Wednesday, June 26, 2024
प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य टिळक
Saturday, August 1, 2020
बहुआयामी व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक
Friday, July 31, 2020
टिळकांचा परराष्ट्रीय दृष्टीकोण
Thursday, July 30, 2020
संगीतप्रेमी लोकमान्य टिळक
Wednesday, July 29, 2020
लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार
आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरत असूनही लोकमान्य टिळक मूलभूत अध्यात्मिक अध्ययन व चिंतनापासून कधीच दूर गेले नाहीत.याउलट अध्यात्म आणि राजकारण,अध्यात्म आणि राष्ट्रवाद याची सांगड घालून अनेक तरूणांना त्यांनी त्याकाळात निस्पृह देशभक्तीसाठी प्रवृत्त केले.निष्काम कर्मयोग हा त्यांच्या समग्र विचारांचा गाभा होता.त्यांचा प्रत्येक व्यवहार याच दिशेने जाणारा होता.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते.
महर्षी योगी अरविंदांनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही.
१९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”
टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे. लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले.
टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.
लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.
शसुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात.
मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे.
जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हाच त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार होता.मोक्षाप्रत जाणारा अध्यात्ममार्ग हा केवळ तत्त्वचिंतन अथवा तपश्चर्येतून जात नाही तर निष्काम कर्मयोगातूनही मोक्षाप्रत जाता येते हे त्यांनी आपल्या विचारातून आणि व्यवहारातून सिध्द केले.अशा महान कर्मयोगी टिळकांच्या चरणी हे विचार पुष्प सादर समर्पण!!!!!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार.
Tuesday, July 28, 2020
निष्णात कायदेतज्ञ टिळक
Sunday, July 26, 2020
टिळकांचे अर्थशास्त्रीय चिंतन
Saturday, July 25, 2020
झुंजार पत्रकार' लोकमान्य टिळक
Friday, July 24, 2020
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ लोकमान्य टिळक
स्वातंत्र्यचळवळीतील अग्रणी म्हणून राष्ट्रीय राजकारणात लोकमान्य टिळक आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होतेच पण सामाजिक कार्यकर्ते म्हणुनही त्यांची एक वेगळी छाप होती . असं असूनही लोकमान्य टिळकांनी आपला व्यासंग कधीच सोडला नाही. खरंतर टिळकांचा मूळ पिंड हा एका अभ्यासकाचा, संशोधकाचा होता.गणित व खगोलशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते.त्याकाळात कामाचा प्रचंड व्याप असतांनाही वेळात वेळ काढून त्यांनी ‘द ओरायन’ तसंच ‘द आक्र्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचं संशोधन सुरूच होते.
लोकमान्य टिळकांनीही प्राचीन वैदिक साहित्यांतील खगोलीय उल्लेखांच्या आधारे वेदांचा काल व आर्याचे मूळ वर्षांस्थान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी आपल्या The Orien आणि The Arctic Home In the Vedas या दोन अद्वितीय ग्रंथांद्वारे आपले संशोधन, आपले विचार जगाच्या समोर मांडले व सर्वत्र त्याचे जोरदार स्वागत झाले. १८९३ साली Orien प्रसिद्ध झाल्यानंतर, जॉन हॉपकिन्स युनिव्र्हसिटी, बाल्टीमोर येथील प्राच्य विद्येचे प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी फेब्रु. १८९४ मध्ये दिलेल्या व्याख्यानात म्हटले की, 'A literary event of even greater importance has happened within the last two or three months- an event which is certain to stir the world of science and culture' हे पुस्तक म्हणजे 'unquestinably the literary sensation of the year' आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या ग्रंथांमुळे जहाल राजकारणाच्या पलीकडील प्रज्ञावंत टिळकांचे स्तिमित करणारे दर्शन जगाला झाले. या संशोधनामुळेच मॅक्समुल्लरसारख्या ऋषितुल्य विद्वानाची व टिळकांची जवळीक निर्माण झाली.वेदवाङ्मय हे मानवाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे आणि मानवाचा विशेषत: आर्यवंशाचा अभ्यास करण्यास वेदांइतके दुसरे महत्त्वाचे असे काहीच नाही. १८८२ साली केंब्रिज विद्यापीठात ‘भारतापासून इंग्लंडने काय शिकावे?’ या विषयावरती प्रा. मॅक्समुल्लर यांनी व्याख्यानमाला गुंफली. आपल्या भाषणात संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात, ‘प्राचीन आर्यवंशाचा विस्तार आज ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव्ह अशा नानारूप रंगात झाला आहे. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून या आर्यवंशाचा व त्यांच्या चालीरीतींचा व संस्कृतीचा परिचय आपल्याला होणार आहे. ऋग्वेदातील काही सूक्तात आजही आपल्याला आर्यजनांच्या पूर्वीच्या अवस्थेचे दर्शन होते.मानवाच्या उत्क्रांतीचा विचार करताना आर्यसंस्कृतीचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. परंतु वेदांसारखे अतिशय अभिजात वाङ्मय निर्माण करणाऱ्या आर्याबद्दलचा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय झालेला नाही. त्यापैकी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे १) आर्याचे मूळ वसतिस्थान कुठले? २) वेदांचा निश्चित काळ कोणता? ३) आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून इतरत्र गेले? या सर्व प्रश्नांचा विचार खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र वगैरे शास्त्रांच्या आधारे करणे आवश्यक आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना अनेक स्थित्यंतरे झाली. हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता, इतर नैसर्गिक आपत्ती व मानवी टोळ्यांतील आपापसातील आक्रमणे यातून मानवाचे निरनिराळे गट सतत स्थलांतर करत होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कृतीचे आदानप्रदान होत होते. शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे भाषांमुळे वैविध्य येत होते. काही नवीन भाषा उदयाला येत होत्या, तर काही भाषा मृत होत होत्या. या सर्वाचा विचार करता आर्यासंबंधीच्या समस्येची उकल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे, काटेकोरपणे उपलब्ध पुराव्यांची छाननी करून, विविध शास्त्रांच्या साहाय्याने तर्कशुद्ध निष्कर्ष मांडणे आवश्यक आहे.टिळकांचेही लक्ष या गहन प्रश्नांकडे गेले आणि त्यांनी चिकित्सकपणे वैदिक साहित्याचे संशोधन केले. त्या संशोधनाची फलश्रुती म्हणजेच टिळकांचे हे दोन अपूर्व ग्रंथ! भगवद्गीतेचे परिशीलन करत असताना विभूती योगांतील ‘मासाना मार्गशीर्षोऽहं, ऋतुना कुसुमाकर:’ या श्लोकाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या वचनामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे असे त्यांना वाटले अन् त्या अनुरोधाने त्यांनी वेदकाळाचा निर्णय करण्याचे ठरवले. इजिप्तची संस्कृती सर्वात प्राचीन आहे, असे पाश्चात्त्य विद्वान मानत होते. परंतु आर्य संस्कृती मात्र इ.स. पूर्व २४०० पेक्षा जास्त जुनी नाही असे त्यांचे मत होते. टिळकांनी आपल्या संशोधनाद्वारे नेमके हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, आर्यसंस्कृती अतिप्राचीन आहे व वेदातील विशेषत: ऋग्वेदातील आर्याच्या धार्मिक चालीरीती ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावेळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. या संबंधात टिळकांनी वैदिक वाङ्मयातील सूक्ते व पुराणकथा यांचा पुरावा म्हणून वापर करून त्यांचा अर्थ नव्याने लावला. त्याचप्रमाणे वैदिक आर्याच्या या चालीरीती व पुराणकथा यांचा इराण व ग्रीसच्या चालीरीती आणि पुराणकथा यामध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आपले मत सिद्ध करण्यासाठी लोकमान्यांनी वैदिक साहित्यातील अत्यंत विश्वसनीय पुरावेच वापरले व पुराणकथांचा उपयोग केवळ मतपुष्टीसाठी केला.प्रो. मॅक्समुल्लर यांनी वेदांचा काल ठरवण्यासाठी वेद वाङ्मयाची छंद, पंत, ब्राह्मण आणि सूत्र अशी विभागणी त्यातील भाषेच्या फरकाप्रमाणे केली. परंतु भाषाशास्त्रीय किंवा वाङ्यमयीन पद्धतीने वेदांचा काल ठरवण्याची पद्धत सदोष आहे. प्रो. मॅक्समुल्लर यांनी प्रत्येक कालखंड ५०० वर्षांचा धरला. अशा तऱ्हेने भाषाशास्त्रीय पद्धतीने वेदांचा काल ठरवू पाहणाऱ्या विद्वानातच एकवाक्यता नव्हती. म्हणूनच भाषाशास्त्रीय पद्धतीशिवाय दुसरी कुठली तरी पद्धत वापरणे आवश्यक आहे, असे टिळकांना वाटले. या दृष्टीनेच त्यांनी खगोलशास्त्राच्या साहाय्याने वेदांचा काल ठरवण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीवरही अर्थातच टीका झाली. परंतु या पद्धतीने अनुमान काढू पाहणारे विद्वान वैदिक वाङ्मयातील खगोलीय उल्लेख शोधून त्याचा योग्य तो अर्थ लावण्याऐवजी, नक्षत्रांची संकल्पना चीनकडून हिंदूंनी घेतली की हिंदूंकडून चीनने घेतली, वेदकालीन कालचक्र हे पाच की सहा वर्षांचे होते, चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी Intercalary दिवस किंवा महिने कधीपासून सुरू झाले, अशा प्रश्नांच्या चर्चेतच घुटमळत राहिले. त्यामुळेच त्यांना योग्य तो कालनिर्णय करता आला नाही, असे टिळकांचे मत होते.खगोलीय पद्धतीने कालनिर्णय करण्यासाठी उत्तरायण, दक्षिणायन आदी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे सूक्ष्म ज्ञान आवश्यक आहे. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे संपात बिंदूंचे चलन होते व ते क्रमाचे एकेका नक्षत्रांतून फिरत असतात. या संपात चलनामुळे वैदिक काळी मृगशीर्ष नक्षत्रांत असलेला वसंत संपात बिंदू रोहिणी, कृतिका, भरणी, अश्विनी, रेवती अशा क्रमाने उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सरकला आहे. याचाच अर्थ असा की मृगशीर्ष नक्षत्रापूर्वी आद्र्रा, पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये वसंत संपात होत असावा. टिळकांच्या मते वेदवाङ्मयात याचे अस्पष्ट उल्लेख आहेत. पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती होती व आर्याचे नववर्ष व पंचांग पुनर्वसू नक्षत्रातून सुरू होत असल्याचे उल्लेख ऐतरीय व तैतरीय ब्राह्मण तसेच वाजसेनीय संहितेत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. वेदवाङ्मय निर्मितीपूर्वीचा हा काळ असून लोकमान्यांनी त्याला ‘अदिती काल’ असे नाव दिले. लोकमान्य टिळकांनी आपल्या अद्वितीय ज्योतिज्र्ञानाने आणि गणिती प्रतिभेने वैदिक साहित्यात अयनचलनांचे उल्लेख आहेत हे सिद्ध केले. मृगशीर्ष (आग्रहायण किंवा ग्रीक ओरायन) नक्षत्र वसंत ऋतूच्या प्रारंभी उगवत असताना आर्यलोक यज्ञप्रारंभ करीत असल्याचे उल्लेख वेदांत आहेत हे त्यांनी निदर्शित केले. वेदवाङ्मयनिर्मितीच्या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असल्याचे नि:संदिग्धपणे सिद्ध करणाऱ्या वेदातील आख्यायिका म्हणजे १) प्रजापती दुहितृगमन, २) श्वानकथा, ३) वृषाकपी सूक्त इ. लोकमान्यांच्या मते प्रजापती हा आर्याचा मूळपुरुष असावा. त्याचेच प्रतीक म्हणून आजही उपनयनसंस्कार केला जातो व बटूचा वेश प्रजापतीप्रमाणे (दंड, मेखला इ.) असा असतो. हाच संस्कार पारशी लोकांमध्ये ‘नवज्योत’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुरावे व अयनचलनांच्या सूक्ष्म गणिताद्वारे लोकमान्यांनी ऋग्वेदाचा काल इ.स.पू. ४००० वर्षे असावा, असा सिद्धांत मांडला.सर्वसामान्य भारतीयांची व दुरभिमानी पोथीपंडितांची अशी समजूत होती की, संस्कृत या गीर्वाणभाषेतूनच जगातील सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत. परंतु, टिळकांनी हे सिद्ध केले की वेदकाली संस्कृतसारख्याच काही प्रगत भाषा अस्तित्वात होत्या व अथर्ववेदांत अन्य भाषेतील विशेषत: खाल्डियन भाषेतील शब्द आहेत. तसेच तुलनात्मक भाषाभ्यासानेही लक्षात आलेले आहे की संस्कृत, ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे. परंतु, संस्कृत ही इंडोयुरोपियन भाषासमूहाची जननी नसून ती ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांची सहभगिनी आहे. यावरून आपणास असे ढोबळ अनुमान काढता येते की, या सर्व भाषा अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात व ही प्राचीन भाषा बोलणारे आर्य लोक कुठे तरी केव्हा तरी एकत्र राहत असावेत.वेदकाळाचा वेध घेत असतानाच टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत. अवेस्तांमध्ये आर्याच्या आनंदी निवासस्थानाचे ‘अैर्यानाम वेजो’ असे वर्णन आहे. येथे अनेक महिने कडक थंडी व काही महिनेच उन्हाळा असे. या बाबतीत वैदिक व इराणी परंपरांचे मत जवळजवळ सारखेच आहे. वेदातही दीर्घकालीन दिवस व रात्री यांचा उल्लेख आहे. लो. टिळकांनी ऋग्वेदांतील,तानीदहानि बहुलान्यासन या प्राचीनमुदिता सूर्यस्य।यत: परिजार इवाचरन्त्युषो ददृक्षे न पुनर्यतीव।।या ऋचेकडे लक्ष वेधले. सूर्योदयापूर्वी बराच काळ लोटला आहे असा उल्लेख येथे आहे. टिळकांनी अशा तऱ्हेचे कालमान फक्त उत्तर ध्रुव प्रदेशातच असू शकते असे प्रतिपादन केले. टिळकांच्या मते वेदातील व अवेस्तांतील परंपरांचा विचार करता आर्याच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील मूळ वसतिस्थानाचे अक्षांश साधारणत: बरोबर ठरवता येतात. परंतु रेखांश किंवा ही आर्यभूमी उत्तर ध्रुव प्रदेशात कुठपर्यंत पसरलेली होती हे ठरवणे मात्र कठीण आहे. आर्याचे हे वसतिस्थान युरोप की आशियाच्या उत्तरेला होते हे ठरवणे शक्य नाही, ते सायबेरियाच्या उत्तरेला असणेही अशक्य नाही. परंतु, याबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे, हे त्यांना मान्य होते.वैदिक वाङ्मयात पूर्व युगातील (पूर्वयुगम) म्हणून अनेक स्फुट, अनाकलनीय आख्यायिका आहेत. त्या दुबरेध असून, त्यांचा योग्य अर्थ लावणे सहज शक्य नव्हते. परंतु लोकमान्यांनी संशोधन करून असे मत मांडले की या सकृद्दर्शनी, दुबरेध आख्यायिकांचा अर्थ आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले तर सहज लावता येतो. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडल्यानंतर वेदांची रचना झालेली असली तरी वैदिक देवतांना उत्तर ध्रुव प्रदेशाचा स्पष्ट संदर्भ आहे. महाभारतीय युद्धापर्यंत वेदांत नवनवीन सूक्तांची भर पडत होती, त्यामुळेच यातील अनेक आख्यायिका पुरातन काळातील असून, पूर्वीच्या ऋषीची (पूर्वेऋषय:) दैवी वाणीच पुनरुक्त करत असल्याचे उल्लेख या ग्रंथांत आढळतात. या पुरातन आख्यायिकांपैकी ऋग्वेदातील इंद्रवृत्रयुद्ध, दीर्घरात्रीभय, दीर्घतमस कथा, अष्टपुत्रा अदिती आख्यायिका आदींच्या साहाय्याने टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाविषयीची आपली उपपत्ती मांडली. यासाठी त्यांनी तत्कालीन भूगर्भशास्त्रीय व पुरातनशास्त्रीय संशोधनाचाही विचार केला. ‘आक्र्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथाद्वारे त्यांनी आपले हे संशोधन सादर केले. १८९९ साली टिळक डोंगरीच्या तुरुंगात असतानाच या ग्रंथाची सिद्धता झाली, .पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग इ.स.पू. दहा हजार वर्षे इतके आधी झाले असावे. लोकमान्यांनी हिमयुगोत्तर कालाच्या सुरुवातीपासून ते बुद्धपूर्वकालातील आर्याच्या स्थित्यंतराची पाच कालखंडांत विभागणी केली, तो येणेप्रमाणे-इ.स.पू. दहा हजार ते आठ हजार - या कालखंडात आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असावेत. दीर्घकालीन हिमप्रलयामुळे आर्याना मूळ वसतिस्थान सोडावे लागले. हिमयुगोत्तर काळाची सुरुवात.इ.स.पू. आठ हजार ते पाच हजार - नवीन वसतिस्थानाच्या शोधात आर्याचे स्थलांतर, युरोप व आशियाच्या उत्तरेला आर्याची भटकंती. या कालखंडात वसंत संपात पुनर्वसू नक्षत्रात होत असावा व पुनर्वसू नक्षत्रांची देवता अदिती असल्यामुळे या कालखंडाला ‘अदिती काल’ असे नाव.इ.स.पू. पाच हजार ते तीन हजार - ‘ओरायन कालखंड’ आर्याच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा कालखंड. या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. वेदांतील बहुतांश सूक्ते/ ऋचा याच कालखंडात वैदिक ऋषींना स्फुरल्या. परंतु, उत्तर ध्रुव प्रदेशातील आपल्या मूळ वसतिस्थानाच्या आठवणी त्यांच्या स्मृतिकोशात साठवलेल्या असल्यामुळे वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख याच कालखंडात आपले पंचांग व धार्मिक चालीरीती रिफॉर्म करण्याचा प्रयत्न आर्यानी केला.इ.स.पू. तीन हजार ते चौदाशे - ‘कृतिका काळ’ वसंत संपात कृतिका नक्षत्रात होत असे. तैतरीय संहिता, ब्राह्मणे वगैरेंची रचना याच कालखंडातील आहे.१९१८ साली टिळक इंग्लंडला गेले होते, त्या वेळी विशेष खटला व इतर राजकीय कामकाजात व्यग्र असतानाही टिळक ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’त जाऊन खाल्डियन व असीरियन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे इष्टिका लेख लिहून घेत. तसेच असीरियन संस्कृतीचे थोर अभ्यासक डॉ. थॉमस यांच्याबरोबर लोकमान्यांची चर्चा होत असे. तेव्हा दादासाहेब खापर्डे लोकमान्यांना म्हणाले, ‘इतक्या कामानंतर आपल्याला शीण न येता आपण अशा गहन विषयाकडे कसे वळता?’ यावर टिळकांचे उत्तर होते, ‘राजकीय कामाचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा करायला जातो. टिळकांचा गौरव करताना डॉ. राधाकृष्णन म्हणालेच होते, की ही वॉज बाय नेचर अ स्कॉलर अॅण्ड ओन्ली बाय नेसेसिटी अ पोलिटिशन’ (He was by nature a scholar and only by necessity a politician.)वैदिक साहित्यातील अनाकलनीय सूक्तांचा ऋचांचा अर्थ लावून टिळकांनी वेदकाल इ.स.पू. चार हजार ते साडेचार हजार वर्षे इतका मागे गेला आणि पृथ्वीवरील शेवटच्या दोन हिमयुगामधील (Interglacier) काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते हे सिद्ध केले. ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने टिळकांनी हे संशोधन केले असले तरी वैदिक वाङ्मयातील सूक्तांचा अर्थ लावण्याचे काम हे मूलत: संस्कृत भाषातज्ज्ञांचे आहे आणि एकदा का आपण लावलेला अर्थ बरोबर आहे हे मान्य झाले तर खगोलशास्त्राच्या आधारे वेदवाङ्मयाचा काल व आर्याच्या मूळ वसतिस्थानाचे गूढ उकलणे सहज शक्य आहे, अशी टिळकांची धारणा होती. टिळकांनी आपले दोन्ही ग्रंथ इंग्रजीत लिहिले. जेणेकरून वेदांची व आर्यसंस्कृतीची प्राचीनता व महानता पाश्चात्त्य विद्वानांना समजेल. तसेच इंग्रजी भाषेत हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याने जगातील विद्वानांमध्ये, आर्यसंस्कृतीच्या अभ्यासकांमध्ये या ग्रंथासंबंधी चर्चा होऊन जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाची दखल घेतली जाईल याची टिळकांना खात्री होती. तसेच आपल्या संशोधनावर काही आक्षेप घेतले जातील, आपल्या काही मतांचे खंडनही होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती. परंतु, ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धताही अग्निसान्निध पारखली जाते, तद्वत आपले संशोधन टीकाकारांच्या परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडून आर्याच्या प्रश्नावरती नवीन प्रकाश पडेल किंवा यामुळे आर्यसंस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयीच्या संशोधनास चालना मिळून पूर्वग्रहविरहित चर्चेस प्रोत्साहन मिळेल, अशी टिळकांची भावना होती. अशा तऱ्हेने कुठलाही दुराग्रह न बाळगता, निखळ संशोधकाच्या भूमिकेतून टिळकांनी आपले संशोधन अत्यंत विनम्रतेने जगापुढे सादर केले . लोकमान्य टिळकांच्या या अद्वितीय कार्याला हा मानाचा मुजरा!!!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार.
Thursday, July 23, 2020
दूरदर्शी सामाजिक कार्यकर्ते लोकमान्य टिळक
समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री
समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...
-
भारतीय इतिहासातील ' न भूतो न भविष्यति ' अशी राजकीय विरासत कुणाची असेल तर लोकमान्य टिळक हे नांव प्रकर्षाने पुढे येतं.त्यांच्या स्मृती...
-
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:| इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि || मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केले...
-
वाचकहो, मन:पूर्वक नमस्कार! लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पै...