कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम्।।
परवा सहजच महाभारतातील शांतीपर्वातला एक श्लोक डोळ्यासमोर आला आणि लगेचच महाराष्ट्रातील सद्यस्थिती संदर्भांत कांही विचारचक्र मनात घोळू लागले.खरं म्हणजे पितामह भीष्मांनी युधिष्ठीराला उद्देशून केलेलं हे मार्गदर्शन आहे.जवळपास २० श्लोकातून राजधर्म,प्रजातंत्र आणि अनुशासन यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन पितामह भीष्म यांनी शासकांना केलं आहे.काळ राजाला बनवतो की राजा काळ बनविण्यासाठी कारणीभूत असतो ?या संभ्रमात युधिष्ठीर असतांना भीष्मांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की ' राजाच काळाला कारणीभूत असतो.' सध्या महाराष्ट्रात राजकारणाची जी भीषण परिस्थिती आपण अनुभवतो आहोत हा अत्यंत कठीण काळ आहे.त्याला जबाबदार या राज्यातले सर्व राजकारणी जबाबदार आहेत.यात डावे उजवे करण्याची सध्यातरी गरज नाही.सत्ताधारी असो वा विरोधक हे सर्व एकार्थाने राजेच आहेत . आपापल्या भागाचे प्रमुख म्हणूनच ते वावरत असतात.पण ते आपल्या भागाच्या सर्वसामान्य जनतेचे राजे म्हणून न वागता आपल्या मनाचे राजे म्हणून वागतांना दिसतात . म्हणूनच उद्वेगाने असे म्हणावेसे वाटते की राजकारण्यांनो लगाम घाला आपल्या मनाला अन् तोंडाला.
एक व्यक्ती म्हणून जेव्हा जेव्हा आपण अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहतो तेव्हा ' आम्हां काय त्याचे ' असे वाटून घेऊन थेट ' जे जे होईल ते ते पहावे ' अशी सोयीस्कर भूमिका स्वीकारून गप्प बसतो.त्याचेच परिणाम सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिक भोगतोय हो भोगतोच आहे. गेले काही महिने आपल्यापैकी जे जे संवेदनशील आहेत आणि देश देव धर्म आणि समाज यांच्या हिताचं कांहीं घडावं असं ज्यांना मनापासून वाटतंय ते ते सर्व सामान्य नागरिक आज अस्वस्थ आहेत.या अस्वस्थ झालेल्या लोकांनीच राजकारणाच्या सुंदोपसुंदीत कुणा एकाची बाजू न घेता सर्व राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकांना खडसावून विचारण्याची गरज आहे की तुम्ही गप्प राहून केवळ लोकहिताच्या कामांवर कधी लक्ष देणार? तुमच्याकडे असलेलं पद,प्रतिष्ठा,पैसा ही काही तुमची जहागीर नाही ती केवळ आम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे तुम्हाला मिळालेली विश्वस्ताची जबाबदारी आहे याचं भान ठेवा . देशहित , लोककल्याण यांच्या थापा न मारता कामाला लागा आधी जीभेला लगाम घाला.
माझ्यासारखा सामान्य नागरिक जेंव्हा आपल्या सकाळची सुरुवात चांगली व्हावी म्हणून वृत्तपत्र हातात घेतो किंवा घरात असेल तर दूरदर्शन लावतो एवढंच नाही तर आता आम्ही भौतिक दृष्ट्या खूप प्रगत असल्याने दुनिया मुठ्ठी में घेवूनच फिरत असतो म्हणून आमचा हातातला भ्रमणध्वनी उघडतो आणि.......निराशा , उद्वेगाने तो बंद करून टाकतो.तेच ते चेहरे,तेच ते आरोप प्रत्यारोप,तेच ते खुलासे,त्याच त्या सभा भाषणं,नकला आणि अत्यंत बेजबाबदारपणे केली जाणारी विधानं , शाब्दिक कोट्या वैताग आलाय नुसता....राजकारण्यानो कोण आहात तुम्ही ? नकलाकार.. विडंबनकार...नाचे, सोंगाडे... कोर्टात युक्तिवाद करणारे वकील..की सर्कशीत ले प्राणी...???? काय चाललंय तुमचं...??? जनांची नाही तर मनाची तरी बाळगा असं म्हटलं जातं तुम्ही दोन्ही विकून खाल्लंय...लाज वाटतेय तुम्हाला नेते म्हणण्याची जरा भानावर या तोंडाला व मनाला लगाम घाला.
कुणी चुकीचं वागला तरी जा कोर्टात... चुकीचं बोलला की जा कोर्टात... चुकीचं लिहीलं म्हणून जा कोर्टात.... सुरक्षायंत्रणेला तुम्ही तुमचं बटीक केलं आहेच आता न्यायव्यवस्था ही तुमची बटीक मानायला लागलात काय ?..... न्यायव्यवस्था ही तुमची वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय न्यायनिवाडे करत बसली तर सामान्य लोकांचे हजारो प्रलंबित खटले चालवून न्यायनिवाडा कसा करणार?.... वैयक्तिक निवाड्यांसाठी जातीनिहाय, गावनिहाय न्याय पंचायती आहेत ना? कौटुंबिक निवाडे कुटुंबातील वडीलधारी मंडळी सोडवतात ना ? राजकीय खटल्यासाठी पक्षप्रमुखाकडे आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी क्षमता आहे का?...कसे असणार सगळेच पक्षप्रमुख बेजबाबदार,बेताल विधानांचे मेरूमणी झाले आहेत तिथे कोण आवर घालणार???.....
सत्ता मिळवण्यासाठी पैसा.. पैशासाठी सरकारी योजनांत भ्रष्टाचार.. भ्रष्ट्राचार दडपण्यासाठी नोकरशाहीवर दबाव... याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना धाकदपटशा पोलीसीखाक्या.....मी आणि माझ्याच घराण्याची सत्ता कायम रहावी यासाठी जातीयता,धर्मांधता आदिंचा वापर हे सर्व कोण करतंय सामान्य जनता की तुम्ही?????..... लोकांच्या धार्मिक आस्थांना शिव्याशाप देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे दिवस आता संपले हे लक्षात घ्या. मिडीयाला विकत घेऊन प्रपोगंडा केला की कदाचित एखादी निवडणूक तुम्ही जिंकत असाल पण लोकांचा विश्वास तुम्ही सर्वांनीच गमावला आहे.तसाच तो या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या मिडीयाने पण गमावला आहे. तुम्ही सर्व जण हे विसरता आहात की,
प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।
प्रजेच्या सुखात राजाचं सुख असतं आणि प्रजेच्या हितासाठीच तो राजा असतो.आजच्या नवमतदार असलेल्या युवा पिढीला हे चांगलं माहिती आहे.त्यामुळे वेळीच स्वतःला आवरा .....मनाला, तोंडाला,स्वार्थाला,लगाम घाला.. अन्यथा येणारा युवा मतदार तुम्हाला माफ करणार नाही.
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
९८२७१५३९२५
No comments:
Post a Comment