Wednesday, July 29, 2020

लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार


आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरत असूनही लोकमान्य टिळक  मूलभूत अध्यात्मिक अध्ययन व  चिंतनापासून कधीच दूर गेले नाहीत.याउलट अध्यात्म आणि राजकारण,अध्यात्म आणि राष्ट्रवाद याची सांगड घालून अनेक तरूणांना त्यांनी त्याकाळात निस्पृह देशभक्तीसाठी प्रवृत्त केले.निष्काम कर्मयोग हा त्यांच्या समग्र विचारांचा गाभा होता.त्यांचा प्रत्येक व्यवहार याच दिशेने जाणारा होता.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते.
       महर्षी योगी अरविंदांनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही.
१९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”
     टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे. लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले.
टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.
  लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्‍तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.
   शसुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात. 
मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे.
जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हाच त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार होता.मोक्षाप्रत जाणारा अध्यात्ममार्ग हा केवळ तत्त्वचिंतन अथवा तपश्चर्येतून जात नाही तर निष्काम कर्मयोगातूनही मोक्षाप्रत जाता येते हे त्यांनी आपल्या विचारातून आणि व्यवहारातून सिध्द केले.अशा महान कर्मयोगी टिळकांच्या चरणी हे विचार पुष्प सादर समर्पण!!!!!!
                                           शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


Tuesday, July 28, 2020

निष्णात कायदेतज्ञ टिळक


      लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे टिळक हे सर्वोत्कृष्ट वकीलच नव्हे तर निष्णात कायदेतज्ञ होते.वकील हे केवळ समोर आलेल्या खटल्याच्या कायदेशीर बाबी तपासून आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात पण टिळकांनी अनेकदा कायद्यालाच आव्हान देवून त्या कायद्यात सुधारणा करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले.  
१८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली
संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा लेख लिहिला. त्या वेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करीत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदा., सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादीअनेक सुधारणांचा त्यात समावेश होता.
पुण्यातील पंचहौद मिशनतर्फे १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.
हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. 
२२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.
शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. 
या सुमारास टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्‌भवले. यात इंग्रज अधिकारी, कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने, खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तऐवज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला; पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथमहाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली.
जुलूम तो जुलूम; मग तो कायदेशीर असो  किंवा बेकायदेशीर  असे परखड मत ते व्यक्त करीत.
भारतमंत्री सर एडविन माँटेग्यू यांनी २० ऑगस्ट १९१७ रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. या वेळी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले.
१९१९ मध्ये अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे; माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अपुऱ्‍या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत, असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले; परंतु सुधारणा अपुऱ्‍या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये; आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका, असा टिळकांचा सल्ला होता.
व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले;
अशाप्रकारे अनेक खटले चालवून भारतीय जनतेला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.अन्यायकारक जुलमी कायद्याच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला
अशा महान कायदेतज्ञ टिळकाना लक्ष लक्ष नमन!!!
                                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Sunday, July 26, 2020

टिळकांचे अर्थशास्त्रीय चिंतन


टिळकांचे अर्थशास्त्रीय चिंतन
लोकमान्य टिळक हे  अर्थशास्त्रज्ञ नव्हते. परंतु प्रत्येक विषयाचे सखोल अध्ययन करून त्याविषयी मत व्यक्त करणे हा टिळकांचा  स्थायीभाव होता.त्यांनी त्याकाळात मांडलेले अर्थविषयक विचार आजही तंतोतंत लागू पडतात.
   याबाबत  दी इकॉनॉमिस्ट' या पुस्तकात  टी. व्ही. पर्वते यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे.ते म्हणतात- ''अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थशास्त्र हा विषय तज्ज्ञांवर सोडला होता, टिळकांनी मात्र तसे केले नाही. राजकीय अर्थकारणाच्या खाचाखोचा पूर्णपणे जाणून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी जनमत तयार केले.''
 तसेच आचार्य जावडेकर यांनी  ''हिंदवी स्वराज्य हा केवळ वरिष्ठ वर्गाच्या स्वाभिमानाचा किंवा संस्कृतिरक्षणाचा अथवा वैभवाचा प्रश्न नसून, तो सामान्य जनतेतील कोट्यवधी जिवांच्या पोटाचा, प्राणधारणेचा आणि क्लेशरहित व रोगरहित जीवनाचा प्रश्न आहे.''याची लोकांमध्ये राजकीय जाणीव रुजवली ती लोकमान्यांनी असे नमूद केले आहे. ब्रिटिशांनी आणलेली कायदा आणि सुव्यवस्था, जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण, परचक्रापासून रक्षण या तथाकथित फायद्यांना काहीही अर्थ नव्हता. कारण भारताचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी ब्रिटिश सरकार कुठलीही धोरणं आखत नव्हतं. तसंच भारतीय भांडवलाचा आणि असलेल्या उद्योगधंद्यांचा क्षय होऊन भारत कायमस्वरूपी पिढ्यान् पिढ्या भयानक गरिबीत ढकलला जाईल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. लोकमान्यांनी अत्यंत मार्मिकपणे याचं वर्णन  त्यांच्या एका अग्रलेखात केलं आहे- ते म्हणतात,"काही काळापर्यंत ईश्वराने दयाळू होऊन आमच्यावर राज्य करण्याकरिता हे कोणी तरी दैवशाली पुरुष पाठविले आहेत, असा सर्वांचा समज झाला. इंग्रजांच्या राज्यात आंधळ्याने काठीस सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावे असे लोक म्हणू लागले; परंतु दारूचा अंमल ज्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही, त्याचप्रमाणे राज्यक्रांतीपासून उत्पन्न झालेला हा भ्रमही उत्तरोत्तर दूर होत चालला. आंधळ्याने काठीस सोने बांधून जावे खरें; पण सोनेच उत्तरोत्तर दुर्मिळ होत चालले ही गोष्ट दिवसेंदिवस लोकांच्या जास्त लक्षात येऊ लागली.
सारांश, इंग्रजी अमलाने आमची दृष्टी जी अगदी दिपून गेली होती, ती आता सुधारत जाऊन आमच्यावर जुलूम कसा होतो व आमचे नुकसान कशाने होते हे शोधण्यास आम्ही लागलो आहोत ''.
अर्थतज्ज्ञांची Drain Theory, लोकमान्य अशाप्रकारे सोप्या भाषेत लोकांपर्यंत नेत होते आणि ब्रिटिश भारताच्या आर्थिक प्रश्नांवर लक्ष वेधून स्वराज्यासाठीच्या राजकीय लढ्याला धार चढवत होते. 'केसरी'तील आपल्या सहज-सोप्या मराठी लेखांतून लोकमान्यांनी अनेक विद्याक्षेत्रांची दारं सामान्य मराठी वाचकांसाठी किलकिली केली. अर्थशास्त्र हाही त्यातील महत्त्वाचा विषय. शेतसारा, कररचना, उद्योगधंदे, शेती, दुष्काळ, गरिबी, कामगार, चलन अशा बहुविध आर्थिक विषयांवर लोकमान्यांनी मुबलक लिखाण केलं.
आर्थिक प्रश्नांच्या माध्यमातूनही ते राजकीय असंतोष निर्माण करत होते. परतंत्र देशातील लोकांचे नेते, या नात्याने होत असलेल्या आर्थिक अन्यायाला वाचा फोडणे, त्यावर तत्कालीन उपाय शोधून लोकांचा त्रास कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणे, भारतीयांचे आर्थिक हितसंबंध जपणे, या कार्यातून त्यांनी भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात केली. त्याचा राजकीय दृष्ट्या वापर करून घेतला. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार वगैरे माध्यमातून लोकांची मोठ्या दीर्घकालीन लढ्याची तयारी पक्की करून घेतली. त्यांनी त्या पायावर स्वराज्याची लढाई उभी केली!
पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो, यासंबंधाने कोणाचाच वाद नाही. वादाचा प्रश्न असा आहे की, दुष्काळाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य रयतेत कां असू नये? दुष्काळाच्या वेळी निर्वाह चालविता येण्याइतकी शिल्लक प्रजेपाशी कां नसावी? दुष्काळामुळे येथे धान्य उत्पन्न झाले नाही तर मद्रास, बंगाल, ब्रह्मदेश या प्रांतांतून तेथील लोकांना पुरून आम्हांस पुरेसे धान्य यंदा उपलब्ध झालेले आहे; पण ते धान्य विकत घेण्यास आमच्या रयतेपाशी पैसेच नाहीत.वर्षाच्या अखेरीस सरकार-सारा देऊन टाकल्यावर रयतेपाशी काहीच शिल्लक न राहून नवीन सालच्या प्रारंभी धुतलेल्या तांदळाप्रमाणे आम्हांस उघडे-नागडे का व्हावे लागते?.हिंदुस्तानच्या दारिद्र्याचे कारण सांप्रतची राज्यव्यवस्था होय.'दुष्काळ ही नैसर्गिक घटना नसून राजकीय कारणांमुळे तो घडतो, हा मुख्य सिद्धांत लोकमान्यांनी मांडला.       टिळकांचा हा विचार अशाप्रकारे आजही जगात अनेक देशांबाबत लागू होतो आणि त्यांची अर्थविषयक इतर मांडणी ही भारताच्या आजच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भातही उपयुक्त ठरते, हे त्यांच्या विचारांचे महत्त्व आहे.
भारतातील ब्रिटिश राज्यव्यवस्था गरिबांवर कराचा बोजा टाकते. साम्राज्यातील इतर खर्चही त्यातून निभावते. इकडचे जुने उद्योग मेले आणि नवे वाढणार नाहीत, याची व्यवस्था केली जाते. दरवर्षी अशी दिवसाढवळ्या होणारी लूट, पुन्हा भारतात कर्जाऊ रक्कम म्हणून आणली जाते किंवा गुंतवली जाते आणि व्याजाच्या रूपाने किंवा नफ्याच्या रूपाने पुन्हा एकदा पैशाचा ओघ देशाबाहेरच जातो.अशा दुष्टचक्रात देश, स्वराज्य नसल्याने अडकून पडला आहे, असे टिळक म्हणत. आज पूर्ण राजकीय स्वातंत्र्याच्या काळातही काहीशा याच पद्धतीने इथून लुटलेला काळा पैसा पुन्हा एकदा एफ.पी.आय किंवा एफ.आय.आय.च्या स्वरूपात नफेखोरीसाठी परत येण्याची शक्यता राहते. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीच लाभ होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. योग्य पद्धतीने येणाऱ्या परकीय भांडवलाला मात्र टिळकांचा विरोध नव्हता, किंबहुना परकीय भांडवल वापरलं जावं, याविषयी ते आग्रही होते.
महाराष्ट्राची जमीन ही साखर उद्योगाला योग्य आहे, हे टिळकांनी पहिल्यांदा मांडलं. 'कोणत्याही देशाची सांपत्तिक स्थिती निव्वळ शेतीवरच अवलंबून असल्यास ती सदासर्वकाळ चांगली राहणे संभवनीय नसते' असं म्हणून शेती किफायतशीर करणं आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण कमी होऊन त्यांच्या रोजगारासाठी उद्योगधंदे हाच पर्याय ठरतो, हा त्यांनी मांडलेला विचार आजही कालसुसंगत आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे त्यांनी जे लिहिलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतले. 'पैसा फंड'सारख्या उपक्रमांना प्रेरणा देऊन उद्योगांसाठी भांडवल उभं केलं. औद्योगिक परिषदा भरवल्या. काडेपेट्यांचा कारखाना, ग्लास कारखाना यांसारख्या लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, याची अनेक उदाहरणं आहेत. एम.एस.एम.इ.च्या संदर्भात त्यांचे विचार हे आजही राष्ट्रनिर्माणासाठी उपयुक्त आहेत. विखुरलेले लघु आणि मध्यम उद्योगधंदे उभारल्यानेच फ्रँको-जर्मनी युद्धानंतर जर्मनी पुन्हा एकदा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकला, हे ते नमूद करतात.
ब्रिटिश साम्राज्यशाही ही मूलतः व्यापारी आणि आर्थिक आहे आणि मध्ययुगीन पंथीय आणि धार्मिक प्रेरणा त्यात नाहीत अथवा कमी आहेत असं टिळक म्हणतात. तसंच अशी अनिर्बंध आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणारी सत्ता ही उभयपक्षी कशी घातक असते, हे ही ते सांगतात. कारण साम्राज्य हे अंतिमतः जेत्या राष्ट्रातीलही व्यापक हिताकडे दुर्लक्ष करून मोजक्यांचं आर्थिक हितसंबंध जोपासण्याचं एक साधन होतं, हे त्यांनी फार सोप्या रीतीने स्पष्ट केलं. या साम्राज्यामीमांसेची परिणती म्हणूनच टिळकांनी ब्रिटिश मजूर पक्षाशी जोडलेले संबंध आणि त्याच पक्षाच्या कारकिर्दीत पुढे भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, यावरून निश्चितच त्या मांडणीची सत्यता इतिहाससिद्ध आहे. आजच्या काळातही अनिर्बंध आर्थिक सत्ता गाजवू पाहणाऱ्या चीनसारख्या देशाला ती मीमांसा लागू आहे.
अनेक शतकं भारतातील विविध महान तत्त्वचिंतकांनी तयार केलेल्या वैचारिक बैठकीमुळे ऐहिक जीवनाच्या उन्नतीबाबत भारतीय मन उदासीन झालं होतं. टिळकांच्या 'गीतारहस्या'ने ती विचारपद्धती बदलून ऐहिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात भांडण नसून, ऐहिक उन्नती सुद्धा साधली पाहिजे, हा विचार विद्वत्तापूर्वक मांडला. भारतीय मानसिकतेसाठी हा बदल क्रांतिकारक होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील 'पॉझिटिव्हिझम' या तत्त्वप्रणालीमुळे युरोप विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे गेला आणि त्याची परिणती त्याच्या आर्थिक सुबत्तेत झाली. टिळकांना भारतानेही त्याचा अंगीकार करून आपली प्रगती साधावी असं वाटत होतं. परंतु त्याचबरोबर समाजधारणशास्त्र, नीतिशास्त्र या विषयांमध्ये मात्र ते 'पॉझिटिव्हिझम' आणि 'पुष्कळांचे पुष्कळ सुख' मांडणारे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र नाकारतात आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा अंगीकार करतात. असा हा विचार आधुनिक भारतासाठी आणि जगासाठीही उपयुक्त ठरणार आहे. टिळकांच्या राजकीय अर्थविचाराचं मूळ अशा रीतीने त्यांनी 'गीतारहस्या'त मांडलेल्या तत्त्वविचारात आहे.
उदारमतवादावर आधारित जागतिक भांडवलशाही असो की शेतकरी-कामगारांची जागतिक सत्ता स्थापन करू पाहणारा कम्युनिझम या 'जगाचे कल्याण' करू पाहणाऱ्या विचारसरणी खरेतर श्रीमंत राष्ट्रांना आपल्या सोयीने वागून अधिक श्रीमंत, अधिक प्रबळ होण्यासाठी असतात, असा अनुभव टिळकपूर्व आणि टिळकांच्या काळात लोकांना इंग्लंडबाबत येत होता आणि टिळकोत्तर काळात तो आता आपल्याला अमेरिका आणि चीनबाबत येत आहे. श्रीमंत राष्ट्र आपल्या सोयीने 'मुक्त व्यापार' किंवा 'संरक्षणवाद' याची निवड करतात. राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून भारतही धोरणांची आखणी करू शकतो, हे टिळकांच्या अर्थविचाराला जे राष्ट्रवादाचे सातत्याने कोंदण होते. 
सद्यस्थितीत या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्यासाठी, स्वराज्याचे राजकीय, आर्थिक, अध्यात्मिक अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा टिळकविचारांकडे वळावे लागणार आहे. लोकमान्यांच्या या अर्थविचाराला विनम्र प्रणाम!!!!
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Saturday, July 25, 2020

झुंजार पत्रकार' लोकमान्य टिळक

'
     लोकमान्य टिळक हे मुळातच तल्लख बुध्दीमत्ता असलेले स्वतंत्र व परखड विचारांचे होते.त्याकाळात तथाकथित बुद्धिवादी इंग्रजांचे गुणगान करण्यातच आपली लेखणी झिजवत होते.लोकमान्यांना हे सहन झालं नाही.असे परधार्जिणे लेखक व पत्रकार हे समाजाचे प्रबोधन करण्याऐवजी भारतातील सर्वसामान्य माणसाला वैचारिक गुलामगिरीत ढकलण्याचाच प्रयत्न करीत आहेत,असे त्यांना वाटले.स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रखर राष्ट्रवाद तसेच इंग्रजी राजवटीच्या जुलमी कारभारावर आसूड ओढणारी पत्रकारिता त्यांना अभिप्रेत होती. त्यामुळेच केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी पार मोठी आहे
भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं आणि लढणारं एक धोरणी आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक किती चुकले किती बरोबर आहेत याच्या कितीही चर्चा झाल्या तरीही टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले योगदान कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ' प्रखर राष्ट्रवादाचे जनक' म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. विविध अग्रलेख लिहून  ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी  खूप मोठी आहे.
भारतात पत्रकारिता ही पाश्चिमात्य जगाच्या  तुलनेत फारच उशिरा आली. त्याहीपेक्षा पत्रकारितेचे महत्त्व समजायला लोकांना फार वेळ लागला. पण देशाला इंग्रजांच्या विरूद्ध जागं करायचं असेल, स्वातंत्र्याची लढाई जर समर्थपणे लढायची असेल तर पत्रकारितेसारखं दुसरं हत्यार नाही हे टिळकांनी चांगलंच हेरलं होतं. अमेरिकन क्रांतीही पूर्णपणे माध्यमांनी पुढे नेली होती. यासाठीच केसरी आणि मराठासारखे वर्तमानपत्र टिळकांनी सुरू केले. 
टिळक लिहित असलेले अग्रलेख तेव्हा सारा समाज वाचत होता. त्यांच्या वैचारिक प्रबोधनातून सारा समाज ढवळून निघत होता. पुण्यात 1897 सालं उगवलंच ते प्लेगची साथ घेऊन. या भयानक साथीच्या रोगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही जीव घेतला. तेव्हा सरकारने रॅन्ड नावाचा अधिकारी पुण्यात नियुक्त केला होता. प्लेगच्या रूग्णांना अत्यंत अमानुष वागणूक इंग्रज देत होते. प्लेगच्या साथीच्या नावाखाली इंग्रज नागरिकांचा प्रचंड छळत करत होते. या साऱ्या जाचाविरूद्ध टिळक लिहित होते. ब्रिटिशांच्या अन्यायावर टीकेचे आसूड टिळकांनी ओढले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुण्यातल्या दोन तरूणांनी रॅण्डचा खून केला. पण रॅण्डला मारण्यास त्यांना प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून टिळक आणि त्यांचे लेखच आहेत हे ब्रिटीशांना कळायला वेळ लागली नाही आणि भारताच्या इतिहासातला पहिला राजद्रोहाचा म्हणजेच 'सेडिशन'चा खटला टिळकांवर टाकला गेला. या खटल्यात टिळकांना 18 महिने तुरूंगवास ठोठावण्यात आला. तुरूंगातून सुटल्यावरही टिळकांनी सरकारवर टीकास्त्र सोडणे चालूच ठेवले.
त्यांचे हितचिंतक तुम्हाला असं लिहिल्याने कैद होऊ शकते तेव्हा असं लिहू नका असं वारंवार सुचवायचे. पण वर्तमानपत्र ही सरकारला खूश करण्यासाठी नाही तर सरकार सामान्यांवर जो अन्याय करतंय,ज्या धोरणांनी सरकार या देशचं नुकसान करतंय ती धोरणं तो अन्याय लोकांसमोर आणणे याचसाठी आहेत ही टिळकांची धारणा होती. आज जगाला हादरवून सोडणाऱ्या पनामा पेपर्ससारख्या प्रकरणावर आणि त्यातल्या आरोपींवर जेव्हा  भारतीय माध्यमं मुक गिळून गप्प बसतात तेव्हा खरोखरच निर्भीडपणे जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करणाऱ्या टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
1906 साली टिळकांवर पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. यावेळी टिळकांनी  भारतीयांच्या सहिष्णुतेलाही मर्यादा असतात असं बजावलं होतं आणि सरकारवर ' विनाशकाले विपरीत बुद्धी ' नावाच्या लेखातून सडकून टीका केली होती. यावेळी पुन्हा एकदा टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि टिळकांचे वकील मात्र मोहम्मद अली जिन्ना होते. यावेळी टिळकांना सहा वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आला. टिळकांवर आयुष्यात तीनदा राजद्रोहाचा खटला भरला आणि तिन्हीदा त्यांना शिक्षा झाली तरीही टिळकांनी सरकारविरूद्ध  लिहिणे चालूच ठेवले.
फक्त राजकीयच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांवरही टिळक लिखाण करत असत पण ते सारं लिखाण ते  स्वातंत्र्याशी जोडतं. गीतेचा सार सांगताना त्यांनी कर्मयोग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहा, या हेतूनेच सुचवला होता. लढत राहा स्वातंत्र्याची अपेक्षा करू नका, कारण लढलो तर ते नक्की मिळेल अशी टिळकांची धारणा होती.
टिळकांच्या काळात भारतातले इंग्रजी वर्तमानपत्र सरकारची तळी उचलण्यातच धन्यता मानत होते. प्रादेशिक भाषांमध्ये इतकं प्रभावीपणे पत्रकारिता रूजवणाऱ्या टिळकांवर या इंग्रजी वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली. सत्य उघडकीस आणल्याबद्दल एका पत्रकारावरच माध्यमांनी टीका करण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. पण टिळकांनी कोणालाच भीक घातली नाही. आयुष्यभर आपल्या पत्रकारितेतून स्वराज्यासाठी लढत राहिले. पुढे गांधीजींनीही टिळकांचा आदर्श घेत पत्रकार होऊन समाजाचे प्रबोधन आणि ब्रिटिशांवर टीका करणं चालूच ठेवलं आणि स्वतंत्र होईपर्यंत टिळकांची परंपरा पुढे नेली.
  गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आपल्या बांधवाना सोडवण्यासाठीही लोकमान्य टिळक झटत राहिले. आजच्या प्रसारमाध्यमांकडे बघितल्यानंतर त्यांनी टिळकांकडून कांहीं धडा घ्यायची नितांत गरज आहे असे म्हणावे लागेल.
   भारतीय पत्रकारितेला वेगळा आयाम देणाऱ्या लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आजच्या परिस्थितीतही किती चपखलपणे लागू होतात,सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, पुन:श्च हरि ओम, अगंतुक अधिकाराची थोरवी अशा महत्त्वाच्या अग्रलेखांमुळे माध्यमांच्या विस्फोटाच्या काळात लोकमान्यांची पत्रकारिता समजून घेता येणार आहे.गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे मनोरंजन करणे हे वर्तमानपत्राचे खरे कर्तव्य नव्हे. खरे पत्रकार हे वाचकांचे राजकीय मार्गदर्शक म्हणूनच काम करीत असतात, असा विचार लोकमान्यांनी दिला आहे.'आजच्या पत्रकारिता क्षेत्राने हे समजून घेण्याची गरज आहे.नि:स्पृह व झुंजार पत्रकार असलेल्या लोकमान्य टिळकांना ही मानवंदना!!!!
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार

Friday, July 24, 2020

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ लोकमान्य टिळक


स्वातंत्र्यचळवळीतील अग्रणी म्हणून राष्ट्रीय राजकारणात लोकमान्य टिळक आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होतेच पण सामाजिक कार्यकर्ते म्हणुनही त्यांची एक वेगळी छाप होती . असं असूनही  लोकमान्य टिळकांनी आपला व्यासंग कधीच सोडला नाही. खरंतर टिळकांचा मूळ पिंड हा एका अभ्यासकाचा, संशोधकाचा होता.गणित व खगोलशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते.त्याकाळात कामाचा प्रचंड व्याप असतांनाही वेळात वेळ काढून त्यांनी ‘द ओरायन’ तसंच ‘द आक्र्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचं संशोधन सुरूच होते.

      लोकमान्य टिळकांनीही प्राचीन वैदिक साहित्यांतील खगोलीय उल्लेखांच्या आधारे वेदांचा काल व आर्याचे मूळ वर्षांस्थान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी आपल्या The Orien आणि The Arctic Home In the Vedas या दोन अद्वितीय ग्रंथांद्वारे आपले संशोधन, आपले विचार जगाच्या समोर मांडले व सर्वत्र त्याचे जोरदार स्वागत झाले. १८९३ साली Orien प्रसिद्ध झाल्यानंतर, जॉन हॉपकिन्स युनिव्‍‌र्हसिटी, बाल्टीमोर येथील प्राच्य विद्येचे प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी फेब्रु. १८९४ मध्ये दिलेल्या व्याख्यानात म्हटले की, 'A literary event of even greater importance has happened within the last two or three months- an event which is certain to stir the world of science and culture' हे पुस्तक म्हणजे 'unquestinably the literary sensation of the year' आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या ग्रंथांमुळे जहाल राजकारणाच्या पलीकडील प्रज्ञावंत टिळकांचे स्तिमित करणारे दर्शन जगाला झाले. या संशोधनामुळेच मॅक्समुल्लरसारख्या ऋषितुल्य विद्वानाची व टिळकांची जवळीक निर्माण झाली.वेदवाङ्मय हे मानवाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे आणि मानवाचा विशेषत: आर्यवंशाचा अभ्यास करण्यास वेदांइतके दुसरे महत्त्वाचे असे काहीच नाही. १८८२ साली केंब्रिज विद्यापीठात ‘भारतापासून इंग्लंडने काय शिकावे?’ या विषयावरती प्रा. मॅक्समुल्लर यांनी व्याख्यानमाला गुंफली. आपल्या भाषणात संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात, ‘प्राचीन आर्यवंशाचा विस्तार आज ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव्ह अशा नानारूप रंगात झाला आहे. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून या आर्यवंशाचा व त्यांच्या चालीरीतींचा व संस्कृतीचा परिचय आपल्याला होणार आहे. ऋग्वेदातील काही सूक्तात आजही आपल्याला आर्यजनांच्या पूर्वीच्या अवस्थेचे दर्शन होते.मानवाच्या उत्क्रांतीचा विचार करताना आर्यसंस्कृतीचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. परंतु वेदांसारखे अतिशय अभिजात वाङ्मय निर्माण करणाऱ्या आर्याबद्दलचा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय झालेला नाही. त्यापैकी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे १) आर्याचे मूळ वसतिस्थान कुठले? २) वेदांचा निश्चित काळ कोणता? ३) आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून इतरत्र गेले? या सर्व प्रश्नांचा विचार खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र वगैरे शास्त्रांच्या आधारे करणे आवश्यक आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना अनेक स्थित्यंतरे झाली. हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता, इतर नैसर्गिक आपत्ती व मानवी टोळ्यांतील आपापसातील आक्रमणे यातून मानवाचे निरनिराळे गट सतत स्थलांतर करत होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कृतीचे आदानप्रदान होत होते. शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे भाषांमुळे वैविध्य येत होते. काही नवीन भाषा उदयाला येत होत्या, तर काही भाषा मृत होत होत्या. या सर्वाचा विचार करता आर्यासंबंधीच्या समस्येची उकल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे, काटेकोरपणे उपलब्ध पुराव्यांची छाननी करून, विविध शास्त्रांच्या साहाय्याने तर्कशुद्ध निष्कर्ष मांडणे आवश्यक आहे.टिळकांचेही लक्ष या गहन प्रश्नांकडे गेले आणि त्यांनी चिकित्सकपणे वैदिक साहित्याचे संशोधन केले. त्या संशोधनाची फलश्रुती म्हणजेच टिळकांचे हे दोन अपूर्व ग्रंथ! भगवद्गीतेचे परिशीलन करत असताना विभूती योगांतील ‘मासाना मार्गशीर्षोऽहं, ऋतुना कुसुमाकर:’ या श्लोकाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या वचनामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे असे त्यांना वाटले अन् त्या अनुरोधाने त्यांनी वेदकाळाचा निर्णय करण्याचे ठरवले. इजिप्तची संस्कृती सर्वात प्राचीन आहे, असे पाश्चात्त्य विद्वान मानत होते. परंतु आर्य संस्कृती मात्र इ.स. पूर्व २४०० पेक्षा जास्त जुनी नाही असे त्यांचे मत होते. टिळकांनी आपल्या संशोधनाद्वारे नेमके हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, आर्यसंस्कृती अतिप्राचीन आहे व वेदातील विशेषत: ऋग्वेदातील आर्याच्या धार्मिक चालीरीती ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावेळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. या संबंधात टिळकांनी वैदिक वाङ्मयातील सूक्ते व पुराणकथा यांचा पुरावा म्हणून वापर करून त्यांचा अर्थ नव्याने लावला. त्याचप्रमाणे वैदिक आर्याच्या या चालीरीती व पुराणकथा यांचा इराण व ग्रीसच्या चालीरीती आणि पुराणकथा यामध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आपले मत सिद्ध करण्यासाठी लोकमान्यांनी वैदिक साहित्यातील अत्यंत विश्वसनीय पुरावेच वापरले व पुराणकथांचा उपयोग केवळ मतपुष्टीसाठी केला.प्रो. मॅक्समुल्लर यांनी वेदांचा काल ठरवण्यासाठी वेद वाङ्मयाची छंद, पंत, ब्राह्मण आणि सूत्र अशी विभागणी त्यातील भाषेच्या फरकाप्रमाणे केली. परंतु भाषाशास्त्रीय किंवा वाङ्यमयीन पद्धतीने वेदांचा काल ठरवण्याची पद्धत सदोष आहे. प्रो. मॅक्समुल्लर यांनी प्रत्येक कालखंड ५०० वर्षांचा धरला. अशा तऱ्हेने भाषाशास्त्रीय पद्धतीने वेदांचा काल ठरवू पाहणाऱ्या विद्वानातच एकवाक्यता नव्हती. म्हणूनच भाषाशास्त्रीय पद्धतीशिवाय दुसरी कुठली तरी पद्धत वापरणे आवश्यक आहे, असे टिळकांना वाटले. या दृष्टीनेच त्यांनी खगोलशास्त्राच्या साहाय्याने वेदांचा काल ठरवण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीवरही अर्थातच टीका झाली. परंतु या पद्धतीने अनुमान काढू पाहणारे विद्वान वैदिक वाङ्मयातील खगोलीय उल्लेख शोधून त्याचा योग्य तो अर्थ लावण्याऐवजी, नक्षत्रांची संकल्पना चीनकडून हिंदूंनी घेतली की हिंदूंकडून चीनने घेतली, वेदकालीन कालचक्र हे पाच की सहा वर्षांचे होते, चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी Intercalary दिवस किंवा महिने कधीपासून सुरू झाले, अशा प्रश्नांच्या चर्चेतच घुटमळत राहिले. त्यामुळेच त्यांना योग्य तो कालनिर्णय करता आला नाही, असे टिळकांचे मत होते.खगोलीय पद्धतीने कालनिर्णय करण्यासाठी उत्तरायण, दक्षिणायन आदी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे सूक्ष्म ज्ञान आवश्यक आहे. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे संपात बिंदूंचे चलन होते व ते क्रमाचे एकेका नक्षत्रांतून फिरत असतात. या संपात चलनामुळे वैदिक काळी मृगशीर्ष नक्षत्रांत असलेला वसंत संपात बिंदू रोहिणी, कृतिका, भरणी, अश्विनी, रेवती अशा क्रमाने उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सरकला आहे. याचाच अर्थ असा की मृगशीर्ष नक्षत्रापूर्वी आद्र्रा, पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये वसंत संपात होत असावा. टिळकांच्या मते वेदवाङ्मयात याचे अस्पष्ट उल्लेख आहेत. पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती होती व आर्याचे नववर्ष व पंचांग पुनर्वसू नक्षत्रातून सुरू होत असल्याचे उल्लेख ऐतरीय व तैतरीय ब्राह्मण तसेच वाजसेनीय संहितेत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. वेदवाङ्मय निर्मितीपूर्वीचा हा काळ असून लोकमान्यांनी त्याला ‘अदिती काल’ असे नाव दिले. लोकमान्य टिळकांनी आपल्या अद्वितीय ज्योतिज्र्ञानाने आणि गणिती प्रतिभेने वैदिक साहित्यात अयनचलनांचे उल्लेख आहेत हे सिद्ध केले. मृगशीर्ष (आग्रहायण किंवा ग्रीक ओरायन) नक्षत्र वसंत ऋतूच्या प्रारंभी उगवत असताना आर्यलोक यज्ञप्रारंभ करीत असल्याचे उल्लेख वेदांत आहेत हे त्यांनी निदर्शित केले. वेदवाङ्मयनिर्मितीच्या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असल्याचे नि:संदिग्धपणे सिद्ध करणाऱ्या वेदातील आख्यायिका म्हणजे १) प्रजापती दुहितृगमन, २) श्वानकथा, ३) वृषाकपी सूक्त इ. लोकमान्यांच्या मते प्रजापती हा आर्याचा मूळपुरुष असावा. त्याचेच प्रतीक म्हणून आजही उपनयनसंस्कार केला जातो व बटूचा वेश प्रजापतीप्रमाणे (दंड, मेखला इ.) असा असतो. हाच संस्कार पारशी लोकांमध्ये ‘नवज्योत’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुरावे व अयनचलनांच्या सूक्ष्म गणिताद्वारे लोकमान्यांनी ऋग्वेदाचा काल इ.स.पू. ४००० वर्षे असावा, असा सिद्धांत मांडला.सर्वसामान्य भारतीयांची व दुरभिमानी पोथीपंडितांची अशी समजूत होती की, संस्कृत या गीर्वाणभाषेतूनच जगातील सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत. परंतु, टिळकांनी हे सिद्ध केले की वेदकाली संस्कृतसारख्याच काही प्रगत भाषा अस्तित्वात होत्या व अथर्ववेदांत अन्य भाषेतील विशेषत: खाल्डियन भाषेतील शब्द आहेत. तसेच तुलनात्मक भाषाभ्यासानेही लक्षात आलेले आहे की संस्कृत, ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे. परंतु, संस्कृत ही इंडोयुरोपियन भाषासमूहाची जननी नसून ती ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांची सहभगिनी आहे. यावरून आपणास असे ढोबळ अनुमान काढता येते की, या सर्व भाषा अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात व ही प्राचीन भाषा बोलणारे आर्य लोक कुठे तरी केव्हा तरी एकत्र राहत असावेत.वेदकाळाचा वेध घेत असतानाच टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत. अवेस्तांमध्ये आर्याच्या आनंदी निवासस्थानाचे ‘अैर्यानाम वेजो’ असे वर्णन आहे. येथे अनेक महिने कडक थंडी व काही महिनेच उन्हाळा असे. या बाबतीत वैदिक व इराणी परंपरांचे मत जवळजवळ सारखेच आहे. वेदातही दीर्घकालीन दिवस व रात्री यांचा उल्लेख आहे. लो. टिळकांनी ऋग्वेदांतील,तानीदहानि बहुलान्यासन या प्राचीनमुदिता सूर्यस्य।यत: परिजार इवाचरन्त्युषो ददृक्षे न पुनर्यतीव।।या ऋचेकडे लक्ष वेधले. सूर्योदयापूर्वी बराच काळ लोटला आहे असा उल्लेख येथे आहे. टिळकांनी अशा तऱ्हेचे कालमान फक्त उत्तर ध्रुव प्रदेशातच असू शकते असे प्रतिपादन केले. टिळकांच्या मते वेदातील व अवेस्तांतील परंपरांचा विचार करता आर्याच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील मूळ वसतिस्थानाचे अक्षांश साधारणत: बरोबर ठरवता येतात. परंतु रेखांश किंवा ही आर्यभूमी उत्तर ध्रुव प्रदेशात कुठपर्यंत पसरलेली होती हे ठरवणे मात्र कठीण आहे. आर्याचे हे वसतिस्थान युरोप की आशियाच्या उत्तरेला होते हे ठरवणे शक्य नाही, ते सायबेरियाच्या उत्तरेला असणेही अशक्य नाही. परंतु, याबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे, हे त्यांना मान्य होते.वैदिक वाङ्मयात पूर्व युगातील (पूर्वयुगम) म्हणून अनेक स्फुट, अनाकलनीय आख्यायिका आहेत. त्या दुबरेध असून, त्यांचा योग्य अर्थ लावणे सहज शक्य नव्हते. परंतु लोकमान्यांनी संशोधन करून असे मत मांडले की या सकृद्दर्शनी, दुबरेध आख्यायिकांचा अर्थ आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले तर सहज लावता येतो. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडल्यानंतर वेदांची रचना झालेली असली तरी वैदिक देवतांना उत्तर ध्रुव प्रदेशाचा स्पष्ट संदर्भ आहे. महाभारतीय युद्धापर्यंत वेदांत नवनवीन सूक्तांची भर पडत होती, त्यामुळेच यातील अनेक आख्यायिका पुरातन काळातील असून, पूर्वीच्या ऋषीची (पूर्वेऋषय:) दैवी वाणीच पुनरुक्त करत असल्याचे उल्लेख या ग्रंथांत आढळतात. या पुरातन आख्यायिकांपैकी ऋग्वेदातील इंद्रवृत्रयुद्ध, दीर्घरात्रीभय, दीर्घतमस कथा, अष्टपुत्रा अदिती आख्यायिका आदींच्या साहाय्याने टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाविषयीची आपली उपपत्ती मांडली. यासाठी त्यांनी तत्कालीन भूगर्भशास्त्रीय व पुरातनशास्त्रीय संशोधनाचाही विचार केला. ‘आक्र्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथाद्वारे त्यांनी आपले हे संशोधन सादर केले. १८९९ साली टिळक डोंगरीच्या तुरुंगात असतानाच या ग्रंथाची सिद्धता झाली, .पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग इ.स.पू. दहा हजार वर्षे इतके आधी झाले असावे. लोकमान्यांनी हिमयुगोत्तर कालाच्या सुरुवातीपासून ते बुद्धपूर्वकालातील आर्याच्या स्थित्यंतराची पाच कालखंडांत विभागणी केली, तो येणेप्रमाणे-इ.स.पू. दहा हजार ते आठ हजार - या कालखंडात आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असावेत. दीर्घकालीन हिमप्रलयामुळे आर्याना मूळ वसतिस्थान सोडावे लागले. हिमयुगोत्तर काळाची सुरुवात.इ.स.पू. आठ हजार ते पाच हजार - नवीन वसतिस्थानाच्या शोधात आर्याचे स्थलांतर, युरोप व आशियाच्या उत्तरेला आर्याची भटकंती. या कालखंडात वसंत संपात पुनर्वसू नक्षत्रात होत असावा व पुनर्वसू नक्षत्रांची देवता अदिती असल्यामुळे या कालखंडाला ‘अदिती काल’ असे नाव.इ.स.पू. पाच हजार ते तीन हजार - ‘ओरायन कालखंड’ आर्याच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा कालखंड. या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. वेदांतील बहुतांश सूक्ते/ ऋचा याच कालखंडात वैदिक ऋषींना स्फुरल्या. परंतु, उत्तर ध्रुव प्रदेशातील आपल्या मूळ वसतिस्थानाच्या आठवणी त्यांच्या स्मृतिकोशात साठवलेल्या असल्यामुळे वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख याच कालखंडात आपले पंचांग व धार्मिक चालीरीती रिफॉर्म करण्याचा प्रयत्न आर्यानी केला.इ.स.पू. तीन हजार ते चौदाशे - ‘कृतिका काळ’ वसंत संपात कृतिका नक्षत्रात होत असे. तैतरीय संहिता, ब्राह्मणे वगैरेंची रचना याच कालखंडातील आहे.
         १९१८ साली टिळक इंग्लंडला गेले होते, त्या वेळी विशेष खटला व इतर राजकीय कामकाजात व्यग्र असतानाही टिळक ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’त जाऊन खाल्डियन व असीरियन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे इष्टिका लेख लिहून घेत. तसेच असीरियन संस्कृतीचे थोर अभ्यासक डॉ. थॉमस यांच्याबरोबर लोकमान्यांची चर्चा होत असे. तेव्हा दादासाहेब खापर्डे लोकमान्यांना म्हणाले, ‘इतक्या कामानंतर आपल्याला शीण न येता आपण अशा गहन विषयाकडे कसे वळता?’ यावर टिळकांचे उत्तर होते, ‘राजकीय कामाचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा करायला जातो. टिळकांचा गौरव करताना डॉ. राधाकृष्णन म्हणालेच होते, की ही वॉज बाय नेचर अ स्कॉलर अ‍ॅण्ड ओन्ली बाय नेसेसिटी अ पोलिटिशन’ (He was by nature a scholar and only by necessity a politician.)वैदिक साहित्यातील अनाकलनीय सूक्तांचा ऋचांचा अर्थ लावून टिळकांनी वेदकाल इ.स.पू. चार हजार ते साडेचार हजार वर्षे इतका मागे गेला आणि पृथ्वीवरील शेवटच्या दोन हिमयुगामधील (Interglacier) काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते हे सिद्ध केले. ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने टिळकांनी हे संशोधन केले असले तरी वैदिक वाङ्मयातील सूक्तांचा अर्थ लावण्याचे काम हे मूलत: संस्कृत भाषातज्ज्ञांचे आहे आणि एकदा का आपण लावलेला अर्थ बरोबर आहे हे मान्य झाले तर खगोलशास्त्राच्या आधारे वेदवाङ्मयाचा काल व आर्याच्या मूळ वसतिस्थानाचे गूढ उकलणे सहज शक्य आहे, अशी टिळकांची धारणा होती. टिळकांनी आपले दोन्ही ग्रंथ इंग्रजीत लिहिले. जेणेकरून वेदांची व आर्यसंस्कृतीची प्राचीनता व महानता पाश्चात्त्य विद्वानांना समजेल. तसेच इंग्रजी भाषेत हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याने जगातील विद्वानांमध्ये, आर्यसंस्कृतीच्या अभ्यासकांमध्ये या ग्रंथासंबंधी चर्चा होऊन जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाची दखल घेतली जाईल याची टिळकांना खात्री होती. तसेच आपल्या संशोधनावर काही आक्षेप घेतले जातील, आपल्या काही मतांचे खंडनही होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती. परंतु, ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धताही अग्निसान्निध पारखली जाते, तद्वत आपले संशोधन टीकाकारांच्या परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडून आर्याच्या प्रश्नावरती नवीन प्रकाश पडेल किंवा यामुळे आर्यसंस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयीच्या संशोधनास चालना मिळून पूर्वग्रहविरहित चर्चेस प्रोत्साहन मिळेल, अशी टिळकांची भावना होती. अशा तऱ्हेने कुठलाही दुराग्रह न बाळगता, निखळ संशोधकाच्या भूमिकेतून टिळकांनी आपले संशोधन अत्यंत विनम्रतेने जगापुढे सादर केले . लोकमान्य टिळकांच्या या अद्वितीय कार्याला हा मानाचा मुजरा!!!!
                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


Thursday, July 23, 2020

दूरदर्शी सामाजिक कार्यकर्ते लोकमान्य टिळक


एक जहाल राष्ट्रवादी विचारांचे राजकारणी म्हणून लोकमान्य टिळक सर्वांना माहीत आहेत.पण एक दूरदर्शी सामाजिक कार्यकर्ते म्हणून टिळकांकडे पाहिले जात नाही.किंबहुना ते समाज सुधारणांच्या विरोधात होते अशी मांडणी करण्यात आली. खरंतर लोकमान्य टिळकांनी अत्यंत वस्तुनिष्ठपणे सामाजिक सुधारणांचा पाया घातला.
एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणुन कार्य करते झाले. पत्रकार म्हणुन कार्य करत असतांना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी होत होते. सर्वप्रथम त्यांचे सामाजिक विचार समजून घेतले तर त्यांचे सामाजिक कार्य आपल्या लक्षात येईल.
लोकमान्य टिळक म्हणायचे ’’ धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजुन त्याकरता कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पुजा करण्यास शिकायला हवे तेव्हांच परमेश्वराची पुजा करण्यालायक बनु शकु ".
महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता. शैक्षणिक सुधारणा ही त्यावेळची प्राथमिक गरज लक्षात घेऊन आपल्या सामाजिक कार्याचा शुभारंभ टिळकांनी अशा पद्धतीने केला
त्याच्याही पुढे जावून टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यु इंग्लिश हायस्कुल व महाविद्यालयीन शिक्षणाकरता फर्ग्युसन काॅलेज ची स्थापना केली.
1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला यामागे भगवद्गीता ही केवळ मोक्ष किंवा धार्मिक उपासनेचा ग्रंथ नसून समाजाला कर्ममार्गावर नेणारे हे पाथेय आहे हा विचार दिला.
1916 साली त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे यालाच ’स्वशासन’ देखील म्हणतात यातून त्यांना आपल्या समाजाचा आत्मसन्मान वाढवायचा होता.
हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार  घेणारे नेते टिळकच होते.यातून संपूर्ण देश एकसूत्रात बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
    टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये अखेर पर्यंत चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. त्यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली. टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला.
    आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले.
अशा थोर समाजसुधारक टिळकांना विनम्र अभिवादन!!!!!
                             शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Friday, July 10, 2020

मैत्री आणि गप्पा


किती छान आहेत हे दोन शब्द.मनाला विरंगुळा देणारे,मनाचा थकवा दूर करणारे,मनाची प्रसन्नता वाढविणारे,आपलं एक वेगळं भावविश्व निर्माण करणारे.खरेपणाची चाड शिकवणारे,पारदर्शकतेची जाणीव निर्माण करणारे,' प्रेम' या शब्दाचा गहन व योग्य अर्थ सांगणारे,' विश्वास' या शब्दाची अनुभूती देणारे . किती तरी प्रकाराने या शब्दाचं विश्लेषण            करता येईल. . . . . . . . . . . . आयुष्यात ज्याने या दोन शब्दांची अनुभूती घेतली नसेल असा माणूस विरळाच म्हणावा लागेल. विलक्षण परस्परपूरकता या दोन शब्दांमध्ये गुंफलेली आहे.मैत्री आहे पण गप्पा झाल्या नाहीत असे कोणीही म्हणणार नाही.
सर्वप्रथम ऋग्वेदात 'मित्र ' या शब्दाचा उल्लेख आढळतो त्यालाच जोडून वरूण असा शब्द येतो.या दोन देवता ऋग्वेदात मानल्या गेल्या आहेत.' मित्रावरूण ' असा एकत्रित उल्लेख देखील या शब्दांचा केला जातो. या दोन्ही देवता जलावर अधिराज्य करतात. हे दोघेही कश्यप ऋषी व त्यांची पत्नी आदितीचे पुत्र आहेत. मित्र म्हणजे अथांग सागराची गहन सखोलता तर वरूण म्हणजे या विस्तीर्ण सागराचा पृष्ठभाग किंवा किनारा असे वर्णन केलेलं आहे.मित्र हा सूर्योदय असेल तर वरूण हा सूर्यास्त आहे.खूप विस्तृत वर्णन या दोन देवतांचं केलेलं असून या दोघांमध्ये द्वंद्व वाटत असलं तरी एक गहन मैत्रीचं अंतरंग त्यात आढळून येतं.व्यावहारिक जगात मैत्री आणि गप्पा यांच्यातलं नातं अशाच स्वरूपाचं आहे असं म्हणता येईल.
' अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करूण एव च ' श्रीमद् भगवद्गीतेत आपल्या प्रिय भक्तांचं विवेचन करताना भगवान श्रीकृष्णांनी कथन केलेला हा श्लोकार्ध आहे. या मध्ये
 भगवान श्रीकृष्ण सर्व प्राणीमात्रांशी द्वेषरहित व करूणायुक्त मैत्रीची अपेक्षा करतात.अशी मैत्री ही संवादातून होत असते. अशा सुसंगत मैत्रीचा आयुष्यात उपयोग काय ? यासाठी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे त्याचा अर्थ पाहू या.
"जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं !
मानोन्नतिं दिशति पापमपा करोति !!
चांगली मैत्री ही आपल्या बुध्दीतला गोंधळ किंवा द्वंद्व संपवणे.मन पारदर्शक होवून आपल्याला खरं बोलायला शिकवते.त्यामुळे आपल्यातले दोष दूर होवून आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेते.या संदर्भात आणखी एक सुभाषित आहे ज्यांत मित्र या संकल्पनेचं चांगलं वर्णन केलंय.
चन्दनं शीतलं लोके,चन्दनादपि चन्द्रमाः !
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः !!"
 म्हणजे सर्वात थंड म्हणजेच शीतलता चंदनात असते.त्यापेक्षाही शीतलता चंद्रात असते.पण, एका चांगल्या मित्रात चंदन आणि चंद्रापेक्षाही जास्त शीतलता असते.त्यामुळेच ' मैत्री आणि गप्पा ' या दोन शब्दांमध्ये एक अनोखं नातं असतं.
प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नाड शॉ मित्राविषयी म्हणतात
" The only service a friend can really render is to keep up your courage by holding up to you a mirror in which you can see a noble image of yourself. "
एखादी सेवा खरोखर देवू शकणारी सेवा म्हणजे मित्र. ज्यात आरशाप्रमाणे आपले प्रतिबिंब आपण धैर्याने पाहिले तरी आपली प्रतिमा आपल्यालाच उदात्त दिसेल.मैत्री किती निखळ असते याची ग्वाहीच जणू बर्नाड शॉ आपल्याला देतात.त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र आणि मैत्री यांचं स्थान महत्त्वाचं आहे याबाबत कोणतीही शंका नाही.मैत्रीची महती पटल्यानंतर त्याचा दुसरा अभेद्य भाग म्हणजे संवाद त्यासाठी वापरला जाणारा सोपा शब्द म्हणजे गप्पा.घनिष्ठ मैत्री आहे पण गप्पा होत नाही असं कधी होत नाही.सर्व प्रकारच्या वयोगटात आपल्याला मित्र असतात.बालवयात झालेले मित्र ज्यांना आपण लंगोटी यार म्हणतो.ही मैत्री खूप निरागस असते.या काळात आपल्या गप्पा पण निरागस असतात.समरस होवून खेळणे हा एकच भाव यामध्ये असतो.पण आयुष्यभर एखादा तरी लंगोटी यार आपल्याला लक्षात राहतो.शालेय जीवनात आपलं मैत्रीचं वर्तुळ वाढतं पण त्यातही आपली अभ्यासाची आवड,एखादा छंद यानुसार आपली मित्रांची चौकट ठरते.या वयात होणा-या गप्पा किंवा संवाद प्रामुख्याने अभ्यासाविषयी, शिक्षकांच्या शिकवण्याविषयी , एखाद्या आवडत्या खेळाविषयी असतात.मात्र हे स्वरूप आता विकसित तंत्रज्ञानामुळे बदलतंय हे निश्चित.मला आठवतंय आम्ही किशोरावस्थेत असतांना कधी मैदानी खेळ तर कधी बैठे खेळ खेळत असू पण संध्याकाळी कुठेतरी पायी फिरायला जाणे नियमित व्हायचे. त्यावेळी आपण वाचलेली एखादी गोष्ट किंवा सिनेमाची स्टोरी. हा गप्पांचा विषय असे.पण खरा मैत्री आणि गप्पांचा आनंद मिळतो तो महाविद्यालयीन जीवनात.या वयात प्रत्येकाची निरीक्षण शक्ती, सौंदर्यदृष्टी, एखाद्या विषयाचा आस्वाद घेण्याची क्षमता विलक्षण विकसित झालेली असते.जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देखील विकसित होत जातो.मन संवेदनशील बनत जाते.त्यावर सभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव देखील पडत असतो.पण वेव्हलेंथ जुळणारे मित्र मिळाले तर अशा सुसंगत मैत्रीमधील गप्पा आपलं आयुष्य घडवतात.अशा मैत्रीला काळ,वेळ,वय असे कोणतेही निकष लावता येत नाही.अशी मैत्री दीर्घकाळ टिकून राहते.मला आठवतंय की महाविद्यालयात शिकत असताना अ.भा.विद्यार्थी परिषदेशी संबंध आला तोपर्यंत कांहीं सहपाठी मित्र होते.पण पदवीपरीक्षा होईपर्यंत अनेक नवनवीन मित्र संपर्कात येत होते.सर्वांशीच संबंध सलोख्याचे राहिले.पण, आयुष्यभर टिकणारी घनिष्ठ मैत्री काही मोजक्या मित्रांशीच निर्माण झाली ती केवळ मैत्रीत होणा-या गप्पांमुळेच.मला आठवतोय तो पदवीधर झाल्यानंतरचा सुवर्णकाळ.कदाचित १/२ वर्षानंतरचा काळ असेल पदव्यूत्तर शिक्षण बहिस्थ विद्यार्थी म्हणून सुरू होते.विद्यार्थी परिषदेच्या कामात पूर्णत: सक्रीय होतो.नवनविन कार्यकर्ते परिषदेच्या कामात जोडण्याचा प्रयत्न सुरूच होता.अधूनमधून काॅलेजातही जाणे होत असे.त्यावेळी काॅलेजात अत्यंत उत्साही गृप परिषदेच्या कामात सक्रिय झाला.परिषदेच्या कामासाठी हा संपूर्ण गृप अधिक सक्रिय करायचा असेल तर मैत्री वाढवली पाहिजे म्हणून त्यातील तिघांकडे माझे वरचेवर जाणं होवू लागलं. त्यात विकास हा संघ   कामात असल्याने पूर्वपरिचीत होता पण प्रदीप आणि राजेश,संजय ,शेखरची नव्यानं मैत्री झालेली.ती अधिक घनिष्ठ होत गेली ती आमच्यात होत असलेल्या बहुआयामी गप्पांमुळे.सलग ४/५ वर्ष आम्ही सोबतच असायचो म्हणजे इतके की २४ तासांपैकी २० तास असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.एवढे तास आम्ही गप्पा मारतच असायचो.परिषदेचं काम, कार्यक्रम,योजना , संघटनात्मक बांधणी हे विषय तर होतेच पण अन्य वेळात राजकारण, समाजकारण, साहित्यिक विषय,एखाद्या सिनेमा किंवा नाटकाचे कथानक, वृत्तपत्रातील लेख, अग्रलेख,पुस्तक वाचन, एखाद्या कवितेची चर्चा असे कितीतरी विषय गप्पांमध्ये असायचे.त्यामुळे वेळ कसा निघून जायचा ते समजायचंच नाही.कित्येकदा पूर्ण रात्रसुध्दा सरून जायची.अभ्यास,घरातली कामही एकमेकांच्या सोबतीने व्हायची.जेवण सुध्दा कित्येकदा आमच्यापैकी एखाद्याच्या घरीच उरकायचे.आमच्यापैकी सगळ्यांच्याच घरी तुम्ही एवढ्या काय गप्पा करतात ? हा यक्षप्रश्न कायमच पडलेला असायचा.कुणाच्याही घरी त्यांचे आई-बाबा घरी नसणं ही आमच्यासाठी पर्वणीच असायची मनसोक्तपणे खाणं अन् मनसोक्त गप्पा.त्यानंतर आई किंवा बाबांचा ओरडा पण खावा लागत असे.आमच्यासोबत काही नविन मित्रही कधीतरी असायचे.एकदा एका नवीन मित्राने निरागसपणे असं म्हटलं की 'तुम्ही काय बोलतात ते मला फारसं कळत नाही पण जे काही बोलता ते ऐकायला खूप छान वाटतं'.एकाने हा अग्रलेख पेपरात कुठं असतो? असंही प्रांजळपणे विचारलं.आमच्यापैकी कुणालाही वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत किंवा अगदी परिषदेच्या कार्यक्रमात बोलायचं असेल तर त्याची भाषणापूर्वी व भाषणानंतर विस्तृत चर्चा व्हायची. यामुळे आमचं वक्तृत्व विकसित झालं . एखादा लेख अथवा निबंध लिहीतांना सुध्दा आम्ही सामुहिक चर्चा करत असू. एकदा तर राष्ट्रभाषा सभा पुणेची  पंडित परीक्षा आम्ही सोबत दिली.कामाचा व्याप आणि काॅलेजचा अभ्यास यामुळे दोन दिवसांवर परीक्षा आलेली असूनही असल्यास नव्हता ४ पुस्तकं अभ्यासाला होती.आम्ही प्रत्येकाने एकेक पुस्तक एका दिवसात अभ्यासलं.दुसर् या दिवशी गप्पांचा विषय आपण अभ्यासलेलं पुस्तक विस्तृत सांगणं असाच होता.गप्पांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सर्व पंडित परीक्षा विशेष श्रेणीत पास झालो.तर अशी ही आमची मैत्री आणि आमच्या गप्पा.यामुळे आम्ही समाजजीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात झोकून देवून काम करू शकलो किंबहुना ती क्षेत्र गाजवली.आजही आम्ही आपापल्या परीने सक्रिय आहोतच पण आमची ही मैत्री आजही ताजीतवानी आहे.आम्ही क्वचित कधीतरी भेटलो तरी गप्पांमधला तोच जिव्हाळा आजही तसाच आहे.कदाचित वेळ कमी-जास्त होत असेलही पण त्या गप्पांमधला आनंद काही औरच आहे.असे अनेक मित्रांचे चमू अनेक आहेत अगदी आताच्या पिढीतही ते दिसून येतं.संगीत,नाटक, चित्रपट,कविता, सामाजिक उपक्रम, पुस्तक वाचन, नविन संशोधन, क्रीडा क्षेत्र, परराष्ट्रीय धोरण,,युध्दस्य वार्ता असे शेकडो विषय गप्पांचे राहिले तर नकारात्मक विचार आपल्यापासून शेकडो मैल  दूर राहतात याची अनुभूती आम्ही घेतली आमची पुढची पिढीही ती घेतेय.
' समान शीले व्यसनेषु सख्यम् 'असं एक संस्कृत वचन आहे.आपल्याकडे चुकीच्या अर्थाने ते वापरतात.. पण चांगल्या अर्थाने अशा समान चारित्र्याचे सारख्या आवडीचे चमू एकत्र येणं, त्यांच्यातील मैत्रीभाव वाढण्यासाठी गप्पांचे फड रंगणे हे सशक्त समाजरचनेचे लक्षण आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली पसायदानात " भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे "असं साकडं त्या विश्वात्मक परमेश्वराला घालत असावेत.त्याचा अर्थबोध व्हावा एवढीच अपेक्षा.
            धन्यवाद!!

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...