भाषणापूर्वी व भाषणानंतर विस्तृत चर्चा व्हायची. यामुळे आमचं वक्तृत्व विकसित झालं . एखादा लेख अथवा निबंध लिहीतांना सुध्दा आम्ही सामुहिक चर्चा करत असू. एकदा तर राष्ट्रभाषा सभा पुणेची  पंडित परीक्षा आम्ही सोबत दिली.कामाचा व्याप आणि काॅलेजचा अभ्यास यामुळे दोन दिवसांवर परीक्षा आलेली असूनही असल्यास नव्हता ४ पुस्तकं अभ्यासाला होती.आम्ही प्रत्येकाने एकेक पुस्तक एका दिवसात अभ्यासलं.दुसर् या दिवशी गप्पांचा विषय आपण अभ्यासलेलं पुस्तक विस्तृत सांगणं असाच होता.गप्पांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सर्व पंडित परीक्षा विशेष श्रेणीत पास झालो.तर अशी ही आमची मैत्री आणि आमच्या गप्पा.यामुळे आम्ही समाजजीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात झोकून देवून काम करू शकलो किंबहुना ती क्षेत्र गाजवली.आजही आम्ही आपापल्या परीने सक्रिय आहोतच पण आमची ही मैत्री आजही ताजीतवानी आहे.आम्ही क्वचित कधीतरी भेटलो तरी गप्पांमधला तोच जिव्हाळा आजही तसाच आहे.कदाचित वेळ कमी-जास्त होत असेलही पण त्या गप्पांमधला आनंद काही औरच आहे.असे अनेक मित्रांचे चमू अनेक आहेत अगदी आताच्या पिढीतही ते दिसून येतं.संगीत,नाटक, चित्रपट,कविता, सामाजिक उपक्रम, पुस्तक वाचन, नविन संशोधन, क्रीडा क्षेत्र, परराष्ट्रीय धोरण,,युध्दस्य वार्ता असे शेकडो विषय गप्पांचे राहिले तर नकारात्मक विचार आपल्यापासून शेकडो मैल  दूर राहतात याची अनुभूती आम्ही घेतली आमची पुढची पिढीही ती घेतेय.
' समान शीले व्यसनेषु सख्यम् 'असं एक संस्कृत वचन आहे.आपल्याकडे चुकीच्या अर्थाने ते वापरतात.. पण चांगल्या अर्थाने अशा समान चारित्र्याचे सारख्या आवडीचे चमू एकत्र येणं, त्यांच्यातील मैत्रीभाव वाढण्यासाठी गप्पांचे फड रंगणे हे सशक्त समाजरचनेचे लक्षण आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली पसायदानात " भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे "असं साकडं त्या विश्वात्मक परमेश्वराला घालत असावेत.त्याचा अर्थबोध व्हावा एवढीच अपेक्षा.
            धन्यवाद!!

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...