उपासनां नाम यथाशास्त्रं उपास्यस्यार्थस्य
विषयी करणें न समीप्य मुषगम्य||
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेन दीर्घकालं
यदासनं तदुपासन याच क्षतेड्ख||
शांकरभाष्यातील या श्लोकात शंकराचार्यांनी सांगितलेली उपासनेची व्याख्या खूप वेगळी आहे. ' उपासना ' हा शब्द तसा सर्वत्र रूढ आहे. आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थही लावले जातात. परंतु कुठल्याही कर्मकांडाला थारा न देता "तेलाची धार ज्याप्रमाणे खंडीत न होता एकसारखी प्रवाहित राहते त्याप्रमाणे कोणत्याही उपासकाने आपल्या उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता आपल्या चिंतनाने प्रवाहवत् राहून एकाग्र होणे , त्यासाठी कठोर परिश्रम करणे म्हणजे उपासना. अशा प्रकारची उपासना जो करतो तो योध्दा उपासक म्हंटला जातो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर या श्लोकाची अनुभूती त्यांच्या प्रत्येक कार्यात येते.
आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे अनुसरण करून त्यांनी एका साधकाप्रमाणेच स्वातंत्र्य लक्ष्मीची कठोर उपासना केली. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येवून सुध्दा क्षणभरही विचलित न होता वयाच्या सोळाव्या वर्षापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत सदुसष्ट वर्ष स्वातंत्र्यवीर अविरत संघर्ष करीत होते. त्यांच्या या उपासनेचे खरं म्हणजे बहुविध आयाम आहेत. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपल्या या कठोर उपासनेचीच छाप त्यांनी उमटवली. म्हणूनच ' योध्दा उपासक ' हे बिरूद त्यांना तंतोतंत लागू पडते.
वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या भगूर या गावी घरात असलेली अष्टभुजा दुर्गा भवानीची मुर्ती पाहून विनायकरावांना त्या मुर्तीतच स्वातंत्र्य लक्ष्मीचा साक्षात्कार झाला आणि सहजपणे त्यांच्या मुखातून ' स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ' असा उद्घोष निघाला. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर ते वृत्त समजताच विनायकराव संतप्त झाले. आपली कुलदेवता जिला स्वातंत्र्य लक्ष्मी म्हणून त्यांनी संबोधले तिच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की " देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" , केवढी अवघड प्रतिज्ञा केली होती. पण देश , काल , परिस्थितीशी झुंज देत तब्बल ६७ वर्ष ते या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहिले, तद्रूप झाले. केवढी ही कठोर उपासना? उपासनेसाठी आवश्यक असलेला गुण 'निग्रह ' याठिकाणी अनुभवाला येतो. ही मनस्थिती इतक्या सहजपणे त्यांना प्राप्त झालेली नव्हती. त्याच्या शुध्द बीजाचे रोपण त्यांच्या बालपणीच्या संस्कारात झालेले होते. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांत तात्यारावांचा जन्म झाला हा एक विलक्षण योगायोग होता. घरात असलेल्या आठही हातात शस्त्र बाळगणाऱ्या दुर्गा मातेची पूजा करण्याचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले. आईच्या मृत्यूनंतर थोरल्या वहिनी येसूबाई यांच्या सहवासात त्यांच्यावर वाचन व काव्य निर्मितीचा संस्कार घेत त्यांचे बालपण विकसित होत गेले. वेदशास्त्र अध्यनाची परंपरा असलेल्या कुटुंबात सावरकर घडले. त्यांच्या कुटुंबियांना पेशव्यांकडून वर्षासन मिळत असे तो इंग्रजांनी बंद केला यामुळे विनायकरावांच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षी रामायण, महाभारत, दासबोध भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, वेद उपनिषदे आदी विविध धर्मग्रंथाचे वाचन त्यांनी केले. वयाच्या तेराव्या वर्षी ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' त्यांनी लिहिले.
त्यात "तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे".
हा उत्कट समर्पण भाव त्यांच्या या उपासनेत होता असे लक्षात येते. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी देशबांधवांना उद्देशून ' स्वदेशी फटका ' हे दीर्घ काव्य लिहून भारत मातेवरील अपरंपार श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. याच कवितेत शेवटी ते म्हणतात,
कवितारूपी माला अर्पी ,आर्य बुधाला सार्थक हो
भक्ताकरवी मन देवासी, सेवा यासी अर्पण हो.
आपल्या मनातला उत्कट सेवा भाव ते यातून प्रकट करतात.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे वडील दामोदरराव सावरकर यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला.त्याकाळात इंग्रजांकडून भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून ते अस्वस्थ होत होते.वयाच्या २० व्या वर्षी ते विवाहबद्ध झाले खरे पण त्यांच्या पत्नी सौ यमुनाबाई यांना त्यावेळी स्वातंत्र्यदेवतेचा हा उपासक इतके कठोर तपाचरण करेल याची कल्पनाही त्या माऊलीला नसावी.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात तर तात्यारावांचा प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांशी संपर्क आला . टिळकांच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.पुण्यातल्या सर्व तरूणांमध्ये स्वदेशीची ज्योत प्रज्वलित करण्यात ते अग्रभागी होते.वयाच्या २४ व्या वर्षी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात पहिली आहुती त्यांनी दिली.त्याचे परिणाम त्यांना ठळकपणे माहीत होते.फर्ग्युसन महाविद्यालयांतील अनेक मवाळ नेते व प्राध्यापकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली .त्यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले.पण लोकमान्य टिळकांनी ' हे कसले आमचे गुरू ' असा जळजळीत अग्रलेख लिहून सावरकरांच्या भूमिकेचे समर्थन केले.भारतमातेच्या उपासनेतलं हे पहिलं कठोर आचरण होतं.
लोकमान्यांनी सावरकरांची तल्लख बुद्धीमत्ता, तर्कशुद्ध विचार व जीवितकार्यावरील अढळ श्रद्धा हे गुण हेरून त्यांना लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती देवून वकीलीच्या शिक्षणासाठी पाठवले.वकीलीचे शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य चळवळीशी तद्रूप झालेल्या विनायकरावांनी प्रखर देशभक्तीपर लिखाणाला सुरुवात केली व तिथल्या तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.१८५७ चे बंड हे स्वातंत्र्य समर होते असा शब्दप्रयोग करून त्यांनी तो ग्रंथ लिहिला व गुप्तपणे त्यांचे प्रकाशन हाॅलंडमध्ये केले.फ्रान्समध्ये हा ग्रंथ वाटण्यात आला. त्यांच्या या उपासनामार्गातील दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येते.अनेक तरूणांमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल या ग्रंथामुळे धगधगू लागली.
मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध करून याचे प्रत्यंतर दिले.स्वाभाविकपणे यांचा ठपका विनायकरावांवर ठेवण्यात आला त्यांना एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा मिळालेले सावरकर जगातील एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते.शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी लंडनमधूनच आपल्या मातेसमान वहिनीला दीर्घ पत्रकाव्य लिहीले.त्यातील प्रत्येक शब्दांतून त्यांची संन्यस्त वृत्ती प्रकट होते.
अनेक फुले फुलती,फुलोनीया सुकोनी जाती
परंतु त्याची महती गणती कोणी ठेविली असे
याच काव्याच्या शेवटी ते म्हणतात
अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता
दिगंती पसरे सुगंधता,लोकहित परिमलाची
एकीकडे आपल्या सार्थकता कशात आहे हे सांगताना सर्वस्व समर्पणाच्या सुगंधाची महती ही ते विशद करतात.
जन्मठेप झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर त्यांच्या पत्नी सौ भाई सावरकरांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. या भेटीत दोघांनाही आपले अश्रू अनावर झाले.पण क्षणभरात खंबीर होवून विनायकराव म्हणतात," ईश्वराची द्या असेल तर पुन्हा भेट होईल .माई , काड्या काटक्या एकत्र करून घरटं बांधून त्यात अंडी उबवायची,पिल्लं वाढवायची असा संसार तर कावळे चिमण्याही करतात आम्हाला देशाचा संसार करता आला यातच धन्यता माना." केवढी ही निरीच्छवृत्ती? मोह ,माया सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ देशाचाच विचार त्या परिस्थीतीतही त्यांनी केला.
वयाच्या ३१ व्या वर्षी जन्मठेप झाली . लंडनवरून भारतात आणण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला. बोटीवरून अथांग सागर पाहताना मातृभूमीच्या भेटीची अनिवार ओढ त्यांना लागली डोळे पाणावले अन् धीर गंभीर आवाजात मुखातून उत्कट मातृभक्ती प्रगटली ' सागरा प्राण तळमळला ' त्यानंतर मार्सेलिस बंदरात त्यांनी घेतलेली उडी याच उत्कट देशभक्तीची अत्युच्च अभिव्यक्ती हौती.
अंदमानच्या कालकोठडीत तब्बल ११ वर्ष त्यांनी मरण यातनाच भोगल्या पण त्याही स्थितीत तसुभरही न ढळता खंबीरपणे आपली लेखनसाधना त्यांनी अविरतपणे सुरू ठेवली.यावरून उपासना मार्गात आवश्यक असलेला संयम त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेला होता याची प्रचिती आल्यावाचून रहात नाही.शारीरिक , मानसिक, कौटुंबिक आघात एकाचवेळी होत असताना देखील आपला निग्रह त्यांनी सोडला नाही.वयाच्या चाळीशी नंतर जनमतांचा रेटा वाढल्याने सावरकरांची जन्मठेप संपली पण त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले.आयुष्यभर स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य चळवळ,प्रखर हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली पण रत्नागिरीच्या वास्तव्यात राजकारणावर बोलण्यास लिहीण्यास बंदी असल्याने विनायकरावांनी समाजकारण सुरू करून जाती निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, भाषाशुद्धी,परधर्मात गेलेल्या हिंदूबांधवांचे शुध्दीकरण, समरसता आदि विषय हातात घेवुन विपुल लेखन व उपक्रम केले.त्यावेळी अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी त्यांना विरोध केला.
स्वातंत्र्योत्तर काळात देखील गांधीहत्येचे पातक त्यांच्या माथी थोपवून त्यांना अटक करण्याचे हीन कृत्य त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले.त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.वयाच्या ८३ व्या वर्षी तात्यारावांनी आपल्या सर्व कार्यांना पूर्णविराम दिला.आणि शेवटी ' मृत्यो ये ' अशी साद घालत कोणताही गंभीर आजार नसतांना प्रायोपवेशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
स्वातंत्र्य लक्ष्मीच्या या ' योध्दा उपासकाला ' कोटी कोटी प्रणाम!!
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
९५२७१५३९२५
No comments:
Post a Comment