Tuesday, December 27, 2022

पत्र लिही पण.........

 

पत्र लिही पण.........
परवाच पोस्टमनने आडनांवाचा पुकारा केला.तेंव्हा नेहमीप्रमाणेच एखादा लिफाफा अथवा रजिस्टर असावे म्हणून बाहेर डोकावून पाहिले आणि त्याने चक्क एक पोस्टकार्ड हातात दिलं.ते पाहून मी क्षणभर अचंबित झालो.कारण आजकाल पोस्टकार्ड येणं तसं दुर्मिळच नाही का ?
  ते पत्र म्हणजेच पोस्टकार्ड आमच्या चिरंजीवानेच लिहीलेले होतं.तो योगायोगाने इथंच आलेला होता म्हणून त्याला आश्चर्यकारक चेहऱ्यानेच विचारलं पोस्टकार्ड लिहिलंस?कसं काय? तो म्हणाला कांही नाही सहजच आठवण आली म्हणून.मला खूप खूप आनंद झाला.
तंत्रज्ञानाच्या या युगात तसे आपण सर्वच टेक्नोसॅवी झालेलो आहोत प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपण आपल्या मुलाबाळांचे घेत असतो .अशा काळात पोस्टकार्डचा उपयोग तसा मर्यादितच राहणार नाही का? अशा काळात मुलाने सहज आठवण आली म्हणून लिहीलेलं हे पत्र खूप सुखावून गेलं.
भारतात १८७९ मध्ये म्हणजे १४३ वर्षांपूर्वी केवळ ३ पैशात सुरू झालेली ही टपाल सेवा अद्यापही  आपलं स्थान टिकवून आहे.आता फक्त १ रूपया त्याची किंमत आहे.पण आजही लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात हे महत्त्वाचे आहे.
अगणित संस्था,संघटना कार्यालयं, कुटुंब यांच्या व्यक्तिगत संपर्काचं माध्यम म्हणजे हे पोस्टकार्ड . दिवाळी किंवा अन्य सणांच्या शुभेच्छा असो किंवा एखादी शुभ अथवा दु:खद वार्ता ती संक्षिप्त मजकूरात कळवण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड.आपल्या घरापासून दूर असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळवण्याचं किंवा विचारण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड. मला आठवतंय , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक यांचा संपर्क देशभरात लाखो सर्वसामान्य स्वयंसेवकांशी केवळ पोस्टकार्डवर लिहीलेल्या पत्राद्वारे होत होता. आजतागायत अगणित प्रचारक ही प्रथा पाळत आहेत. अभाविपचं काम करत असतानाची ही गोष्ट आहे.अमळनेरात जळगांव जिल्ह्याच्या एका वर्गाच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती जिल्हा प्रमुखांशी रोज संपर्क ठेवणं आवश्यक होतं तेव्हा टेलिफोनदेखील फारसे नव्हते.मी रोज एक पत्र लिहून १५ दिवस संपर्क ठेवला तितक्याच तत्परतेने मलाही तिकडून उत्तरं मिळाली.अर्थात त्यावेळी टपाल खातेही खूप तत्पर होते हा भाग वेगळा.एकूण काय तर पोस्टकार्डमुळे किती तरी लोकांशी सहज संवाद होत असे.
मित्रहो, मनातल्या भावना जितक्या उत्कटतेने आपण पत्रातून व्यक्त करू शकतो ना तितकं फोनवरचा संवाद, मेसेजेस म्हणून आपण नाही व्यक्त करू शकत.अशावेळी काय हरकत आहे पोस्टकार्डचा वापर करायला?
कवयित्री इंदिरा संत यांची एक कविता आहे पत्र लिही पण.......त्याचा संदर्भ वेगळा आहे.पण त्यातले हे पहिले तीन शब्द महत्वाचे आहेत.पत्र लिही पण ..... पोस्टकार्डवर....
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
9527153925

Sunday, May 29, 2022

स्वातंत्र्य लक्ष्मीचा योद्धा उपासक: वीर सावरकर

 


उपासनां नाम यथाशास्त्रं उपास्यस्यार्थस्य
विषयी करणें न समीप्य मुषगम्य||
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेन दीर्घकालं
यदासनं तदुपासन याच क्षतेड्ख||
      शांकरभाष्यातील या श्लोकात शंकराचार्यांनी सांगितलेली उपासनेची व्याख्या खूप वेगळी आहे. ' उपासना ' हा शब्द तसा सर्वत्र रूढ आहे. आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थही लावले जातात. परंतु कुठल्याही कर्मकांडाला थारा न देता "तेलाची धार ज्याप्रमाणे खंडीत न होता एकसारखी प्रवाहित राहते त्याप्रमाणे कोणत्याही उपासकाने आपल्या उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता आपल्या चिंतनाने प्रवाहवत्  राहून एकाग्र होणे , त्यासाठी कठोर परिश्रम करणे म्हणजे उपासना. अशा प्रकारची उपासना जो करतो तो योध्दा उपासक म्हंटला जातो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर या श्लोकाची अनुभूती त्यांच्या प्रत्येक कार्यात येते.
          आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे अनुसरण करून त्यांनी एका साधकाप्रमाणेच स्वातंत्र्य लक्ष्मीची कठोर उपासना केली. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येवून सुध्दा क्षणभरही विचलित न होता वयाच्या सोळाव्या वर्षापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत सदुसष्ट वर्ष स्वातंत्र्यवीर अविरत संघर्ष करीत होते. त्यांच्या या उपासनेचे खरं म्हणजे बहुविध आयाम आहेत. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपल्या या कठोर उपासनेचीच छाप त्यांनी उमटवली. म्हणूनच ' योध्दा उपासक ' हे बिरूद त्यांना तंतोतंत लागू पडते.
          वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या भगूर या गावी घरात असलेली अष्टभुजा दुर्गा भवानीची मुर्ती पाहून विनायकरावांना त्या मुर्तीतच  स्वातंत्र्य लक्ष्मीचा साक्षात्कार झाला आणि सहजपणे त्यांच्या मुखातून ' स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ' असा उद्घोष निघाला. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर ते वृत्त समजताच विनायकराव संतप्त झाले. आपली कुलदेवता जिला स्वातंत्र्य लक्ष्मी म्हणून त्यांनी संबोधले तिच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की " देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" , केवढी अवघड प्रतिज्ञा केली होती. पण देश , काल , परिस्थितीशी झुंज देत तब्बल ६७ वर्ष ते या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहिले, तद्रूप झाले. केवढी ही कठोर उपासना? उपासनेसाठी आवश्यक असलेला गुण 'निग्रह ' याठिकाणी अनुभवाला येतो. ही मनस्थिती इतक्या सहजपणे त्यांना प्राप्त झालेली नव्हती. त्याच्या शुध्द बीजाचे रोपण त्यांच्या बालपणीच्या संस्कारात झालेले होते. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांत तात्यारावांचा जन्म झाला हा एक विलक्षण योगायोग होता. घरात असलेल्या आठही हातात शस्त्र बाळगणाऱ्या दुर्गा मातेची पूजा करण्याचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले. आईच्या मृत्यूनंतर थोरल्या वहिनी येसूबाई यांच्या सहवासात त्यांच्यावर वाचन व काव्य निर्मितीचा संस्कार घेत त्यांचे बालपण विकसित होत गेले. वेदशास्त्र अध्यनाची परंपरा असलेल्या कुटुंबात सावरकर घडले. त्यांच्या कुटुंबियांना पेशव्यांकडून वर्षासन मिळत असे तो इंग्रजांनी बंद केला यामुळे विनायकरावांच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षी रामायण, महाभारत, दासबोध भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, वेद उपनिषदे आदी विविध धर्मग्रंथाचे वाचन त्यांनी केले.  वयाच्या तेराव्या वर्षी ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' त्यांनी लिहिले.
         त्यात "तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
          तुज सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे".
हा उत्कट समर्पण भाव त्यांच्या या उपासनेत होता असे लक्षात येते. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी देशबांधवांना उद्देशून '  स्वदेशी फटका ' हे दीर्घ काव्य लिहून भारत मातेवरील अपरंपार श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. याच कवितेत शेवटी ते म्हणतात,
          कवितारूपी  माला अर्पी ,आर्य बुधाला सार्थक हो
           भक्ताकरवी मन देवासी, सेवा यासी अर्पण हो.
आपल्या मनातला उत्कट सेवा भाव ते यातून प्रकट करतात.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे वडील दामोदरराव सावरकर यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला.त्याकाळात इंग्रजांकडून भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून ते अस्वस्थ होत होते.वयाच्या २० व्या वर्षी ते विवाहबद्ध झाले खरे पण त्यांच्या पत्नी सौ यमुनाबाई यांना त्यावेळी स्वातंत्र्यदेवतेचा हा उपासक इतके कठोर तपाचरण करेल याची कल्पनाही त्या माऊलीला नसावी.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात तर तात्यारावांचा प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांशी संपर्क आला . टिळकांच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.पुण्यातल्या सर्व तरूणांमध्ये स्वदेशीची ज्योत प्रज्वलित करण्यात ते अग्रभागी होते.वयाच्या २४ व्या वर्षी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात पहिली आहुती त्यांनी दिली.त्याचे परिणाम त्यांना ठळकपणे माहीत होते.फर्ग्युसन महाविद्यालयांतील अनेक मवाळ नेते व प्राध्यापकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली .त्यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले.पण लोकमान्य टिळकांनी ' हे कसले आमचे गुरू ' असा जळजळीत अग्रलेख लिहून सावरकरांच्या भूमिकेचे समर्थन केले.भारतमातेच्या उपासनेतलं हे  पहिलं कठोर आचरण होतं.
लोकमान्यांनी सावरकरांची तल्लख बुद्धीमत्ता, तर्कशुद्ध विचार व जीवितकार्यावरील अढळ श्रद्धा हे गुण हेरून त्यांना लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती देवून वकीलीच्या शिक्षणासाठी पाठवले.वकीलीचे शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य चळवळीशी तद्रूप झालेल्या विनायकरावांनी प्रखर देशभक्तीपर लिखाणाला सुरुवात केली व तिथल्या तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.१८५७ चे बंड हे स्वातंत्र्य समर होते असा शब्दप्रयोग करून त्यांनी तो ग्रंथ लिहिला व गुप्तपणे त्यांचे प्रकाशन हाॅलंडमध्ये केले.फ्रान्समध्ये हा ग्रंथ वाटण्यात आला. त्यांच्या या उपासनामार्गातील दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येते.अनेक तरूणांमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल या ग्रंथामुळे धगधगू लागली.
मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध करून याचे प्रत्यंतर दिले.स्वाभाविकपणे यांचा ठपका विनायकरावांवर ठेवण्यात आला त्यांना एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा मिळालेले सावरकर जगातील एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते.शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी लंडनमधूनच आपल्या मातेसमान वहिनीला दीर्घ पत्रकाव्य लिहीले.त्यातील प्रत्येक शब्दांतून त्यांची संन्यस्त वृत्ती प्रकट होते.
      अनेक फुले फुलती,फुलोनीया सुकोनी जाती
      परंतु त्याची महती गणती कोणी ठेविली असे
याच काव्याच्या शेवटी ते म्हणतात
अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता
दिगंती पसरे सुगंधता,लोकहित परिमलाची
एकीकडे आपल्या सार्थकता कशात आहे हे सांगताना सर्वस्व समर्पणाच्या सुगंधाची महती ही ते विशद करतात.
जन्मठेप झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर त्यांच्या पत्नी सौ भाई सावरकरांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. या भेटीत दोघांनाही आपले अश्रू अनावर झाले.पण क्षणभरात खंबीर होवून विनायकराव म्हणतात," ईश्वराची द्या असेल तर पुन्हा भेट होईल .माई  , काड्या काटक्या एकत्र करून घरटं बांधून त्यात अंडी उबवायची,पिल्लं वाढवायची असा संसार तर कावळे चिमण्याही करतात आम्हाला देशाचा संसार करता आला यातच धन्यता माना." केवढी ही निरीच्छवृत्ती? मोह ,माया सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ देशाचाच विचार त्या परिस्थीतीतही त्यांनी केला.
   वयाच्या ३१ व्या वर्षी जन्मठेप झाली . लंडनवरून भारतात आणण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला. बोटीवरून अथांग सागर पाहताना मातृभूमीच्या भेटीची  अनिवार ओढ त्यांना लागली डोळे पाणावले अन् धीर गंभीर आवाजात मुखातून उत्कट मातृभक्ती प्रगटली ' सागरा प्राण तळमळला ' त्यानंतर मार्सेलिस बंदरात त्यांनी घेतलेली उडी याच उत्कट देशभक्तीची अत्युच्च अभिव्यक्ती हौती.
      अंदमानच्या कालकोठडीत तब्बल ११ वर्ष त्यांनी मरण यातनाच भोगल्या पण त्याही स्थितीत तसुभरही न ढळता खंबीरपणे आपली लेखनसाधना त्यांनी अविरतपणे सुरू ठेवली.यावरून उपासना मार्गात आवश्यक असलेला संयम त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेला होता याची प्रचिती आल्यावाचून रहात नाही.शारीरिक , मानसिक, कौटुंबिक आघात एकाचवेळी होत असताना देखील आपला निग्रह त्यांनी सोडला नाही.वयाच्या चाळीशी नंतर जनमतांचा रेटा वाढल्याने सावरकरांची जन्मठेप संपली पण त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले.आयुष्यभर स्वातंत्र्यवीरांनी  स्वातंत्र्य चळवळ,प्रखर हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली पण रत्नागिरीच्या वास्तव्यात राजकारणावर बोलण्यास लिहीण्यास बंदी असल्याने विनायकरावांनी समाजकारण सुरू करून जाती निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, भाषाशुद्धी,परधर्मात गेलेल्या हिंदूबांधवांचे शुध्दीकरण, समरसता आदि विषय हातात घेवुन विपुल लेखन व उपक्रम केले.त्यावेळी अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी त्यांना विरोध केला.
स्वातंत्र्योत्तर काळात देखील गांधीहत्येचे पातक त्यांच्या माथी थोपवून त्यांना अटक करण्याचे हीन कृत्य त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले.त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.वयाच्या ८३ व्या वर्षी तात्यारावांनी आपल्या सर्व कार्यांना पूर्णविराम दिला.आणि शेवटी '  मृत्यो ये ' अशी साद घालत कोणताही गंभीर आजार नसतांना प्रायोपवेशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
स्वातंत्र्य लक्ष्मीच्या या  ' योध्दा उपासकाला ' कोटी कोटी प्रणाम!!
                                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                   ९५२७१५३९२५




Wednesday, May 18, 2022

राजकारण्यांनो लगाम घाला

 


     कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
         इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम्।।
परवा सहजच महाभारतातील शांतीपर्वातला एक श्लोक डोळ्यासमोर आला आणि लगेचच महाराष्ट्रातील सद्यस्थिती संदर्भांत कांही विचारचक्र मनात घोळू लागले.खरं म्हणजे पितामह भीष्मांनी युधिष्ठीराला उद्देशून केलेलं हे मार्गदर्शन आहे.जवळपास २० श्लोकातून राजधर्म,प्रजातंत्र आणि अनुशासन यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन पितामह भीष्म यांनी शासकांना केलं आहे.काळ राजाला बनवतो की राजा काळ बनविण्यासाठी कारणीभूत असतो ?या संभ्रमात युधिष्ठीर असतांना भीष्मांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की ' राजाच काळाला कारणीभूत असतो.' सध्या महाराष्ट्रात राजकारणाची जी भीषण परिस्थिती आपण अनुभवतो आहोत हा अत्यंत कठीण काळ आहे.त्याला जबाबदार या राज्यातले सर्व राजकारणी जबाबदार आहेत.यात डावे उजवे करण्याची सध्यातरी गरज नाही.सत्ताधारी असो वा विरोधक हे सर्व एकार्थाने राजेच आहेत . आपापल्या भागाचे प्रमुख म्हणूनच ते वावरत असतात.पण ते आपल्या भागाच्या सर्वसामान्य जनतेचे राजे म्हणून न वागता आपल्या मनाचे राजे म्हणून वागतांना दिसतात . म्हणूनच उद्वेगाने असे म्हणावेसे वाटते की राजकारण्यांनो लगाम घाला आपल्या मनाला अन् तोंडाला.
       एक व्यक्ती म्हणून जेव्हा जेव्हा आपण अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहतो तेव्हा ' आम्हां काय त्याचे ' असे  वाटून घेऊन थेट ' जे जे होईल ते ते पहावे ' अशी सोयीस्कर भूमिका स्वीकारून गप्प बसतो.त्याचेच परिणाम सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिक भोगतोय हो भोगतोच आहे. गेले काही महिने आपल्यापैकी जे जे संवेदनशील आहेत  आणि  देश देव धर्म आणि समाज यांच्या हिताचं कांहीं घडावं असं ज्यांना मनापासून वाटतंय ते ते सर्व सामान्य नागरिक आज अस्वस्थ आहेत.या अस्वस्थ झालेल्या लोकांनीच राजकारणाच्या सुंदोपसुंदीत कुणा एकाची बाजू न घेता सर्व राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकांना खडसावून विचारण्याची गरज आहे की तुम्ही गप्प राहून केवळ लोकहिताच्या कामांवर कधी लक्ष देणार? तुमच्याकडे असलेलं पद,प्रतिष्ठा,पैसा ही काही तुमची जहागीर नाही ती केवळ आम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे तुम्हाला मिळालेली विश्वस्ताची जबाबदारी आहे याचं भान ठेवा . देशहित , लोककल्याण यांच्या थापा न मारता कामाला लागा आधी जीभेला लगाम घाला.
  माझ्यासारखा सामान्य नागरिक जेंव्हा आपल्या सकाळची सुरुवात चांगली व्हावी म्हणून वृत्तपत्र हातात घेतो किंवा घरात असेल तर दूरदर्शन लावतो एवढंच नाही तर आता आम्ही भौतिक दृष्ट्या खूप प्रगत असल्याने दुनिया मुठ्ठी में घेवूनच फिरत असतो म्हणून आमचा हातातला भ्रमणध्वनी उघडतो आणि.......निराशा , उद्वेगाने तो बंद करून टाकतो.तेच ते चेहरे,तेच ते आरोप प्रत्यारोप,तेच ते खुलासे,त्याच त्या सभा भाषणं,नकला आणि अत्यंत बेजबाबदारपणे केली जाणारी विधानं , शाब्दिक कोट्या वैताग आलाय नुसता....राजकारण्यानो कोण आहात तुम्ही ? नकलाकार.. विडंबनकार...नाचे, सोंगाडे... कोर्टात युक्तिवाद करणारे वकील..की सर्कशीत ले प्राणी...???? काय चाललंय तुमचं...??? जनांची नाही तर मनाची तरी बाळगा असं म्हटलं जातं तुम्ही दोन्ही विकून खाल्लंय...लाज वाटतेय तुम्हाला नेते म्हणण्याची जरा भानावर या तोंडाला व मनाला लगाम घाला.
   कुणी चुकीचं वागला तरी जा कोर्टात... चुकीचं बोलला की जा कोर्टात... चुकीचं लिहीलं म्हणून जा कोर्टात.... सुरक्षायंत्रणेला तुम्ही तुमचं बटीक केलं आहेच आता न्यायव्यवस्था ही तुमची बटीक मानायला लागलात काय ?..... न्यायव्यवस्था ही तुमची वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय न्यायनिवाडे करत बसली तर सामान्य लोकांचे हजारो प्रलंबित खटले चालवून न्यायनिवाडा कसा करणार?.... वैयक्तिक निवाड्यांसाठी जातीनिहाय, गावनिहाय न्याय पंचायती आहेत ना? कौटुंबिक निवाडे कुटुंबातील वडीलधारी मंडळी सोडवतात ना ? राजकीय खटल्यासाठी पक्षप्रमुखाकडे आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी क्षमता आहे का?...कसे असणार सगळेच पक्षप्रमुख बेजबाबदार,बेताल विधानांचे मेरूमणी झाले आहेत तिथे कोण आवर घालणार???.....
     सत्ता मिळवण्यासाठी पैसा.. पैशासाठी सरकारी योजनांत भ्रष्टाचार.. भ्रष्ट्राचार दडपण्यासाठी नोकरशाहीवर दबाव... याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना धाकदपटशा पोलीसीखाक्या.....मी आणि माझ्याच घराण्याची सत्ता कायम रहावी यासाठी जातीयता,धर्मांधता आदिंचा वापर हे सर्व कोण करतंय सामान्य जनता की तुम्ही?????..... लोकांच्या धार्मिक आस्थांना शिव्याशाप देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे दिवस आता संपले हे लक्षात घ्या. मिडीयाला विकत घेऊन प्रपोगंडा केला की कदाचित एखादी निवडणूक तुम्ही जिंकत असाल पण लोकांचा विश्वास तुम्ही सर्वांनीच गमावला आहे.तसाच तो या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या मिडीयाने पण गमावला आहे. तुम्ही सर्व जण हे विसरता आहात की,
               प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।
प्रजेच्या सुखात राजाचं सुख असतं आणि प्रजेच्या हितासाठीच तो राजा असतो.आजच्या नवमतदार असलेल्या युवा पिढीला हे चांगलं माहिती आहे.त्यामुळे वेळीच स्वतःला आवरा .....मनाला, तोंडाला,स्वार्थाला,लगाम घाला.. अन्यथा येणारा युवा मतदार तुम्हाला माफ करणार नाही.
                                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                         ९८२७१५३९२५

Tuesday, May 3, 2022

परशुरामा अस्त्रं द्या

 अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:|

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ||

मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केलेले भगवान परशुराम......... एकाच वेळी ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची अनुभूती देणारी आपली प्रतिमा....मनाला एक विश्वास देते .......
भगवान विष्णूंचा सहावा अवतार घेवून आपण या भूतलावर प्रगटलात...... कां ? तर या पृथ्वीतलावर असलेल्या......... तपोभूमीवर.....कर्मभूमीवर....पुण्यभूमीवर...... कुणी धर्मकार्यात...राष्ट्रकार्यात......लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या...कर्मयोग्यांच्या कार्यात अडथळे आणणाऱ्या..... विद्रोही शक्तिंचा .....आपल्या शापवाणीने ....... वेळ आलीच तर....शस्त्रास्त्रांनी विनाश करण्यासाठीच हा अवतार नव्हे तर अधिकार आपल्याला मिळाला.......  आणि हो ....चिरंजीवीतेचं अनोखं वरदानही तुम्हाला प्राप्त आहे........होय आजही आपण या पृथ्वीतलावर कुठंतरी आहात ही आमची श्रद्धा आहे........ सद्य:स्थितीत......
या पुण्यभूमीत.......सत्तांध......धर्मांध.......वासनांध ......‌‌ स्वार्थांध....ल़ोकांचा...नव्हे...नव्हे ....दैत्यांचा अक्षरशः....हैदोस चाललाय् ....... तो आपल्या कुशाग्र दृष्टीने आपण पहात असालच.....या दुष्कर्मांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेला हा......हा समाजपुरूष आक्रोश करतोय......याचना करतोय.... आणि विमनस्क स्थितीत ....साकडं घालतोय..... परशुरामा.......
आता अस्त्रं द्या.... फक्त एकदा शस्त्रें द्या.........
नि:पात ...करू देत आम्हाला.....या दुष्टप्रवृत्तींना नष्ट करू द्या आम्हाला त्यांचे रक्तांने.....घाणीने .....पापकर्मांनी बरबटलेले हात..... यासाठीच आम्हाला आता शस्त्रं हवे.....परशुरामाच्या हवे...........
       भृगुवंशीय ऋषी जमदग्नींचे तुम्ही पुत्रं........कठोर तपश्चर्येमुळे पुराणातील सप्तर्षी मध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं........ अन्याय.... अत्याचार.... दुराचाराच्या...विरोधात पेटून उठणारे आपले पिताश्री जमदग्नीं........ आपल्या सदाचारी व पतिव्रता असलेली पत्नी रेणुकेला......गंधर्व क्रीडा पाहण्याच्या मोहात दुष्कर्म केलं म्हणून हत्या करण्याची आज्ञा त्यांनी केली.....पित्याची आज्ञा पाळण्याच्या कर्तव्यबुध्दीने ..... तुम्ही आपल्या मातेची हत्या केलीत....पण त्याचवेळी पित्याकडून वरदान मागून आपण मातेला व भावंडांना जीवदान दिले......नि:सीम मातृभक्तीचा हा आदर्श ही तुम्ही दिलात.....आपली माता आदिशक्ती रेणुका .....कठोर पतिव्रता..... तेवढीच थोर तपस्विनी..... कर्तव्यदक्ष माता .......आपले पती जमदग्नी यांच्याकडे कामधेनूची मागणी करणाऱ्या लोभी सहस्त्रार्जुनाने ती दिली नाही म्हणून त्यांची हत्या केल्यानंतर.....माता रेणुका यांनी माझा पुत्र २१ वेळा आपल्या क्षत्रिय कुळाचा वध करेल ....अशी शापवाणी केली .एवढंच नाही तर...दु:खाने शक्तीहीन  झालेल्या तुम्हाला श्री दत्तात्रेय चरणी अर्पण करून......पुन्हा एकदा बलशाली केले... अन् मातृवचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही पृथ्वी दुराचारी क्षत्रियहीन केली.........ही कर्तव्यकठोरता......ही मातृभक्ती आमचा आदर्श आहेच पण.......या तपोभूमीवरील दुराचाराचा.. नायनाट करण्यासाठी.... फक्त एकदाच...हे क्षात्रतेज आम्हाला द्या...परशुरामा अस्त्रं द्या........
   उत्पत्ती... स्थिती...... लय ...... यांचं प्रतिक.... ब्रह्मा, विष्णू,महेश आहेत......स्थिती प्रदान करणाऱ्या भगवान विष्णूंचे तुम्ही अवतार....विधायक,रचनात्मक कार्याचा आदर्श तुम्ही निर्माण केलात...लयकर्ता भगवान शंकरांनी तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दुराचारी क्षत्रियांचा विनाश करून ....लोककल्याण करण्यासाठी तुम्हाला अस्त्रं दिले तेच परशुरामास्त्र.........आपण नेहमीच विधायक.... रचनात्मक कार्यातून या सृष्टीला स्थिरता प्रदान केली त्याचबरोबर.. विधायक कामात अडथळा आणणाऱ्या विघातक शक्तिंचा आपण बिमोड केलात....... आताही हीच वेळ आली आहे..... म्हणून म्हणतोय आता शस्त्रं द्या.....
          चिरंजीव परशुरामा ..बघताय ना आपण....सध्या सर्वत्र... जगातल्या धर्मांध शक्ती आणि त्यांना बळ देणारे सत्तापिपासू बेगडी धर्मनिरपेक्षता वादी....‌सत्तेपायी हिंदुत्वाला तिलांजली देवून आपल्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा ओढणारे सत्तापिपासू राजकारणी.....या भूमीतील मूळ असलेल्या हिंदुत्वालाच उखडून टाकण्याचे आव्हान आपल्या वागण्यातून .... बोलण्यातून रोज देत आहेत.....आमची श्रध्दास्थाने...आमच्या देवदेवता....आमचे सण उत्सव...आमचे राष्ट्रपुरुष यांच्यावर खुलेआम हल्ले करतायेत......पण आमचे सत्तांना राज्यकर्ते त्यांचा बिमोड करण्याऐवजी त्यांना संरक्षण देवून सच्च्या देशभक्तांना तुरुंगात डांबत आहेत........पुन्हा एकदा हिंदुत्वाला निष्प्रभ करण्याचं पाप ते करताहेत......सारं काही संतापजनक...भयावह....आहे.म्हणून म्हणतो.... हिंदुंना संघटीत होण्याची बुध्दी द्या.....शत्रुचा नायनाट करण्यासाठी शस्त्रं द्या......
       सामाजिक चित्रही निराशाजनक आहे......वासनांध पुरूष दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूंचे लचके तोडत आहेत......हे कुकर्म करूनदेखील निर्लज्जपणे समाजात उजळमाथ्याने वावरतायत सामान्य माणूस मूक होवून हताश उसासे सोडत बसलाय..... न्यायाच्या प्रांगणात त्याच्यावर अन्यायच होतो आहे.......हीच स्थिती स्वार्थांध झालेल्या राज्यकर्त्यांची आहे......डोळे ...कान....मनाची कवाडं बंद करून .....केवळ आपल्याच आप्तांच्या तुंबड्या भरण्यासाठी हे भ्रष्ट नेते बेधुंद झाले आहेत......त्यांना आवर घालू पाहणाऱ्या सरकारी यंत्रणांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणचे धाडस हेच भ्रष्टाचारी करताहेत .........त्यात भर म्हणून आपल्या प्रभावासाठी एक दिलाने राहणाऱ्या सर्व समाजात .........जातीयतेचे विष पेरण्याचे काम काही जाणते म्हणविले जाणारे जात्यांध नेते करत आहेत.....सर्व समाज एक सूत्रात बांधण्यासाठी ........आम्हाला शक्ती द्या...हे भगवान आम्हाला शस्त्रं द्याच......
      हे परशुरामा,...पुण्यकर्मावर पापकर्माने.....सदाचारावर दुराचाराने.....सज्जनांवर दुर्जनांनी.......देशभक्तांवर देशद्रोह्यांनी..... देवांवर दैत्यांनी... अवैध मार्गाने नेहमीच आक्रमण केले आहे.....पण या मूठभर अपप्रवृत्तींवर आपल्यातल्याच ब्रह्मतेज व क्षात्रतेजाने आपले शास्त्र आणि शस्त्रं वापरून  त्यांचा समूळ नाश केला आहे.... विधायक कामं करणाऱ्यांना या भूमीत नेहमीच उपहास उपेक्षा अवहेलनांना सामोरं जावं लागलं आहे...... आपणही याला अपवाद नाहीत....हे भगवन् रचनात्मक कार्याचे प्रेरक तुम्ही आहातच.... त्याचबरोबर या भरतभूमीचे संरक्षक म्हणून आम्हा सर्वांचे उपास्य दैवत तुम्ही आहात.......
हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर ' परशुराम की प्रतिक्षा ' या खंडकाव्यात एका ठिकाणी लिहीतात
जबतक प्रसन्न यह आनंद सगुण हॅंसते है
है जहाँ खडग् ,सब पुण्य वहां बसते है ||
वीरता जहांपर नहीं पुण्य का क्षय है
वीरता जहांपर नहीं स्वार्थ की जय हैं ||
हीच प्रेरणा,हाच आत्मविश्वास,हेच वरदान या विराट परशुराम स्वरूप हिंदू समाजाला द्या हे परशुराम ... आम्हाला शास्त्र न तर द्याच पण शस्त्रं ही द्या.......
                    जय परशुराम !
                                         शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                      ९५२७१५३९२५

Sunday, May 1, 2022

महाराष्ट्राची माती

  महाराष्ट्राची माती  कणकणात वसते शक्ती || धृ ||

.

    माय भवानी आदिशक्ती मल्हारी यळकोट गर्जतो

विठुरायाचे दर्शन घेता भक्तांचाही ऊर दाटतो

 हरिनामाचा घोष निनादे चंद्रभागेच्या  काठी  || १ ||

 

    शिवरायांची गौरवगाथा पराक्रमाची स्फूर्ती देते

संतजनांची अभंगवाणी  सत्संगाची महती गाते

मायबोलीच्या मधुर स्वरांनी शब्दांतून पाझरते भक्ती || २ ||

  

   मुंबईत बहु दाटीवाटी कोकणचा तर बाज आगळा

 सह्याद्रीची सुपीक माती मराठवाडी प्रेम जिव्हाळा |

  खान्देशाची बोली रांगडी  विदर्भातली खाद्यसंस्कृती || ३ ||



महाराष्ट्रभू महान जगती  सत्पुरूषांची इथे न गणती

विज्ञानाची कास धरूनी देवू ज्ञानाची गंगोत्री

घेवू भरारी जगी नांदवू विश्वासाची नाती || ४ ||

        

                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                             ९५२७१५३९२५ 













Monday, April 25, 2022

अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यिकांचं व्यासपीठ की राजकीय कट्टा

 

   नुकतेच मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचं सूप वाजलं आणि आयोजकांनी सुटलो बुवा एकदाचे असं म्हणत समाधानाचा एक लांब सुस्कारा सोडला असेल. आयोजकांना कोणताही मोठा सोहळा सुखेनैव कोणतेही गालबोट न लागता पार पडला की समाधान वाटणारच अणि त्यात काही गैर नाही.परंतू संमेलनानंतर त्याविषयी जेव्हा त्याचं कवित्व सुरू होतं त्यात आयोजक उगाच भरडला जातो.खरंतर या चुका संमेलन अध्यक्षांपासून ते ते स्वतःला उगाचच साहित्यिक , विचारवंत मानून साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रात लुडबुड करणाऱ्यांनी केलेल्या असतात.
एक काळ असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण हे साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण मानले जाई पण दुर्दैवाने ही स्थिती आज नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझ्यासारख्या सामान्य वाचक व साहित्यप्रेमी रसिकांची तरी हीच धारणा झाली आहे.नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील काही टवाळ भाषणांमुळे तर ही धारणा अधिक दृढ झाली आहे.एकूणच झालेल्या सर्व संमेलनाचा गोषवारा वाचत असतांना या संमेलनाने समाजाला काय दिलं ?असा प्रश्न मनात उपस्थित झाला. कोणताही नविन साहित्यिक विचार नाही, साहित्यातील नविन विचार प्रवाहाची साधक बाधक चर्चा नाही, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं असं उद्बोधन नाही किंबहुना साहित्यावर चर्चा कमी अन्  देशाला राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर नेणारे कालबाह्य राजकीय विचार थोपविण्याचा प्रयत्न अनाहूतपणे आलेल्या तथाकथित पुरोगामी राजकीय विचारवंतांनी केला ही वस्तुस्थिती आहे.त्यापेक्षाही संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचीच री ओढली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.साहित्यात सर्व प्रकारचे विचार प्रवाह असणारच ते स्विकारले पाहिजेत .त्यातील प्रत्येक मुद्यावर खंडण मंडण व्हावे असा समतोल विचार संमेलन अध्यक्षांनी मांडणे अपेक्षित होते.पण सनदी अधिकारी राहिल्यामुळे त्या मानसिकतेतून एखाद्या राजकीय नेत्यांच्या जातीयवादी भाषणाची भलावण एका जेष्ठ साहित्यिकाने करावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
यावेळी मला सहजच १९७५ सारी झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाची आठवण झाली.जेष्ठ साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या . नुकतीच देशात आणीबाणी जाहीर झालेली होती . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याने संमेलन घेवूच नये अशी चर्चा सुरू झाली होती पण खूप विचारांती संमेलन ठरले . स्वागताध्यक्ष म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण होते.पण ते राजकारणा इतकेच साहित्यिक म्हणून लोकांना परिचीत होते. साहित्याच्या मंचावर साहित्याचीच चर्चा व्हावी ह्या विचारांचे ते होते.स्व .पु.ल.देशपांडे संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते.राजकारण म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याने आणीबाणीच्या निषेधाचा ठराव दुर्गाबाईंनी त्यावेळी मांडला व या ठरावाचे निवेदन सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत यशवंतराव चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या मंचावरून दिली नाही.ही त्यावेळची परिस्थिती होती.सांगायचा मुद्दा असा की संमेलनाचे अध्यक्ष राजकीय दबाव मानत नव्हते आणि राजकारणी नेत्यांनाही त्याचे वैषम्य वाटत नव्हते.आता सर्वच काही बदललंय.असो.
अद्यापही सर्व सामान्य वाचक , साहित्य रसिकांना ही संमेलने राजकीय विचारांनी मुक्त रहावीत, हिंदुत्ववादी साहित्यापासून विद्रोही साहित्य विचारप्रवाहांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,सर्व प्रकारच्या साहित्य कृतींचे स्वागत व्हावे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ निखळ साहित्याच्या चर्चेचं व्यासपीठ व्हावं .एवढेच यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                          ‌                         ९५२७१५३९२५

Tuesday, March 8, 2022

 चैतन्याचा दीप घेऊनी

 उजळलेस तू विश्व त्रिभुवनी || १||


शक्तीचे करी खड्ग घेऊनी

प्रगटलीस तू मायभवानी|| २||


मयुरासनी स्वरविणा घेऊनी

 झंकारली तू अवघी अवनी ||३||


 कधी विद्येचे वाण घेवूनी

जगताची तू ज्ञानदायिनी ||४||


अनेक स्वरूपे तुझीच मोहिनी

 विश्वाची तू तारक जननी ||५||

                      शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                        ९५२७१५३९२५




समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...