Friday, February 21, 2025

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

 समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण | सर्व विषयी ||
ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत असतांना त्यातील काही निवडक ओव्या विचाराला प्रवृत्त करतात.अकराव्या दशकातील पाचव्या समासातील या काही ओव्या प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मसात केल्या तर सध्या एकूणच धर्मकारण, राष्ट्रकारण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या मानवी जीवनातील महत्वपूर्ण अंग असलेल्या पाच क्षेत्रातील दूरवस्थेला दुरूस्त करून सुव्यवस्था निर्माण करता येईल असे सखोल अभ्यास व चिंतन केल्यावर प्रकर्षाने जाणवते.दासनवमीच्या निमित्ताने समर्थांनीच दिलेले हे पाथेय आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी ही अल्पसेवा समर्थचरणी अर्पण करतो.
ग्रंथराज दासबोधातील सर्वच विचार हे समर्थांनी केलेल्या कठोर तपाची व मूलगामी चिंतनाची अभिव्यक्ती आहे.देश काल परिस्थितीच्या मापदंडात हे विचार बसवून चालणार नाहीत.एक प्रदीर्घ दूरगामी चिंतन त्यातील प्रत्येक शब्दातून व्यक्त होते म्हणून त्यातील प्रत्येक शब्दाला मंत्राचे सामर्थ्य आहे.त्यातील प्रत्येक शब्दावर निरूपण करता येईल एवढा गहन अर्थ त्यात भरलेला आहे.सद्यस्थितीत उपरोक्त ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया.
राजकीय भाषेत बोलायचे झाले तर राज्यकर्ते,नेतेगण, कार्यकर्ते व सामान्य नागरिक या सर्वांनीच यावर विचार करून आचरण करण्याची गरज आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण -समर्थांनी असे सांगून आपल्या मनाला खूप मोठा संदेश दिला आहे.कोणताही विचार, आचार, व्यवहार करताना आपल्याला एक अध्यात्मिक बैठक असणे महत्त्वाचे आहे तरच आपल्याकडून योग्य विचार, योग्य आचार आणि योग्य व्यवहार घडतो. त्यासाठी हरिकथा निरूपण हे पहिले हवे असे ते आग्रहाने सांगतात.दासबोधात एका ठिकाणी समर्थांनी
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ||
असे आग्रही प्रतिपादन केले आहे.याचा स्पष्ट अर्थ असा की, कोणताही कार्यारंभ करतांना भगवंताचे स्मरण निरूपण आवश्यक आहे.तरच तो त्या कार्याचा श्रीगणेशा ठरतो.हे मूलगामी , दूरगामी चिंतन आजच्या स्थितीततही तंतोतंत लागू आहे.भगवंताचे अस्तित्वच नाकारणारा एक विचार प्रवाह समाजात निर्माण होवू पाहतो आहे.त्याला पुरोगामी म्हणण्याचा एक प्रघात आपल्याकडे आहे . दुर्दैवाने त्यालाच प्रगत म्हंटले जाते आहे.पण असल्या शक्तींना रोखण्यासाठी समर्थांचे हे मार्गदर्शन फार मोलाचे ठरेल.ते मनात साठवून ठेवले पाहिजे.हरिकथा निरूपणावर विश्वास ठेवणारी भगवद् भक्तांची मांदियाळी वाढवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.यालाच धर्मकारण असेही म्हणता येईल.व्यक्तिगत व सामुहिक स्वरूपात भगवंताचे स्मरण , निरूपण करणे याला प्रथम प्राधान्य समर्थ देतात.
दुसरे ते राजकारण - असे प्रतिपादन करतांना समर्थांनी दुसरे महत्त्वाचे स्थान राजकारणाला दिले आहे कारण समाजव्यवस्था सुचारू रूपात चालायची असेल तर कांहीं नियम दंडशक्तीच्या रूपाने तयार करून समाज नियंत्रित करणे आवश्यक आहे.हे नियंत्रण करणारा तो राजा किंवा राज्यकर्ता ही व्यवस्था म्हणजे राजकारण.हरिकथा निरूपणातून एक अध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त केलेला राजा हे सर्व नियंत्रण करेल हे समर्थांना अभिप्रेत आहे.पण सद्यःस्थितीत निधर्मी राजकारणाचा बोलबाला अधिक दिसून येत असल्याने तुमच्या माझ्यासारखे सामान्य नागरिक संभ्रमित होतात .त्याचाच परिणाम म्हणून राजकारण हे दिशाहीन बनत चाललंय ही वस्तुस्थिती आहे.देव ,धर्म,देश या सर्वांनाच आपल्या सोयीनुसार वापरणं म्हणजे राजकारण असा चुकीचा अर्थ लावून समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तत्वज्ञ, आध्यात्मिक शासक असण्याची नितांत गरज आहे. प्रखर राष्ट्रवादाची बीजं त्यात पेरली आहेत. म्हणून राजकारणाकडे त्या डोळस दृष्टीकोनातून पाहणं ही आमची जबाबदारी आहे.असा समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होणं ही काळाची गरज आहे.राष्ट्रकारणातून राजकारण घडावे यासाठी राजकारण आपला विषय नाही.आपल्याला त्यातलं काही कळत नाही असं म्हणण्यात शहाणपण नाही.हे समाजात रूढ करण्यासाठीच समर्थांनी राजकारणाला दुसरें स्थान दिले आहे.
तिसरे ते सावधपण-  हा अत्यंत समर्पक असा संदेश समाजाला म्हणजे आपल्याला समर्थ देतात. धर्मकारण, राष्ट्रकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण ही पाचही क्षेत्र योग्य रितीने उभी रहावीत ही समर्थांची तळमळ होती.त्यासाठी धडपडणारे आपण सर्वच आहोत.आज समाजजीवनातील ही सर्व अंग विस्कळीत झाल्याचा अनुभव आपण घेत आहोत. धर्मद्रोही,राष्ट्रद्रोही,राजद्रोही,समाजद्रोही,अर्थद्रोही या नवीन जमातींचा हैदोस सर्वत्र सुरू आहे . याचं प्रमुख कारण आमच्यातला बेसावधपणा हेच आहे.म्हणूनच अधर्म, देशविरोधी कारवाया, राजकीय स्वार्थ,अनिती, अन्याय ,जात्यंधता, भ्रष्टाचार या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत.यातून बाहेर पडण्यासाठी समर्थांचा हा तिसरा संदेश देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
या तीनही महत्त्वपूर्ण अशा उपदेशानंतर समर्थ ' सर्व विषयी ' असे मार्मिक व सूचक असे भाष्य करतात . याचा अर्थ सर्वांना सर्व विषयांत सर्वत्र सावधानता बाळगावी लागेल.तरच सर्व क्षेत्र योग्य रितीने उभी राहतील.आज आपण सर्वत्र हाच अनुभव घेत आहोत. त्यामुळे सद्यःस्थितीत समाजाची मानसिकता "भग्न मन है, त्रस्त तन है तिक्त जन हुआ " अशी झालेली आहे. अशावेळी समर्थांनी सांगितलेल्या या समासातील आणखी एका ओवीचा आधार आपल्याला मिळतो तो म्हणजे  " चौथा तो अत्यंत साक्षेप  फेडावे नाना आक्षेप " अशा स्थितीत आळस झटकून सक्रिय होते आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर करणे हे काम करण्याचे दायित्व ते आपल्याच देतात हे लक्षात घेऊन आजच्या काळात आपण कटिबद्ध होवू या हाच संदेश ही दासनवमी आपल्याला देत आहे.
                        धन्यवाद 🙏🏼
                       शशिकांत घासकडबी, नंदुरबार, ९५२७१५३९२५            
 

Tuesday, August 6, 2024

श्रावण सरी

श्रावणसरींची लागते चाहूल, 
संपे घालमेल धरित्रीची | 
मोहरते भूमी,फुलतो निसर्ग,
आनंदी आनंद सर्वदूर ||
 पाखरांची किलबील, 
वेली पानांची सळसळ |
सूरसंगिताची वाटे, 
 जणू भरली मैफिल || १ ||
मठमंदिरात येती , 
भक्तभाविकांच्या झुंडी |
जप तप दानासाठी, 
 लागे भाविकांत होडी || २ ||
कुणी धरी उपवास,
 कुणी करी एकभुक्त |
कुणी देती शिवमूठ,
करी शिवा अभिषेक || ३ ||
सण उत्सवाचा मास,
 होई आल्हाद मनास |
सर्व सुखात असू दे,
हाच देई विश्वास |४
असा हा श्रावण,
करी सुखाची बरसात | 
विश्वमांगल्याची होते,
जणू इथे सुरूवात || ५ ||
          शशिकांत घासकडबी, नंदुरबार

Wednesday, June 26, 2024

प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य टिळक


भारतीय इतिहासातील ' न भूतो न भविष्यति ' अशी राजकीय विरासत कुणाची असेल तर लोकमान्य टिळक हे नांव प्रकर्षाने पुढे येतं.त्यांच्या स्मृती शताब्दीचं हे वर्ष आहे.पक्षीय अथवा सत्तेचं राजकारण न करता  केवळ आणि केवळ राष्ट्रहितासाठीच राजकारण लोकमान्यांनी केले.ब्रिटीश इतिहासकारांनी त्यांची नोंद भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खोडसाळपणाने केली असली तरी आमच्यादृष्टीने ते प्रखर राष्ट्रवादाचे जनक होते.ते कसे?हे आपण थोडक्यात समजून घेतले पाहिजे.
 ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या सिंहगर्जनेतून  ब्रिटिश गुलामगिरीचा कडवट विरोध केला होता. हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची रोवलेली मुहूर्तमेढ असो किंवा आपल्या परखड लेखणीने स्वातंत्र्य चळवळीत वेळोवेळी फुंकलेले प्रयाण असोत राष्ट्रवादावर त्यांनी ब्रिटीशांनी कधीच तडजोड केली नाही.
 वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे चाफेकर बंधूंनी केलेले खून , मुझफ्फरनगरमध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्याकडून झालेला  केनेडी मायलेकींचा झालेला खून,   टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना नाशिकमध्ये झालेला जॅक्सनचा खून, त्या सर्वांमागे टिळक या तीन अक्षरांचे व्यक्तिमत्त्व होते, असे या चिरोलने बिनदिक्कतपणे ‘टाइम्स’मध्ये छापलेले होते. त्याच ‘टाइम्स’नेही ’पुणेकर चित्पावनांचे प्रमुख’ असा उल्लेख करत त्यांच्याविरोधात अग्रलेख लिहिले. टिळकांमागे कायमचा ससेमिरा लावण्याचा हा उद्योग होता. पण टिळकांनी कधीच माघार घेतली नाही.
ब्रिटिशांनी १९१८ मध्ये न्यायमूर्ती एस.ए. टी. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ’सीडिशन कमिटी’ने सादर केलेल्या अहवालाच्या पहिल्याच प्रकरणात आणि त्याच्या प्रस्तावनेत, ’’१८८३ मध्ये टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देत गणपती या देवाला रस्त्यावर आणले आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करायला प्रारंभ करून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजात क्रोध जागृत केला,’’ असे म्हटले आहे. त्यावेळी टिळकांनी लिहिलेले गणेशोत्सवाचे अग्रलेख वाचले तरी त्यांच्या त्या उत्सवामागे असलेल्या तीव्र भावनांचे अधिक प्रकटीकरण होते. 
टिळक जेव्हा अजून ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जात नव्हते, तेव्हाही त्यांनी जनतेचेच प्रश्न हाती घेतलेले होते. त्यांनी ९ ऑगस्ट १८९२ च्या ’’इंग्रजी राज्यांत आम्हांस फायदा काय झाला?’’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्या अग्रलेखातून इंग्रजी राज्याचे फायदेच अधिक सांगितलेले आहेत, असाच कोणाचाही समज होईल, पण शांतता, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, शेतकी सुधारणा आदींचा त्यात त्यांनी उल्लेख केला असला तरी त्यातच एक मेख आहे. इंग्रजी राज्यकर्त्यांनी आमच्या सल्ल्याने राज्य कारभार चालवावा, अशी जनतेची अपेक्षा असेल तर त्यात गैर काहीही नाही, असेही लिहिलेले आहे. त्यावेळी सुशिक्षितांचा एक वर्ग आणि अल्पशिक्षितांचाही एक वर्ग असा होता की, त्यांना इंग्रजी सत्तेने केलेल्या सुधारणांनी भारावून टाकले होते. आगगाडी आली, टपालाची चांगली सोय झाली, रस्ते झाले, तारयंत्रणा कार्यान्वित झाली आणि हे सर्व इंग्रजी राज्यकारभाराने केले, ही त्यांची समजूत होती. टिळकांनी त्या फुगलेल्या फुग्याला हळूच टाचणी लावली. इंग्रजांनी या सर्व सुधारणा का केल्या तर त्यांना भारतात व्यापारउदीम करण्यास चांगल्या सोयी हव्या होत्या आणि आपल्या देशातल्या मालाला सर्वदूर नेऊन त्याच्या विक्रीतून झालेला नफा त्यांना इंग्लंडमध्ये घेऊन जायचा होता म्हणून त्यांनी या सुधारणा आपल्याला देऊ केल्या, त्यात त्यांचाच जास्त फायदा झाला, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी २४ जानेवारी १८९३ रोजी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते, ’’आमच्यावर जुलूम कसा होतो?’’ त्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, ’’लोकांवर जुलूम होण्यास केवळ शेतकी हेच एकमेव खाते आहे, असे नाही. जंगल, मीठ, अबकारी, कालवे, देवी, रजिस्ट्रेशन, शाळा, पोलीस आणि गावसफाई यांनी रयतेस भंडावून सोडले आहे. तोळाभर मीठ अगर खारी माती काढीन म्हटले तर सरकारचा शिपाई उभा आहेच! शेताबाहेर जरा गुरे गेली की, जंगलच्या अधिकार्‍याकडे खेपा घालून दंड भरून त्यांची सुटका करून घ्यावी लागते. दारूची दुकाने त्यांच्या घरात व बाजारात बसविली जातात. इंग्रज सरकारच्या सर्व सत्तेचा मूर्तिमंत अवतार जो पोलीसचा शिपाई तो यमदूतासारखा त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत असतो. अशा स्थितीत कोणत्याही राजाच्या रयतेस कधीतरी सुख होईल की काय याचा लोकांनीच अजमास करावा, अशी सर वेडरबर्न यांची विलायतच्या लोकांस सूचना आहे. पूर्वीच्या राज्यांतून हे सर्व अधिकार रयतेकडे असत. जंगलांची, ताडामाडाची, गायरानांची, पोलिसांची, मिठाची व आरोग्यरक्षणाची सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या सवडीप्रमाणे व गरजेप्रमाणे जे ते तेथे लक्ष ठेवित असत; पण आता ती सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या इंग्रज सरकारने बदलून टाकून मीठ देण्याचा, झाडे राखण्याचा व दारू पाजण्याचा आपणाकडे मक्ता घेतला आहे ! आणि हा मक्ता चालवतेवेळी सरकार आपल्या तिजोरीकडे काय ते लक्ष पुरवते.’’
 टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून घेतलेली अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 
 टिळकांचा राष्ट्रवाद हा अस्सल देशी होता. त्यात कोणताही अहंभाव नव्हता. आपल्या देशाचे दुर्दैव असे की, त्याकडे पाहणारे आजच्या घटकेलाही वेगळ्या चष्म्यातून पाहात असतात. त्यांना लावले जाणारे निकष हेही आजच्या पातळीवरचे असतात. ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत असताना त्यांनाही अशा अनेक अडथळ्यांना ओलांडून जावे लागले होते. महाराष्ट्रातल्या काही जातीवंत नेत्यांनी तर ‘‘आम्हाला स्वराज्यच नको, कारण ते टिळकांना पाहिजे आहे,’’ अशा तर्‍हेचा अत्यंत मूर्खपणाचा वाद घातला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी असा स्वराज्याला आडवे जाणार्‍यांचे बुरखे टरकावले होते. १९१४ नंतर टिळकांमध्ये झालेला बदल क्रांतिकारक होता. ’’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’’ अशी घोषणा करताना त्यांनी लखनौत जे सांगितले ते महत्त्वाचे आहे.
 लखनौ कॉंग्रेसच्या त्या अधिवेशनात टिळक म्हणाले होते की, ’’आम्हाला ब्रिटिश सांगतात, तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही या भूमीचे खरे मालक नाही.’’ आम्ही आर्यांनी इथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून तो आमच्याकडून काबीज केला. मुस्लिमांकडून, मराठ्यांकडून इंग्रजांनी तो घेतला. अर्थातच इंग्लिश राज्यकर्ते हे अनार्यांच्या या भूमीचे पालक होतात. ठीक आहे, मी त्यांचा हा युक्तीवाद मान्य करायला तयार आहे, पण मग ते या भूमीचे सध्याचे रक्षणकर्ते आहेत, तर त्यांनी ही भूमी सोडून भिल्ल, गोंड आणि आदि द्रविडआदी कोणाही आदिवासी, दलित यांच्या ताब्यात परत द्यावी आणि मुख्य म्हणजे येथून तातडीने चालते व्हावे. या भूमीचे जे मूळ मालक आहेत, मग भले ते कोणत्याही जातीधर्माचे असोत, पंथाचे असोत; त्यांची सेवा करायला आम्ही आनंदाने तयार आहोत. ब्रिटिशांना ’चले जाव’ असे बजावणारे ते पहिले नेते होत. लखनौमध्ये लोकमान्यांकडून ही घोषणा केली जाताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला, टाळ्या तर एकसारख्या वाजतच राहिल्या. लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या वर्मावरच नेमका घाव घातला होता. त्याचा आनंद गगनाशी स्पर्धा करत होता. टाळ्यांचा कडकडाट कमी व्हायची थोडीशी वाट पाहून त्याच टीपेला गेलेल्या आवाजात लोकमान्य म्हणाले, ’’होमरूल (इज माय बर्थराइट ऍण्ड आय शॅल हॅव इट’’ सर्व सभागृह प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले, एक क्षण तर असा निर्माण झाला की, मांडव कोसळतो की काय असेच अनेकांना तेव्हा वाटले होते. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. परकियांकडून तसेच स्वरकियांकडून टीकाही सहन केली. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधात सर्वतोपरी आक्रमक भूमिका घेतल्या. तथापि लोकमान्य डगमगले नाहीत. टिळकांनी गोहत्त्येच्या विरोधात भूमिका घेतली आणि हा मुद्दा जिथे रेटायचा तिथे रेटला. मुस्लीम लीगच्या लाहोर प्रांतिक अधिवेशनाला ते हजर राहिले होते. त्या सभेत बोलताना त्यांनी, ’’हिंदूंच्या घरातून ओढून काढल्या जाणार्‍या गायींबद्दल आणि भररस्त्यात त्यांना मारले जाण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्या सभेत हजर राहिलेले मोहम्मद अली जिना यांनी लगेचच मुस्लीम समाजाला हिंदू सणांच्या दिवशी तरी गोहत्त्या टाळा, असा सल्ला दिला आणि लगेचच तसा ठराव संमत करवून घेतला.  इंग्लंडमध्ये १९१८ मध्ये स्वराज्याचा प्रचार करायला गेलेल्या टिळकांना जेव्हा, ’’समजा, आजच तुम्हाला स्वराज्य दिले गेले तर तुम्ही कोण होणार? परराष्ट्रमंत्री की पंतप्रधान?’’ असा सवाल करण्यात आला तेव्हा टिळकांनी त्या प्रश्नकर्त्याला नम्रपणे सांगितले की, ’’स्वराज्य आज मिळाले, तर मी फर्ग्युसनमध्ये जाईन आणि परत गणित विषय शिकवायला घेईन.’’असे नि:स्वार्थ व प्रखर राष्ट्रवादी राजकारण टिळकांनी आयुष्यभर केले.त्यांना हा मानाचा मुजर
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार

Thursday, July 13, 2023

प्रतिभासंपन्न कवयित्री

 

प्रतिभा संपन्न निसर्ग व प्रेम कवयित्री
इंदिरा संत

२० व्या शतकातील शेवटच्या सहा दशकांमध्ये सातत्याने काव्यलेखन करणार्‍या मराठी कवितेच्या परंपरेमध्ये स्वतःचे एक वैशिष्ट्यपूर्ण  स्थान निर्माण करणार्‍या प्रतिभासंपन्न कवी इंदिरा संत.एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे इंदिरा संत यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.    साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादाची लय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत .रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवयित्रीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते.  साठ, सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कविता आजही वाचताना ताज्या टवटवीत फुलासारखा सुगंध  वाटत जातात.
थंड गुलाबी कार्तिकातली, धूसर धूसर धुके तरंगणारी सकाळ, अशा निर्मल निर्भर वातावरणावर झगमगणारी सोनेरी किरणांची सुंदर नक्षी, त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूचफुलांचा सुगंध!
चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलुन तो हृदयाशी धरला!
इतका सुंदर सौंदर्यानुभव देणारी शेला ही आपली आवडती कला. अशाच अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे’ असं म्हणणार्‍या इंदिराबाईंच्या कवितेचं नातं शिल्पकलेबरोबर अभिजात रसिकतेशी कायमचं जुळलं आहे.
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या आजच्या तरुणाईने एकदा इंदिराबाईंची ही कविता आवर्जून वाचावी.प्रेमात इतका हळुवारपणा असावा याचा वस्तुपाठच इंदिरा संतांनी दिला आहे.
नको पाठवू.........
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !
पाठवीशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते ||
कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेचे वर्णन एका वाक्यात करावयाचे असेल तर ' स्वत्वाने सुंदर ठरलेली विशुध्द भावकविता’ असे  करता. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातल्या कविता रविकिरण मंडळाचे संस्कार घेऊन आलेल्या आहेत.
   केवळ कविता हा त्यांच्या लेखनाचा प्रांत कधी राहिला नाही.जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्या कविता करत होत्या आणि त्या ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा वगैरे मासिकातून प्रसिध्द होऊ लागल्या होत्या. १९४१ मध्ये ‘सहवास’ हा उभय पतीपत्नींचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर शेला (१९५१) मेंदी(१९५५) मृगजळ (१९५७) रंगबावरी (१९६४) बाहुल्या (१९७२) गर्भरेशीम (१९८२) चित्कळा (१९८९) वंश कुसुम (१९९४) व निराकार (२०००) असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले. शामली (१९५२) कदली (१९५५) चैतू (१९५७) हे तीन कथासंग्रह, मृद्गंध (१९८६) मालनगाथा (१९९६) फुलवेश (१९९७) हे तीन ललितलेख संग्रह, गवतफुला, अंगतपंगत, मामाचा बंगला हे बालसाहित्य- असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांच्या गद्यलेखनाचे स्वरूपही कवितेसारखे नितळ, सहजसुंदर व काव्यात्मक आहे, त्यामुळे साहजिकच कवी म्हणून इंदिराबाईंचा ठसा साहित्यक्षेत्रावर अधिक उमटला.
‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.
प्रियकराचा चिरविरह हाच त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू बनला. निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या चार अनुभवसूत्रांना या विशिष्ट प्रकारच्या दुःखाने व्यापून टाकल्याने त्यांची कविता विरहाच्या अधिकच गडद छटा घेऊन व्यक्त झाली. दुःखाच्या ताजेपणातील प्रतिक्रियात्मक उत्कटता सर्वाधिक जाणवते ती ‘शेला’ मधल्या कवितांवर
अजूनही जागा आहे
स्पर्श तुझा कायेवरी
आणि अंगाचा सुगंध
खेळतसे श्‍वासावरी (अजूनही)
मनावरची चांदण्यांची झिरझिरी धुंदी अजून ओसरली नाही तोच चंदेरी वर्तमानाचे रूपांतर एकाएकी भीषण भूतकाळाच्या जळत्या आठवणीत व्हावे हे एक संवेदनाशील कवीमन मानूच शकत नाही. शेलानंतर चारच वर्षांनी प्रसिध्द झालेल्या मेंदीतील कविता अधिक तरल, अर्थघन आणि सुजाण वाटतात.
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला घ्यावे तुजला घ्यावेे (मृण्मयी - मेंदी)
' नाहीस तू ने भरले अंबर’ अशा जाणीवेने व्यापलेले दुःख ‘मृगजळ’मध्ये अधिक गडद झाल्याचे, एकवटत चालल्याचे जाणवते. थोड्या अलिप्तपणे दुःखाच्या नजरेला नजर देण्याचे सामर्थ्य त्या गोळा करताना इथे दिसतात. ‘उभे दुःख हे उभेे पुढ्यातच ..... स्तब्ध स्वयंभू पहाडापरी’ - दुःखाचं असं पुढे ठाकणं जणू सवयीचं झाल्यासारखं स्वीकारार्ह आहे. त्या दुःखाला स्त्रीच्या म्हणून असलेल्या अनुभवाचा हळुवार जीवनस्पर्शी वास आहे.
कारण येतो वास तयाला
तान्ह्या ओठावरूनी
ओघळणार्‍या गोड दुधाचा
जुन्या अनुभवांना सामोरे जाणारे कवीमन आता अधिक चिंतनशील, तटस्थ आणि प्रतिमांच्या भाषेत बोलू लागलेले दिसते. या पार्श्‍वभूमीवर आठ वर्षांनी प्रसिध्द झालेल्या रंगबावरीत दुःखाचा कढ निमाला आहे, दुःखाच्या दाहकतेतून पोळून निघाल्यावर कवीमन शांत झाले आहे, बाहेरच्या जगाची सोनेरी चाहूल होऊन बघते आहे.
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळाळेल मन
केंव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात (किती उबावे उबावे)असा प्रश्‍न त्या स्वतःला विचारू लागल्या आहेत. जागं होण्याचं नाकारणार्‍या स्वतःच्या मनाला त्या प्रतिप्रश्‍न विचारू लागल्या आहेत.
निसर्गाच्या संवेद्य वर्णनाबरोबर शिणलेल्या देहाला आलेेले विश्रब्धपण, ‘कोमल काळोखात’ संथ निवांत झुलणारे मन, मनात उगवणारी सतेज पहाट, समर्पण वृत्तीने स्वत्वाचे दान करून ‘शून्या’ झालेली भरतीची लाट, या प्रतिमा दुःखाशी संघर्ष संपल्याची साक्ष देतात. निर्गुण, निराकार जगाला व्यापणार्‍या प्रेमाची, विशुध्द निसर्गसौंदर्याची, जगण्यातल्या एका अबोध आनंदाची जाणीव कवीमनाला झालेली दिसते. तटस्थपणे प्रेमानुभवाचे विश्‍लेषण करण्याची प्रक्रिया जीवनातील ताणांसकट व्यक्त होते. दुःखाचा सातत्याने शोध घेताना भोवतालच्या विश्‍वातील दुःखाचे आतले हुंकार त्यांना जाणवू लागतात.
इंदिराबाईंच्या सुरवातीच्या कवितांमधली स्त्री असंयमी, समर्पिता, जीवनाचा धूप करून प्रियकराभोवती घमघमणारी रातराणी, धूळफुलांचा वास लेवून होणारी पाऊलवाट आहे. परिपूर्णता म्हणजे पुरूष आणि अपूर्णता, चंचलता म्हणजे स्त्री. ही स्त्री पन्नास, साठच्या दशकातील स्त्री-प्रतिमेला साजेशीच होती. पण काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते. गेल्या तीस, चाळीस वर्षात बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न त्या ‘बाहुल्या’ मध्ये करतात, ही त्यांच्या जाणिवांच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या त्याचीच खूण आहे. ‘ही अशी ती तशी’ मध्ये विविध परिस्थितीतून आलेल्या व शिक्षकीपेशा पत्करलेल्या स्त्रियांची रेखाटने येतात. ‘कुटुंबातील नीटस पोर’ मध्ये पैशासाठी नोकरी करणार्‍या स्त्रीचे वर्णन येते. आखीव रेखीव आयुष्यात कसरत करून (कसातरी) तोल सांभाळताना अचानक तोल जातो (बंदिस्त) स्त्रीचं घरातलं दुय्यम, दुर्लक्षित स्थान, आयुष्यातला कंटाळवाणेपणा आणि घरकामाचं तेच तेचपण ‘फॉसिल’ कवितेत व्यक्त होतं.
मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी
मी म्हणजे आवकजावक बिलेपावत्या
मी म्हणजेे बौद्धिकाची रतीब-गाळणी
मी म्हणजे हेच काही
चैतन्याची चमक नाही
चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही, दुःख नाही. स्त्रीला दिलेली चालत्या बोलत्या पाषाणाची उपमा संसारातलं तिचं गोठलेलं स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते. घरासाठी कष्ट करणारी, नोकरी करणारी, घर सांभाळणारी ‘गृहलक्ष्मी’ ही घरासाठी आयुष्य वेचताना स्वतःच सारं काही गमावून बसते याचं उपरोधिक चित्र ‘मध्यमवर्गीय गार्गी’ या कवितेतील ‘शिजवणारी तीच - शिजणारी तीच’ या प्रतिमेतून घरादारासाठी भरडून निघालेल्या स्त्रीमध्ये प्रभावीपणे व्यक्त होते.
या सर्वच कवितांमधून एक शांत संयत, प्रौढ अलिप्तता जाणवते. समर्पिता प्रेयसी ते एकाकी व्यक्ती हा स्त्रीच्या व्यक्तिजीवनाचा त्यांचा प्रवास पुढील काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी कविता प्रवाहाला दिशादर्शक आहे.
त्यांची कविता दुःखाच्या आत्म्याचा शोध घेताना वैयक्तिक दुःखाकडून विश्‍वात्मक दुःखाकडे विस्तारत जाते. या संपूर्ण प्रवासात त्यांचा सच्चा साथी प्रियकर आहे तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाला स्वतःचा रंग, रूप, स्वभाव, स्पर्श, रस सगळं माणसांसारखं आहे. कार्तिकाचा थंड गुलाबी स्पर्श आणि उमलत्या बूच फुलांचा मादक सुगंध असणारं धुकं म्हणजे वसंतसेना वसुंधरेला चारुदत्ताकडून मिळालेला शेला आहे (शेला) धूळभरू रुक्ष विरागी सडक, लाल कोवळ्या पानांचा पिसारा फुलवून उभ्या असणार्‍या पिंपळाच्या दर्शनानं त्याच्यावर लोभावून जाते.
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन (मृण्मयी)
आपल्या रक्ताला मातीची ओढ आहे, मनाला मातीचे ताजेपण आहे असे सांगताना
दंवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावे.असेही त्या म्हणतात.
हेमंताच्या शेल्याने अंग टिपावे, वसंतातील फुलांचे वस्त्र ल्यावे, ग्रीष्माने कचभार उदवावा आणि जर्द विजेचा मत्त केवडा वेणीवर तिरकस माळावा अशी सुंदर रोमँटिक कल्पनाचित्रे उभी करताना त्या निसर्गकन्या होतात. निसर्गरूपातून फिरणार्‍या कालचक्राच्या गतीचा क्षण पकडताना निसर्ग प्रतिमारूपाने येतो, आणि त्याचे त्यांच्या भाववृत्तीशी नाते जुळते. निसर्गातील रंगांची मुक्त उधळणही त्यांच्या कवितेत वेधक रूप घेऊन येते गाण्यामधला पोपटी भाव, मनातील हिरवा गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके अशा रंगप्रतिमा निसर्ग आणि माणसाची एकरूपता दर्शवतात.
ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)
शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात.
संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ज्या ठिणग्या उडतात, त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजे माझी कविता आहे.’ असे त्या म्हणत.
धगधगते जीवन हे
धरून असे ओंजळीत
आले मी कुठून कशी
आले मी हेच फक्त (आले मी)
अनेक वर्षे सातत्याने लेखन करणार्‍या इंदिराबाईंची कविता त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच प्रगल्भ होत गेली. आयुष्यातील स्वतः पलिकडची अनुभूती उत्कटपणे कवेत घेत गेली. भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे.
                                                 शशिकांत घासकडबी , नंदुरबार
                                                  ९५२७१५३९२५

अविस्मरणीय स्मरणगाथा

 

गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनिदां 

   आजच्या तरुणाईला तूला गोनिदां माहिती आहेत का? असं कोणी विचारलं तर कदाचित त्यातला एखादाच त्याचं उत्तर देवू शकेल कारण ६०,७०,८० घ्या दशकात साहित्य जगतात वाचन करणाऱ्या तरूणांच्या मनावर ज्यांनी राज्य केलं त्यातील एक मोठं नांव म्हणजे गोनिदां उर्फ आप्पा दांडेकर.गोनिदां नांव उच्चारताच आपल्या समोर दोन पुस्तकांची नांव आवर्जून येतात ती म्हणजे‌   'कुणा एकाची भ्रमणगाथा 'आणि '        ' स्मरणगाथा '.ही दोन्ही पुस्तकं ज्यांनी वाचली आहेत त्यांच्यासाठी तर गोनिदां हे ' अविस्मरणीय स्मरणगाथा ' आहेत आणि त्यांचा क्षणभराचा सहवास ज्यांना मिळाला ती त्यांच्यासाठी एक अमृतगाथाच म्हणावी लागेल.

  ८ जुलै १९१६ ला विदर्भात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे अप्पांचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी घराबाहेर पडून सलग पन्नास वर्ष पूर्णेपासून नर्मदेपर्यंत जास्तीत जास्त पदभ्रमंती करणाऱ्या या कलंदर फकीराची अवघी जीवनगाथा म्हणजेच स्मरणगाथा आणि भ्रमणगाथा आहे.

सहयाद्रीच्या कडेकपाऱ्या, गड-किल्ले यांच्या कुशीत रमलेले,शिवबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेक गडावरची धूळ मस्तकी धारण करणारे व्यक्तिमत्त्व. शिवरायांचे पदचिन्ह, हाताचा ठसा व अस्थिशेष आपल्यापाशी आहे, याची श्रीमंती बाळगणारा हा अस्सल मराठी मातीतला हा माणूस किती अनुभव संपन्न आणि समृद्ध असेल याची अनुभूती त्यांच्या सहवासात किंवा त्यांची साहित्य संपदा वाचणाऱ्यालाच येवू शकेल.. या अनुभवांतूनच त्यांचे साहित्य प्रसवले. त्यातून मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या, छत्रपतींच्या काळात नेणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अखंड भ्रमंतीतून आलेले आगळेवेगळे अनुभवच शब्दरूप घेऊन आले.  तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;’ असे गोनीदां म्हणत असत.

नर्मदची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले.  या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.

'आमचे राष्ट्रगुरू’ ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. ‘साभार परत’ हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. ‘बिंदूची कथा’ ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी ‘माचीवरला बुधा’, ‘पूर्णामायेची लेकरं’ (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),’आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘मृण्मयी’ अशा अनेक  दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या.

  'मृण्मयी’ अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. ‘पवनाकाठचा धोंडी’ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘शितू’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’ या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.

  ‘मोगरा फुलला’ कादंबरीची हकीकत थोडी वेगळी. ज्ञानदेवांचे वडील विट्ठलपंत यांच्या संन्यासी वृत्तीचे गोनीदांना खूप आकर्षण होते. ज्या माणसाचा पुत्र साक्षात ज्ञानेश्वर आहे, त्यात तेज:पुंज असे काही असणारच, या विचाराने त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यातील निम्मा भाग त्यांनी विट्ठलपंतांच्या जीवनातील संघर्षाचे, ताणतणावांचे चित्रण करण्यात खर्च केला आहे. या कादंबरीचे १९७७ मध्ये प्रथम गोनीदांनीच जाहीर वाचन केले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला; पण तेंव्हा हा प्रकार रूजला नाही. आता गोनीदांची कन्या प्रा. वीणा देव, व जामात डॉ विजय देव आपल्या मुलींसह गोनीदांच्या सहा कादंबऱ्यांचे अभिवाचन करीत आहेत.गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला.

गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी’, तसेच ‘श्री रामायण’, ‘भक्तिमार्गदीप’, ‘कर्णायन’, ‘कृष्णायन’, ‘दास डोंगरी राहतो’, ‘तुका आकाशाएवढा’ ही पुस्तके लिहिली. साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘काका माणसात येतो’, ‘वनराज सावध होतात’, ‘कुऱ्हाडीचा दांडा’, ‘संगीत राधामाई’, ही नाटके त्यांनी लिहिली. ‘छंद माझा वेगळा’ हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, ‘पाच संगीतिका’ हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.

 त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘स्मरणगाथा’ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने’नगरभूषण’, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्य वाचस्पती’ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ‘नानासाहेब नारळकर’ पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ‘दुर्गप्रेमी’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. 

१९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान. मालतीबाई बेडेकर यांना दहा मतांनी हरवून गोनीदा अध्यक्ष झाले. आपल्या वऱ्हाड प्रांतात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला; पण नंतर ‘आदरणीय मालती बेडेकरांविरूध्द मित्रमंडळींच्या आग्रहास्तव उभा राहिलो. ते सर्व वर्ष कटू गेले. साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो हे विसरून जायचे आहे.’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. ‘जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.’, अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी ‘सकाळ’ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.

गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे’ अशी त्यांची मराठी आहे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा ‘मृण्मयी पुरस्कार’ सुरू केला. १९९८ सालात, स. प. महाविद्यालयाच्या ‘प्राचार्य सोनोपंत दांडेकर’ अध्यासनाला हा पुरस्कार लाभला. त्याआधी मारूती चित्तमपल्ली, विलास मनोहर, शुभदा गोगटे, तळेगावचे साहित्य संस्कृती मंडळ, आळंदीचे वारकरी शिक्षण मंडळ, यांना हा पुरस्कार मिळाला आहे.मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ”माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.’ या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा? गोनीदांचे मायमराठीवर असेच प्रेम होते. ‘मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,’ अशी खंत ते व्यक्त करीत.‘सर्वथा अनलंकृत लिहिता यावे, हीच आता तीव्र इच्छा आहे,’ असे त्यांनी सोळा वर्षांपूर्वी म्हटले होते. एवढे लिखाण केल्यावरही त्यांना साधेसोपे लिहीणे हे अवघड आहे याची जाणीव होती. या दांडेकराला लालित्यासाठी तडजोड करावी लागत नाही, लालित्य हा त्याच्या लिखाणाचा अंगभूत गुण आहे, असे ते आत्मविश्वासाने म्हणू शकत असत.अतिशय सूक्ष्म अवलोकन, गड-किल्ल्यांचा मुखोद्गत इतिहास, तेथील रेतीरेतीविषयी मनात दाटलेला अभिमान, मुलखाचे फकिरी व्यक्तिमत्त्व, प्रचंड अनुभवातून उतरलेले ताकदवान साहित्य, मायबोलीविषयी वाटणारी उत्कट तळमळ, हे गोनीदांच्या अवघ्या जीवनाचे सार आहे.

महाविद्यालयात शिकत असताना दोन वेळा गोनिदांचा सहवास लाभला एकदा अमळनेरला ते विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी ते आलेले होते.त्यावेळी आमच्या काॅलेजचे प्राचार्य असलेले प्रा.मुंजे यांची कन्या कौमुदी ही त्यांची मानसकन्या.भटकंतीत वेगवेगळ्या प्रकारचे दगड,खडे संकलित करणं हा त्यांचा छंद होता.त्याचे संकलनही त्यांनी त्यावेळी आम्हाला दाखवले होते.एकदा पुण्यात असताना पेरूगेटजवळच्या एका दवाखान्यात ते दाखल होते आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हादेखील आपले आजारपण विसरून त्यांच्या भ्रमंतीविषयीच ते बोलत होते.विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनात त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आवर्जून एक आवाहन केले होते की, 'आयुष्यात खूप मोठे व्हा तुम्हाला जे करावसं वाटेल ते करा पण राजकारण्यांच्या आसपासही फिरकू नका '. 

पुण्याला तळजाई येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या

 शिबीरानिमीत्त पुणे शहरातून झालेल्या विशाल पथसंचलनाचे चित्रीकरण करताना पाहिले आणि आम्ही थक्क झालो.त्यावेळी ६०/६५ वर्षाचे अप्पा पंचविशीत असलेल्या तरूणाप्रमाणे संचलनाच्या पुढे उत्साहाने धावत होते. साहित्य पंढरीतील या अनोख्या वारकऱ्याला विनम्र अभिवादन 🙏🌹🙏

                        शशिकांत घासकडबी, नंदुरबार -९५२७१५३९२५

Thursday, May 25, 2023

अ ल क ४ सुख आणि शांती

 


सुख आणि शांती यांच्यात एकदा जोरदार वादविवाद सुरू असतो
माणसाच्या सर्वात जास्त गरज कशाची? यासाठी समर्थन करणारे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातात, त्यांचं खंडन मंडनही सुरू असतं.सुखं म्हणतं की माणसाला जे जे हवं ते ते म्हणजे भौतिक, अध्यात्मिक गोष्टी मिळाल्या की तो सुखी होतो.त्यानंतर त्याला कांहीच नको असतं.
शांती म्हणते छे छे ते अशक्य आहे.त्याच्याही नंतर त्याला समाधान ( satisfaction) हवं असतं त्याच्या शोधात तो भटकत असतो.ते मिळालं तरच त्याला शांती मिळते.त्यानंतर त्याला कशाचीही गरज रहात नाही.
तात्पर्य -मन शांत असेल तर आपण सर्व सुखाचे धनी असतो.नुसतं सुख मिळून चालत नाही समाधानाची जोड मिळाली तर शांती प्राप्त होते.
                                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार

Tuesday, December 27, 2022

पत्र लिही पण.........

 

पत्र लिही पण.........
परवाच पोस्टमनने आडनांवाचा पुकारा केला.तेंव्हा नेहमीप्रमाणेच एखादा लिफाफा अथवा रजिस्टर असावे म्हणून बाहेर डोकावून पाहिले आणि त्याने चक्क एक पोस्टकार्ड हातात दिलं.ते पाहून मी क्षणभर अचंबित झालो.कारण आजकाल पोस्टकार्ड येणं तसं दुर्मिळच नाही का ?
  ते पत्र म्हणजेच पोस्टकार्ड आमच्या चिरंजीवानेच लिहीलेले होतं.तो योगायोगाने इथंच आलेला होता म्हणून त्याला आश्चर्यकारक चेहऱ्यानेच विचारलं पोस्टकार्ड लिहिलंस?कसं काय? तो म्हणाला कांही नाही सहजच आठवण आली म्हणून.मला खूप खूप आनंद झाला.
तंत्रज्ञानाच्या या युगात तसे आपण सर्वच टेक्नोसॅवी झालेलो आहोत प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपण आपल्या मुलाबाळांचे घेत असतो .अशा काळात पोस्टकार्डचा उपयोग तसा मर्यादितच राहणार नाही का? अशा काळात मुलाने सहज आठवण आली म्हणून लिहीलेलं हे पत्र खूप सुखावून गेलं.
भारतात १८७९ मध्ये म्हणजे १४३ वर्षांपूर्वी केवळ ३ पैशात सुरू झालेली ही टपाल सेवा अद्यापही  आपलं स्थान टिकवून आहे.आता फक्त १ रूपया त्याची किंमत आहे.पण आजही लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात हे महत्त्वाचे आहे.
अगणित संस्था,संघटना कार्यालयं, कुटुंब यांच्या व्यक्तिगत संपर्काचं माध्यम म्हणजे हे पोस्टकार्ड . दिवाळी किंवा अन्य सणांच्या शुभेच्छा असो किंवा एखादी शुभ अथवा दु:खद वार्ता ती संक्षिप्त मजकूरात कळवण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड.आपल्या घरापासून दूर असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळवण्याचं किंवा विचारण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड. मला आठवतंय , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक यांचा संपर्क देशभरात लाखो सर्वसामान्य स्वयंसेवकांशी केवळ पोस्टकार्डवर लिहीलेल्या पत्राद्वारे होत होता. आजतागायत अगणित प्रचारक ही प्रथा पाळत आहेत. अभाविपचं काम करत असतानाची ही गोष्ट आहे.अमळनेरात जळगांव जिल्ह्याच्या एका वर्गाच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती जिल्हा प्रमुखांशी रोज संपर्क ठेवणं आवश्यक होतं तेव्हा टेलिफोनदेखील फारसे नव्हते.मी रोज एक पत्र लिहून १५ दिवस संपर्क ठेवला तितक्याच तत्परतेने मलाही तिकडून उत्तरं मिळाली.अर्थात त्यावेळी टपाल खातेही खूप तत्पर होते हा भाग वेगळा.एकूण काय तर पोस्टकार्डमुळे किती तरी लोकांशी सहज संवाद होत असे.
मित्रहो, मनातल्या भावना जितक्या उत्कटतेने आपण पत्रातून व्यक्त करू शकतो ना तितकं फोनवरचा संवाद, मेसेजेस म्हणून आपण नाही व्यक्त करू शकत.अशावेळी काय हरकत आहे पोस्टकार्डचा वापर करायला?
कवयित्री इंदिरा संत यांची एक कविता आहे पत्र लिही पण.......त्याचा संदर्भ वेगळा आहे.पण त्यातले हे पहिले तीन शब्द महत्वाचे आहेत.पत्र लिही पण ..... पोस्टकार्डवर....
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
9527153925

Sunday, May 29, 2022

स्वातंत्र्य लक्ष्मीचा योद्धा उपासक: वीर सावरकर

 


उपासनां नाम यथाशास्त्रं उपास्यस्यार्थस्य
विषयी करणें न समीप्य मुषगम्य||
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेन दीर्घकालं
यदासनं तदुपासन याच क्षतेड्ख||
      शांकरभाष्यातील या श्लोकात शंकराचार्यांनी सांगितलेली उपासनेची व्याख्या खूप वेगळी आहे. ' उपासना ' हा शब्द तसा सर्वत्र रूढ आहे. आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थही लावले जातात. परंतु कुठल्याही कर्मकांडाला थारा न देता "तेलाची धार ज्याप्रमाणे खंडीत न होता एकसारखी प्रवाहित राहते त्याप्रमाणे कोणत्याही उपासकाने आपल्या उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता आपल्या चिंतनाने प्रवाहवत्  राहून एकाग्र होणे , त्यासाठी कठोर परिश्रम करणे म्हणजे उपासना. अशा प्रकारची उपासना जो करतो तो योध्दा उपासक म्हंटला जातो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर या श्लोकाची अनुभूती त्यांच्या प्रत्येक कार्यात येते.
          आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे अनुसरण करून त्यांनी एका साधकाप्रमाणेच स्वातंत्र्य लक्ष्मीची कठोर उपासना केली. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येवून सुध्दा क्षणभरही विचलित न होता वयाच्या सोळाव्या वर्षापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत सदुसष्ट वर्ष स्वातंत्र्यवीर अविरत संघर्ष करीत होते. त्यांच्या या उपासनेचे खरं म्हणजे बहुविध आयाम आहेत. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपल्या या कठोर उपासनेचीच छाप त्यांनी उमटवली. म्हणूनच ' योध्दा उपासक ' हे बिरूद त्यांना तंतोतंत लागू पडते.
          वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या भगूर या गावी घरात असलेली अष्टभुजा दुर्गा भवानीची मुर्ती पाहून विनायकरावांना त्या मुर्तीतच  स्वातंत्र्य लक्ष्मीचा साक्षात्कार झाला आणि सहजपणे त्यांच्या मुखातून ' स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ' असा उद्घोष निघाला. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर ते वृत्त समजताच विनायकराव संतप्त झाले. आपली कुलदेवता जिला स्वातंत्र्य लक्ष्मी म्हणून त्यांनी संबोधले तिच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की " देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" , केवढी अवघड प्रतिज्ञा केली होती. पण देश , काल , परिस्थितीशी झुंज देत तब्बल ६७ वर्ष ते या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहिले, तद्रूप झाले. केवढी ही कठोर उपासना? उपासनेसाठी आवश्यक असलेला गुण 'निग्रह ' याठिकाणी अनुभवाला येतो. ही मनस्थिती इतक्या सहजपणे त्यांना प्राप्त झालेली नव्हती. त्याच्या शुध्द बीजाचे रोपण त्यांच्या बालपणीच्या संस्कारात झालेले होते. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांत तात्यारावांचा जन्म झाला हा एक विलक्षण योगायोग होता. घरात असलेल्या आठही हातात शस्त्र बाळगणाऱ्या दुर्गा मातेची पूजा करण्याचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले. आईच्या मृत्यूनंतर थोरल्या वहिनी येसूबाई यांच्या सहवासात त्यांच्यावर वाचन व काव्य निर्मितीचा संस्कार घेत त्यांचे बालपण विकसित होत गेले. वेदशास्त्र अध्यनाची परंपरा असलेल्या कुटुंबात सावरकर घडले. त्यांच्या कुटुंबियांना पेशव्यांकडून वर्षासन मिळत असे तो इंग्रजांनी बंद केला यामुळे विनायकरावांच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षी रामायण, महाभारत, दासबोध भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, वेद उपनिषदे आदी विविध धर्मग्रंथाचे वाचन त्यांनी केले.  वयाच्या तेराव्या वर्षी ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' त्यांनी लिहिले.
         त्यात "तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
          तुज सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे".
हा उत्कट समर्पण भाव त्यांच्या या उपासनेत होता असे लक्षात येते. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी देशबांधवांना उद्देशून '  स्वदेशी फटका ' हे दीर्घ काव्य लिहून भारत मातेवरील अपरंपार श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. याच कवितेत शेवटी ते म्हणतात,
          कवितारूपी  माला अर्पी ,आर्य बुधाला सार्थक हो
           भक्ताकरवी मन देवासी, सेवा यासी अर्पण हो.
आपल्या मनातला उत्कट सेवा भाव ते यातून प्रकट करतात.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे वडील दामोदरराव सावरकर यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला.त्याकाळात इंग्रजांकडून भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून ते अस्वस्थ होत होते.वयाच्या २० व्या वर्षी ते विवाहबद्ध झाले खरे पण त्यांच्या पत्नी सौ यमुनाबाई यांना त्यावेळी स्वातंत्र्यदेवतेचा हा उपासक इतके कठोर तपाचरण करेल याची कल्पनाही त्या माऊलीला नसावी.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात तर तात्यारावांचा प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांशी संपर्क आला . टिळकांच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.पुण्यातल्या सर्व तरूणांमध्ये स्वदेशीची ज्योत प्रज्वलित करण्यात ते अग्रभागी होते.वयाच्या २४ व्या वर्षी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात पहिली आहुती त्यांनी दिली.त्याचे परिणाम त्यांना ठळकपणे माहीत होते.फर्ग्युसन महाविद्यालयांतील अनेक मवाळ नेते व प्राध्यापकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली .त्यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले.पण लोकमान्य टिळकांनी ' हे कसले आमचे गुरू ' असा जळजळीत अग्रलेख लिहून सावरकरांच्या भूमिकेचे समर्थन केले.भारतमातेच्या उपासनेतलं हे  पहिलं कठोर आचरण होतं.
लोकमान्यांनी सावरकरांची तल्लख बुद्धीमत्ता, तर्कशुद्ध विचार व जीवितकार्यावरील अढळ श्रद्धा हे गुण हेरून त्यांना लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती देवून वकीलीच्या शिक्षणासाठी पाठवले.वकीलीचे शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य चळवळीशी तद्रूप झालेल्या विनायकरावांनी प्रखर देशभक्तीपर लिखाणाला सुरुवात केली व तिथल्या तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.१८५७ चे बंड हे स्वातंत्र्य समर होते असा शब्दप्रयोग करून त्यांनी तो ग्रंथ लिहिला व गुप्तपणे त्यांचे प्रकाशन हाॅलंडमध्ये केले.फ्रान्समध्ये हा ग्रंथ वाटण्यात आला. त्यांच्या या उपासनामार्गातील दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येते.अनेक तरूणांमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल या ग्रंथामुळे धगधगू लागली.
मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध करून याचे प्रत्यंतर दिले.स्वाभाविकपणे यांचा ठपका विनायकरावांवर ठेवण्यात आला त्यांना एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.एकाचवेळी दोन जन्मठेपेची शिक्षा मिळालेले सावरकर जगातील एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते.शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी लंडनमधूनच आपल्या मातेसमान वहिनीला दीर्घ पत्रकाव्य लिहीले.त्यातील प्रत्येक शब्दांतून त्यांची संन्यस्त वृत्ती प्रकट होते.
      अनेक फुले फुलती,फुलोनीया सुकोनी जाती
      परंतु त्याची महती गणती कोणी ठेविली असे
याच काव्याच्या शेवटी ते म्हणतात
अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता
दिगंती पसरे सुगंधता,लोकहित परिमलाची
एकीकडे आपल्या सार्थकता कशात आहे हे सांगताना सर्वस्व समर्पणाच्या सुगंधाची महती ही ते विशद करतात.
जन्मठेप झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर त्यांच्या पत्नी सौ भाई सावरकरांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. या भेटीत दोघांनाही आपले अश्रू अनावर झाले.पण क्षणभरात खंबीर होवून विनायकराव म्हणतात," ईश्वराची द्या असेल तर पुन्हा भेट होईल .माई  , काड्या काटक्या एकत्र करून घरटं बांधून त्यात अंडी उबवायची,पिल्लं वाढवायची असा संसार तर कावळे चिमण्याही करतात आम्हाला देशाचा संसार करता आला यातच धन्यता माना." केवढी ही निरीच्छवृत्ती? मोह ,माया सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ देशाचाच विचार त्या परिस्थीतीतही त्यांनी केला.
   वयाच्या ३१ व्या वर्षी जन्मठेप झाली . लंडनवरून भारतात आणण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला. बोटीवरून अथांग सागर पाहताना मातृभूमीच्या भेटीची  अनिवार ओढ त्यांना लागली डोळे पाणावले अन् धीर गंभीर आवाजात मुखातून उत्कट मातृभक्ती प्रगटली ' सागरा प्राण तळमळला ' त्यानंतर मार्सेलिस बंदरात त्यांनी घेतलेली उडी याच उत्कट देशभक्तीची अत्युच्च अभिव्यक्ती हौती.
      अंदमानच्या कालकोठडीत तब्बल ११ वर्ष त्यांनी मरण यातनाच भोगल्या पण त्याही स्थितीत तसुभरही न ढळता खंबीरपणे आपली लेखनसाधना त्यांनी अविरतपणे सुरू ठेवली.यावरून उपासना मार्गात आवश्यक असलेला संयम त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेला होता याची प्रचिती आल्यावाचून रहात नाही.शारीरिक , मानसिक, कौटुंबिक आघात एकाचवेळी होत असताना देखील आपला निग्रह त्यांनी सोडला नाही.वयाच्या चाळीशी नंतर जनमतांचा रेटा वाढल्याने सावरकरांची जन्मठेप संपली पण त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले.आयुष्यभर स्वातंत्र्यवीरांनी  स्वातंत्र्य चळवळ,प्रखर हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली पण रत्नागिरीच्या वास्तव्यात राजकारणावर बोलण्यास लिहीण्यास बंदी असल्याने विनायकरावांनी समाजकारण सुरू करून जाती निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, भाषाशुद्धी,परधर्मात गेलेल्या हिंदूबांधवांचे शुध्दीकरण, समरसता आदि विषय हातात घेवुन विपुल लेखन व उपक्रम केले.त्यावेळी अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी त्यांना विरोध केला.
स्वातंत्र्योत्तर काळात देखील गांधीहत्येचे पातक त्यांच्या माथी थोपवून त्यांना अटक करण्याचे हीन कृत्य त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केले.त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.वयाच्या ८३ व्या वर्षी तात्यारावांनी आपल्या सर्व कार्यांना पूर्णविराम दिला.आणि शेवटी '  मृत्यो ये ' अशी साद घालत कोणताही गंभीर आजार नसतांना प्रायोपवेशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
स्वातंत्र्य लक्ष्मीच्या या  ' योध्दा उपासकाला ' कोटी कोटी प्रणाम!!
                                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                   ९५२७१५३९२५




Wednesday, May 18, 2022

राजकारण्यांनो लगाम घाला

 


     कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
         इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम्।।
परवा सहजच महाभारतातील शांतीपर्वातला एक श्लोक डोळ्यासमोर आला आणि लगेचच महाराष्ट्रातील सद्यस्थिती संदर्भांत कांही विचारचक्र मनात घोळू लागले.खरं म्हणजे पितामह भीष्मांनी युधिष्ठीराला उद्देशून केलेलं हे मार्गदर्शन आहे.जवळपास २० श्लोकातून राजधर्म,प्रजातंत्र आणि अनुशासन यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन पितामह भीष्म यांनी शासकांना केलं आहे.काळ राजाला बनवतो की राजा काळ बनविण्यासाठी कारणीभूत असतो ?या संभ्रमात युधिष्ठीर असतांना भीष्मांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की ' राजाच काळाला कारणीभूत असतो.' सध्या महाराष्ट्रात राजकारणाची जी भीषण परिस्थिती आपण अनुभवतो आहोत हा अत्यंत कठीण काळ आहे.त्याला जबाबदार या राज्यातले सर्व राजकारणी जबाबदार आहेत.यात डावे उजवे करण्याची सध्यातरी गरज नाही.सत्ताधारी असो वा विरोधक हे सर्व एकार्थाने राजेच आहेत . आपापल्या भागाचे प्रमुख म्हणूनच ते वावरत असतात.पण ते आपल्या भागाच्या सर्वसामान्य जनतेचे राजे म्हणून न वागता आपल्या मनाचे राजे म्हणून वागतांना दिसतात . म्हणूनच उद्वेगाने असे म्हणावेसे वाटते की राजकारण्यांनो लगाम घाला आपल्या मनाला अन् तोंडाला.
       एक व्यक्ती म्हणून जेव्हा जेव्हा आपण अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहतो तेव्हा ' आम्हां काय त्याचे ' असे  वाटून घेऊन थेट ' जे जे होईल ते ते पहावे ' अशी सोयीस्कर भूमिका स्वीकारून गप्प बसतो.त्याचेच परिणाम सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिक भोगतोय हो भोगतोच आहे. गेले काही महिने आपल्यापैकी जे जे संवेदनशील आहेत  आणि  देश देव धर्म आणि समाज यांच्या हिताचं कांहीं घडावं असं ज्यांना मनापासून वाटतंय ते ते सर्व सामान्य नागरिक आज अस्वस्थ आहेत.या अस्वस्थ झालेल्या लोकांनीच राजकारणाच्या सुंदोपसुंदीत कुणा एकाची बाजू न घेता सर्व राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकांना खडसावून विचारण्याची गरज आहे की तुम्ही गप्प राहून केवळ लोकहिताच्या कामांवर कधी लक्ष देणार? तुमच्याकडे असलेलं पद,प्रतिष्ठा,पैसा ही काही तुमची जहागीर नाही ती केवळ आम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे तुम्हाला मिळालेली विश्वस्ताची जबाबदारी आहे याचं भान ठेवा . देशहित , लोककल्याण यांच्या थापा न मारता कामाला लागा आधी जीभेला लगाम घाला.
  माझ्यासारखा सामान्य नागरिक जेंव्हा आपल्या सकाळची सुरुवात चांगली व्हावी म्हणून वृत्तपत्र हातात घेतो किंवा घरात असेल तर दूरदर्शन लावतो एवढंच नाही तर आता आम्ही भौतिक दृष्ट्या खूप प्रगत असल्याने दुनिया मुठ्ठी में घेवूनच फिरत असतो म्हणून आमचा हातातला भ्रमणध्वनी उघडतो आणि.......निराशा , उद्वेगाने तो बंद करून टाकतो.तेच ते चेहरे,तेच ते आरोप प्रत्यारोप,तेच ते खुलासे,त्याच त्या सभा भाषणं,नकला आणि अत्यंत बेजबाबदारपणे केली जाणारी विधानं , शाब्दिक कोट्या वैताग आलाय नुसता....राजकारण्यानो कोण आहात तुम्ही ? नकलाकार.. विडंबनकार...नाचे, सोंगाडे... कोर्टात युक्तिवाद करणारे वकील..की सर्कशीत ले प्राणी...???? काय चाललंय तुमचं...??? जनांची नाही तर मनाची तरी बाळगा असं म्हटलं जातं तुम्ही दोन्ही विकून खाल्लंय...लाज वाटतेय तुम्हाला नेते म्हणण्याची जरा भानावर या तोंडाला व मनाला लगाम घाला.
   कुणी चुकीचं वागला तरी जा कोर्टात... चुकीचं बोलला की जा कोर्टात... चुकीचं लिहीलं म्हणून जा कोर्टात.... सुरक्षायंत्रणेला तुम्ही तुमचं बटीक केलं आहेच आता न्यायव्यवस्था ही तुमची बटीक मानायला लागलात काय ?..... न्यायव्यवस्था ही तुमची वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय न्यायनिवाडे करत बसली तर सामान्य लोकांचे हजारो प्रलंबित खटले चालवून न्यायनिवाडा कसा करणार?.... वैयक्तिक निवाड्यांसाठी जातीनिहाय, गावनिहाय न्याय पंचायती आहेत ना? कौटुंबिक निवाडे कुटुंबातील वडीलधारी मंडळी सोडवतात ना ? राजकीय खटल्यासाठी पक्षप्रमुखाकडे आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी क्षमता आहे का?...कसे असणार सगळेच पक्षप्रमुख बेजबाबदार,बेताल विधानांचे मेरूमणी झाले आहेत तिथे कोण आवर घालणार???.....
     सत्ता मिळवण्यासाठी पैसा.. पैशासाठी सरकारी योजनांत भ्रष्टाचार.. भ्रष्ट्राचार दडपण्यासाठी नोकरशाहीवर दबाव... याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना धाकदपटशा पोलीसीखाक्या.....मी आणि माझ्याच घराण्याची सत्ता कायम रहावी यासाठी जातीयता,धर्मांधता आदिंचा वापर हे सर्व कोण करतंय सामान्य जनता की तुम्ही?????..... लोकांच्या धार्मिक आस्थांना शिव्याशाप देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे दिवस आता संपले हे लक्षात घ्या. मिडीयाला विकत घेऊन प्रपोगंडा केला की कदाचित एखादी निवडणूक तुम्ही जिंकत असाल पण लोकांचा विश्वास तुम्ही सर्वांनीच गमावला आहे.तसाच तो या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या मिडीयाने पण गमावला आहे. तुम्ही सर्व जण हे विसरता आहात की,
               प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।
प्रजेच्या सुखात राजाचं सुख असतं आणि प्रजेच्या हितासाठीच तो राजा असतो.आजच्या नवमतदार असलेल्या युवा पिढीला हे चांगलं माहिती आहे.त्यामुळे वेळीच स्वतःला आवरा .....मनाला, तोंडाला,स्वार्थाला,लगाम घाला.. अन्यथा येणारा युवा मतदार तुम्हाला माफ करणार नाही.
                                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                         ९८२७१५३९२५

Tuesday, May 3, 2022

परशुरामा अस्त्रं द्या

 अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:|

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ||

मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केलेले भगवान परशुराम......... एकाच वेळी ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची अनुभूती देणारी आपली प्रतिमा....मनाला एक विश्वास देते .......
भगवान विष्णूंचा सहावा अवतार घेवून आपण या भूतलावर प्रगटलात...... कां ? तर या पृथ्वीतलावर असलेल्या......... तपोभूमीवर.....कर्मभूमीवर....पुण्यभूमीवर...... कुणी धर्मकार्यात...राष्ट्रकार्यात......लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या...कर्मयोग्यांच्या कार्यात अडथळे आणणाऱ्या..... विद्रोही शक्तिंचा .....आपल्या शापवाणीने ....... वेळ आलीच तर....शस्त्रास्त्रांनी विनाश करण्यासाठीच हा अवतार नव्हे तर अधिकार आपल्याला मिळाला.......  आणि हो ....चिरंजीवीतेचं अनोखं वरदानही तुम्हाला प्राप्त आहे........होय आजही आपण या पृथ्वीतलावर कुठंतरी आहात ही आमची श्रद्धा आहे........ सद्य:स्थितीत......
या पुण्यभूमीत.......सत्तांध......धर्मांध.......वासनांध ......‌‌ स्वार्थांध....ल़ोकांचा...नव्हे...नव्हे ....दैत्यांचा अक्षरशः....हैदोस चाललाय् ....... तो आपल्या कुशाग्र दृष्टीने आपण पहात असालच.....या दुष्कर्मांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेला हा......हा समाजपुरूष आक्रोश करतोय......याचना करतोय.... आणि विमनस्क स्थितीत ....साकडं घालतोय..... परशुरामा.......
आता अस्त्रं द्या.... फक्त एकदा शस्त्रें द्या.........
नि:पात ...करू देत आम्हाला.....या दुष्टप्रवृत्तींना नष्ट करू द्या आम्हाला त्यांचे रक्तांने.....घाणीने .....पापकर्मांनी बरबटलेले हात..... यासाठीच आम्हाला आता शस्त्रं हवे.....परशुरामाच्या हवे...........
       भृगुवंशीय ऋषी जमदग्नींचे तुम्ही पुत्रं........कठोर तपश्चर्येमुळे पुराणातील सप्तर्षी मध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं........ अन्याय.... अत्याचार.... दुराचाराच्या...विरोधात पेटून उठणारे आपले पिताश्री जमदग्नीं........ आपल्या सदाचारी व पतिव्रता असलेली पत्नी रेणुकेला......गंधर्व क्रीडा पाहण्याच्या मोहात दुष्कर्म केलं म्हणून हत्या करण्याची आज्ञा त्यांनी केली.....पित्याची आज्ञा पाळण्याच्या कर्तव्यबुध्दीने ..... तुम्ही आपल्या मातेची हत्या केलीत....पण त्याचवेळी पित्याकडून वरदान मागून आपण मातेला व भावंडांना जीवदान दिले......नि:सीम मातृभक्तीचा हा आदर्श ही तुम्ही दिलात.....आपली माता आदिशक्ती रेणुका .....कठोर पतिव्रता..... तेवढीच थोर तपस्विनी..... कर्तव्यदक्ष माता .......आपले पती जमदग्नी यांच्याकडे कामधेनूची मागणी करणाऱ्या लोभी सहस्त्रार्जुनाने ती दिली नाही म्हणून त्यांची हत्या केल्यानंतर.....माता रेणुका यांनी माझा पुत्र २१ वेळा आपल्या क्षत्रिय कुळाचा वध करेल ....अशी शापवाणी केली .एवढंच नाही तर...दु:खाने शक्तीहीन  झालेल्या तुम्हाला श्री दत्तात्रेय चरणी अर्पण करून......पुन्हा एकदा बलशाली केले... अन् मातृवचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही पृथ्वी दुराचारी क्षत्रियहीन केली.........ही कर्तव्यकठोरता......ही मातृभक्ती आमचा आदर्श आहेच पण.......या तपोभूमीवरील दुराचाराचा.. नायनाट करण्यासाठी.... फक्त एकदाच...हे क्षात्रतेज आम्हाला द्या...परशुरामा अस्त्रं द्या........
   उत्पत्ती... स्थिती...... लय ...... यांचं प्रतिक.... ब्रह्मा, विष्णू,महेश आहेत......स्थिती प्रदान करणाऱ्या भगवान विष्णूंचे तुम्ही अवतार....विधायक,रचनात्मक कार्याचा आदर्श तुम्ही निर्माण केलात...लयकर्ता भगवान शंकरांनी तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दुराचारी क्षत्रियांचा विनाश करून ....लोककल्याण करण्यासाठी तुम्हाला अस्त्रं दिले तेच परशुरामास्त्र.........आपण नेहमीच विधायक.... रचनात्मक कार्यातून या सृष्टीला स्थिरता प्रदान केली त्याचबरोबर.. विधायक कामात अडथळा आणणाऱ्या विघातक शक्तिंचा आपण बिमोड केलात....... आताही हीच वेळ आली आहे..... म्हणून म्हणतोय आता शस्त्रं द्या.....
          चिरंजीव परशुरामा ..बघताय ना आपण....सध्या सर्वत्र... जगातल्या धर्मांध शक्ती आणि त्यांना बळ देणारे सत्तापिपासू बेगडी धर्मनिरपेक्षता वादी....‌सत्तेपायी हिंदुत्वाला तिलांजली देवून आपल्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा ओढणारे सत्तापिपासू राजकारणी.....या भूमीतील मूळ असलेल्या हिंदुत्वालाच उखडून टाकण्याचे आव्हान आपल्या वागण्यातून .... बोलण्यातून रोज देत आहेत.....आमची श्रध्दास्थाने...आमच्या देवदेवता....आमचे सण उत्सव...आमचे राष्ट्रपुरुष यांच्यावर खुलेआम हल्ले करतायेत......पण आमचे सत्तांना राज्यकर्ते त्यांचा बिमोड करण्याऐवजी त्यांना संरक्षण देवून सच्च्या देशभक्तांना तुरुंगात डांबत आहेत........पुन्हा एकदा हिंदुत्वाला निष्प्रभ करण्याचं पाप ते करताहेत......सारं काही संतापजनक...भयावह....आहे.म्हणून म्हणतो.... हिंदुंना संघटीत होण्याची बुध्दी द्या.....शत्रुचा नायनाट करण्यासाठी शस्त्रं द्या......
       सामाजिक चित्रही निराशाजनक आहे......वासनांध पुरूष दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूंचे लचके तोडत आहेत......हे कुकर्म करूनदेखील निर्लज्जपणे समाजात उजळमाथ्याने वावरतायत सामान्य माणूस मूक होवून हताश उसासे सोडत बसलाय..... न्यायाच्या प्रांगणात त्याच्यावर अन्यायच होतो आहे.......हीच स्थिती स्वार्थांध झालेल्या राज्यकर्त्यांची आहे......डोळे ...कान....मनाची कवाडं बंद करून .....केवळ आपल्याच आप्तांच्या तुंबड्या भरण्यासाठी हे भ्रष्ट नेते बेधुंद झाले आहेत......त्यांना आवर घालू पाहणाऱ्या सरकारी यंत्रणांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणचे धाडस हेच भ्रष्टाचारी करताहेत .........त्यात भर म्हणून आपल्या प्रभावासाठी एक दिलाने राहणाऱ्या सर्व समाजात .........जातीयतेचे विष पेरण्याचे काम काही जाणते म्हणविले जाणारे जात्यांध नेते करत आहेत.....सर्व समाज एक सूत्रात बांधण्यासाठी ........आम्हाला शक्ती द्या...हे भगवान आम्हाला शस्त्रं द्याच......
      हे परशुरामा,...पुण्यकर्मावर पापकर्माने.....सदाचारावर दुराचाराने.....सज्जनांवर दुर्जनांनी.......देशभक्तांवर देशद्रोह्यांनी..... देवांवर दैत्यांनी... अवैध मार्गाने नेहमीच आक्रमण केले आहे.....पण या मूठभर अपप्रवृत्तींवर आपल्यातल्याच ब्रह्मतेज व क्षात्रतेजाने आपले शास्त्र आणि शस्त्रं वापरून  त्यांचा समूळ नाश केला आहे.... विधायक कामं करणाऱ्यांना या भूमीत नेहमीच उपहास उपेक्षा अवहेलनांना सामोरं जावं लागलं आहे...... आपणही याला अपवाद नाहीत....हे भगवन् रचनात्मक कार्याचे प्रेरक तुम्ही आहातच.... त्याचबरोबर या भरतभूमीचे संरक्षक म्हणून आम्हा सर्वांचे उपास्य दैवत तुम्ही आहात.......
हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर ' परशुराम की प्रतिक्षा ' या खंडकाव्यात एका ठिकाणी लिहीतात
जबतक प्रसन्न यह आनंद सगुण हॅंसते है
है जहाँ खडग् ,सब पुण्य वहां बसते है ||
वीरता जहांपर नहीं पुण्य का क्षय है
वीरता जहांपर नहीं स्वार्थ की जय हैं ||
हीच प्रेरणा,हाच आत्मविश्वास,हेच वरदान या विराट परशुराम स्वरूप हिंदू समाजाला द्या हे परशुराम ... आम्हाला शास्त्र न तर द्याच पण शस्त्रं ही द्या.......
                    जय परशुराम !
                                         शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                      ९५२७१५३९२५

Sunday, May 1, 2022

महाराष्ट्राची माती

  महाराष्ट्राची माती  कणकणात वसते शक्ती || धृ ||

.

    माय भवानी आदिशक्ती मल्हारी यळकोट गर्जतो

विठुरायाचे दर्शन घेता भक्तांचाही ऊर दाटतो

 हरिनामाचा घोष निनादे चंद्रभागेच्या  काठी  || १ ||

 

    शिवरायांची गौरवगाथा पराक्रमाची स्फूर्ती देते

संतजनांची अभंगवाणी  सत्संगाची महती गाते

मायबोलीच्या मधुर स्वरांनी शब्दांतून पाझरते भक्ती || २ ||

  

   मुंबईत बहु दाटीवाटी कोकणचा तर बाज आगळा

 सह्याद्रीची सुपीक माती मराठवाडी प्रेम जिव्हाळा |

  खान्देशाची बोली रांगडी  विदर्भातली खाद्यसंस्कृती || ३ ||



महाराष्ट्रभू महान जगती  सत्पुरूषांची इथे न गणती

विज्ञानाची कास धरूनी देवू ज्ञानाची गंगोत्री

घेवू भरारी जगी नांदवू विश्वासाची नाती || ४ ||

        

                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                             ९५२७१५३९२५ 













Monday, April 25, 2022

अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यिकांचं व्यासपीठ की राजकीय कट्टा

 

   नुकतेच मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचं सूप वाजलं आणि आयोजकांनी सुटलो बुवा एकदाचे असं म्हणत समाधानाचा एक लांब सुस्कारा सोडला असेल. आयोजकांना कोणताही मोठा सोहळा सुखेनैव कोणतेही गालबोट न लागता पार पडला की समाधान वाटणारच अणि त्यात काही गैर नाही.परंतू संमेलनानंतर त्याविषयी जेव्हा त्याचं कवित्व सुरू होतं त्यात आयोजक उगाच भरडला जातो.खरंतर या चुका संमेलन अध्यक्षांपासून ते ते स्वतःला उगाचच साहित्यिक , विचारवंत मानून साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रात लुडबुड करणाऱ्यांनी केलेल्या असतात.
एक काळ असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण हे साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण मानले जाई पण दुर्दैवाने ही स्थिती आज नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझ्यासारख्या सामान्य वाचक व साहित्यप्रेमी रसिकांची तरी हीच धारणा झाली आहे.नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील काही टवाळ भाषणांमुळे तर ही धारणा अधिक दृढ झाली आहे.एकूणच झालेल्या सर्व संमेलनाचा गोषवारा वाचत असतांना या संमेलनाने समाजाला काय दिलं ?असा प्रश्न मनात उपस्थित झाला. कोणताही नविन साहित्यिक विचार नाही, साहित्यातील नविन विचार प्रवाहाची साधक बाधक चर्चा नाही, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं असं उद्बोधन नाही किंबहुना साहित्यावर चर्चा कमी अन्  देशाला राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर नेणारे कालबाह्य राजकीय विचार थोपविण्याचा प्रयत्न अनाहूतपणे आलेल्या तथाकथित पुरोगामी राजकीय विचारवंतांनी केला ही वस्तुस्थिती आहे.त्यापेक्षाही संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचीच री ओढली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.साहित्यात सर्व प्रकारचे विचार प्रवाह असणारच ते स्विकारले पाहिजेत .त्यातील प्रत्येक मुद्यावर खंडण मंडण व्हावे असा समतोल विचार संमेलन अध्यक्षांनी मांडणे अपेक्षित होते.पण सनदी अधिकारी राहिल्यामुळे त्या मानसिकतेतून एखाद्या राजकीय नेत्यांच्या जातीयवादी भाषणाची भलावण एका जेष्ठ साहित्यिकाने करावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
यावेळी मला सहजच १९७५ सारी झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाची आठवण झाली.जेष्ठ साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या . नुकतीच देशात आणीबाणी जाहीर झालेली होती . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याने संमेलन घेवूच नये अशी चर्चा सुरू झाली होती पण खूप विचारांती संमेलन ठरले . स्वागताध्यक्ष म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण होते.पण ते राजकारणा इतकेच साहित्यिक म्हणून लोकांना परिचीत होते. साहित्याच्या मंचावर साहित्याचीच चर्चा व्हावी ह्या विचारांचे ते होते.स्व .पु.ल.देशपांडे संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते.राजकारण म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याने आणीबाणीच्या निषेधाचा ठराव दुर्गाबाईंनी त्यावेळी मांडला व या ठरावाचे निवेदन सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत यशवंतराव चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या मंचावरून दिली नाही.ही त्यावेळची परिस्थिती होती.सांगायचा मुद्दा असा की संमेलनाचे अध्यक्ष राजकीय दबाव मानत नव्हते आणि राजकारणी नेत्यांनाही त्याचे वैषम्य वाटत नव्हते.आता सर्वच काही बदललंय.असो.
अद्यापही सर्व सामान्य वाचक , साहित्य रसिकांना ही संमेलने राजकीय विचारांनी मुक्त रहावीत, हिंदुत्ववादी साहित्यापासून विद्रोही साहित्य विचारप्रवाहांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,सर्व प्रकारच्या साहित्य कृतींचे स्वागत व्हावे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ निखळ साहित्याच्या चर्चेचं व्यासपीठ व्हावं .एवढेच यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                          ‌                         ९५२७१५३९२५

Tuesday, March 8, 2022

 चैतन्याचा दीप घेऊनी

 उजळलेस तू विश्व त्रिभुवनी || १||


शक्तीचे करी खड्ग घेऊनी

प्रगटलीस तू मायभवानी|| २||


मयुरासनी स्वरविणा घेऊनी

 झंकारली तू अवघी अवनी ||३||


 कधी विद्येचे वाण घेवूनी

जगताची तू ज्ञानदायिनी ||४||


अनेक स्वरूपे तुझीच मोहिनी

 विश्वाची तू तारक जननी ||५||

                      शशिकांत घासकडबी, नंदुरबार

                        ९५२७१५३९२५




Sunday, February 27, 2022

माय मराठी महान

 माय मराठी महान अमुची माय मराठी महान ||धृ ||

सातवाहने निर्मित केली यादवकाळी विकसित झाली

संत महंते पावन केली सकला देई ज्ञान ||१||

    संस्कृत प्राकृत भाषा बोली देवनागरी लिपीत नटली

मुकुंदराज अन्  ज्ञानेशाने वाढविला सन्मान ||२||

शिवरायांच्या स्वराज्यकाळी राजदरबारी जावून बसली

मराठी झाली वैभवशाली जागविला अभिमान ||३||

 अहिराणी वा असो वऱ्हाडी कोळी कोकणी अन् भिल्लोरी

गणबोलीची रीत आगळी भाषा हीच प्रमाण ||४||

   अभंग भारूड ओवी लावणी गद्य पद्याचा साज लेवूनि

नाट्य कथांची झेप घेवूनि जगीं वाढली शान ||५||

लिहू मराठी बोलू मराठी शाळेतून ही शिकू मराठी

उद्घोष असावा एकच कंठी 'अभिजात' मिळावा मान ||६ ||

                                शशिकांत घासकडबी, नंदुरबार ९५२७१५३९२५



Friday, August 7, 2020

आत्मारामांची अमृतवाणी

 नुकताच ५ ऑगस्टला श्रीरामजन्मभूमीवर संकल्पित भव्य मंदिर उभारणीचं भूमिपूजन विधीवत व आनंदमयी वातावरणात करण्यात आलं आणि संपूर्ण भारतवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.' याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड झाला ' असा कृतार्थतेचा भाव आपल्या सर्वांच्याच मनात व चेहऱ्यावर दाटून आलेला होता.या आनंदाच्या सुवर्णक्षणांवर आपल्या अमोघ वाणीतून अक्षरशअमृताची बरसासोहळ्यातीोन महनीय व्यक्तींच्या मुखातून झालयाचे सर्वाधिक अप्रूप वाटले.अनेकांनी समाज माध्यमातून खूसकारात्मक चर्चा केली हे.या सर्व चर्चांबाबत माझ्या मनाआलेला भाव मी सर्वत्र व्यक्त केला व तो अनेकांना आवडला.तो भाव असा होता,'' काल मोदीजी बोलतच नव्हते त्यांच्यातला आत्माराम बोलत होता.ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांना 'आत्माराम '   संकल्पना लक्षात येईल. जी कठोर साधनेतून प्राप्त होते."  

        'आत्माराम'हा वेदांतपर ग्रंथ आहे; समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्रवण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नुसते श्रवण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे. 
सरसंघचालक मा.मोहनरावजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी या दोघांच्याही जीवनाकडपाहिल्यानंतर ही अनुभूती आपल्याला येते.
  प्रभु श्रीरामस्वरूप देशाला देव मानून ही भगवंताची भक्ति या दोघांनीही मनापासून केली म्हणून त्यांच्या जीवनात वेदांताचं तत्वज्ञान उतरलं.परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी परम पूजनीय श्रीगुरूजी आणि अगणित सत्पुरूषांचा सहवास त्यांना लाभला.अनेक साधूसंतांच्या सान्निध्यात देखील ते राहिले.मोदीजी काही काळ अध्यात्ममार्गात देखील होते.आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच ते राजकारणात सेवाभाव मनात ठेवून ते आले.आपापल्या सान्निध्यातील सत्पुरूषांनी दिलेल्या मार्गानुसारच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला.समर्थांच्या उक्तीनुसार या भक्तीतूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे.संघकार्य असो किंवा अध्यात्ममार्ग तिथे केवळ श्रवणभक्ती असून चालत नाही तर ज्याच्यापासून ज्ञान घेतलं तर याची सेवा घडावी लागते त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.ही जिवीत कार्यातील एकरूपता दोन्हीही व्यक्तिमत्वात आपल्याला पहायला मिळते.आत्माराम दासबोधात समर्थांनी यालाच स्व स्वरूप म्हंटलं आहे.
आत्माराम मधील केवळ दोन ओव्या या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.
   त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ म्हणजे सर्वस्वाचे समर्पण करून माझ्या बोलण्याप्रमाणे आचरण केलं तर तूला मी सत्यस्वरूपापर्यंत नेईन.हे समर्थांनी आपल्या शिष्यांना दिलेलं वचन आहे.ठीक याच प्रकारचा व्यवहार या दोन्हमान्यवरांचा असल्यानेत्यांच्या मुखातून हे अमृताचे ोल प्रगटले.
दुसऱ्या एका ओवीत समर्थ म्हणतात,
बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते॥अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥
शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे ,परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात आपल्या अनुभवाला येऊ लागतो आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच सत्यस्वरूप असतं.या सत्यस्वरूपाचं दर्शन या दोन्ही भाषणातून आपल्या अनुभवाला आलं म्हणून ही 'आत्मारामांची अमृतवाणी 'असल्याचे आपण अनुभवले.
पूजनीय सरसंघचालक यांनी या प्रसंगी केलेलं भाषण यादृष्टीने महत्त्वाचं आहे.ते म्हणतात की,
" आज संपूर्ण देशात एक आनंदाची लाट आली आहे.। शतकानुशतकाची इच्छा आज पूर्ण होतेय.परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठा आनंद भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ज्या आत्मविश्र्वासाची आवश्यकता होती आणि जेआत्मभान  आवश्यक होतं ते सगुण-साकार रूपात प्रस्थापित होण्याचा हा शुभारंभ आज आहे. हे अधिष्ठान है आध्यामिक दृष्टिचं आहे.
' सिया राममय सब जग जानी 'सर्व  जगाला आपल्यात पाहण्याची आणि  आपल्यात संपूर्ण जग पाहण्याची ही भारतीय दृष्टि आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक व्यक्तिचा व्यवहार आजसुद्धा जगात सर्वाधिक सौजन्याचा व्यवहार असतो.आणि आमच्या  देशाचा  सामूहिक व्यवहार सर्वांसोबत ' वसुधैव कुटुम्बकम ' चा असतो. परमवैभव संपन्न  आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा  भारत त्याच्या निर्माणाचा हा  शुभारंभ आहे.
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः'
जीवन जगायचं कसं? याची दृष्टी आमच्याजवळ आहे. कोरोनाच्या स्थितीत  संपूर्ण  जग अंर्तमुख झालंय.त्यांना चिंता आहे  कुठे चुकलं याची.यातून मार्ग  कसा काढायचा याची. तो आमच्याजवळ आहे. तो मार्ग दाखवण्याचं  काम आम्हाला करायचंय. त्याची तैयारी करण्याचा संकल्प आज होतोय.
  अशा प्रकारचा विश्वास, प्ररेणा, स्फुरण आज आम्हाला मिळतंय   कारण 'राम सर्वांचे आहेत आणि सर्वांमध्ये राम आहेत. " ही अनुभूती सरसंघचालकांना मिळाली ती त्यांच्या वाणीतून त्यांनी प्रगट केली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सुध्दा तेवढ्याच तोलामोलाचं होतं.ते म्हणाले की,
" आज पूर्ण भारत राममय झाला आहे. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत  तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे . कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
  हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे 
जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत
भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत . देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे. राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पणही होते आणि तर्पणही  होते, संघर्षही होता आणि संकल्पही होता. ही अनुभूती पंतप्रधान मोदींना आली तीच त्यांनी प्रांजळपणे मांडली.
देशाच्या संस्कृतीविषयी,सभ्यतेविषयी गर्वाने बोलणारा पंतप्रधान यानिमित्ताने सर्वांनी पाहिला.हे त्यांचे सहजोद्गार होते जे सत्यस्वरूपाची अनुभूती घेतल्याशिवाय मुखातून बाहेर पडत नाहीत.म्हणूनच अयोध्येत झालेली दोन्ही भाषणे ही आत्मारामांची अमृतवाणीच होती.असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.



Saturday, August 1, 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक


वाचकहो, 
मन:पूर्वक नमस्कार!
   लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पैलूचे अध्ययन करून मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतांना विलक्षण त्रेधा उडाली कारण लोकमान्य टिळकांचा एक पैलू उलगडायचे म्हटले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील असंख्य अगणित आयाम कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलू लागतात त्यातून नेमकं काय मांडता येईल यासाठी ही त्रेधातिरपीट होत होती. परंतु आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही मालिका पूर्ण झाली.आपल्या सूचनांचे स्वागत करून आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
     विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन ।
     स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।। 
 या श्लोकात जे म्हटलंय यांची तंतोतंत अनुभूती हे लिखाण करतांना आली. राजा आणि विद्वान यांची खरोखर तुलना होवू शकत नाही.कारण राजाचा सन्मान त्याच्या राज्यात होतो पण विद्वान लोक सर्व स्थळी पूजनीय असतात.अष्टपैलू, अष्टावधानी हे शब्द लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना अपुरे पडतात.टिळक हे लोकमान्य,लोकोत्तर युगपुरुष ठरले यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं व्यक्तित्व,कर्तृत्व व दातृत्व बहुआयामी अशा स्वरूपाचं होतं.लोकजागृती, लोकसंग्रह,लोकसंघटन,,या त्रिसूत्रीच्या आधारावर ते लोकमान्य ठरले.
१८८० ते १९२० असा तब्बल ४० वर्षाचा काळ त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यतित केला.त्यात त्यांनी केलेल्या बहुविध कामांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची साक्ष मिळते.एक हुशार  व विद्यार्थी प्रिय शिक्षक ते लोकमान्य नेता म्हणून त्यांचा झालेला प्रवास जगातील विचारवंतांना देखील अचंबित करणारा होता.सव्यसाची शिक्षक,संस्थाचालक, झुंजार पत्रकार, व्यासंगी संशोधक,निस्पृह देशभक्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,परखड देशभक्त, अर्थशास्त्रज्ञ,अभ्यासपूर्ण लेखन, धर्माभिमानी, संस्कृती रक्षक,राष्ट्रहित जोपासणारा धुरंधर राजकारणी,वेदान्तापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर भाष्य करण्याची जाण असणारा विश्लेषक, कलेची आवड असणारा रसिक अशी अगणित रूपं लोकमान्यांच्या जीवनात ठळकपणे समोर येतात.म्हणूनच टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे अनुभवाला येते.त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी देशविदेशातील अनेक विचारवंतांनी विस्तृतपणे विश्लेषण केले आहे.एवढच नाही तर अनेक कवींनी त्यांच्यावर कवने, पोवाडे,आरती,अष्टके संस्कृत श्लोक आदि विविध प्रकारे रचना केल्या आहेत.आपापल्या परीने लोकमान्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील कवी गोविंद यांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केलेली रचना मनाला विशेष स्पर्श करून जाते.
आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद
या कवितेतून लोकमान्यांच्या कांहीं पैलूंवर ते नक्कीच प्रकाश टाकतात. लिहीण्यासारखे खूप आहे.त्यांच्या पावन स्मृती जागवणे आजच्या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकमान्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज लेखणीला विराम देतो!!!!! धन्यवाद 🙏
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Friday, July 31, 2020

टिळकांचा परराष्ट्रीय दृष्टीकोण




संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याची आग्रही मागणी करून त्यासाठी अहोरात्र झटणारे लोकमान्य टिळक सर्वांनाच माहित आहेत. देशबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारशी टक्कर घेणारे, परखड राष्ट्रवाद मांडणारे लोकमान्य  टिळक सर्वसामान्यांना नक्कीच आवडतात. पण,भारताची राजकीय चळवळ प्रभावी करताना जागतिकस्तरावर भारताचे प्रश्न समजून सांगण्यात टिळकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली याबद्दल कोणी फारशी दखल इतिहासात घेतलेली दिसत नाही.टिळकांच्या जीवन चरित्रातला हा दुर्लक्षित पैलू समजून घेणे आवश्यक आहे.
   आंतरराष्ट्रीय जगतात लोकमान्यांचे अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दळणवळणांच्या साधनांचा विकास झालेला नसतांनाही  त्यांनी त्यांच्या काळातील सर्व समस्यांना तोंड दिले आणि त्या सुटाव्यात यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्ष केला. हे करताना त्यांनी भविष्याचा वेध घेतला आंतराराष्ट्रीयस्तरावर आपली बाजू बळकटपणे मांडली.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या चळवळी भारतातच कराव्यात. यासाठी इंग्लडमध्ये शिष्टमंडळे पाठविण्याची गरज नाही असे टिळकांचे मत होते. परंतु पहिले महायुध्द पेटले. इंग्लडची ठिकठिकाणी पीछेहाट होऊ लागली. त्यांचे सेनादल अपूरे पडू लागले. ब्रिटीश सरकारच्या अडचणीचा फायदा घेण्याचे टिळकांनी ठरविले. भारताकडून इंग्लडला मनुष्यबळ, युद्धसामुग्रीच्या उत्पादनात मदत केली जात होती. स्वराज्याचे हक्काची रोखठोक व्यवहारी मागणी त्यांनी प्रत्यक्षात राज्यकर्त्या इंग्रजांकडे आणि त्यांच्या सामान्य मतदार नागरिकांकडे करण्याचे ठरविले आणि इंग्लडमध्ये प्रत्यक्ष जाऊनच हक्क मागण्याचा निर्धार केला. मात्र, यात अडचण होती त्यांनी भोगलेल्या शिक्षेची. राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगलेल्या टिळकांना इंग्लडला जायची परवानगी मिळणे कठीण होते. त्यात युद्धाची धुमश्चक्री सुरू असल्याने इंग्रजांनी राजकीय कारणांमुळे इंग्लडला जाण्याची परवानगी नाकारली. या कोंडीतून त्यांनी मार्ग काढला.
  टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. त्यातून भारताच्या दारिद्रयाचे विदारक चित्र आकडेवारी ते मांडत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखांतून आग्रहाने प्रतिपादन करीत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लडमध्ये जाणा-या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची योजना वर्मा यांनी सुरू केली. टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाची असे ठरले.
स्वा.सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्मा यांनी सावरकरांना शिष्यवृत्ती दिली आणि इंडिया हाऊसमध्ये राहण्याची सोय केली. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशांतही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहका-यांमध्ये मॅडम कामा या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्यांनी १९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथील जागतिक समाजवादी परिषदेत स्वतंत्र भारताचा ध्वज फडकविला. मॅडम कामाच्या या कर्तृत्त्वाचे टिळकांना समाधान वाटले.
त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा दौरा करून भारताची बाजू मांडली. टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्त्वाचा होता.
लोकमान्यांच्य क्रांतीकारकांशी संबंध असे. अर्थात ते त्यांच्या कार्यात प्रत्यक्ष सामील झाले नाहीत. शस्त्र उचलून स्वराज्य निश्चित मिळेल अशी खात्री झाल्याशिवाय आपण तो मार्ग स्विकारणार नाही, असे ते म्हणत. टिळकांनी त्यावेळी मुंबईत असलेल्या रशियन राजदूताशी संपर्क साधला होता. ही माहिती अगदी प्रथम कै.म.म.दत्तोपंत पोतदार यांनी प्रसिद्ध केली. बडोदे सरकारच्या सैन्यात असलेल्या माधवराव जाधव यांना स्वित्झर्लंडमध्ये लष्करी शिक्षणा‌स पाठविण्याची खटपट लोकमान्यांनी केली. जाधव यांना अमेरिकेतील सैनिक विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांना तेथे सर्व लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको यांना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही. जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील, होमरूल डेप्युटेशनचे एक सदस्य बॅ. वेलणकर यांनी पुढील आठवण सांगितली होती. टिळक वेलणकरांना म्हणाले, लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, की आपल्याला स्वराज्य मिळविण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साह्य होईल. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले.
      टिळकांचा दृष्टीकोन विशाल आणि व्यापक होता. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रूपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ''मी राजकीय कार्यकर्ता नाही , मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.'' टिळकांनी त्यांना कळविले, ''तुम्ही राजकीय प्रचार करावा, अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्त्वाची वाटते.''
  ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतात उठाव झाल्यास लष्करी शिक्षण घेतलेल्यांना नेतृत्त्व करता येईल या उद्देशाने भारतीय तरूणांना रशियात तसे शिक्षण घेण्याची संधी मिळेल का याची चाचपणी लोकमान्य टिळकांनी केली होती. तत्कालीन रशियन राजदूतांच्या अहवालांतून याविषयी नोंद आढळते. लोकमान्यांचा हा मनोदय पुढे सिद्धीस गेला नाही कारण खुद्द रशियातच १९०५ मध्ये क्रांती झाली आणि ब्रिटन-रशिया यांमध्ये सहकार्याचे वारे वाहू लागले.
   डॉ. खानखोजे हे सुदधा टिळकांच्या प्रोत्साहनाने परदेशी गेले होते. तेही जपानमार्गे अमेरिकेस मुख्यतः युद्धशास्त्र शिकण्यासाठी गेले. जागतिक स्तरावरील वजन लक्षात घेता भारतीयांच्या प्रश्नाची जगाला मु्ख्यत्त्वे इंग्लडमधील ब्रिटीश सरकारला जाण करून देणारे लोकमान्य टिळकच होते.
लोकमान्य टिळकांच्या या अनोख्या दृष्टीपुढे मनापासून नतमस्तक!!!!! 
             शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Thursday, July 30, 2020

संगीतप्रेमी लोकमान्य टिळक


राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, न्यायालयीन खटले या सर्व धावपळीच्या दिनक्रमात लोकमान्य टिळक आपला वाचन व लिखाणाचा व्यासंग जोपासत असतांना त्यांना असलेली शास्त्रीय गायन व नाट्यगीताची आवडदेखील जोपासत होते.गणेशोत्सवाच्या निमीत्ताने त्यांच्या वाड्यात अधूनमधून गाण्याच्या मैफिली रंगत असत. एकदा नारायण राजहंस हा बालक आपल्या माणसांसोबत टिळकांच्या घरी गेले असता तो एक बंदीश गात असतांनाच टिळकांनी ते ऐकले व त्यांच्या तोंडून ' अरे हा तर बालगंधर्व ' हे सहजोद्गार निघाले.तोच नारायण पुढे बालगंधर्व म्हणूनच प्रसिध्द झाला.
एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने टिळक रहात असलेल्या गायकवाडवाड्यात रात्री बरीच गर्दी जमली होती.संगीत नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, यांच्याशी टिळकांचे स्नेहाचे संबंध होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन होणार होतं. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले त्याला एक वर्ष झालं होतं म्हणून त्यावर्षीच्या उत्सवात बखलेबुवांचं गाणं व्हावं, असं कृष्णाजी खाडिलकरांनी लोकमान्यांना सुचवलं होतं. लोकमान्यांना बखलेबुवांबद्दल प्रचंड आदर होता, त्यामुळे त्यांनी खाडीलकरांची ही सूचना मान्य केली. खुद्द लोकमान्यांनी दिलेलं आमंत्रण बखलेबुवांनीही लगेच स्वीकारलं. कार्यक्रम रात्री ठीक दहा वाजता सुरू झाला. सुरुवातीला मा. कृष्णरावांचं गायन झालं. नंतर बालगंधर्व गायला बसले. काही नाट्यगीतांनंतर लोकमान्यांच्या गुणवर्णनपर ’जो लोककल्याण साधावया’ हे मालकंसातलं पद ते गायले. या दोन्ही तरुण गायकांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. दोन्ही गायक श्रोत्यांचे लाडके, आणि त्यांच्या नाट्यगीतांनी तमाम गानरसिकांना वेड लावलं होतं. मध्यरात्री एक वाजता भास्करबुवा बैठकीवर आले. त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. बुवांना हा अनुभव नवीन नव्हता. बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि बुवा या तिघांचे जलसे भारतभर सतत होत असत. या जलशांना तोबा गर्दी उसळत असे. पण प्रत्येक ठिकाणी बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांच्या पदांना भरपूर दाद मिळे. बुवांचं शास्त्रीय गायन सुरू झालं, की श्रोत्यांचा बैठकीतला रस ओसरे. बुवांच्या नाटकातल्या पदांना मात्र जोरदार दाद मिळे, त्यांनी नाट्यगीतं गावीत, असा आग्रह होई. नाट्यगीतांनी श्रोत्यांना वेड लावलं, तरी शास्त्रीय गायनात आता त्यांना रुची राहिली नव्हती, याचं बुवांना फार वाईट वाटे.
गायकवाडवाड्यात त्या रात्री भास्करबुवांचं गाणं सुरू होताच श्रोत्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अनेकजण बुवा गात असतानाच उठून जाऊ लागले. बैठकीला लोकमान्य उपस्थित होते. भास्करबुवांसारख्या थोर गायनाचार्यांचा असा अपमान त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. ते उभे राहिले, आणि श्रोत्यांना म्हणाले, "आजचा कार्यक्रम गणपतीउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा यांच्या गायनाला सुरुवात झालेली आहे, आणि ते तुम्ही शांतपणानं ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कोणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं, पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं, ते वाटतं म्हणजे असं की, त्यांची कला फार मोठी आहे, आणि त्याबद्दल विचार करण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून भास्करबुवांना मी मुद्दाम तसदी दिली. ते इथे आले, आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. त्यांनी उत्तमप्रकारे काम केलं आहे, याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं, प्रत्यक्ष गजाननस्वरूप  भास्करबुवा बखले यांच्या घातल्याचे कार्यक्रम ऐकण्याचा प्रसंग वारंवार येऊ द्यावा, अशी प्रार्थना मी करतो."
टिळकांच्या आवाहनानंतर श्रोते अर्थातच शांत झाले, आणि पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला. बुवा अडीच तास गायले. गाणं संपल्यानंतर लोकमान्यांनी सर्वांना घरात नेलं, आणि बुवांच्या गाण्याची मनापासून प्रशंसा केली. मोठ्या प्रेमानं जरीचं उपरणं लोकमान्यांनी बुवांच्या अंगावर घातलं. नंतर लोकमान्य कंदील घेऊन उंबर्‍या गणपती चौकापर्यंत बुवांना सोडायला आले होते.या एकाच प्रसंगांतून लोकमान्य टिळकांचं संगीत प्रेम किती होतं हे लक्षात येतं. संगीत कलेची आवड जोपासत कलाकारांना प्रोत्साहन देणारे लोकमान्य आपणांस नक्कीच वंदनीय आहेत!!!!!!!!
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Wednesday, July 29, 2020

लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार


आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरत असूनही लोकमान्य टिळक  मूलभूत अध्यात्मिक अध्ययन व  चिंतनापासून कधीच दूर गेले नाहीत.याउलट अध्यात्म आणि राजकारण,अध्यात्म आणि राष्ट्रवाद याची सांगड घालून अनेक तरूणांना त्यांनी त्याकाळात निस्पृह देशभक्तीसाठी प्रवृत्त केले.निष्काम कर्मयोग हा त्यांच्या समग्र विचारांचा गाभा होता.त्यांचा प्रत्येक व्यवहार याच दिशेने जाणारा होता.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते.
       महर्षी योगी अरविंदांनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही.
१९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”
     टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे. लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले.
टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.
  लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्‍तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.
   शसुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात. 
मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे.
जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हाच त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार होता.मोक्षाप्रत जाणारा अध्यात्ममार्ग हा केवळ तत्त्वचिंतन अथवा तपश्चर्येतून जात नाही तर निष्काम कर्मयोगातूनही मोक्षाप्रत जाता येते हे त्यांनी आपल्या विचारातून आणि व्यवहारातून सिध्द केले.अशा महान कर्मयोगी टिळकांच्या चरणी हे विचार पुष्प सादर समर्पण!!!!!!
                                           शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


Tuesday, July 28, 2020

निष्णात कायदेतज्ञ टिळक


      लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे टिळक हे सर्वोत्कृष्ट वकीलच नव्हे तर निष्णात कायदेतज्ञ होते.वकील हे केवळ समोर आलेल्या खटल्याच्या कायदेशीर बाबी तपासून आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात पण टिळकांनी अनेकदा कायद्यालाच आव्हान देवून त्या कायद्यात सुधारणा करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले.  
१८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली
संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा लेख लिहिला. त्या वेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करीत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदा., सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादीअनेक सुधारणांचा त्यात समावेश होता.
पुण्यातील पंचहौद मिशनतर्फे १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.
हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. 
२२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.
शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. 
या सुमारास टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्‌भवले. यात इंग्रज अधिकारी, कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने, खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तऐवज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला; पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथमहाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली.
जुलूम तो जुलूम; मग तो कायदेशीर असो  किंवा बेकायदेशीर  असे परखड मत ते व्यक्त करीत.
भारतमंत्री सर एडविन माँटेग्यू यांनी २० ऑगस्ट १९१७ रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. या वेळी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले.
१९१९ मध्ये अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे; माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अपुऱ्‍या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत, असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले; परंतु सुधारणा अपुऱ्‍या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये; आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका, असा टिळकांचा सल्ला होता.
व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले;
अशाप्रकारे अनेक खटले चालवून भारतीय जनतेला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.अन्यायकारक जुलमी कायद्याच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला
अशा महान कायदेतज्ञ टिळकाना लक्ष लक्ष नमन!!!
                                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...