Tuesday, May 3, 2022

परशुरामा अस्त्रं द्या

 अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:|

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ||

मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केलेले भगवान परशुराम......... एकाच वेळी ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची अनुभूती देणारी आपली प्रतिमा....मनाला एक विश्वास देते .......
भगवान विष्णूंचा सहावा अवतार घेवून आपण या भूतलावर प्रगटलात...... कां ? तर या पृथ्वीतलावर असलेल्या......... तपोभूमीवर.....कर्मभूमीवर....पुण्यभूमीवर...... कुणी धर्मकार्यात...राष्ट्रकार्यात......लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या...कर्मयोग्यांच्या कार्यात अडथळे आणणाऱ्या..... विद्रोही शक्तिंचा .....आपल्या शापवाणीने ....... वेळ आलीच तर....शस्त्रास्त्रांनी विनाश करण्यासाठीच हा अवतार नव्हे तर अधिकार आपल्याला मिळाला.......  आणि हो ....चिरंजीवीतेचं अनोखं वरदानही तुम्हाला प्राप्त आहे........होय आजही आपण या पृथ्वीतलावर कुठंतरी आहात ही आमची श्रद्धा आहे........ सद्य:स्थितीत......
या पुण्यभूमीत.......सत्तांध......धर्मांध.......वासनांध ......‌‌ स्वार्थांध....ल़ोकांचा...नव्हे...नव्हे ....दैत्यांचा अक्षरशः....हैदोस चाललाय् ....... तो आपल्या कुशाग्र दृष्टीने आपण पहात असालच.....या दुष्कर्मांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेला हा......हा समाजपुरूष आक्रोश करतोय......याचना करतोय.... आणि विमनस्क स्थितीत ....साकडं घालतोय..... परशुरामा.......
आता अस्त्रं द्या.... फक्त एकदा शस्त्रें द्या.........
नि:पात ...करू देत आम्हाला.....या दुष्टप्रवृत्तींना नष्ट करू द्या आम्हाला त्यांचे रक्तांने.....घाणीने .....पापकर्मांनी बरबटलेले हात..... यासाठीच आम्हाला आता शस्त्रं हवे.....परशुरामाच्या हवे...........
       भृगुवंशीय ऋषी जमदग्नींचे तुम्ही पुत्रं........कठोर तपश्चर्येमुळे पुराणातील सप्तर्षी मध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं........ अन्याय.... अत्याचार.... दुराचाराच्या...विरोधात पेटून उठणारे आपले पिताश्री जमदग्नीं........ आपल्या सदाचारी व पतिव्रता असलेली पत्नी रेणुकेला......गंधर्व क्रीडा पाहण्याच्या मोहात दुष्कर्म केलं म्हणून हत्या करण्याची आज्ञा त्यांनी केली.....पित्याची आज्ञा पाळण्याच्या कर्तव्यबुध्दीने ..... तुम्ही आपल्या मातेची हत्या केलीत....पण त्याचवेळी पित्याकडून वरदान मागून आपण मातेला व भावंडांना जीवदान दिले......नि:सीम मातृभक्तीचा हा आदर्श ही तुम्ही दिलात.....आपली माता आदिशक्ती रेणुका .....कठोर पतिव्रता..... तेवढीच थोर तपस्विनी..... कर्तव्यदक्ष माता .......आपले पती जमदग्नी यांच्याकडे कामधेनूची मागणी करणाऱ्या लोभी सहस्त्रार्जुनाने ती दिली नाही म्हणून त्यांची हत्या केल्यानंतर.....माता रेणुका यांनी माझा पुत्र २१ वेळा आपल्या क्षत्रिय कुळाचा वध करेल ....अशी शापवाणी केली .एवढंच नाही तर...दु:खाने शक्तीहीन  झालेल्या तुम्हाला श्री दत्तात्रेय चरणी अर्पण करून......पुन्हा एकदा बलशाली केले... अन् मातृवचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही पृथ्वी दुराचारी क्षत्रियहीन केली.........ही कर्तव्यकठोरता......ही मातृभक्ती आमचा आदर्श आहेच पण.......या तपोभूमीवरील दुराचाराचा.. नायनाट करण्यासाठी.... फक्त एकदाच...हे क्षात्रतेज आम्हाला द्या...परशुरामा अस्त्रं द्या........
   उत्पत्ती... स्थिती...... लय ...... यांचं प्रतिक.... ब्रह्मा, विष्णू,महेश आहेत......स्थिती प्रदान करणाऱ्या भगवान विष्णूंचे तुम्ही अवतार....विधायक,रचनात्मक कार्याचा आदर्श तुम्ही निर्माण केलात...लयकर्ता भगवान शंकरांनी तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दुराचारी क्षत्रियांचा विनाश करून ....लोककल्याण करण्यासाठी तुम्हाला अस्त्रं दिले तेच परशुरामास्त्र.........आपण नेहमीच विधायक.... रचनात्मक कार्यातून या सृष्टीला स्थिरता प्रदान केली त्याचबरोबर.. विधायक कामात अडथळा आणणाऱ्या विघातक शक्तिंचा आपण बिमोड केलात....... आताही हीच वेळ आली आहे..... म्हणून म्हणतोय आता शस्त्रं द्या.....
          चिरंजीव परशुरामा ..बघताय ना आपण....सध्या सर्वत्र... जगातल्या धर्मांध शक्ती आणि त्यांना बळ देणारे सत्तापिपासू बेगडी धर्मनिरपेक्षता वादी....‌सत्तेपायी हिंदुत्वाला तिलांजली देवून आपल्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा ओढणारे सत्तापिपासू राजकारणी.....या भूमीतील मूळ असलेल्या हिंदुत्वालाच उखडून टाकण्याचे आव्हान आपल्या वागण्यातून .... बोलण्यातून रोज देत आहेत.....आमची श्रध्दास्थाने...आमच्या देवदेवता....आमचे सण उत्सव...आमचे राष्ट्रपुरुष यांच्यावर खुलेआम हल्ले करतायेत......पण आमचे सत्तांना राज्यकर्ते त्यांचा बिमोड करण्याऐवजी त्यांना संरक्षण देवून सच्च्या देशभक्तांना तुरुंगात डांबत आहेत........पुन्हा एकदा हिंदुत्वाला निष्प्रभ करण्याचं पाप ते करताहेत......सारं काही संतापजनक...भयावह....आहे.म्हणून म्हणतो.... हिंदुंना संघटीत होण्याची बुध्दी द्या.....शत्रुचा नायनाट करण्यासाठी शस्त्रं द्या......
       सामाजिक चित्रही निराशाजनक आहे......वासनांध पुरूष दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूंचे लचके तोडत आहेत......हे कुकर्म करूनदेखील निर्लज्जपणे समाजात उजळमाथ्याने वावरतायत सामान्य माणूस मूक होवून हताश उसासे सोडत बसलाय..... न्यायाच्या प्रांगणात त्याच्यावर अन्यायच होतो आहे.......हीच स्थिती स्वार्थांध झालेल्या राज्यकर्त्यांची आहे......डोळे ...कान....मनाची कवाडं बंद करून .....केवळ आपल्याच आप्तांच्या तुंबड्या भरण्यासाठी हे भ्रष्ट नेते बेधुंद झाले आहेत......त्यांना आवर घालू पाहणाऱ्या सरकारी यंत्रणांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणचे धाडस हेच भ्रष्टाचारी करताहेत .........त्यात भर म्हणून आपल्या प्रभावासाठी एक दिलाने राहणाऱ्या सर्व समाजात .........जातीयतेचे विष पेरण्याचे काम काही जाणते म्हणविले जाणारे जात्यांध नेते करत आहेत.....सर्व समाज एक सूत्रात बांधण्यासाठी ........आम्हाला शक्ती द्या...हे भगवान आम्हाला शस्त्रं द्याच......
      हे परशुरामा,...पुण्यकर्मावर पापकर्माने.....सदाचारावर दुराचाराने.....सज्जनांवर दुर्जनांनी.......देशभक्तांवर देशद्रोह्यांनी..... देवांवर दैत्यांनी... अवैध मार्गाने नेहमीच आक्रमण केले आहे.....पण या मूठभर अपप्रवृत्तींवर आपल्यातल्याच ब्रह्मतेज व क्षात्रतेजाने आपले शास्त्र आणि शस्त्रं वापरून  त्यांचा समूळ नाश केला आहे.... विधायक कामं करणाऱ्यांना या भूमीत नेहमीच उपहास उपेक्षा अवहेलनांना सामोरं जावं लागलं आहे...... आपणही याला अपवाद नाहीत....हे भगवन् रचनात्मक कार्याचे प्रेरक तुम्ही आहातच.... त्याचबरोबर या भरतभूमीचे संरक्षक म्हणून आम्हा सर्वांचे उपास्य दैवत तुम्ही आहात.......
हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर ' परशुराम की प्रतिक्षा ' या खंडकाव्यात एका ठिकाणी लिहीतात
जबतक प्रसन्न यह आनंद सगुण हॅंसते है
है जहाँ खडग् ,सब पुण्य वहां बसते है ||
वीरता जहांपर नहीं पुण्य का क्षय है
वीरता जहांपर नहीं स्वार्थ की जय हैं ||
हीच प्रेरणा,हाच आत्मविश्वास,हेच वरदान या विराट परशुराम स्वरूप हिंदू समाजाला द्या हे परशुराम ... आम्हाला शास्त्र न तर द्याच पण शस्त्रं ही द्या.......
                    जय परशुराम !
                                         शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                      ९५२७१५३९२५

Sunday, May 1, 2022

महाराष्ट्राची माती

  महाराष्ट्राची माती  कणकणात वसते शक्ती || धृ ||

.

    माय भवानी आदिशक्ती मल्हारी यळकोट गर्जतो

विठुरायाचे दर्शन घेता भक्तांचाही ऊर दाटतो

 हरिनामाचा घोष निनादे चंद्रभागेच्या  काठी  || १ ||

 

    शिवरायांची गौरवगाथा पराक्रमाची स्फूर्ती देते

संतजनांची अभंगवाणी  सत्संगाची महती गाते

मायबोलीच्या मधुर स्वरांनी शब्दांतून पाझरते भक्ती || २ ||

  

   मुंबईत बहु दाटीवाटी कोकणचा तर बाज आगळा

 सह्याद्रीची सुपीक माती मराठवाडी प्रेम जिव्हाळा |

  खान्देशाची बोली रांगडी  विदर्भातली खाद्यसंस्कृती || ३ ||



महाराष्ट्रभू महान जगती  सत्पुरूषांची इथे न गणती

विज्ञानाची कास धरूनी देवू ज्ञानाची गंगोत्री

घेवू भरारी जगी नांदवू विश्वासाची नाती || ४ ||

        

                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                             ९५२७१५३९२५ 













Monday, April 25, 2022

अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यिकांचं व्यासपीठ की राजकीय कट्टा

 

   नुकतेच मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचं सूप वाजलं आणि आयोजकांनी सुटलो बुवा एकदाचे असं म्हणत समाधानाचा एक लांब सुस्कारा सोडला असेल. आयोजकांना कोणताही मोठा सोहळा सुखेनैव कोणतेही गालबोट न लागता पार पडला की समाधान वाटणारच अणि त्यात काही गैर नाही.परंतू संमेलनानंतर त्याविषयी जेव्हा त्याचं कवित्व सुरू होतं त्यात आयोजक उगाच भरडला जातो.खरंतर या चुका संमेलन अध्यक्षांपासून ते ते स्वतःला उगाचच साहित्यिक , विचारवंत मानून साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रात लुडबुड करणाऱ्यांनी केलेल्या असतात.
एक काळ असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण हे साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण मानले जाई पण दुर्दैवाने ही स्थिती आज नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझ्यासारख्या सामान्य वाचक व साहित्यप्रेमी रसिकांची तरी हीच धारणा झाली आहे.नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील काही टवाळ भाषणांमुळे तर ही धारणा अधिक दृढ झाली आहे.एकूणच झालेल्या सर्व संमेलनाचा गोषवारा वाचत असतांना या संमेलनाने समाजाला काय दिलं ?असा प्रश्न मनात उपस्थित झाला. कोणताही नविन साहित्यिक विचार नाही, साहित्यातील नविन विचार प्रवाहाची साधक बाधक चर्चा नाही, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं असं उद्बोधन नाही किंबहुना साहित्यावर चर्चा कमी अन्  देशाला राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर नेणारे कालबाह्य राजकीय विचार थोपविण्याचा प्रयत्न अनाहूतपणे आलेल्या तथाकथित पुरोगामी राजकीय विचारवंतांनी केला ही वस्तुस्थिती आहे.त्यापेक्षाही संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचीच री ओढली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.साहित्यात सर्व प्रकारचे विचार प्रवाह असणारच ते स्विकारले पाहिजेत .त्यातील प्रत्येक मुद्यावर खंडण मंडण व्हावे असा समतोल विचार संमेलन अध्यक्षांनी मांडणे अपेक्षित होते.पण सनदी अधिकारी राहिल्यामुळे त्या मानसिकतेतून एखाद्या राजकीय नेत्यांच्या जातीयवादी भाषणाची भलावण एका जेष्ठ साहित्यिकाने करावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
यावेळी मला सहजच १९७५ सारी झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाची आठवण झाली.जेष्ठ साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या . नुकतीच देशात आणीबाणी जाहीर झालेली होती . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याने संमेलन घेवूच नये अशी चर्चा सुरू झाली होती पण खूप विचारांती संमेलन ठरले . स्वागताध्यक्ष म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण होते.पण ते राजकारणा इतकेच साहित्यिक म्हणून लोकांना परिचीत होते. साहित्याच्या मंचावर साहित्याचीच चर्चा व्हावी ह्या विचारांचे ते होते.स्व .पु.ल.देशपांडे संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते.राजकारण म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याने आणीबाणीच्या निषेधाचा ठराव दुर्गाबाईंनी त्यावेळी मांडला व या ठरावाचे निवेदन सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत यशवंतराव चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या मंचावरून दिली नाही.ही त्यावेळची परिस्थिती होती.सांगायचा मुद्दा असा की संमेलनाचे अध्यक्ष राजकीय दबाव मानत नव्हते आणि राजकारणी नेत्यांनाही त्याचे वैषम्य वाटत नव्हते.आता सर्वच काही बदललंय.असो.
अद्यापही सर्व सामान्य वाचक , साहित्य रसिकांना ही संमेलने राजकीय विचारांनी मुक्त रहावीत, हिंदुत्ववादी साहित्यापासून विद्रोही साहित्य विचारप्रवाहांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,सर्व प्रकारच्या साहित्य कृतींचे स्वागत व्हावे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ निखळ साहित्याच्या चर्चेचं व्यासपीठ व्हावं .एवढेच यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                          ‌                         ९५२७१५३९२५

Tuesday, March 8, 2022

 चैतन्याचा दीप घेऊनी

 उजळलेस तू विश्व त्रिभुवनी || १||


शक्तीचे करी खड्ग घेऊनी

प्रगटलीस तू मायभवानी|| २||


मयुरासनी स्वरविणा घेऊनी

 झंकारली तू अवघी अवनी ||३||


 कधी विद्येचे वाण घेवूनी

जगताची तू ज्ञानदायिनी ||४||


अनेक स्वरूपे तुझीच मोहिनी

 विश्वाची तू तारक जननी ||५||

                      शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                        ९५२७१५३९२५




Sunday, February 27, 2022

माय मराठी महान

 माय मराठी महान अमुची माय मराठी महान ||धृ ||

सातवाहने निर्मित केली यादवकाळी विकसित झाली

संत महंते पावन केली सकला देई ज्ञान ||१||

    संस्कृत प्राकृत भाषा बोली देवनागरी लिपीत नटली

मुकुंदराज अन्  ज्ञानेशाने वाढविला सन्मान ||२||

शिवरायांच्या स्वराज्यकाळी राजदरबारी जावून बसली

मराठी झाली वैभवशाली जागविला अभिमान ||३||

 अहिराणी वा असो वऱ्हाडी कोळी कोकणी अन् भिल्लोरी

गणबोलीची रीत आगळी भाषा हीच प्रमाण ||४||

   अभंग भारूड ओवी लावणी गद्य पद्याचा साज लेवूनि

नाट्य कथांची झेप घेवूनि जगीं वाढली शान ||५||

लिहू मराठी बोलू मराठी शाळेतून ही शिकू मराठी

उद्घोष असावा एकच कंठी 'अभिजात' मिळावा मान ||६ ||

                                शशिकांत घासकडबी, नंदुरबार ९५२७१५३९२५



Friday, August 7, 2020

आत्मारामांची अमृतवाणी

 नुकताच ५ ऑगस्टला श्रीरामजन्मभूमीवर संकल्पित भव्य मंदिर उभारणीचं भूमिपूजन विधीवत व आनंदमयी वातावरणात करण्यात आलं आणि संपूर्ण भारतवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.' याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड झाला ' असा कृतार्थतेचा भाव आपल्या सर्वांच्याच मनात व चेहऱ्यावर दाटून आलेला होता.या आनंदाच्या सुवर्णक्षणांवर आपल्या अमोघ वाणीतून अक्षरशअमृताची बरसासोहळ्यातीोन महनीय व्यक्तींच्या मुखातून झालयाचे सर्वाधिक अप्रूप वाटले.अनेकांनी समाज माध्यमातून खूसकारात्मक चर्चा केली हे.या सर्व चर्चांबाबत माझ्या मनाआलेला भाव मी सर्वत्र व्यक्त केला व तो अनेकांना आवडला.तो भाव असा होता,'' काल मोदीजी बोलतच नव्हते त्यांच्यातला आत्माराम बोलत होता.ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांना 'आत्माराम '   संकल्पना लक्षात येईल. जी कठोर साधनेतून प्राप्त होते."  

        'आत्माराम'हा वेदांतपर ग्रंथ आहे; समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्रवण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नुसते श्रवण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे. 
सरसंघचालक मा.मोहनरावजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी या दोघांच्याही जीवनाकडपाहिल्यानंतर ही अनुभूती आपल्याला येते.
  प्रभु श्रीरामस्वरूप देशाला देव मानून ही भगवंताची भक्ति या दोघांनीही मनापासून केली म्हणून त्यांच्या जीवनात वेदांताचं तत्वज्ञान उतरलं.परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी परम पूजनीय श्रीगुरूजी आणि अगणित सत्पुरूषांचा सहवास त्यांना लाभला.अनेक साधूसंतांच्या सान्निध्यात देखील ते राहिले.मोदीजी काही काळ अध्यात्ममार्गात देखील होते.आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच ते राजकारणात सेवाभाव मनात ठेवून ते आले.आपापल्या सान्निध्यातील सत्पुरूषांनी दिलेल्या मार्गानुसारच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला.समर्थांच्या उक्तीनुसार या भक्तीतूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे.संघकार्य असो किंवा अध्यात्ममार्ग तिथे केवळ श्रवणभक्ती असून चालत नाही तर ज्याच्यापासून ज्ञान घेतलं तर याची सेवा घडावी लागते त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.ही जिवीत कार्यातील एकरूपता दोन्हीही व्यक्तिमत्वात आपल्याला पहायला मिळते.आत्माराम दासबोधात समर्थांनी यालाच स्व स्वरूप म्हंटलं आहे.
आत्माराम मधील केवळ दोन ओव्या या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.
   त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ म्हणजे सर्वस्वाचे समर्पण करून माझ्या बोलण्याप्रमाणे आचरण केलं तर तूला मी सत्यस्वरूपापर्यंत नेईन.हे समर्थांनी आपल्या शिष्यांना दिलेलं वचन आहे.ठीक याच प्रकारचा व्यवहार या दोन्हमान्यवरांचा असल्यानेत्यांच्या मुखातून हे अमृताचे ोल प्रगटले.
दुसऱ्या एका ओवीत समर्थ म्हणतात,
बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते॥अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥
शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे ,परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात आपल्या अनुभवाला येऊ लागतो आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच सत्यस्वरूप असतं.या सत्यस्वरूपाचं दर्शन या दोन्ही भाषणातून आपल्या अनुभवाला आलं म्हणून ही 'आत्मारामांची अमृतवाणी 'असल्याचे आपण अनुभवले.
पूजनीय सरसंघचालक यांनी या प्रसंगी केलेलं भाषण यादृष्टीने महत्त्वाचं आहे.ते म्हणतात की,
" आज संपूर्ण देशात एक आनंदाची लाट आली आहे.। शतकानुशतकाची इच्छा आज पूर्ण होतेय.परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठा आनंद भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ज्या आत्मविश्र्वासाची आवश्यकता होती आणि जेआत्मभान  आवश्यक होतं ते सगुण-साकार रूपात प्रस्थापित होण्याचा हा शुभारंभ आज आहे. हे अधिष्ठान है आध्यामिक दृष्टिचं आहे.
' सिया राममय सब जग जानी 'सर्व  जगाला आपल्यात पाहण्याची आणि  आपल्यात संपूर्ण जग पाहण्याची ही भारतीय दृष्टि आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक व्यक्तिचा व्यवहार आजसुद्धा जगात सर्वाधिक सौजन्याचा व्यवहार असतो.आणि आमच्या  देशाचा  सामूहिक व्यवहार सर्वांसोबत ' वसुधैव कुटुम्बकम ' चा असतो. परमवैभव संपन्न  आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा  भारत त्याच्या निर्माणाचा हा  शुभारंभ आहे.
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः'
जीवन जगायचं कसं? याची दृष्टी आमच्याजवळ आहे. कोरोनाच्या स्थितीत  संपूर्ण  जग अंर्तमुख झालंय.त्यांना चिंता आहे  कुठे चुकलं याची.यातून मार्ग  कसा काढायचा याची. तो आमच्याजवळ आहे. तो मार्ग दाखवण्याचं  काम आम्हाला करायचंय. त्याची तैयारी करण्याचा संकल्प आज होतोय.
  अशा प्रकारचा विश्वास, प्ररेणा, स्फुरण आज आम्हाला मिळतंय   कारण 'राम सर्वांचे आहेत आणि सर्वांमध्ये राम आहेत. " ही अनुभूती सरसंघचालकांना मिळाली ती त्यांच्या वाणीतून त्यांनी प्रगट केली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सुध्दा तेवढ्याच तोलामोलाचं होतं.ते म्हणाले की,
" आज पूर्ण भारत राममय झाला आहे. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत  तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे . कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
  हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे 
जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत
भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत . देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे. राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पणही होते आणि तर्पणही  होते, संघर्षही होता आणि संकल्पही होता. ही अनुभूती पंतप्रधान मोदींना आली तीच त्यांनी प्रांजळपणे मांडली.
देशाच्या संस्कृतीविषयी,सभ्यतेविषयी गर्वाने बोलणारा पंतप्रधान यानिमित्ताने सर्वांनी पाहिला.हे त्यांचे सहजोद्गार होते जे सत्यस्वरूपाची अनुभूती घेतल्याशिवाय मुखातून बाहेर पडत नाहीत.म्हणूनच अयोध्येत झालेली दोन्ही भाषणे ही आत्मारामांची अमृतवाणीच होती.असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.



Saturday, August 1, 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक


वाचकहो, 
मन:पूर्वक नमस्कार!
   लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पैलूचे अध्ययन करून मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतांना विलक्षण त्रेधा उडाली कारण लोकमान्य टिळकांचा एक पैलू उलगडायचे म्हटले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील असंख्य अगणित आयाम कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलू लागतात त्यातून नेमकं काय मांडता येईल यासाठी ही त्रेधातिरपीट होत होती. परंतु आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही मालिका पूर्ण झाली.आपल्या सूचनांचे स्वागत करून आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
     विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन ।
     स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।। 
 या श्लोकात जे म्हटलंय यांची तंतोतंत अनुभूती हे लिखाण करतांना आली. राजा आणि विद्वान यांची खरोखर तुलना होवू शकत नाही.कारण राजाचा सन्मान त्याच्या राज्यात होतो पण विद्वान लोक सर्व स्थळी पूजनीय असतात.अष्टपैलू, अष्टावधानी हे शब्द लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना अपुरे पडतात.टिळक हे लोकमान्य,लोकोत्तर युगपुरुष ठरले यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं व्यक्तित्व,कर्तृत्व व दातृत्व बहुआयामी अशा स्वरूपाचं होतं.लोकजागृती, लोकसंग्रह,लोकसंघटन,,या त्रिसूत्रीच्या आधारावर ते लोकमान्य ठरले.
१८८० ते १९२० असा तब्बल ४० वर्षाचा काळ त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यतित केला.त्यात त्यांनी केलेल्या बहुविध कामांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची साक्ष मिळते.एक हुशार  व विद्यार्थी प्रिय शिक्षक ते लोकमान्य नेता म्हणून त्यांचा झालेला प्रवास जगातील विचारवंतांना देखील अचंबित करणारा होता.सव्यसाची शिक्षक,संस्थाचालक, झुंजार पत्रकार, व्यासंगी संशोधक,निस्पृह देशभक्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,परखड देशभक्त, अर्थशास्त्रज्ञ,अभ्यासपूर्ण लेखन, धर्माभिमानी, संस्कृती रक्षक,राष्ट्रहित जोपासणारा धुरंधर राजकारणी,वेदान्तापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर भाष्य करण्याची जाण असणारा विश्लेषक, कलेची आवड असणारा रसिक अशी अगणित रूपं लोकमान्यांच्या जीवनात ठळकपणे समोर येतात.म्हणूनच टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे अनुभवाला येते.त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी देशविदेशातील अनेक विचारवंतांनी विस्तृतपणे विश्लेषण केले आहे.एवढच नाही तर अनेक कवींनी त्यांच्यावर कवने, पोवाडे,आरती,अष्टके संस्कृत श्लोक आदि विविध प्रकारे रचना केल्या आहेत.आपापल्या परीने लोकमान्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील कवी गोविंद यांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केलेली रचना मनाला विशेष स्पर्श करून जाते.
आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद
या कवितेतून लोकमान्यांच्या कांहीं पैलूंवर ते नक्कीच प्रकाश टाकतात. लिहीण्यासारखे खूप आहे.त्यांच्या पावन स्मृती जागवणे आजच्या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकमान्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज लेखणीला विराम देतो!!!!! धन्यवाद 🙏
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...