Monday, April 25, 2022

अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यिकांचं व्यासपीठ की राजकीय कट्टा

 

   नुकतेच मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचं सूप वाजलं आणि आयोजकांनी सुटलो बुवा एकदाचे असं म्हणत समाधानाचा एक लांब सुस्कारा सोडला असेल. आयोजकांना कोणताही मोठा सोहळा सुखेनैव कोणतेही गालबोट न लागता पार पडला की समाधान वाटणारच अणि त्यात काही गैर नाही.परंतू संमेलनानंतर त्याविषयी जेव्हा त्याचं कवित्व सुरू होतं त्यात आयोजक उगाच भरडला जातो.खरंतर या चुका संमेलन अध्यक्षांपासून ते ते स्वतःला उगाचच साहित्यिक , विचारवंत मानून साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रात लुडबुड करणाऱ्यांनी केलेल्या असतात.
एक काळ असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण हे साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण मानले जाई पण दुर्दैवाने ही स्थिती आज नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझ्यासारख्या सामान्य वाचक व साहित्यप्रेमी रसिकांची तरी हीच धारणा झाली आहे.नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील काही टवाळ भाषणांमुळे तर ही धारणा अधिक दृढ झाली आहे.एकूणच झालेल्या सर्व संमेलनाचा गोषवारा वाचत असतांना या संमेलनाने समाजाला काय दिलं ?असा प्रश्न मनात उपस्थित झाला. कोणताही नविन साहित्यिक विचार नाही, साहित्यातील नविन विचार प्रवाहाची साधक बाधक चर्चा नाही, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं असं उद्बोधन नाही किंबहुना साहित्यावर चर्चा कमी अन्  देशाला राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर नेणारे कालबाह्य राजकीय विचार थोपविण्याचा प्रयत्न अनाहूतपणे आलेल्या तथाकथित पुरोगामी राजकीय विचारवंतांनी केला ही वस्तुस्थिती आहे.त्यापेक्षाही संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचीच री ओढली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.साहित्यात सर्व प्रकारचे विचार प्रवाह असणारच ते स्विकारले पाहिजेत .त्यातील प्रत्येक मुद्यावर खंडण मंडण व्हावे असा समतोल विचार संमेलन अध्यक्षांनी मांडणे अपेक्षित होते.पण सनदी अधिकारी राहिल्यामुळे त्या मानसिकतेतून एखाद्या राजकीय नेत्यांच्या जातीयवादी भाषणाची भलावण एका जेष्ठ साहित्यिकाने करावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
यावेळी मला सहजच १९७५ सारी झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाची आठवण झाली.जेष्ठ साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या . नुकतीच देशात आणीबाणी जाहीर झालेली होती . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याने संमेलन घेवूच नये अशी चर्चा सुरू झाली होती पण खूप विचारांती संमेलन ठरले . स्वागताध्यक्ष म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण होते.पण ते राजकारणा इतकेच साहित्यिक म्हणून लोकांना परिचीत होते. साहित्याच्या मंचावर साहित्याचीच चर्चा व्हावी ह्या विचारांचे ते होते.स्व .पु.ल.देशपांडे संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते.राजकारण म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याने आणीबाणीच्या निषेधाचा ठराव दुर्गाबाईंनी त्यावेळी मांडला व या ठरावाचे निवेदन सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत यशवंतराव चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या मंचावरून दिली नाही.ही त्यावेळची परिस्थिती होती.सांगायचा मुद्दा असा की संमेलनाचे अध्यक्ष राजकीय दबाव मानत नव्हते आणि राजकारणी नेत्यांनाही त्याचे वैषम्य वाटत नव्हते.आता सर्वच काही बदललंय.असो.
अद्यापही सर्व सामान्य वाचक , साहित्य रसिकांना ही संमेलने राजकीय विचारांनी मुक्त रहावीत, हिंदुत्ववादी साहित्यापासून विद्रोही साहित्य विचारप्रवाहांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,सर्व प्रकारच्या साहित्य कृतींचे स्वागत व्हावे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ निखळ साहित्याच्या चर्चेचं व्यासपीठ व्हावं .एवढेच यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                          ‌                         ९५२७१५३९२५

Tuesday, March 8, 2022

 चैतन्याचा दीप घेऊनी

 उजळलेस तू विश्व त्रिभुवनी || १||


शक्तीचे करी खड्ग घेऊनी

प्रगटलीस तू मायभवानी|| २||


मयुरासनी स्वरविणा घेऊनी

 झंकारली तू अवघी अवनी ||३||


 कधी विद्येचे वाण घेवूनी

जगताची तू ज्ञानदायिनी ||४||


अनेक स्वरूपे तुझीच मोहिनी

 विश्वाची तू तारक जननी ||५||

                      शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                        ९५२७१५३९२५




Sunday, February 27, 2022

माय मराठी महान

 माय मराठी महान अमुची माय मराठी महान ||धृ ||

सातवाहने निर्मित केली यादवकाळी विकसित झाली

संत महंते पावन केली सकला देई ज्ञान ||१||

    संस्कृत प्राकृत भाषा बोली देवनागरी लिपीत नटली

मुकुंदराज अन्  ज्ञानेशाने वाढविला सन्मान ||२||

शिवरायांच्या स्वराज्यकाळी राजदरबारी जावून बसली

मराठी झाली वैभवशाली जागविला अभिमान ||३||

 अहिराणी वा असो वऱ्हाडी कोळी कोकणी अन् भिल्लोरी

गणबोलीची रीत आगळी भाषा हीच प्रमाण ||४||

   अभंग भारूड ओवी लावणी गद्य पद्याचा साज लेवूनि

नाट्य कथांची झेप घेवूनि जगीं वाढली शान ||५||

लिहू मराठी बोलू मराठी शाळेतून ही शिकू मराठी

उद्घोष असावा एकच कंठी 'अभिजात' मिळावा मान ||६ ||

                                शशिकांत घासकडबी, नंदुरबार ९५२७१५३९२५



Friday, August 7, 2020

आत्मारामांची अमृतवाणी

 नुकताच ५ ऑगस्टला श्रीरामजन्मभूमीवर संकल्पित भव्य मंदिर उभारणीचं भूमिपूजन विधीवत व आनंदमयी वातावरणात करण्यात आलं आणि संपूर्ण भारतवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.' याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड झाला ' असा कृतार्थतेचा भाव आपल्या सर्वांच्याच मनात व चेहऱ्यावर दाटून आलेला होता.या आनंदाच्या सुवर्णक्षणांवर आपल्या अमोघ वाणीतून अक्षरशअमृताची बरसासोहळ्यातीोन महनीय व्यक्तींच्या मुखातून झालयाचे सर्वाधिक अप्रूप वाटले.अनेकांनी समाज माध्यमातून खूसकारात्मक चर्चा केली हे.या सर्व चर्चांबाबत माझ्या मनाआलेला भाव मी सर्वत्र व्यक्त केला व तो अनेकांना आवडला.तो भाव असा होता,'' काल मोदीजी बोलतच नव्हते त्यांच्यातला आत्माराम बोलत होता.ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांना 'आत्माराम '   संकल्पना लक्षात येईल. जी कठोर साधनेतून प्राप्त होते."  

        'आत्माराम'हा वेदांतपर ग्रंथ आहे; समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्रवण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नुसते श्रवण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे. 
सरसंघचालक मा.मोहनरावजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी या दोघांच्याही जीवनाकडपाहिल्यानंतर ही अनुभूती आपल्याला येते.
  प्रभु श्रीरामस्वरूप देशाला देव मानून ही भगवंताची भक्ति या दोघांनीही मनापासून केली म्हणून त्यांच्या जीवनात वेदांताचं तत्वज्ञान उतरलं.परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी परम पूजनीय श्रीगुरूजी आणि अगणित सत्पुरूषांचा सहवास त्यांना लाभला.अनेक साधूसंतांच्या सान्निध्यात देखील ते राहिले.मोदीजी काही काळ अध्यात्ममार्गात देखील होते.आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच ते राजकारणात सेवाभाव मनात ठेवून ते आले.आपापल्या सान्निध्यातील सत्पुरूषांनी दिलेल्या मार्गानुसारच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला.समर्थांच्या उक्तीनुसार या भक्तीतूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे.संघकार्य असो किंवा अध्यात्ममार्ग तिथे केवळ श्रवणभक्ती असून चालत नाही तर ज्याच्यापासून ज्ञान घेतलं तर याची सेवा घडावी लागते त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.ही जिवीत कार्यातील एकरूपता दोन्हीही व्यक्तिमत्वात आपल्याला पहायला मिळते.आत्माराम दासबोधात समर्थांनी यालाच स्व स्वरूप म्हंटलं आहे.
आत्माराम मधील केवळ दोन ओव्या या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.
   त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ म्हणजे सर्वस्वाचे समर्पण करून माझ्या बोलण्याप्रमाणे आचरण केलं तर तूला मी सत्यस्वरूपापर्यंत नेईन.हे समर्थांनी आपल्या शिष्यांना दिलेलं वचन आहे.ठीक याच प्रकारचा व्यवहार या दोन्हमान्यवरांचा असल्यानेत्यांच्या मुखातून हे अमृताचे ोल प्रगटले.
दुसऱ्या एका ओवीत समर्थ म्हणतात,
बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते॥अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥
शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे ,परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात आपल्या अनुभवाला येऊ लागतो आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच सत्यस्वरूप असतं.या सत्यस्वरूपाचं दर्शन या दोन्ही भाषणातून आपल्या अनुभवाला आलं म्हणून ही 'आत्मारामांची अमृतवाणी 'असल्याचे आपण अनुभवले.
पूजनीय सरसंघचालक यांनी या प्रसंगी केलेलं भाषण यादृष्टीने महत्त्वाचं आहे.ते म्हणतात की,
" आज संपूर्ण देशात एक आनंदाची लाट आली आहे.। शतकानुशतकाची इच्छा आज पूर्ण होतेय.परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठा आनंद भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ज्या आत्मविश्र्वासाची आवश्यकता होती आणि जेआत्मभान  आवश्यक होतं ते सगुण-साकार रूपात प्रस्थापित होण्याचा हा शुभारंभ आज आहे. हे अधिष्ठान है आध्यामिक दृष्टिचं आहे.
' सिया राममय सब जग जानी 'सर्व  जगाला आपल्यात पाहण्याची आणि  आपल्यात संपूर्ण जग पाहण्याची ही भारतीय दृष्टि आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक व्यक्तिचा व्यवहार आजसुद्धा जगात सर्वाधिक सौजन्याचा व्यवहार असतो.आणि आमच्या  देशाचा  सामूहिक व्यवहार सर्वांसोबत ' वसुधैव कुटुम्बकम ' चा असतो. परमवैभव संपन्न  आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा  भारत त्याच्या निर्माणाचा हा  शुभारंभ आहे.
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः'
जीवन जगायचं कसं? याची दृष्टी आमच्याजवळ आहे. कोरोनाच्या स्थितीत  संपूर्ण  जग अंर्तमुख झालंय.त्यांना चिंता आहे  कुठे चुकलं याची.यातून मार्ग  कसा काढायचा याची. तो आमच्याजवळ आहे. तो मार्ग दाखवण्याचं  काम आम्हाला करायचंय. त्याची तैयारी करण्याचा संकल्प आज होतोय.
  अशा प्रकारचा विश्वास, प्ररेणा, स्फुरण आज आम्हाला मिळतंय   कारण 'राम सर्वांचे आहेत आणि सर्वांमध्ये राम आहेत. " ही अनुभूती सरसंघचालकांना मिळाली ती त्यांच्या वाणीतून त्यांनी प्रगट केली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सुध्दा तेवढ्याच तोलामोलाचं होतं.ते म्हणाले की,
" आज पूर्ण भारत राममय झाला आहे. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत  तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे . कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
  हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे 
जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत
भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत . देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे. राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पणही होते आणि तर्पणही  होते, संघर्षही होता आणि संकल्पही होता. ही अनुभूती पंतप्रधान मोदींना आली तीच त्यांनी प्रांजळपणे मांडली.
देशाच्या संस्कृतीविषयी,सभ्यतेविषयी गर्वाने बोलणारा पंतप्रधान यानिमित्ताने सर्वांनी पाहिला.हे त्यांचे सहजोद्गार होते जे सत्यस्वरूपाची अनुभूती घेतल्याशिवाय मुखातून बाहेर पडत नाहीत.म्हणूनच अयोध्येत झालेली दोन्ही भाषणे ही आत्मारामांची अमृतवाणीच होती.असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.



Saturday, August 1, 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक


वाचकहो, 
मन:पूर्वक नमस्कार!
   लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पैलूचे अध्ययन करून मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतांना विलक्षण त्रेधा उडाली कारण लोकमान्य टिळकांचा एक पैलू उलगडायचे म्हटले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील असंख्य अगणित आयाम कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलू लागतात त्यातून नेमकं काय मांडता येईल यासाठी ही त्रेधातिरपीट होत होती. परंतु आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही मालिका पूर्ण झाली.आपल्या सूचनांचे स्वागत करून आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
     विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन ।
     स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।। 
 या श्लोकात जे म्हटलंय यांची तंतोतंत अनुभूती हे लिखाण करतांना आली. राजा आणि विद्वान यांची खरोखर तुलना होवू शकत नाही.कारण राजाचा सन्मान त्याच्या राज्यात होतो पण विद्वान लोक सर्व स्थळी पूजनीय असतात.अष्टपैलू, अष्टावधानी हे शब्द लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना अपुरे पडतात.टिळक हे लोकमान्य,लोकोत्तर युगपुरुष ठरले यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं व्यक्तित्व,कर्तृत्व व दातृत्व बहुआयामी अशा स्वरूपाचं होतं.लोकजागृती, लोकसंग्रह,लोकसंघटन,,या त्रिसूत्रीच्या आधारावर ते लोकमान्य ठरले.
१८८० ते १९२० असा तब्बल ४० वर्षाचा काळ त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यतित केला.त्यात त्यांनी केलेल्या बहुविध कामांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची साक्ष मिळते.एक हुशार  व विद्यार्थी प्रिय शिक्षक ते लोकमान्य नेता म्हणून त्यांचा झालेला प्रवास जगातील विचारवंतांना देखील अचंबित करणारा होता.सव्यसाची शिक्षक,संस्थाचालक, झुंजार पत्रकार, व्यासंगी संशोधक,निस्पृह देशभक्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,परखड देशभक्त, अर्थशास्त्रज्ञ,अभ्यासपूर्ण लेखन, धर्माभिमानी, संस्कृती रक्षक,राष्ट्रहित जोपासणारा धुरंधर राजकारणी,वेदान्तापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर भाष्य करण्याची जाण असणारा विश्लेषक, कलेची आवड असणारा रसिक अशी अगणित रूपं लोकमान्यांच्या जीवनात ठळकपणे समोर येतात.म्हणूनच टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे अनुभवाला येते.त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी देशविदेशातील अनेक विचारवंतांनी विस्तृतपणे विश्लेषण केले आहे.एवढच नाही तर अनेक कवींनी त्यांच्यावर कवने, पोवाडे,आरती,अष्टके संस्कृत श्लोक आदि विविध प्रकारे रचना केल्या आहेत.आपापल्या परीने लोकमान्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील कवी गोविंद यांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केलेली रचना मनाला विशेष स्पर्श करून जाते.
आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद
या कवितेतून लोकमान्यांच्या कांहीं पैलूंवर ते नक्कीच प्रकाश टाकतात. लिहीण्यासारखे खूप आहे.त्यांच्या पावन स्मृती जागवणे आजच्या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकमान्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज लेखणीला विराम देतो!!!!! धन्यवाद 🙏
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Friday, July 31, 2020

टिळकांचा परराष्ट्रीय दृष्टीकोण




संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याची आग्रही मागणी करून त्यासाठी अहोरात्र झटणारे लोकमान्य टिळक सर्वांनाच माहित आहेत. देशबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारशी टक्कर घेणारे, परखड राष्ट्रवाद मांडणारे लोकमान्य  टिळक सर्वसामान्यांना नक्कीच आवडतात. पण,भारताची राजकीय चळवळ प्रभावी करताना जागतिकस्तरावर भारताचे प्रश्न समजून सांगण्यात टिळकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली याबद्दल कोणी फारशी दखल इतिहासात घेतलेली दिसत नाही.टिळकांच्या जीवन चरित्रातला हा दुर्लक्षित पैलू समजून घेणे आवश्यक आहे.
   आंतरराष्ट्रीय जगतात लोकमान्यांचे अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दळणवळणांच्या साधनांचा विकास झालेला नसतांनाही  त्यांनी त्यांच्या काळातील सर्व समस्यांना तोंड दिले आणि त्या सुटाव्यात यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्ष केला. हे करताना त्यांनी भविष्याचा वेध घेतला आंतराराष्ट्रीयस्तरावर आपली बाजू बळकटपणे मांडली.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या चळवळी भारतातच कराव्यात. यासाठी इंग्लडमध्ये शिष्टमंडळे पाठविण्याची गरज नाही असे टिळकांचे मत होते. परंतु पहिले महायुध्द पेटले. इंग्लडची ठिकठिकाणी पीछेहाट होऊ लागली. त्यांचे सेनादल अपूरे पडू लागले. ब्रिटीश सरकारच्या अडचणीचा फायदा घेण्याचे टिळकांनी ठरविले. भारताकडून इंग्लडला मनुष्यबळ, युद्धसामुग्रीच्या उत्पादनात मदत केली जात होती. स्वराज्याचे हक्काची रोखठोक व्यवहारी मागणी त्यांनी प्रत्यक्षात राज्यकर्त्या इंग्रजांकडे आणि त्यांच्या सामान्य मतदार नागरिकांकडे करण्याचे ठरविले आणि इंग्लडमध्ये प्रत्यक्ष जाऊनच हक्क मागण्याचा निर्धार केला. मात्र, यात अडचण होती त्यांनी भोगलेल्या शिक्षेची. राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगलेल्या टिळकांना इंग्लडला जायची परवानगी मिळणे कठीण होते. त्यात युद्धाची धुमश्चक्री सुरू असल्याने इंग्रजांनी राजकीय कारणांमुळे इंग्लडला जाण्याची परवानगी नाकारली. या कोंडीतून त्यांनी मार्ग काढला.
  टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. त्यातून भारताच्या दारिद्रयाचे विदारक चित्र आकडेवारी ते मांडत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखांतून आग्रहाने प्रतिपादन करीत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लडमध्ये जाणा-या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची योजना वर्मा यांनी सुरू केली. टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाची असे ठरले.
स्वा.सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्मा यांनी सावरकरांना शिष्यवृत्ती दिली आणि इंडिया हाऊसमध्ये राहण्याची सोय केली. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशांतही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहका-यांमध्ये मॅडम कामा या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्यांनी १९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथील जागतिक समाजवादी परिषदेत स्वतंत्र भारताचा ध्वज फडकविला. मॅडम कामाच्या या कर्तृत्त्वाचे टिळकांना समाधान वाटले.
त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा दौरा करून भारताची बाजू मांडली. टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्त्वाचा होता.
लोकमान्यांच्य क्रांतीकारकांशी संबंध असे. अर्थात ते त्यांच्या कार्यात प्रत्यक्ष सामील झाले नाहीत. शस्त्र उचलून स्वराज्य निश्चित मिळेल अशी खात्री झाल्याशिवाय आपण तो मार्ग स्विकारणार नाही, असे ते म्हणत. टिळकांनी त्यावेळी मुंबईत असलेल्या रशियन राजदूताशी संपर्क साधला होता. ही माहिती अगदी प्रथम कै.म.म.दत्तोपंत पोतदार यांनी प्रसिद्ध केली. बडोदे सरकारच्या सैन्यात असलेल्या माधवराव जाधव यांना स्वित्झर्लंडमध्ये लष्करी शिक्षणा‌स पाठविण्याची खटपट लोकमान्यांनी केली. जाधव यांना अमेरिकेतील सैनिक विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांना तेथे सर्व लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको यांना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही. जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील, होमरूल डेप्युटेशनचे एक सदस्य बॅ. वेलणकर यांनी पुढील आठवण सांगितली होती. टिळक वेलणकरांना म्हणाले, लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, की आपल्याला स्वराज्य मिळविण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साह्य होईल. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले.
      टिळकांचा दृष्टीकोन विशाल आणि व्यापक होता. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रूपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ''मी राजकीय कार्यकर्ता नाही , मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.'' टिळकांनी त्यांना कळविले, ''तुम्ही राजकीय प्रचार करावा, अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्त्वाची वाटते.''
  ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतात उठाव झाल्यास लष्करी शिक्षण घेतलेल्यांना नेतृत्त्व करता येईल या उद्देशाने भारतीय तरूणांना रशियात तसे शिक्षण घेण्याची संधी मिळेल का याची चाचपणी लोकमान्य टिळकांनी केली होती. तत्कालीन रशियन राजदूतांच्या अहवालांतून याविषयी नोंद आढळते. लोकमान्यांचा हा मनोदय पुढे सिद्धीस गेला नाही कारण खुद्द रशियातच १९०५ मध्ये क्रांती झाली आणि ब्रिटन-रशिया यांमध्ये सहकार्याचे वारे वाहू लागले.
   डॉ. खानखोजे हे सुदधा टिळकांच्या प्रोत्साहनाने परदेशी गेले होते. तेही जपानमार्गे अमेरिकेस मुख्यतः युद्धशास्त्र शिकण्यासाठी गेले. जागतिक स्तरावरील वजन लक्षात घेता भारतीयांच्या प्रश्नाची जगाला मु्ख्यत्त्वे इंग्लडमधील ब्रिटीश सरकारला जाण करून देणारे लोकमान्य टिळकच होते.
लोकमान्य टिळकांच्या या अनोख्या दृष्टीपुढे मनापासून नतमस्तक!!!!! 
             शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Thursday, July 30, 2020

संगीतप्रेमी लोकमान्य टिळक


राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, न्यायालयीन खटले या सर्व धावपळीच्या दिनक्रमात लोकमान्य टिळक आपला वाचन व लिखाणाचा व्यासंग जोपासत असतांना त्यांना असलेली शास्त्रीय गायन व नाट्यगीताची आवडदेखील जोपासत होते.गणेशोत्सवाच्या निमीत्ताने त्यांच्या वाड्यात अधूनमधून गाण्याच्या मैफिली रंगत असत. एकदा नारायण राजहंस हा बालक आपल्या माणसांसोबत टिळकांच्या घरी गेले असता तो एक बंदीश गात असतांनाच टिळकांनी ते ऐकले व त्यांच्या तोंडून ' अरे हा तर बालगंधर्व ' हे सहजोद्गार निघाले.तोच नारायण पुढे बालगंधर्व म्हणूनच प्रसिध्द झाला.
एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने टिळक रहात असलेल्या गायकवाडवाड्यात रात्री बरीच गर्दी जमली होती.संगीत नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, यांच्याशी टिळकांचे स्नेहाचे संबंध होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन होणार होतं. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले त्याला एक वर्ष झालं होतं म्हणून त्यावर्षीच्या उत्सवात बखलेबुवांचं गाणं व्हावं, असं कृष्णाजी खाडिलकरांनी लोकमान्यांना सुचवलं होतं. लोकमान्यांना बखलेबुवांबद्दल प्रचंड आदर होता, त्यामुळे त्यांनी खाडीलकरांची ही सूचना मान्य केली. खुद्द लोकमान्यांनी दिलेलं आमंत्रण बखलेबुवांनीही लगेच स्वीकारलं. कार्यक्रम रात्री ठीक दहा वाजता सुरू झाला. सुरुवातीला मा. कृष्णरावांचं गायन झालं. नंतर बालगंधर्व गायला बसले. काही नाट्यगीतांनंतर लोकमान्यांच्या गुणवर्णनपर ’जो लोककल्याण साधावया’ हे मालकंसातलं पद ते गायले. या दोन्ही तरुण गायकांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. दोन्ही गायक श्रोत्यांचे लाडके, आणि त्यांच्या नाट्यगीतांनी तमाम गानरसिकांना वेड लावलं होतं. मध्यरात्री एक वाजता भास्करबुवा बैठकीवर आले. त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. बुवांना हा अनुभव नवीन नव्हता. बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि बुवा या तिघांचे जलसे भारतभर सतत होत असत. या जलशांना तोबा गर्दी उसळत असे. पण प्रत्येक ठिकाणी बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांच्या पदांना भरपूर दाद मिळे. बुवांचं शास्त्रीय गायन सुरू झालं, की श्रोत्यांचा बैठकीतला रस ओसरे. बुवांच्या नाटकातल्या पदांना मात्र जोरदार दाद मिळे, त्यांनी नाट्यगीतं गावीत, असा आग्रह होई. नाट्यगीतांनी श्रोत्यांना वेड लावलं, तरी शास्त्रीय गायनात आता त्यांना रुची राहिली नव्हती, याचं बुवांना फार वाईट वाटे.
गायकवाडवाड्यात त्या रात्री भास्करबुवांचं गाणं सुरू होताच श्रोत्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अनेकजण बुवा गात असतानाच उठून जाऊ लागले. बैठकीला लोकमान्य उपस्थित होते. भास्करबुवांसारख्या थोर गायनाचार्यांचा असा अपमान त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. ते उभे राहिले, आणि श्रोत्यांना म्हणाले, "आजचा कार्यक्रम गणपतीउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा यांच्या गायनाला सुरुवात झालेली आहे, आणि ते तुम्ही शांतपणानं ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कोणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं, पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं, ते वाटतं म्हणजे असं की, त्यांची कला फार मोठी आहे, आणि त्याबद्दल विचार करण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून भास्करबुवांना मी मुद्दाम तसदी दिली. ते इथे आले, आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. त्यांनी उत्तमप्रकारे काम केलं आहे, याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं, प्रत्यक्ष गजाननस्वरूप  भास्करबुवा बखले यांच्या घातल्याचे कार्यक्रम ऐकण्याचा प्रसंग वारंवार येऊ द्यावा, अशी प्रार्थना मी करतो."
टिळकांच्या आवाहनानंतर श्रोते अर्थातच शांत झाले, आणि पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला. बुवा अडीच तास गायले. गाणं संपल्यानंतर लोकमान्यांनी सर्वांना घरात नेलं, आणि बुवांच्या गाण्याची मनापासून प्रशंसा केली. मोठ्या प्रेमानं जरीचं उपरणं लोकमान्यांनी बुवांच्या अंगावर घातलं. नंतर लोकमान्य कंदील घेऊन उंबर्‍या गणपती चौकापर्यंत बुवांना सोडायला आले होते.या एकाच प्रसंगांतून लोकमान्य टिळकांचं संगीत प्रेम किती होतं हे लक्षात येतं. संगीत कलेची आवड जोपासत कलाकारांना प्रोत्साहन देणारे लोकमान्य आपणांस नक्कीच वंदनीय आहेत!!!!!!!!
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...