वाचकहो,
मन:पूर्वक नमस्कार!
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पैलूचे अध्ययन करून मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतांना विलक्षण त्रेधा उडाली कारण लोकमान्य टिळकांचा एक पैलू उलगडायचे म्हटले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील असंख्य अगणित आयाम कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलू लागतात त्यातून नेमकं काय मांडता येईल यासाठी ही त्रेधातिरपीट होत होती. परंतु आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही मालिका पूर्ण झाली.आपल्या सूचनांचे स्वागत करून आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।।
या श्लोकात जे म्हटलंय यांची तंतोतंत अनुभूती हे लिखाण करतांना आली. राजा आणि विद्वान यांची खरोखर तुलना होवू शकत नाही.कारण राजाचा सन्मान त्याच्या राज्यात होतो पण विद्वान लोक सर्व स्थळी पूजनीय असतात.अष्टपैलू, अष्टावधानी हे शब्द लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना अपुरे पडतात.टिळक हे लोकमान्य,लोकोत्तर युगपुरुष ठरले यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं व्यक्तित्व,कर्तृत्व व दातृत्व बहुआयामी अशा स्वरूपाचं होतं.लोकजागृती, लोकसंग्रह,लोकसंघटन,,या त्रिसूत्रीच्या आधारावर ते लोकमान्य ठरले.
१८८० ते १९२० असा तब्बल ४० वर्षाचा काळ त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यतित केला.त्यात त्यांनी केलेल्या बहुविध कामांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची साक्ष मिळते.एक हुशार व विद्यार्थी प्रिय शिक्षक ते लोकमान्य नेता म्हणून त्यांचा झालेला प्रवास जगातील विचारवंतांना देखील अचंबित करणारा होता.सव्यसाची शिक्षक,संस्थाचालक, झुंजार पत्रकार, व्यासंगी संशोधक,निस्पृह देशभक्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,परखड देशभक्त, अर्थशास्त्रज्ञ,अभ्यासपूर्ण लेखन, धर्माभिमानी, संस्कृती रक्षक,राष्ट्रहित जोपासणारा धुरंधर राजकारणी,वेदान्तापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर भाष्य करण्याची जाण असणारा विश्लेषक, कलेची आवड असणारा रसिक अशी अगणित रूपं लोकमान्यांच्या जीवनात ठळकपणे समोर येतात.म्हणूनच टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे अनुभवाला येते.त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी देशविदेशातील अनेक विचारवंतांनी विस्तृतपणे विश्लेषण केले आहे.एवढच नाही तर अनेक कवींनी त्यांच्यावर कवने, पोवाडे,आरती,अष्टके संस्कृत श्लोक आदि विविध प्रकारे रचना केल्या आहेत.आपापल्या परीने लोकमान्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील कवी गोविंद यांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केलेली रचना मनाला विशेष स्पर्श करून जाते.
आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद
या कवितेतून लोकमान्यांच्या कांहीं पैलूंवर ते नक्कीच प्रकाश टाकतात. लिहीण्यासारखे खूप आहे.त्यांच्या पावन स्मृती जागवणे आजच्या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकमान्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज लेखणीला विराम देतो!!!!! धन्यवाद 🙏
शशिकांत घासकडबी, नंदुरबार.
No comments:
Post a Comment