एक जहाल राष्ट्रवादी विचारांचे राजकारणी म्हणून लोकमान्य टिळक सर्वांना माहीत आहेत.पण एक दूरदर्शी सामाजिक कार्यकर्ते म्हणून टिळकांकडे पाहिले जात नाही.किंबहुना ते समाज सुधारणांच्या विरोधात होते अशी मांडणी करण्यात आली. खरंतर लोकमान्य टिळकांनी अत्यंत वस्तुनिष्ठपणे सामाजिक सुधारणांचा पाया घातला.
एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणुन कार्य करते झाले. पत्रकार म्हणुन कार्य करत असतांना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी होत होते. सर्वप्रथम त्यांचे सामाजिक विचार समजून घेतले तर त्यांचे सामाजिक कार्य आपल्या लक्षात येईल.
लोकमान्य टिळक म्हणायचे ’’ धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजुन त्याकरता कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पुजा करण्यास शिकायला हवे तेव्हांच परमेश्वराची पुजा करण्यालायक बनु शकु ".
महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता. शैक्षणिक सुधारणा ही त्यावेळची प्राथमिक गरज लक्षात घेऊन आपल्या सामाजिक कार्याचा शुभारंभ टिळकांनी अशा पद्धतीने केला
त्याच्याही पुढे जावून टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यु इंग्लिश हायस्कुल व महाविद्यालयीन शिक्षणाकरता फर्ग्युसन काॅलेज ची स्थापना केली.
1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला यामागे भगवद्गीता ही केवळ मोक्ष किंवा धार्मिक उपासनेचा ग्रंथ नसून समाजाला कर्ममार्गावर नेणारे हे पाथेय आहे हा विचार दिला.
1916 साली त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे यालाच ’स्वशासन’ देखील म्हणतात यातून त्यांना आपल्या समाजाचा आत्मसन्मान वाढवायचा होता.
हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार घेणारे नेते टिळकच होते.यातून संपूर्ण देश एकसूत्रात बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये अखेर पर्यंत चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. त्यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली. टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला.
आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले.
अशा थोर समाजसुधारक टिळकांना विनम्र अभिवादन!!!!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार.
No comments:
Post a Comment