Monday, June 22, 2020

क्षण एक पकडण्याचा!!


श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट झाल्यावर घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की, "त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून क्षणाचे महत्त्व समजून घे ."
रामाच्या त्या बोलण्याने लक्ष्मण संभ्रमित झाला.ज्याचा आपण शत्रू म्हणून नाव केला.त्याच्याकडून कांहीं समजून घ्यायचं? शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, त्वरा कर अन्यथा रावणाच्या अंताबरोबरच हे 'क्षणाचं महत्व' सुध्दा कायमचे अंत पावेल. भावाची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मण अखेर मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाकडे गेला.रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली. त्याने लक्ष्मणाला सांगितले की, त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्श करून गेले ते सोन्याचे झाले, मधले रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले. 
रावण म्हणाला, हे आहे क्षणाचे महत्त्व. "क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर . प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे.तो क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे. 
मित्रहो, नुकताच रामायणातील हा लहानसा प्रसंग वाचण्यात आला अन्  'क्षण' या एकाच शब्दावर लक्ष केंद्रीत होऊन मनांत विचारांचं अक्षरशः काहुर माजलं . विविध भाषांमध्ये हा शब्द पल, निमीष, a moment, आदि विविध प्रकारे वापरला जातो. परंतु सर्व भाषांमध्येच नाही तर समस्त मानवी जीवनात या शब्दाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका इंग्रजी लेखकाने म्हंटलंय की, " Life is not measured by time. It is measured by moments." किती गहन अर्थ भरलाय या एका लहानशा वाक्यात.आयुष्याचं मूल्यमापन या अर्थाने करायचं असेल तर आपण किती वर्ष जगलो यापेक्षाही आलेल्या प्रत्येक क्षणाचा कसा उपयोग करून जगलो याला आपोआपच महत्त्व प्राप्त होते.म्हणूनच " वाया जावू नेदी क्षण ऐसे संतांचे वचन" असे तुकोबाराय म्हणतात. कविवर्य केशवसुत यांच्या "आला क्षण गेला क्षण" या कवितेतील काही पंक्ती येथे उद्धृत करण्याचा मोह होतो.........
" कर्तव्य जे तत्पर त्यांचे ,दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे ,आला क्षण गेला क्षण" किंवा 
"वार्धक्य जर सौख्यात जावया व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते, ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण "
पहिल्या काव्यपंक्तीत  आपलं निहीत कर्तव्य आपल्याला तत्परतेनं पार पाडायचं असेल तर तसा मनाचा दृढ निश्चय करायला एक क्षण देखील पुरेसा असतो अशी शिकवण आपल्या मुखातून घड्याळ आपल्याला देत असतं.म्हणून आयुष्यातला एक योग्य क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे.हे समजून घेण्यासाठी काही प्रसंग आपण समजून घेतले पाहिजेत,
आपल्याला कुठेतरी प्रवासाला जायचं म्हणून आपण जय्यत तयारी करतो.सर्व सामान, कपडे,पाणी, खाद्य पदार्थ सर्व काही घेवून आपण स्टेशनवर पोहचतो.वेळ ७.३० मिनीटाची असते आपण  घड्याळातील वेळेनुसार योग्य वेळेत पोहोचलेलो असतो पण केवळ काही क्षणांचा विलंब झाल्याने गाडी धाड धाड करत आपल्या समोरून निघून जाते.केवळ काही क्षणांचा विलंब झाल्याने आपल्याला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो.कारण घड्याळाचा प्रत्येक शब्द आपण ऎकत नाही.आयुष्याच्या प्रवासात हा क्षण आपण पकडला तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.
छत्रपती शिवरायांच्या पदरी असलेले कविराज भूषण यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे, एकदा भूषण ऐन तारुण्यात असतांना आपल्या घरी भावासोबत जेवायला बसला असताना जेवणात भाजीत मीठ नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.त्याने तसं वहिनीला तत्काळ सांगितलं,स्वाभाविकपणे वहिनीला राग आला.वहिनीने रागातच उत्तर दिलं ' आधी मीठासाठी पैसे कमवायला शिका मग नांव ठेवा' त्याक्षणी भूषणला ते वाक्य जिव्हारी लागलं अन् तो पानावरून तडक उठून बाहेर पडला ते पैसे कमवण्याचा निर्धार करूनच.आपल्यातल्या काव्य प्रतिभेची जाणीव त्याला झाली अन् छत्रपतींच्या दरबारात कविराज होण्याची संधी त्याला मिळाली.एक क्षण आयुष्याचं सोनं करून गेला.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे,अण्णा ऐन तारुण्यात असतांना देशभक्तीने प्रेरीत होवून सैन्यात भरती झाले होते.एका युध्दाच्या प्रसंगी ते चालवत असलेल्या जीपवर शत्रूचा हल्ला झाला.जीपमधील सर्व सैनिक मारले गेले.मनाला प्रचंड यातना झाल्या पण त्याक्षणी मनात विचार आला की,मी एकटाच जिवंत राहिलो त्याअर्थी माझ्याकडून आणखी काही विशेष कार्य घडायचंय.युध्द संपल्यावर स्टेशनवर गावाकडे येण्यासाठी आले असतानाच आपले सहकारी गेल्याचं दुःख होतं , विमनस्क मनस्थितीत फिरत असताना भूक लागली म्हणून भेळ खायला घेतली त्यावर स्वामी  विवेकानंदांचा " नरसेवा ही ईश्र्वरसेवा है " हा संदेश वाचण्यात आला आणि आपल्या गांवाचा विकास करण्याचा निर्धार करून ते गांवात परतले.पुढे तब्बल वीस वर्ष त्यांनीं स्वत:ला गाडून घेऊन ग्रामविकासाचा आदर्श उभा केला.
मित्रहो, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.याचा पुरेसा बोध घेवून आपण केशवसुतांच्या ह्याच कवितेतील आणखी एका पंक्तीकडे वळू या,
"वार्धक्य जर सौख्यात जावया, व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते, ध्यानी सतत अपुल्या आण,
घडय़ाळ जे हे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण "
आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करताना बालपणीचा अज्ञातपणे गेलेला सुखाचा काळ आपण सोडला तर जगण्याची उमेद जेव्हा येते त्यावेळी येणारं आयुष्य सुखात जावं असं आवर्जून वाटायला लागतं.त्यासाठी आपली धडपड सुरू होते,धावपळ सुरू होते.या धकाधकीत अगणित क्षण आपली इच्छा नसतानाही निसटून जातात. पण याचा पश्चाताप आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी होतो.म्हणुनच केशवसुत आपल्याला घड्याळ आपल्याला अविरतपणे जे सांगतंय ते ऐकण्याची गळ घालतात.
एका ब्रिटीश विचारवंताने क्षणाचं मूल्य सांगताना असं म्हंटलंय,
If you don't give me a penny  no problem .but  .but if you give me a moment l will be more happy" 
संतश्रेष्ठ माधवनाथ महाराज आपल्या शिष्यगणांसमवेत वार्तालाप करत असताना अचानकपणे ' मला हिशेब द्या, हिशेब द्या ' असं मोठमोठ्या आवाजात ओरडायला लागले.सर्वजण घाबरले.शिष्यांना वाटलं महाराज आश्रमातील खर्चाचा तपशील मागत असतील एका ज्येष्ठ शिष्याने धाडस करून नम्रपणे सांगितले महाराज आश्रमातील खर्चाचा हिशेब पूर्ण करून उद्या पर्यंत देतो महाराज म्हणाले मूर्खांनो तो हिशेब मी मागणी नाहीये मला हिशेब हवाय तुमच्या गेलेल्या प्रत्येक क्षणाचा.तो प्रत्येकाला मांडता येईल? शिष्य नि:शब्द झाले.
कविवर्य बा.भ.बोरकर संधीप्रकाशात कवितेत  म्हणतात 
" आयुष्याची आता झाली उजवण , येतो तो तो क्षण अमृताचा "
ही जाणीव माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होत राहिली तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.!!!!
                                   शशिकांत घासकडबी, नंदुरबार,
                                                     9527153925

Tuesday, April 7, 2020

स्वल्पविराम घेवू या,,

                        

नमस्कार मित्रांनो,
         गेले १०/१२ दिवस आपण घरात बसून आहोत.खूप कंटाळा येतोय नाही?पण काय करणार सगळं जगच थांबलंय.आपण जगापेेक्षा वेगळे कसे असणार नाही कां? पण मनांत अनेक प्रश्न तुम्हांला,मला सर्वांनाच भेडसावताहेत की हे सर्व अचानक झालंच कसं ? कधीपर्यंत हे सर्व चालणार ? जग नेमकं कोणत्या अवस्थेला पोहचणार ? या सर्व प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा व्हायची वेळ आलीय. एक ५०० मायक्रो मीटर आकारमान असलेला विषाणू समपूर्ण जग वेठीला धरू शकतो नव्हे ठप्प करून टाकतो.जग तिसरं महायुध्द होणार म्हणून विज्ञान,तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या देशाची संरक्षण सिध्दता करत ़असतांना कुठलाही गाजावाजा न होता जग विनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं जातंय अन् भौतिक विकासाच्या गमज्या मारणारे देश ,त्यांचे प्रमुख हताश होऊन त्याकडे पहात बसले आहेत .केवढी ही दुर्दशा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलीय.हे सत्य नाकारता येणार नाही.फक्त आणि फक्त एका विषाणुमुळे हे घडलंय.मला जाता जाता 'विश्वनाथ' चित्रपटातील नाना पाटेकरचा एक संवाद आठवला."एक मच्छर आदमी को रातभर सोने नही देता,हिजडा बना देता है "......वगैरे वगैरे. आज एक विषाणु कोरोना का रूप लेकर आया और पूरे विश्व को निकम्मा बना दिया. मित्रहो हे सर्व वाटतंय तितकं सोपं नाहीये हे मात्र निश्चीत .कधी संपेल माहीत नाही.पण आपण याकडे एक स्वल्पविराम म्हणूनच पाहू या. होय ' स्वल्पविराम ' हा शब्द नव्हे तर संकल्पना मी जाणीवपूर्वक  वापरतोय.
     ' स्वल्पविराम ' या संकल्पनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे याची  आज नव्याने जाणीव व्हायला लागलीय. हा स्वल्पविराम नसता तर जगात अवघा कल्लोळ निर्माण झाला असता.पाॅज,टेकऑफ,मध्यंतर,शाॅर्ट रेसेस या अनेक शब्दातून हा व्यक्त होतो.एकूण काय तर क्षणभर विश्रांती.सहजपणे विचार केला अन् समाज जीवनातली विविध क्षेत्रं समोर येवू लागली.सर्वप्रथम आपण वाचायला ,लिहायला शिकलो ते विरामचिन्हांचा वापर करून .त्यात स्वल्पविराम आपल्यासमोर कित्येकदा नाचत नाचत येतो.आपण गाणं म्हणायला शिकलो तेंव्हासुध्दा दोन ओळींमध्ये पाॅज घ्यायला शिकलो.ते जर केलं नसतं तर शब्दांचे ,वाक्यांचे अर्थ उमगले नसते.गाण्याचे स्वरताल ह्रदयापर्यंत भिडले नसते.विमान जमिनीवरून आकाशात उंच भरारी घेते तेव्हा टेकऑफ घेतेच की. कोणतंही वाहन बनवतांना त्याच्या वेगाला मर्यादा असावी म्हणून ब्रेक,गियर या व्यवस्था निर्माण केल्याच की.खेळ मैदानावरचा असो की बैठा त्यात पाॅज,टेकऑफ महत्वाचा असतोच ना.? एवढंच कशाला आपण मनोरंजनासाठी एखादा चित्रपट ,नाटक पाहतो तेंव्हादेखील मध्यंतराची आतुरतेने वाट बघत असतो. यालाच ' स्वल्पविराम '   म्हणता येईल. सद्यःस्थितीत संपूर्ण जगाला मिळालेला हा स्वल्पविरामच आहे .हा पूर्णविराम नक्कीच नाही.
मित्रहो,आज या स्वल्पविरामाची गरज कां निर्माण झाली असावी ? याचाही थोडा विचार करण्याची गरज आहे. भौतिक विकासाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपण सर्वच इतके रममाण झालो आहोत की कुठेतरी पाॅज,स्वल्पविराम ,टेकऑफ घ्यायला हवा हेच आपण विसरलो. जगातल्या दोन देशांमध्ये आम्हीच कसे महासत्ता आहोत हे दाखविण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली अन् त्याचा निकष  समोरील शत्रूचा विनाश करण्यासाठी लागणारी संरक्षणसिध्दता हा मानला गेला.दोन व्यक्तीमध्ये होणारी भौतिक विकासाची स्पर्धादेखील याच वळणावर येवून ठेपली.आम्ही भौतिक विकास साधला म्हणजे सारं कांही मिळालं अशीच आमची धारणा बनत चालली त्यामुळे कुठेही स्वल्पविराम न घेता गतिमान अधिक गतिमान होण्याच्या मागे आम्ही लागलो.त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास हेच अंतिम सत्य आपण मानू लागलो. परिणामस्वरूप यातला 'माणूस' हा घटक आम्ही हरवून बसलो आहोत किंबहुना माणसाला सुध्दा यंत्रवत बनविण्याची , वापरण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली.विश्वाचं अंतिम सत्य भौतिक विकास नव्हे तर अधिभौतिक विकासालाही महत्व दिले पाहिजे हेच आम्हाला कळेनासे झालंय. कविवर्य केशवसूतांची एक काव्यपंक्ती येथे उधृत कराविशी वाटतेय.ते म्हणतात,"देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या" नेमकं हेच तत्व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीलाही लागू पडते . विज्ञानाने बनवलेला यंत्रमानव व  यंत्रवत् झालेला माणूसदेखील माणसानेच घडवला ना ?मग या माणसाच्या मन या संकल्पनेच्या विकासाचं काय? त्यालाच अधिभौतिक विकास म्हणतात.तो झाला नाही तर या प्रगतीला कधीतरी विनाश आहेच याची अनुभूती यावी म्हणून हा स्वल्पविराम आहे.थोर विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांनी एक सुंदर वचन एका ठिकाणी लिहून ठेवले आहे .ते म्हणतात,"शत्रुवर विजय मिळवायचा असेल तर शस्त्रांची नितांत गरज असते पण ते शस्त्र चालविणारे हात मजबूत नसतील तर ते शस्त्र कुचकामी ठरते .त्याच्याही पुढे जावून ते म्हणतात की प्रशिक्षणातून हे हात मजबूत होतीलही पण,त्या हातांना ते शस्त्र चालविण्यासाठी प्रवृत्त करणारं मन दुर्बल असेल तर ते शस्त्र व ते हातही निरूपयोगी ठरतील."नेमका हाच बोध या स्वल्प विरामातून आपल्या घ्यायला हवा.भारतीय संस्कृतीत या सर्व प्रकारच्या म्हणजेच सर्वांगीण विकासाच्या विचाराची दिशा आहेच.स्वल्पविरामाच्या निमीत्ताने  ती दिशा शोधण्याच प्रयत्न आपण करू या.सद्यःस्थितीत शासन व प्रशासनाने जो कृती कार्यक्रम दिलाय त्याचे पालन करू या.जगाला पूर्णविराम नको असेल तर स्वल्पविराम घेवू या.
कवी गुलजा़र यांनी एका कवितेत दिलेला संदेश आपण विचारात घ्यायला हवा ते म्हणतात,

बे वजह घर से निकलने की ज़रूरत क्या है?
मौत से आँखे मिलाने की ज़रूरत क्या है?
"सब को मालूम है बाहर की हवा है क़ातिल,
"यूँही क़ातिल से उलझने की ज़रूरत क्या है?
ज़िन्दगी एक नेमत है उसे सम्भाल के रखो,
क़ब्रगाहों को सजाने की ज़रूरत क्या है?
दिल बहलाने के लिये घर में वजह हैं काफ़ी,
यूँही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है ?

गुलज़ारसाहेब व पंतप्रधान यांचा हाच संदेश आहे की
आपण स्वल्पविराम घेवू या! आपण स्वल्पविराम घेवू या!

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...