Tuesday, August 6, 2024
श्रावण सरी
Wednesday, June 26, 2024
प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य टिळक
Thursday, July 13, 2023
प्रतिभासंपन्न कवयित्री
प्रतिभा संपन्न निसर्ग व प्रेम कवयित्री
इंदिरा संत
२० व्या शतकातील शेवटच्या सहा दशकांमध्ये सातत्याने काव्यलेखन करणार्या मराठी कवितेच्या परंपरेमध्ये स्वतःचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्या प्रतिभासंपन्न कवी इंदिरा संत.एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे इंदिरा संत यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादाची लय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत .रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवयित्रीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते. साठ, सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कविता आजही वाचताना ताज्या टवटवीत फुलासारखा सुगंध वाटत जातात.
थंड गुलाबी कार्तिकातली, धूसर धूसर धुके तरंगणारी सकाळ, अशा निर्मल निर्भर वातावरणावर झगमगणारी सोनेरी किरणांची सुंदर नक्षी, त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूचफुलांचा सुगंध!
चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलुन तो हृदयाशी धरला!
इतका सुंदर सौंदर्यानुभव देणारी शेला ही आपली आवडती कला. अशाच अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे’ असं म्हणणार्या इंदिराबाईंच्या कवितेचं नातं शिल्पकलेबरोबर अभिजात रसिकतेशी कायमचं जुळलं आहे.
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या आजच्या तरुणाईने एकदा इंदिराबाईंची ही कविता आवर्जून वाचावी.प्रेमात इतका हळुवारपणा असावा याचा वस्तुपाठच इंदिरा संतांनी दिला आहे.
नको पाठवू.........
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !
पाठवीशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते ||
कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेचे वर्णन एका वाक्यात करावयाचे असेल तर ' स्वत्वाने सुंदर ठरलेली विशुध्द भावकविता’ असे करता. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातल्या कविता रविकिरण मंडळाचे संस्कार घेऊन आलेल्या आहेत.
केवळ कविता हा त्यांच्या लेखनाचा प्रांत कधी राहिला नाही.जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्या कविता करत होत्या आणि त्या ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा वगैरे मासिकातून प्रसिध्द होऊ लागल्या होत्या. १९४१ मध्ये ‘सहवास’ हा उभय पतीपत्नींचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर शेला (१९५१) मेंदी(१९५५) मृगजळ (१९५७) रंगबावरी (१९६४) बाहुल्या (१९७२) गर्भरेशीम (१९८२) चित्कळा (१९८९) वंश कुसुम (१९९४) व निराकार (२०००) असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले. शामली (१९५२) कदली (१९५५) चैतू (१९५७) हे तीन कथासंग्रह, मृद्गंध (१९८६) मालनगाथा (१९९६) फुलवेश (१९९७) हे तीन ललितलेख संग्रह, गवतफुला, अंगतपंगत, मामाचा बंगला हे बालसाहित्य- असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांच्या गद्यलेखनाचे स्वरूपही कवितेसारखे नितळ, सहजसुंदर व काव्यात्मक आहे, त्यामुळे साहजिकच कवी म्हणून इंदिराबाईंचा ठसा साहित्यक्षेत्रावर अधिक उमटला.
‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.
प्रियकराचा चिरविरह हाच त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू बनला. निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या चार अनुभवसूत्रांना या विशिष्ट प्रकारच्या दुःखाने व्यापून टाकल्याने त्यांची कविता विरहाच्या अधिकच गडद छटा घेऊन व्यक्त झाली. दुःखाच्या ताजेपणातील प्रतिक्रियात्मक उत्कटता सर्वाधिक जाणवते ती ‘शेला’ मधल्या कवितांवर
अजूनही जागा आहे
स्पर्श तुझा कायेवरी
आणि अंगाचा सुगंध
खेळतसे श्वासावरी (अजूनही)
मनावरची चांदण्यांची झिरझिरी धुंदी अजून ओसरली नाही तोच चंदेरी वर्तमानाचे रूपांतर एकाएकी भीषण भूतकाळाच्या जळत्या आठवणीत व्हावे हे एक संवेदनाशील कवीमन मानूच शकत नाही. शेलानंतर चारच वर्षांनी प्रसिध्द झालेल्या मेंदीतील कविता अधिक तरल, अर्थघन आणि सुजाण वाटतात.
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला घ्यावे तुजला घ्यावेे (मृण्मयी - मेंदी)
' नाहीस तू ने भरले अंबर’ अशा जाणीवेने व्यापलेले दुःख ‘मृगजळ’मध्ये अधिक गडद झाल्याचे, एकवटत चालल्याचे जाणवते. थोड्या अलिप्तपणे दुःखाच्या नजरेला नजर देण्याचे सामर्थ्य त्या गोळा करताना इथे दिसतात. ‘उभे दुःख हे उभेे पुढ्यातच ..... स्तब्ध स्वयंभू पहाडापरी’ - दुःखाचं असं पुढे ठाकणं जणू सवयीचं झाल्यासारखं स्वीकारार्ह आहे. त्या दुःखाला स्त्रीच्या म्हणून असलेल्या अनुभवाचा हळुवार जीवनस्पर्शी वास आहे.
कारण येतो वास तयाला
तान्ह्या ओठावरूनी
ओघळणार्या गोड दुधाचा
जुन्या अनुभवांना सामोरे जाणारे कवीमन आता अधिक चिंतनशील, तटस्थ आणि प्रतिमांच्या भाषेत बोलू लागलेले दिसते. या पार्श्वभूमीवर आठ वर्षांनी प्रसिध्द झालेल्या रंगबावरीत दुःखाचा कढ निमाला आहे, दुःखाच्या दाहकतेतून पोळून निघाल्यावर कवीमन शांत झाले आहे, बाहेरच्या जगाची सोनेरी चाहूल होऊन बघते आहे.
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळाळेल मन
केंव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात (किती उबावे उबावे)असा प्रश्न त्या स्वतःला विचारू लागल्या आहेत. जागं होण्याचं नाकारणार्या स्वतःच्या मनाला त्या प्रतिप्रश्न विचारू लागल्या आहेत.
निसर्गाच्या संवेद्य वर्णनाबरोबर शिणलेल्या देहाला आलेेले विश्रब्धपण, ‘कोमल काळोखात’ संथ निवांत झुलणारे मन, मनात उगवणारी सतेज पहाट, समर्पण वृत्तीने स्वत्वाचे दान करून ‘शून्या’ झालेली भरतीची लाट, या प्रतिमा दुःखाशी संघर्ष संपल्याची साक्ष देतात. निर्गुण, निराकार जगाला व्यापणार्या प्रेमाची, विशुध्द निसर्गसौंदर्याची, जगण्यातल्या एका अबोध आनंदाची जाणीव कवीमनाला झालेली दिसते. तटस्थपणे प्रेमानुभवाचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया जीवनातील ताणांसकट व्यक्त होते. दुःखाचा सातत्याने शोध घेताना भोवतालच्या विश्वातील दुःखाचे आतले हुंकार त्यांना जाणवू लागतात.
इंदिराबाईंच्या सुरवातीच्या कवितांमधली स्त्री असंयमी, समर्पिता, जीवनाचा धूप करून प्रियकराभोवती घमघमणारी रातराणी, धूळफुलांचा वास लेवून होणारी पाऊलवाट आहे. परिपूर्णता म्हणजे पुरूष आणि अपूर्णता, चंचलता म्हणजे स्त्री. ही स्त्री पन्नास, साठच्या दशकातील स्त्री-प्रतिमेला साजेशीच होती. पण काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते. गेल्या तीस, चाळीस वर्षात बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न त्या ‘बाहुल्या’ मध्ये करतात, ही त्यांच्या जाणिवांच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या त्याचीच खूण आहे. ‘ही अशी ती तशी’ मध्ये विविध परिस्थितीतून आलेल्या व शिक्षकीपेशा पत्करलेल्या स्त्रियांची रेखाटने येतात. ‘कुटुंबातील नीटस पोर’ मध्ये पैशासाठी नोकरी करणार्या स्त्रीचे वर्णन येते. आखीव रेखीव आयुष्यात कसरत करून (कसातरी) तोल सांभाळताना अचानक तोल जातो (बंदिस्त) स्त्रीचं घरातलं दुय्यम, दुर्लक्षित स्थान, आयुष्यातला कंटाळवाणेपणा आणि घरकामाचं तेच तेचपण ‘फॉसिल’ कवितेत व्यक्त होतं.
मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी
मी म्हणजे आवकजावक बिलेपावत्या
मी म्हणजेे बौद्धिकाची रतीब-गाळणी
मी म्हणजे हेच काही
चैतन्याची चमक नाही
चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही, दुःख नाही. स्त्रीला दिलेली चालत्या बोलत्या पाषाणाची उपमा संसारातलं तिचं गोठलेलं स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते. घरासाठी कष्ट करणारी, नोकरी करणारी, घर सांभाळणारी ‘गृहलक्ष्मी’ ही घरासाठी आयुष्य वेचताना स्वतःच सारं काही गमावून बसते याचं उपरोधिक चित्र ‘मध्यमवर्गीय गार्गी’ या कवितेतील ‘शिजवणारी तीच - शिजणारी तीच’ या प्रतिमेतून घरादारासाठी भरडून निघालेल्या स्त्रीमध्ये प्रभावीपणे व्यक्त होते.
या सर्वच कवितांमधून एक शांत संयत, प्रौढ अलिप्तता जाणवते. समर्पिता प्रेयसी ते एकाकी व्यक्ती हा स्त्रीच्या व्यक्तिजीवनाचा त्यांचा प्रवास पुढील काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी कविता प्रवाहाला दिशादर्शक आहे.
त्यांची कविता दुःखाच्या आत्म्याचा शोध घेताना वैयक्तिक दुःखाकडून विश्वात्मक दुःखाकडे विस्तारत जाते. या संपूर्ण प्रवासात त्यांचा सच्चा साथी प्रियकर आहे तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाला स्वतःचा रंग, रूप, स्वभाव, स्पर्श, रस सगळं माणसांसारखं आहे. कार्तिकाचा थंड गुलाबी स्पर्श आणि उमलत्या बूच फुलांचा मादक सुगंध असणारं धुकं म्हणजे वसंतसेना वसुंधरेला चारुदत्ताकडून मिळालेला शेला आहे (शेला) धूळभरू रुक्ष विरागी सडक, लाल कोवळ्या पानांचा पिसारा फुलवून उभ्या असणार्या पिंपळाच्या दर्शनानं त्याच्यावर लोभावून जाते.
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन (मृण्मयी)
आपल्या रक्ताला मातीची ओढ आहे, मनाला मातीचे ताजेपण आहे असे सांगताना
दंवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावे.असेही त्या म्हणतात.
हेमंताच्या शेल्याने अंग टिपावे, वसंतातील फुलांचे वस्त्र ल्यावे, ग्रीष्माने कचभार उदवावा आणि जर्द विजेचा मत्त केवडा वेणीवर तिरकस माळावा अशी सुंदर रोमँटिक कल्पनाचित्रे उभी करताना त्या निसर्गकन्या होतात. निसर्गरूपातून फिरणार्या कालचक्राच्या गतीचा क्षण पकडताना निसर्ग प्रतिमारूपाने येतो, आणि त्याचे त्यांच्या भाववृत्तीशी नाते जुळते. निसर्गातील रंगांची मुक्त उधळणही त्यांच्या कवितेत वेधक रूप घेऊन येते गाण्यामधला पोपटी भाव, मनातील हिरवा गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके अशा रंगप्रतिमा निसर्ग आणि माणसाची एकरूपता दर्शवतात.
ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)
शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात.
संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ज्या ठिणग्या उडतात, त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजे माझी कविता आहे.’ असे त्या म्हणत.
धगधगते जीवन हे
धरून असे ओंजळीत
आले मी कुठून कशी
आले मी हेच फक्त (आले मी)
अनेक वर्षे सातत्याने लेखन करणार्या इंदिराबाईंची कविता त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच प्रगल्भ होत गेली. आयुष्यातील स्वतः पलिकडची अनुभूती उत्कटपणे कवेत घेत गेली. भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे.
शशिकांत घासकडबी , नंदुरबार
९५२७१५३९२५
अविस्मरणीय स्मरणगाथा
गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनिदां
आजच्या तरुणाईला तूला गोनिदां माहिती आहेत का? असं कोणी विचारलं तर कदाचित त्यातला एखादाच त्याचं उत्तर देवू शकेल कारण ६०,७०,८० घ्या दशकात साहित्य जगतात वाचन करणाऱ्या तरूणांच्या मनावर ज्यांनी राज्य केलं त्यातील एक मोठं नांव म्हणजे गोनिदां उर्फ आप्पा दांडेकर.गोनिदां नांव उच्चारताच आपल्या समोर दोन पुस्तकांची नांव आवर्जून येतात ती म्हणजे 'कुणा एकाची भ्रमणगाथा 'आणि ' ' स्मरणगाथा '.ही दोन्ही पुस्तकं ज्यांनी वाचली आहेत त्यांच्यासाठी तर गोनिदां हे ' अविस्मरणीय स्मरणगाथा ' आहेत आणि त्यांचा क्षणभराचा सहवास ज्यांना मिळाला ती त्यांच्यासाठी एक अमृतगाथाच म्हणावी लागेल.
८ जुलै १९१६ ला विदर्भात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे अप्पांचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी घराबाहेर पडून सलग पन्नास वर्ष पूर्णेपासून नर्मदेपर्यंत जास्तीत जास्त पदभ्रमंती करणाऱ्या या कलंदर फकीराची अवघी जीवनगाथा म्हणजेच स्मरणगाथा आणि भ्रमणगाथा आहे.
सहयाद्रीच्या कडेकपाऱ्या, गड-किल्ले यांच्या कुशीत रमलेले,शिवबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेक गडावरची धूळ मस्तकी धारण करणारे व्यक्तिमत्त्व. शिवरायांचे पदचिन्ह, हाताचा ठसा व अस्थिशेष आपल्यापाशी आहे, याची श्रीमंती बाळगणारा हा अस्सल मराठी मातीतला हा माणूस किती अनुभव संपन्न आणि समृद्ध असेल याची अनुभूती त्यांच्या सहवासात किंवा त्यांची साहित्य संपदा वाचणाऱ्यालाच येवू शकेल.. या अनुभवांतूनच त्यांचे साहित्य प्रसवले. त्यातून मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या, छत्रपतींच्या काळात नेणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अखंड भ्रमंतीतून आलेले आगळेवेगळे अनुभवच शब्दरूप घेऊन आले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;’ असे गोनीदां म्हणत असत.
नर्मदची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले. या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.
'आमचे राष्ट्रगुरू’ ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. ‘साभार परत’ हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. ‘बिंदूची कथा’ ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी ‘माचीवरला बुधा’, ‘पूर्णामायेची लेकरं’ (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),’आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘मृण्मयी’ अशा अनेक दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या.
'मृण्मयी’ अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. ‘पवनाकाठचा धोंडी’ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘शितू’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’ या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.
‘मोगरा फुलला’ कादंबरीची हकीकत थोडी वेगळी. ज्ञानदेवांचे वडील विट्ठलपंत यांच्या संन्यासी वृत्तीचे गोनीदांना खूप आकर्षण होते. ज्या माणसाचा पुत्र साक्षात ज्ञानेश्वर आहे, त्यात तेज:पुंज असे काही असणारच, या विचाराने त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यातील निम्मा भाग त्यांनी विट्ठलपंतांच्या जीवनातील संघर्षाचे, ताणतणावांचे चित्रण करण्यात खर्च केला आहे. या कादंबरीचे १९७७ मध्ये प्रथम गोनीदांनीच जाहीर वाचन केले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला; पण तेंव्हा हा प्रकार रूजला नाही. आता गोनीदांची कन्या प्रा. वीणा देव, व जामात डॉ विजय देव आपल्या मुलींसह गोनीदांच्या सहा कादंबऱ्यांचे अभिवाचन करीत आहेत.गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला.
गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी’, तसेच ‘श्री रामायण’, ‘भक्तिमार्गदीप’, ‘कर्णायन’, ‘कृष्णायन’, ‘दास डोंगरी राहतो’, ‘तुका आकाशाएवढा’ ही पुस्तके लिहिली. साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘काका माणसात येतो’, ‘वनराज सावध होतात’, ‘कुऱ्हाडीचा दांडा’, ‘संगीत राधामाई’, ही नाटके त्यांनी लिहिली. ‘छंद माझा वेगळा’ हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, ‘पाच संगीतिका’ हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.
त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘स्मरणगाथा’ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने’नगरभूषण’, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्य वाचस्पती’ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ‘नानासाहेब नारळकर’ पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ‘दुर्गप्रेमी’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.
१९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान. मालतीबाई बेडेकर यांना दहा मतांनी हरवून गोनीदा अध्यक्ष झाले. आपल्या वऱ्हाड प्रांतात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला; पण नंतर ‘आदरणीय मालती बेडेकरांविरूध्द मित्रमंडळींच्या आग्रहास्तव उभा राहिलो. ते सर्व वर्ष कटू गेले. साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो हे विसरून जायचे आहे.’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. ‘जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.’, अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी ‘सकाळ’ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.
गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे’ अशी त्यांची मराठी आहे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा ‘मृण्मयी पुरस्कार’ सुरू केला. १९९८ सालात, स. प. महाविद्यालयाच्या ‘प्राचार्य सोनोपंत दांडेकर’ अध्यासनाला हा पुरस्कार लाभला. त्याआधी मारूती चित्तमपल्ली, विलास मनोहर, शुभदा गोगटे, तळेगावचे साहित्य संस्कृती मंडळ, आळंदीचे वारकरी शिक्षण मंडळ, यांना हा पुरस्कार मिळाला आहे.मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ”माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.’ या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा? गोनीदांचे मायमराठीवर असेच प्रेम होते. ‘मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,’ अशी खंत ते व्यक्त करीत.‘सर्वथा अनलंकृत लिहिता यावे, हीच आता तीव्र इच्छा आहे,’ असे त्यांनी सोळा वर्षांपूर्वी म्हटले होते. एवढे लिखाण केल्यावरही त्यांना साधेसोपे लिहीणे हे अवघड आहे याची जाणीव होती. या दांडेकराला लालित्यासाठी तडजोड करावी लागत नाही, लालित्य हा त्याच्या लिखाणाचा अंगभूत गुण आहे, असे ते आत्मविश्वासाने म्हणू शकत असत.अतिशय सूक्ष्म अवलोकन, गड-किल्ल्यांचा मुखोद्गत इतिहास, तेथील रेतीरेतीविषयी मनात दाटलेला अभिमान, मुलखाचे फकिरी व्यक्तिमत्त्व, प्रचंड अनुभवातून उतरलेले ताकदवान साहित्य, मायबोलीविषयी वाटणारी उत्कट तळमळ, हे गोनीदांच्या अवघ्या जीवनाचे सार आहे.
महाविद्यालयात शिकत असताना दोन वेळा गोनिदांचा सहवास लाभला एकदा अमळनेरला ते विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी ते आलेले होते.त्यावेळी आमच्या काॅलेजचे प्राचार्य असलेले प्रा.मुंजे यांची कन्या कौमुदी ही त्यांची मानसकन्या.भटकंतीत वेगवेगळ्या प्रकारचे दगड,खडे संकलित करणं हा त्यांचा छंद होता.त्याचे संकलनही त्यांनी त्यावेळी आम्हाला दाखवले होते.एकदा पुण्यात असताना पेरूगेटजवळच्या एका दवाखान्यात ते दाखल होते आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हादेखील आपले आजारपण विसरून त्यांच्या भ्रमंतीविषयीच ते बोलत होते.विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनात त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आवर्जून एक आवाहन केले होते की, 'आयुष्यात खूप मोठे व्हा तुम्हाला जे करावसं वाटेल ते करा पण राजकारण्यांच्या आसपासही फिरकू नका '.
पुण्याला तळजाई येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
शिबीरानिमीत्त पुणे शहरातून झालेल्या विशाल पथसंचलनाचे चित्रीकरण करताना पाहिले आणि आम्ही थक्क झालो.त्यावेळी ६०/६५ वर्षाचे अप्पा पंचविशीत असलेल्या तरूणाप्रमाणे संचलनाच्या पुढे उत्साहाने धावत होते. साहित्य पंढरीतील या अनोख्या वारकऱ्याला विनम्र अभिवादन 🙏🌹🙏
शशिकांत घासकडबी, नंदुरबार -९५२७१५३९२५
Thursday, May 25, 2023
अ ल क ४ सुख आणि शांती
सुख आणि शांती यांच्यात एकदा जोरदार वादविवाद सुरू असतो
माणसाच्या सर्वात जास्त गरज कशाची? यासाठी समर्थन करणारे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातात, त्यांचं खंडन मंडनही सुरू असतं.सुखं म्हणतं की माणसाला जे जे हवं ते ते म्हणजे भौतिक, अध्यात्मिक गोष्टी मिळाल्या की तो सुखी होतो.त्यानंतर त्याला कांहीच नको असतं.
शांती म्हणते छे छे ते अशक्य आहे.त्याच्याही नंतर त्याला समाधान ( satisfaction) हवं असतं त्याच्या शोधात तो भटकत असतो.ते मिळालं तरच त्याला शांती मिळते.त्यानंतर त्याला कशाचीही गरज रहात नाही.
तात्पर्य -मन शांत असेल तर आपण सर्व सुखाचे धनी असतो.नुसतं सुख मिळून चालत नाही समाधानाची जोड मिळाली तर शांती प्राप्त होते.
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
Tuesday, December 27, 2022
पत्र लिही पण.........
पत्र लिही पण.........
परवाच पोस्टमनने आडनांवाचा पुकारा केला.तेंव्हा नेहमीप्रमाणेच एखादा लिफाफा अथवा रजिस्टर असावे म्हणून बाहेर डोकावून पाहिले आणि त्याने चक्क एक पोस्टकार्ड हातात दिलं.ते पाहून मी क्षणभर अचंबित झालो.कारण आजकाल पोस्टकार्ड येणं तसं दुर्मिळच नाही का ?
ते पत्र म्हणजेच पोस्टकार्ड आमच्या चिरंजीवानेच लिहीलेले होतं.तो योगायोगाने इथंच आलेला होता म्हणून त्याला आश्चर्यकारक चेहऱ्यानेच विचारलं पोस्टकार्ड लिहिलंस?कसं काय? तो म्हणाला कांही नाही सहजच आठवण आली म्हणून.मला खूप खूप आनंद झाला.
तंत्रज्ञानाच्या या युगात तसे आपण सर्वच टेक्नोसॅवी झालेलो आहोत प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपण आपल्या मुलाबाळांचे घेत असतो .अशा काळात पोस्टकार्डचा उपयोग तसा मर्यादितच राहणार नाही का? अशा काळात मुलाने सहज आठवण आली म्हणून लिहीलेलं हे पत्र खूप सुखावून गेलं.
भारतात १८७९ मध्ये म्हणजे १४३ वर्षांपूर्वी केवळ ३ पैशात सुरू झालेली ही टपाल सेवा अद्यापही आपलं स्थान टिकवून आहे.आता फक्त १ रूपया त्याची किंमत आहे.पण आजही लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात हे महत्त्वाचे आहे.
अगणित संस्था,संघटना कार्यालयं, कुटुंब यांच्या व्यक्तिगत संपर्काचं माध्यम म्हणजे हे पोस्टकार्ड . दिवाळी किंवा अन्य सणांच्या शुभेच्छा असो किंवा एखादी शुभ अथवा दु:खद वार्ता ती संक्षिप्त मजकूरात कळवण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड.आपल्या घरापासून दूर असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळवण्याचं किंवा विचारण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड. मला आठवतंय , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक यांचा संपर्क देशभरात लाखो सर्वसामान्य स्वयंसेवकांशी केवळ पोस्टकार्डवर लिहीलेल्या पत्राद्वारे होत होता. आजतागायत अगणित प्रचारक ही प्रथा पाळत आहेत. अभाविपचं काम करत असतानाची ही गोष्ट आहे.अमळनेरात जळगांव जिल्ह्याच्या एका वर्गाच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती जिल्हा प्रमुखांशी रोज संपर्क ठेवणं आवश्यक होतं तेव्हा टेलिफोनदेखील फारसे नव्हते.मी रोज एक पत्र लिहून १५ दिवस संपर्क ठेवला तितक्याच तत्परतेने मलाही तिकडून उत्तरं मिळाली.अर्थात त्यावेळी टपाल खातेही खूप तत्पर होते हा भाग वेगळा.एकूण काय तर पोस्टकार्डमुळे किती तरी लोकांशी सहज संवाद होत असे.
मित्रहो, मनातल्या भावना जितक्या उत्कटतेने आपण पत्रातून व्यक्त करू शकतो ना तितकं फोनवरचा संवाद, मेसेजेस म्हणून आपण नाही व्यक्त करू शकत.अशावेळी काय हरकत आहे पोस्टकार्डचा वापर करायला?
कवयित्री इंदिरा संत यांची एक कविता आहे पत्र लिही पण.......त्याचा संदर्भ वेगळा आहे.पण त्यातले हे पहिले तीन शब्द महत्वाचे आहेत.पत्र लिही पण ..... पोस्टकार्डवर....
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
9527153925
Sunday, May 29, 2022
स्वातंत्र्य लक्ष्मीचा योद्धा उपासक: वीर सावरकर
उपासनां नाम यथाशास्त्रं उपास्यस्यार्थस्य
विषयी करणें न समीप्य मुषगम्य||
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेन दीर्घकालं
यदासनं तदुपासन याच क्षतेड्ख||
शांकरभाष्यातील या श्लोकात शंकराचार्यांनी सांगितलेली उपासनेची व्याख्या खूप वेगळी आहे. ' उपासना ' हा शब्द तसा सर्वत्र रूढ आहे. आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थही लावले जातात. परंतु कुठल्याही कर्मकांडाला थारा न देता "तेलाची धार ज्याप्रमाणे खंडीत न होता एकसारखी प्रवाहित राहते त्याप्रमाणे कोणत्याही उपासकाने आपल्या उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता आपल्या चिंतनाने प्रवाहवत् राहून एकाग्र होणे , त्यासाठी कठोर परिश्रम करणे म्हणजे उपासना. अशा प्रकारची उपासना जो करतो तो योध्दा उपासक म्हंटला जातो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर या श्लोकाची अनुभूती त्यांच्या प्रत्येक कार्यात येते.
आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे अनुसरण करून त्यांनी एका साधकाप्रमाणेच स्वातंत्र्य लक्ष्मीची कठोर उपासना केली. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येवून सुध्दा क्षणभरही विचलित न होता वयाच्या सोळाव्या वर्षापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत सदुसष्ट वर्ष स्वातंत्र्यवीर अविरत संघर्ष करीत होते. त्यांच्या या उपासनेचे खरं म्हणजे बहुविध आयाम आहेत. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपल्या या कठोर उपासनेचीच छाप त्यांनी उमटवली. म्हणूनच ' योध्दा उपासक ' हे बिरूद त्यांना तंतोतंत लागू पडते.
वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या भगूर या गावी घरात असलेली अष्टभुजा दुर्गा भवानीची मुर्ती पाहून विनायकरावांना त्या मुर्तीतच स्वातंत्र्य लक्ष्मीचा साक्षात्कार झाला आणि सहजपणे त्यांच्या मुखातून ' स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ' असा उद्घोष निघाला. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर ते वृत्त समजताच विनायकराव संतप्त झाले. आपली कुलदेवता जिला स्वातंत्र्य लक्ष्मी म्हणून त्यांनी संबोधले तिच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की " देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" , केवढी अवघड प्रतिज्ञा केली होती. पण देश , काल , परिस्थितीशी झुंज देत तब्बल ६७ वर्ष ते या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहिले, तद्रूप झाले. केवढी ही कठोर उपासना? उपासनेसाठी आवश्यक असलेला गुण 'निग्रह ' याठिकाणी अनुभवाला येतो. ही मनस्थिती इतक्या सहजपणे त्यांना प्राप्त झालेली नव्हती. त्याच्या शुध्द बीजाचे रोपण त्यांच्या बालपणीच्या संस्कारात झालेले होते. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांत तात्यारावांचा जन्म झाला हा एक विलक्षण योगायोग होता. घरात असलेल्या आठही हातात शस्त्र बाळगणाऱ्या दुर्गा मातेची पूजा करण्याचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले. आईच्या मृत्यूनंतर थोरल्या वहिनी येसूबाई यांच्या सहवासात त्यांच्यावर वाचन व काव्य निर्मितीचा संस्कार घेत त्यांचे बालपण विकसित होत गेले. वेदशास्त्र अध्यनाची परंपरा असलेल्या कुटुंबात सावरकर घडले. त्यांच्या कुटुंबियांना पेशव्यांकडून वर्षासन मिळत असे तो इंग्रजांनी बंद केला यामुळे विनायकरावांच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षी रामायण, महाभारत, दासबोध भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, वेद उपनिषदे आदी विविध धर्मग्रंथाचे वाचन त्यांनी केले. वयाच्या तेराव्या वर्षी ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' त्यांनी लिहिले.
त्यात "तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे".
हा उत्कट समर्पण भाव त्यांच्या या उपासनेत होता असे लक्षात येते. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी देशबांधवांना उद्देशून ' स्वदेशी फटका ' हे दीर्घ काव्य लिहून भारत मातेवरील अपरंपार श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. याच कवितेत शेवटी ते म्हणतात,
कवितारूपी माला अर्पी ,आर्य बुधाला सार्थक हो
भक्ताकरवी मन देवासी, सेवा यासी अर्पण हो.
आपल्या मनातला उत्कट सेवा भाव ते यातून प्रकट करतात.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे वडील दामोदरराव सावरकर यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला.त्याकाळात इंग्रजांकडून भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून ते अस्वस्थ होत होते.वयाच्या २० व्या वर्षी ते विवाहबद्ध झाले खरे पण त्यांच्या पत्नी सौ यमुनाबाई यांना त्यावेळी स्वातंत्र्यदेवतेचा हा उपासक इतके कठोर तपाचरण करेल याची कल्पनाही त्या माऊलीला नसावी.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात तर तात्यारावांचा प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांशी संपर्क आला . टिळकांच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.पुण्यातल्या सर्व तरूणांमध्ये स्वदेशीची ज्योत प्रज्वलित करण्यात ते अग्रभागी होते.वयाच्या २४ व्या वर्षी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात पहिली आहुती त्यांनी दिली.त्याचे परिणाम त्यांना ठळकपणे माहीत होते.फर्ग्युसन महाविद्यालयांतील अनेक मवाळ नेते व प्राध्यापकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली .त्यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले.पण लोकमान्य टिळकांनी ' हे कसले आमचे गुरू ' असा जळजळीत अग्रलेख लिहून सावरकरांच्या भूमिकेचे समर्थन केले.भारतमातेच्या उपासनेतलं हे पहिलं कठोर आचरण होतं.
लोकमान्यांनी सावरकरांची तल्लख बुद्धीमत्ता, तर्कशुद्ध विचार व जीवितकार्यावरील अढळ श्रद्धा हे गुण हेरून त्यांना लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती देवून वकीलीच्या शिक्षणासाठी पाठवले.वकीलीचे शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य चळवळीशी तद्रूप झालेल्या विनायकरावांनी प्रखर देशभक्तीपर लिखाणाला सुरुवात केली व तिथल्या तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.१८५७ चे बंड हे स्वातंत्र्य समर होते असा शब्दप्रयोग करून त्यांनी तो ग्रंथ लिहिला व गुप्तपणे त्यांचे प्रकाशन हाॅलंडमध्ये केले.फ्रान्समध्ये हा ग्रंथ वाटण्यात आला. त्यांच्या या उपासनामार्गातील दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येते.अनेक तरूणांमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल या ग्रंथामुळे धगधगू लागली.
मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध करून याचे प्रत्यंतर दिले.स्वाभाविकपणे यांचा ठपका विनायकरावांवर ठेवण्यात आला त्यांना एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा मिळालेले सावरकर जगातील एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते.शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी लंडनमधूनच आपल्या मातेसमान वहिनीला दीर्घ पत्रकाव्य लिहीले.त्यातील प्रत्येक शब्दांतून त्यांची संन्यस्त वृत्ती प्रकट होते.
अनेक फुले फुलती,फुलोनीया सुकोनी जाती
परंतु त्याची महती गणती कोणी ठेविली असे
याच काव्याच्या शेवटी ते म्हणतात
अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता
दिगंती पसरे सुगंधता,लोकहित परिमलाची
एकीकडे आपल्या सार्थकता कशात आहे हे सांगताना सर्वस्व समर्पणाच्या सुगंधाची महती ही ते विशद करतात.
जन्मठेप झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर त्यांच्या पत्नी सौ भाई सावरकरांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. या भेटीत दोघांनाही आपले अश्रू अनावर झाले.पण क्षणभरात खंबीर होवून विनायकराव म्हणतात," ईश्वराची द्या असेल तर पुन्हा भेट होईल .माई , काड्या काटक्या एकत्र करून घरटं बांधून त्यात अंडी उबवायची,पिल्लं वाढवायची असा संसार तर कावळे चिमण्याही करतात आम्हाला देशाचा संसार करता आला यातच धन्यता माना." केवढी ही निरीच्छवृत्ती? मोह ,माया सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ देशाचाच विचार त्या परिस्थीतीतही त्यांनी केला.
वयाच्या ३१ व्या वर्षी जन्मठेप झाली . लंडनवरून भारतात आणण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला. बोटीवरून अथांग सागर पाहताना मातृभूमीच्या भेटीची अनिवार ओढ त्यांना लागली डोळे पाणावले अन् धीर गंभीर आवाजात मुखातून उत्कट मातृभक्ती प्रगटली ' सागरा प्राण तळमळला ' त्यानंतर मार्सेलिस बंदरात त्यांनी घेतलेली उडी याच उत्कट देशभक्तीची अत्युच्च अभिव्यक्ती हौती.
अंदमानच्या कालकोठडीत तब्बल ११ वर्ष त्यांनी मरण यातनाच भोगल्या पण त्याही स्थितीत तसुभरही न ढळता खंबीरपणे आपली लेखनसाधना त्यांनी अविरतपणे सुरू ठेवली.यावरून उपासना मार्गात आवश्यक असलेला संयम त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेला होता याची प्रचिती आल्यावाचून रहात नाही.शारीरिक , मानसिक, कौटुंबिक आघात एकाचवेळी होत असताना देखील आपला निग्रह त्यांनी सोडला नाही.वयाच्या चाळीशी नंतर जनमतांचा रेटा वाढल्याने सावरकरांची जन्मठेप संपली पण त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले.आयुष्यभर स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य चळवळ,प्रखर हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली पण रत्नागिरीच्या वास्तव्यात राजकारणावर बोलण्यास लिहीण्यास बंदी असल्याने विनायकरावांनी समाजकारण सुरू करून जाती निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, भाषाशुद्धी,परधर्मात गेलेल्या हिंदूबांधवांचे शुध्दीकरण, समरसता आदि विषय हातात घेवुन विपुल लेखन व उपक्रम केले.त्यावेळी अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी त्यांना विरोध केला.
स्वातंत्र्योत्तर काळात देखील गांधीहत्येचे पातक त्यांच्या माथी थोपवून त्यांना अटक करण्याचे हीन कृत्य त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले.त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.वयाच्या ८३ व्या वर्षी तात्यारावांनी आपल्या सर्व कार्यांना पूर्णविराम दिला.आणि शेवटी ' मृत्यो ये ' अशी साद घालत कोणताही गंभीर आजार नसतांना प्रायोपवेशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
स्वातंत्र्य लक्ष्मीच्या या ' योध्दा उपासकाला ' कोटी कोटी प्रणाम!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
९५२७१५३९२५
समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री
समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...
-
भारतीय इतिहासातील ' न भूतो न भविष्यति ' अशी राजकीय विरासत कुणाची असेल तर लोकमान्य टिळक हे नांव प्रकर्षाने पुढे येतं.त्यांच्या स्मृती...
-
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:| इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि || मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केले...
-
वाचकहो, मन:पूर्वक नमस्कार! लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पै...